नवीन लेखन...

अन्नपूर्णा

जगद्गुरू शंकराचार्य यांनी जिचा गौरव- ‘नित्यानंदकरी वराभयकरी’ (नित्य आनंद देणारी, श्रेष्ठ आणि अभय देणारी) म्हणून केला आहे, अशी अन्नपूर्णा देवी, भारतीय घराघरात गृहिणीच्या रूपात नांदत असते. परंतु इतरांना जाऊ दे, या अन्नपूर्णेला तरी तिच्या या ‘स्वरूपाची जाणीव आहे का?’

भारतानं स्वातंत्र्य प्राप्त केल्यावर, दुर्दैवानं आपल्याकडील शिक्षणपद्धतीवर वामपंथी विचारांचा प्रभाव राहिला. त्यातून ‘चूल आणि मूल’ या निरर्थक, अनावश्यक, क्षुद्र, फालतू गोष्टी आहेत असा संस्कार सर्व भावी अन्नपूर्णांवर सतत झाला आणि त्यामुळे त्यांच्यातील ‘अन्नपूर्णाबीज’ कमकुवत करण्याचे प्रयत्न केले गेले. मनुष्यानं केलेल्या प्रत्येक कर्माचा आणि घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा ‘धन रूपात’ परतावा मिळत असेल तरच कोणतेही कर्म किंवा क्षण सार्थकी लागले असा बुद्धीवर संस्कार केला गेला. धनाच्या रूपात परतावा मिळत नसेल तर आयुष्य देखील व्यर्थ आहे, इथपर्यंत हा ‘अर्थवाद’ जीवनावर हावी झाला आहे. साहजिकच ‘चूल’ (हा विषय लेखाशी संबंधित असल्यानं केवळ हाच मुद्दा घेऊ.) हा विषय किरकोळ, चार पैसे टाकून करून घेण्याचा, फारशी बुद्धी न लागणारा, कालापव्यय करणारा, करियरच्या आड येणारा…. वगैरे वगैरे निरर्थक असल्याची खूणगाठ, अनेक महिला मनाशी बांधून आहेत. ही बाब मला चिंतनीय वाटते.

हिंदुस्तानातील १४ विद्या (शास्त्र) आणि ६४ कला यांच्याविषयी आपण अनेक वेळा वाचतो. पैकी विद्यांसाठी बुद्ध्यांकाचा तर कलांसाठी (कौशल्यासाठी) भावनांकाचा कस अधिक लागतो. स्वयंपाक (चूल) हे शास्त्र आणि कला दोन्ही आहे. त्यामुळे यात बुद्धी आणि भावना यांचं संतुलन साधलं जातं. स्त्रिया निसर्गतः भावनाप्रधान असतात. त्यामुळे कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय त्या कौशल्य विकसित करू शकतात आणि दैनंदिन आयुष्यात त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात.

सनातनी सिद्धांतानुसार मनुष्य हा ईश्वराचा छोटा अंश आहे. ईश्वराला सृष्टी निर्माण करण्यात जसा आनंद मिळतो, तसाच आनंद मनुष्याला नवनिर्मिती (creativity) मधे मिळतो. नवनिर्माण हा गुणच स्त्रियांचा आहे पूर्वीच्या काळी रांगोळ्या, भरतकाम, शिवण, विणकाम, फुलांचे दागिने, विविध सजावटी अशा अनेकानेक कामात स्त्रिया आपले कौशल्य वापरत आणि नवनिर्मितीचा आनंद घेत. दुर्दैवानं आता धनाच्या अभिलाषेनं खूप स्त्रियांनी ही आनंददायी कामं सोडली आणि कुठलीही नवनिर्मिती (creativity) नसलेली रटाळ कामं हाती घेतली आहेत. अशी रटाळ कामं केल्यावर कंटाळा येतो, दंमायला होतं, सतत बदल हवासा वाटतो तो त्यामुळेच.

नवनिर्मितीचा आनंद देणारी आणि महिलांनी अजून पूर्णतः न त्यागलेली कला म्हणजे स्वयंपाक. कुटुंबासाठी ती जितकी आवश्यक आहे, त्यापेक्षा काकणभर अधिक ती महिलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.

स्वयंपाक शास्त्र.

