नवीन लेखन...

आठवडी बाजार

रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात.

असा बाजार शहरात पहायला मिळणं आता तसं कठीणच .आपल्या शहरांमध्ये जागोजागी वेगवेगळी दुकान असतात. त्या दुकानांमध्ये सुईपासून सायकलपर्यंत सगळं काही मिळतं . त्यासाठी आपल्याला त्या त्या दुकानात जाव लागत.आपल्याला हवं तेव्हा आपण दुकानात जातो आणि हव्या त्या वस्तू अगदी सहज खरेदी करून येतो. पण लहान गावांमध्ये मात्र अजूनही अशी दुकान नाहीत त्यामुळे अशा गावांमधली माणसं वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी या गंमतशीर आठवडी बाजारावर अवलंबून असतात. चला तर मग  आमच्या गावच्या आठवडी बाजारातून फेरफटका मारून येऊया…

हे पहा कुणीतरी भांडी विकत घेतो आहे तर कोणी दोन ताई नवे कपडे खरेदी करीत आहेत, कुणी काकू भेंडीचा एक वाटा विकत घेताना दिसते आहे तर कुणी आजोबा पान आणि चुना ठेवायची डबी आणि चंची विकत घेत आहेत.

पाचलचा रस्ता गर्दीने भरून वाहतो आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला तात्पुरता आसरा तयार करून छोटी छोटी दुकानं थाटली गेली आहेत. काय काय विकत आहेत बरं चला पाहूया. सुरी कात्री लाईटर, प्लास्टिकच्या खेळण्यांची दुकानं, चपला, रंगीबेरंगी चादरी, स्टील आणि अल्युमिनियमची भांडी, मुलींसाठी आणि महिलांसाठी छान छान बांगड्या गळ्यातलं कानातलं अगदी सेफ्टी पिनासुद्धा.लहान मुलांची पुस्तकं कुणी विकत आहे तर काही दुकान छोट्या  विजेरी विकत आहेत. काही ठिकाणी वेताची टोपली, पाखडायचे सूप, केरसुण्या झाडू असा छान मांडून ठेवलं आहे. एक छोटासा दादा आई बरोबर बाजार फिरून दमला आहे आणि तो आईबरोबर उभा राहून गाडीवर आईस्क्रीम खातो आहे त्याच्यासाठी आजचा दिवस म्हणूनच गमतीचा असतो.

चला आता मुख्य रस्ता सोडून उजवी कडे वळूया. या मोठ्या मैदानात प्रत्येकाने आपापल्या शेतातून, बागेतून भाज्या, फळे, धान्य विकायला आणले आहे.

पहिल्या रांगेत मसाल्याचे पदार्थ, डोक्याला लावायचे तेल इथपासून ते धान्य विक्री करणारी दुकान थाटली आहेत आणि हे सगळे पदार्थ एकावेळी एकाच दुकानात मिळतात.दुसऱ्या रांगेमध्ये भाजी विक्रेते बसले आहेत. काहीजण तराजूमध्ये तोलुन वजन करून भाजी विकतात तर काहीजण छोट्या ताटलीत भाज्यांचे वाटे करून ठेवतात. हिरव्यागार तजेलदार तिखट मिरच्या, या दिवसांत भरपूर मिळणारा मटार फ्लॉवर आणि कोबी चे गड्डे, ताज्या रसरशीत पालेभाज्या असं सारं काही रंगीत साम्राज्य पसरलं आहे. त्याच्या थोड पलीकडे मासळी बाजार भरला आहे. त्याच्याही पुढे कपड्यांची दुकाने मांडली आहेत. पलीकडच्या बाजूला काय काय आहे माहिती आहे ?

बेकरीवालेदादा सायकलला पिशव्या लावून खारी बिस्किट, टोस्ट असं काही विकत आहेत. त्यांच्या बाजूलाच फळवाल्यांची अनोखी दुनिया आहे. बाजारातून फेरफटका मारला की वस्तू विकत घेणारे आणि त्या विकणारे यांच्या आवाजाचा सावळागोंधळ अनुभवायला मिळतो. त्या गर्दीतच आपणही घुसायचं आणि आपल्याला हव्या त्या वस्तू विकत घ्यायच्या.सगळीकडे फिरून आधी भाव म्हणजे किंमत काय आहे हे समजून घ्यायचं आणि मग स्वस्त आणि मस्त जिथे मिळेल ते घ्यायचं. यातही खूप मज्जा येते.

