नवीन लेखन...

माझी बोली भाषा

एका संकेतस्थळावर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही.

आमचे आजोबा दिल्लीत स्थायिक झाले होते. वडिलांचे शिक्षण हि दिल्लीतलेच. आमच्या वडिलांची भाषा म्हणजे उर्दू, हिंदी, मराठीचे मिश्रण. जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात आम्ही भाड्यावर राहायचो तिथे पंजाबी, गुजराती, बंगाली, हिंदी भाषी आणि मराठी भाषी असे ८-९ भाडेकरू होते. शेजार बनिया आणि मुसलमान. आमचे घरमालक कडक शिस्तीचे होते. वाड्यात राहणाऱ्या कुणा मुलाच्या तोंडून ‘साला’ शब्द जरी बाहेर पडला तर श्रीमुखात फडकावयाला कमी करत नसे. संध्याकाळी वडील घरी आल्यावर तोंड-हात धुवायचे आणि नंतर आई देवासमोर दिवा लावायची. रामरक्षा आणि शुभंकरोती म्हणायचो. (आंम्हाला तीच मराठी वाटायची, नंतर कळले रामरक्षा आणि स्त्रोते इत्यादी संस्कृत भाषेत असतात).

जुन्या दिल्लीत मराठी परिवार हि होते. रविवारच्या दिवशी सर्व मराठी मुले, महाराष्ट्र समाजात खेळायला जमत असू. आपसांत बोलताना सुरुवात मराठीतून व्हायची आणि नंतर केंव्हा हिंदीत बोलू लागू कळत नसे. कुणी मोठ्यानी टोकले ‘जरा मराठीच बोला’ तेंव्हा लक्ष्यात यायचे. अश्यारितीने अधकचरी मराठी बोलायला शिकलो. माझ्या बोली भाषेवर – उर्दूची अदब आणि तहजीब, शुद्ध हिंदी (शालेय शिक्षक) आणि घरची मराठी या सर्वांचा परिणाम झाला. वर्ष-दोन वर्षांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नागपूरला जायचो. तिथे गेल्यावर वाटायचे इथली मुले किती असभ्य. यानां बोलण्याची तमीज सुद्धा नाही. मोठ्याशी हि अरे-तुरे करतात. तिथे आमची, “काका आपल्या साठी पाणी आणू का?(चाचाजी आपके लिये पानी लाऊं क्या).” काका वैतागून म्हणायचा हे काय आप, आपण लावून ठेवले आहे, अरे मला तू म्हणत जा. पण मला, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर सोडा, लहान मुलांना हि, ‘तू’ म्हणणे आजगयात जमले नाही.

आई भंडार्याची होती. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एक दोन वेळा आजोळी गेलो होतो. तेही ८-१० वर्षाचा होतो तेंव्हा. एवढे आठवते, आम्हा भावंडांचे बोलणे ऐकून, तुम्ही मुसलमान आहात का? अशी विचारणा केल्या गेली. नंतर एकदा लहान मामाच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो. नुसती मुंडी हलविण्याचे काम केले, कारण लोक काय बोलत आहे काहीच कळत नव्हते. असो.

पुन्हा प्रश्न आलाच, माझी बोली भाषा कुठली. मला आठवले, एकदा माझ्या भावाला एक शेजारच्या मुलाने शिवी दिली, दगड हातात उचलीत तो म्हणाला, “मनोजजी, इज्जत से बात कीजिएगा, आइन्दा बत्तमीजी की तो हमसे बुरा कोई नहीं होगा, हमारा निशाना सटीक है, तुम्हारा डोक फोड़ दूंगा. समझे.” बहुधा हीच माझी बोली भाषा. कारण भांडताना आपण आपली खरी भाषा लोकांसमोर उघडी करतो.

— विवेक पटाईत 

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

1 Comment on माझी बोली भाषा

  1. नमस्कार.
    #आपला वाढत्या वयातील आढवणींचा, भाषेबद्दलचा लेख आवडला. खरे आहे, हिंदी-हिंदुस्तानी-उर्दूभाषी ‘आप’ चा उपयोग सारखा करतात. मराठीत ‘तुम्ही’ हेंच नॉर्मल. कोंकणीत तर सगळ्यांना ‘तूं ‘ म्हणायची पद्धत आहे. एकेका भाषेचा गुण वेगवेगळा.
    # मला आठवते : मी हायस्कूल शिक्षणाच्या वेळी इंदौरला होतो, तेव्हां : भांडाभांडी झाल्यावर ‘तूतूमैंमैं’ होतेच. समोरचा मुलगा आप पासून तुम व नंतर तू वर उतरला की मग आपण म्हणायचे ‘आपको इतनी भी तमीज़ नहीं है कि तू तू करके बात कर कहे हैं ’. झालें, समोरचा मुलगा वरमून गप्पच बसायचा.
    # अशीच एक , हिंदी प्रदेशातील धेडगुजरी मराठीची आठवण : ‘ती कूदती आहे’ असे मिक्सड् वाक्य ; पण ऐकू काय येते : ‘ती कुत्ती आहे’ !
    #मराठीत बोली भाषा आहेत. नगरी-मराठवाडी-वर्‍हाडी-अहिराणी-खानदेशी-कोल्हापुरी-संगमेश्वरी-मालवणी वगैरे बोलीभाषा मराठीत आहेत. याव्यतिरिक्त, चित्पावनी-कोकणी वगैरेही आहेत, ज्या आता जवळजवळ अस्तंगत झाल्या आहेत. कांही बोलीभाषांमधील फरक काही शब्दांचा आहे, व मुख्यत्वे ‘हेला’चा ( लहज़ा). अहिराणी ही खरेतर हिंदीची बोली आहे असे म्हणतात. मात्र ती बोलली जाते तो प्रदेश खानदेशात आहे, म्हणून तिला मराठीची बोली म्हणायला हरकत नसावी.
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..