आपण जसं अन्न खातो तसंच आपलं शरीर आणि पुढील प्रजा निर्माण होते. म्हणजेच सुदृढ शरीर हवं असेल तर काय, केव्हा, किती, कधी, कोणते संस्कार करून खावं याचे काही नियम असणार- तेच शास्त्र. कुठल्या ऋतूत कुठले पदार्थ खायचे (उदा. उन्हाळ्यात पेय, थंडीत तिळगुळ, पावसाळ्यात लोणचं), त्यांच्यावर कुठले संस्कार करायचे (उदा. दही घुसळून ताक) आणि कुठले टाळायचे (उदा. दही/ मध हे पदार्थ तापवायचे नाहीत.), कुठले पदार्थ कुठल्या पात्रात ठेवायचे (दूध चांदीच्या पात्रात ठेवायचं) किंवा ठेवायचे नाही (आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात नाही ठेवायचे), कुठल्या आजारात काय खायला द्यायचं (उदा. जुलाबात ताक, खोकल्यात मध, अरुची असेल तर आंबट पदार्थ) आणि काय टाळायचं (उदा. तापात जेवण, अपचनात शिळे पदार्थ) असा याचा पसारा मोठा आहे. या शास्त्रात भारतीय स्त्रिया पारंगत असायच्या. त्यांच्याकडून पुढील पिढ्यांना हे ज्ञान विनामूल्य, विनाश्रम प्राप्त व्हायचं.

त्यातूनच कुटुंबातील सर्वांच्या रसनेद्रियांची तृप्ती आणि सगळ्यांचं आरोग्य या दोन्ही गोष्टी साधल्या जायच्या. आजही तरूण पिढीनं यात रस घेतला तर आवश्यक मार्गदर्शन करणाऱ्या आज्या घरोघरी उपलब्ध आहेत. शिष्य म्हणून शरणागती पत्करण्याचा अवकाश, हे शास्त्राचं भांडार त्यांच्यापुढे खुलं होईल. आपल्याला आणि पुढील पिढ्यांना देखील ते उपयुक्त ठरेल.

स्वयंपाक एक कला

कुठलाही तयार पदार्थ डोळ्यांना सुंदर दिसला, त्याचा सुगंध दरवळला की खावासा वाटतो. तसा तो बनवणं ही कला. गोल पोळ्या, एकसारखी चिरलेली भाजी, बारीक चिरलेली कोथिंबीर (कित्येकांना ही जमत नाही), पदार्थाचा रंग लाल/ हिरवा राखण्यासाठी करायचे प्रयत्न, पदार्थाची सजावट, त्याला हवी तशी चव येणं, एखादी गोष्ट उपलब्ध नसेल तरी पदार्थ छान होणं (कोंड्याचा मांडा करणं ही म्हण त्यावरूनच तर आली.), पदार्थांना हवासा सुगंध येणं, बिघडलेला पदार्थ युक्तीपूर्वक दुरुस्त करणं… हे सोपं नसलं तरी खूप स्त्रियांना प्रयत्नांती साध्य होतंच! गुळपोळी, सुरळीच्या वड्या, पुरणाची पोळी, सामोशाचा सुंदर त्रिकोणी आकार, लुसलुशीत इडली, खुसखुशीत चकली, मऊमोकळा मसालेभात, फक्कड चहा, जायफळाची कॉफी, पापुद्रा फुगलेली पातळ भाकरी, लाडवाचा पाक, कुरकुरीत शेव, वडीचं दही… हे जमलं की महिलांना होणाऱ्या आनंदाला दुसरा काही पर्याय आहे का?

वैयक्तिक शारीरिक स्वास्थ्य

भारतीय चारी ठाव, षड्रसयुक्त स्वयंपाक करायचा असेल तर रोज भाजी, आमटी, पोळी/भाकरी, भात, कोशिंबीर आणि चटणी असे किमान सहा पदार्थ करायचे असतात. हे बनवताना काही पूर्वतयारी करावी लागते. त्यात शरीराचे वेगवेगळे सांधे आणि स्नायू कार्यरत राहतात. स्वयंपाक करताना होणारी उठबस ही जिममधल्या squat चंच रूप नाही का? इथे ते विनामूल्य होतं. भाजी चिरणं, नारळ खोवणं, कणिक तिंबणं यात हालचालींचं वैविध्य आहे. पूर्वी यात कांडण, जात्यावर दळण (आता समोर जातं आहे असं समजून दळायचाच व्यायाम स्थूल महिलांना करायला सांगतात रामदेवबाबा.), पाटा वरवंटा, चूल सारवणं अशा अनेक गोष्टींची भर होती. आज त्या कालसुसंगत वाटत नसल्या तरी स्वास्थ्यसुसंगत निश्चित होत्या.