पुढच्या बुधवारपर्यंत घरात लागणाऱ्या सर्वच गोष्टी आज आठवणीने विकत घ्यायच्या असतात त्यामुळे पिशव्या भरभरून लोक खरेदी करत असतात. आठवडी बाजाराची आणखी एक मज्जा म्हणजे पंचक्रोशीतल्या गावांमधले ओळखीचे किंवा आपले नातेवाईक इथे भेटू शकतात मग त्यांचा गप्पांचा फड इथे जमतो. खरेदी करून थकलेले पाय चहाच्या टपरीकडे वळतात किंवा उसाच्या रसाच्या गाडीकडे.

ते जसे दमतात तसेच उन्हात बसून विक्री करणारे ही दमत असतीलच की. मग एखादा दादा त्यांच्यासाठी म्हणून ताक विकायला आणतो तर कोणीतरी अल्युमिनियमच्या किटलीत गरम गरम चहा घेऊन येतो. अशी सगळी गंमत इथे सुरू असते सूईपासून भांड्यांपर्यंत आणि रूमालापासून शर्ट पर्यंत सर्व काही इथे एकाच जागी एकाच वेळी विकत मिळतं . शहरात आता मोठ्या मोठ्या मॉल मध्येही आपण हेच अनुभवतो पण शहरात त्या सगळ्याला एक आधुनिक आणि व्यावहारिक स्पर्श आहे .गावातल्या आठवडी बाजाराला आजही निसर्गाचा हळूवार स्पर्श जाणवतो. गावकऱ्यांच्या गप्पांमधून प्रेमाचा ओलावा दिसतो ,आपलेपणा मनाला भिडून जातो.

गावांमध्ये अनेक घरांमध्ये वीज बरेचदा नसतेच. शहरासारखे इथल्या घरांमध्ये साठवणुकीसाठी फ्रीज असतातच असं नाही. त्यामुळे आठवडी बाजारातून नेलेला भाजीपाला नीट सांभाळून ठेवणे आणि पूर्णपणे वापरणे हीसुद्धा मोठी जबाबदारी असते

आपण शहरात खूप सहज आपली दुचाकी किंवा चारचाकी काढतो आणि खरेदी करून येतो पण गावात असं असतं असं नाही. त्यामुळे बाजाराच्या दिवशी शेअर रिक्षा, एसटी यातून माणसं खच्चून भरलेली असतात. येताना तरी त्यांच्या पिशव्या रिका म्या असतात पण घरी परतताना त्यात आठवड्याची सर्व बेगमी भरलेली असते.

आठवडी बाजाराच्या दिवशी सहसा गावात कामाला सुट्टीच घेतली जाते कारण आपल्या गावातून बाजाराच्या गावी जायला वेळ लागतो.
आठवडी बाजार ही अशी एक रंगीबेरंगी आणि लोभसवाणी दुनिया आहे. या बाजारात एखादा फकीर आपला मोरपिसाचा पंखा दुकानदाराच्या डोक्यावर ठेवत त्याच्याकडून आपल्या पोतडीत भाजीचा वाटा सहज घेऊन जातो .एखादी भाजी विकणारी आजी किंवा काका खरेदीला आलेल्या छोट्या मुलीला एक गाजर असंच खाऊ म्हणून पण देऊन जातात. ही आत्मीयता गावातल्या बाजारात अनुभवणं हा विशेष आनंदाचा ठेवाच आहे. त्यासाठी एकदा तरी एखाद्या छोट्या गावातल्या आठवडी बाजाराला भेट द्यायला हवी हे मात्र नक्की. कधी येताय मग? मंगळवारीच या हां. म्हणजे बुधवारी लवकर उठून बाजार मांडला जात असतानाची मजजा ही पहायला मिळेल. या नकी. वाट पाहते.

घरात स्टोव्ह,छत्री,चप्पल असं काही नादुरूस्त असेल तर ते ही आणा बरोबर. इथले तात्पुरत्या दुकानात बसलेले काका तुमचं काम पटकन् करून देतील बरं का…

— आर्या आशुतोष जोशी 

Weekly Market 

Avatar
About आर्या आशुतोष जोशी 21 Articles
संस्कृत विषयातील विद्यावाचस्पती पदवी. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, इतिहास या विषयातील संशोधन आणि लेखन, व्याख्याने आणि शोधनिबंध

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..