नवीन लेखन...

‘आशिकी’

‘गुणगौरव’मध्ये कमर्शियल कामांची सुरुवात करुन पाच सहा वर्षं झाली होती. तीन चार ऑफिसबाॅय मदतीला ठेवून पाहिलं होतं. त्यांच्यापैकी कुणीही जास्त काळ टिकले नाहीत. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, आम्ही दोघंच कामं पार पाडत होतो.
त्यावेळी छत्रपती राजाराम मित्र मंडळ चौकातला जिगरी दोस्त नरेंद्र लिम्हण ऑफिसमध्ये येऊन बसायचा. तो एकदा सहज बोलून गेला, ‘तुमच्या मदतीला एका मुलाला सांगू का? त्याला थोडी मदत होईल आणि तुमचीही जवळची कामं तो करेल.’ आम्ही होकार दिला.
त्यावेळी नुकताच पहिला ‘आशिकी’ प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटातील सर्व गाणी तुफान गाजली होती. नदीम श्रवणचं सुश्राव्य संगीत, अनुराधा पौडवाल व कुमार सानुच्या सुमधुर आवाजातील गीतांनी तरुणांना वेड लावले होते. गीतकार समीरने लिहिलेले सर्व गीतांचे बोल हे साधे, सोपे असल्याने प्रत्येकाला ती गाणी गुणगुणावीशी, ऐकावीशी वाटत असत.
नरेंद्रने सुचविलेला मुलगा चौकातच रहाणारा होता. त्याचं नाव होतं गणेश. गणेश हा वयानं अठरा एकोणीस वर्षांचा होता. त्याच्या पाठीवर त्याला दोन लहान भाऊ होते. आई चार घरची धुणीभांडी करायची. त्याची आई जाता येता रस्त्यावर नेहमी दिसायची. ती कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा लावीत असे. वडील हमाली करायचे. गणेश स्वभावाने अतिशय गरीब व भोळा भाबडा होता. त्याला चांगल्या आवाजाची दैवी देणगी लाभलेली होती. त्याचं वयच असं होतं की, त्याला ‘आशिकी’ ची सर्व गाणी तोंडपाठ होती. चौकातील टवाळखोर मुलांना त्याची गंमत करायची लहर आली की, त्याला वाटेत अडवून ‘नजर के सामने, जिगर के पास…’ गाणं म्हणायला लावत, तो देखील त्यांची ‘फर्माईश’ पूर्ण करीत असे.
नरेंद्र एके दिवशी गणेशला ऑफिसवर घेऊन आला. उभट लंबगोल चेहऱ्याचा, जिरेकट केलेला, अंगात ढगाळा खाकी शर्ट व खाली पॅन्ट, पायात स्लीपर घातलेला गणेश मंद स्मित करीत समोर उभा राहिला. त्याला बसायला सांगितल्यावर तो संकोचून बसला. त्याला कामाची कल्पना दिली व उद्यापासून ये असं सांगितलं.
आम्ही त्याला झेराॅक्स काढायला, कुणाला निरोप द्यायला पाठवायचो, कधी तात्या ऐतवडेकरांकडे ब्रोमाईड आणायला पाठवायचो. कधी चहा आणायला ‘चंद्रविलास’मध्ये पाठवला तर त्याला फारच उशीर लागत असे. त्याचे कारण शोधायला गेल्यावर कळायचे की, त्याला वाटेत अडवून कुणीतरी ‘आशिकी’ मधील ‘धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना…’ हे गाणं गायला लावले होते.
दिवसेंदिवस ‘आशिकी’चे चाहते वाढत होते. आमच्याकडे येणारा प्रकाश कान्हेरे, प्रभाकर दळवी, इ. मंडळी त्याच्या आवाजावर फिदा होती. सुमारे चार महिने गणेशने आमच्याकडे काम केले. आमच्या ऑफिसच्या पलीकडचा रोड, ही मेडिकल डिस्ट्रिब्युटर्सची गल्ली आहे. ह्या संपूर्ण गल्लीत शंभर सव्वाशे दुकानं आहेत. गणेशला गल्लीतील एका दुकानात काम मिळणार होतं, म्हणून तो आमचं काम सोडणार होता. मात्र हे आम्हाला सांगण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं, त्यानं ते आईला सांगायला लावलं. आम्ही होकार दिला.
त्यानंतर काही वर्षे तो अधूनमधून दिसायचा. दरम्यान त्याचे वडील गेले. त्यामुळे आईचा चेहरा ठसठशीत कुंकवाविना भकास दिसू लागला. काही दिवसांनंतर त्या चौघांपैकी कोणीही दिसेनासं झालं. कदाचित रहायला लांब कुठेतरी गेले असावेत.
आता या गोष्टीला पंचवीस वर्षे लोटली आहेत. ‘आशिकी’ परत दिसलाच नाही. ‘आशिकी’ चित्रपटातील कलाकार देखील वय वाढल्याने आता ओळखता येणार नाहीत, इतके बदलले आहेत. नंतर ‘आशिकी २’ हा देखील चित्रपट येऊन गेला. त्यालासुद्धा पहाणारे रसिक विसरुन गेले, मात्र पहिल्या ‘आशिकी’तलं कोणतंही गाणं कानावर पडलं की, गणेश उर्फ ‘आशिकी’ची आठवण येतेच… कारण काही माणसं ‘हृदयात’ घर करतात तर काही ‘मनात’ घर करतात… गणेशने मात्र त्याची गाणी ऐकणारांच्या ‘कानात घर’ केलंय….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
७-९-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..