स्वयंपाक आणि मनः स्वास्थ्य

सर्वप्रथम स्वयंपाक ही कला असल्यानं रोजचे सगळे पदार्थ हवे तसे बनवता आले की होणारा निर्मितीचा आनंद अद्वितीय असतो. घरच्या लोकांनी, पाहुण्यांनी तो पोटभर खाऊन प्रशंसा केली की समाधान न वाटणारी स्त्री दुर्मीळ आहे. नुसत्या पोचपावतीच्या बळावर ती दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी छान बनवायला घेते. या स्वयंपाकात कर्तव्यपूर्तीचं समाधान, नवनिर्मितीचा आनंद, आपल्या माणसांना तृप्त केल्याचा संतोष, त्यांच्या आरोग्याविषयीची निश्चिंतता असे आनंदाचे किती कंगोरे सामावलेले असतात!

माझ्या परिचयाच्या एक मामी आहेत. वय सत्तरीच्या आसपास असेल. एकट्या असतात. पैशांची अजिबात ददात नाही. ठरवलं तर प्रत्येक कामाला नोकर ठेवू शकतात. पण वेळ जावा, हालचाल राहावी आणि आवड आहे म्हणून त्या तिन्ही वेळा घरात अन्न शिजवतात. इतकंच नाही तर आसपासच्या आजारी, एकट्या महिलांना निःशुल्क डबा देतात. साफसफाई करणाऱ्या बाईला रोज आपल्या सोबत दुपारी जेवायला बसवून घेतात. त्या सुगरण असल्यानं, रसनेंद्रियांचा आनंद वाटतात आणि स्वतः ही आनंदी राहतात.

थोडक्यात काय तर चूल सांभाळण्याचं काम हलकं किंवा बाळगण्याचं मुळीच न्यूनगंड नाही. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी ते अत्यावश्यक आहे. वाग्भटाचार्य तर सांगतात की अगदी राजाच्या आचाऱ्यानं देखील राजाला न विचारता, राजाला हितकर काय हे वैद्याला विचारून स्वयंपाक करावा. घराघरातील गृहिणींना हे वैद्यक ज्ञान परंपरेनं प्राप्त होत होतं आणि आजही होऊ शकतं. त्यातून प्रत्येक व्यक्तीचं स्वास्थ्य, उत्तम कार्यक्षमता, औषधांच्या आणि रुग्णालयांच्या खर्चात कपात… असे कितीतरी फायदे वैयक्तिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय पातळीवर मिळू शकतात.

‘महिलांनीच का स्वयंपाक करायचा?’ हा वामपंथी लोकांचा विघ्नसंतोषी प्रश्न आता प्रत्येक महिलेच्या जिभेवर. धनुष्यावर चढवलेल्या बाणाप्रमाणे तयार असतो. त्याचं उत्तर कितीही वेळा आणि कितीही शास्त्रीय पद्धतीनं दिलं तर कान झाकलेल्या आणि पटवून घ्यायचं नाही असं ठरवलेल्या लोकांना ते पटणार कसं?

गृहिणी आणि गृहस्थ यांच्या कामाची वाटणी ही त्यांच्या नैसर्गिक कल (aptitude) आणि क्षमता यावर आधारित आहे. स्वयंपाकासाठी आवश्यक सर्व क्षमता, गुण स्त्रियांकडे जन्मजात असतात. त्यामुळे सुगरण होणं हे त्यांच्यासाठी अजिबात कष्टांचं काम नसतं.

यावर देखील खुसपट काढून अनेक वाद उत्पन्न केले जातात. त्यांना अंत नाही. मुद्दा असा आहे की कामाची वाटणी आवश्यक आहे. कोणाच्या तरी वाट्याला कोणतं तरी काम येणारच. शेतातील कष्ट, व्यापारासाठी घरापासून दूर राहात केलेले प्रवास, कुटुंबाचं संरक्षण, कुटुंबासाठी खस्ता खाणं, प्रसंगी प्राण द्यावे लागणं… हे पुरुषांच्या वाटणीला आलं. पण आम्हीच का हे करायचं? आम्ही का नाही घरातलं सुरक्षित आयुष्य उपभोगायचं? असे प्रश्न ते कधी निर्माण करतात का? मला प्रश्न आहे.

वैद्य सुचित्रा कुलकर्णी

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..