नवीन लेखन...

अनमोल ‘रतन’

आज रविवार. रविवारी माझी न चुकता मंडईत एक तरी चक्कर होतेच. आजही मी शनिपार स्टाॅपला उतरलो व थोडं मागे जाऊन मंडईच्या गणपतीचा रस्ता धरला. मी गेली पन्नासहून अधिक वर्षे या परिसरात वावरलेलो आहे. त्यामुळे झालेले बदल लगेच लक्षात येतात. भाऊ महाराज बोळाच्या चौकातच माझे सहज कोपऱ्यावरील दुकानाकडे लक्ष गेलं, जिथं मी ‘रतन सायकल मार्ट’ हे लहानपणापासून पहात आलो होतो…तिथं दुकानाच्या शटरवर पाटी लावली होती..’दुकान भाड्याने देणे आहे.’
पूर्वी तिथं मोठा वाडा होता, वाड्याच्या त्याच काॅर्नरला लाकडी फळ्यांच्या दारांचं ‘रतन सायकल मार्ट’ हे भव्य दुकान नजरेत भरायचं. सायकली भाड्याने देणे, पंक्चर काढणे, दुरुस्ती करणे, नवीन सायकलींची विक्री करणे ह्यासाठी ग्राहकांची तिथे नेहमीच गर्दी दिसायची. गल्ल्यावर मालक बसलेला असायचा. पाच सहा कामगार काम करताना दिसायचे. दुकानाच्या दोन्ही बाजूला दोन पत्र्याचे उभे रंगीत बोर्ड लावलेले असायचे. त्यावर एका बाजूला सायकल चालविणारा तरुण, दुसऱ्या बाजूला सायकल चालविणारी साडीतील तरुणीचं चित्र असायचं. त्या दोन्ही चित्रांतील तरुण-तरुणीची वेशभूषा ही १९६५ सालातील होती. त्यातील तरुणी सायकल चालविताना एका हात वर करून गुलाबी रुमाल फडकवीत होती.
कालांतराने तो भव्य वाडा पाडून तिथं मोठी इमारत उभी राहिली. ‘रतन सायकल मार्ट’ मात्र त्याच जागेवर नव्या स्वरुपात सुरु झालं. २००० सालानंतर सायकल चालविणाऱ्यांचं प्रमाण घटलं. प्रत्येक घरात स्कुटर दिसू लागली. साहजिकच सायकलच्या दुकानांचा व्यवसाय कमी होऊ लागला.
गेल्या काही वर्षांत घरटी तीन चार अॅक्टिव्हा, हिरो होंडा दिसू लागल्या. आमच्या काळी काॅलेजला गेल्यावर सायकल मिळायची, आता दहावीच्या मुला मुलींना पालक हौसेने अॅक्टिव्हा घेऊन देतात. साहजिकच जुन्या सायकली अडगळीत गेल्या, काहींनी त्या भंगारमध्ये दिल्या.
पूर्वी घरटी दिसणारी, कुठेही पटकन जाण्यासाठी उपयोगी पडणारी, दुरुस्तीचा वारंवार खर्च न काढणारी सायकल कुटुंबाची एक भागीदार असायची. रविवारी प्रत्येकजण तिला धुवून साफसफाई करायचा. दसऱ्याला तिला फुलांची माळ लावली जायची. सायकल चालवताना कोणी समोर आलं की, हॅण्डलवरची घंटी वाजवताना आनंद व्हायचा. जुन्या फिलीप्स, अॅटलास, हिरो कंपनीच्या सायकली आता इतिहासजमा झालेल्या आहेत. आता गियरच्या दहा ते वीस हजार रुपये किंमतीच्या सायकली घेण्याची फॅशन झाली आहे. दिवसभर कार वापरणारा चाळीशीच्या तरुण सकाळी व्यायाम म्हणून तासभर त्यावरुन सायकलींग करतो. पूर्वीचे रेल्वे स्टेशन, बस स्थानकावरचे सायकल स्टॅण्ड जाऊन आता टू व्हिलरचे स्टॅण्ड झाले आहेत.
शहरांमध्ये चौका-चौकात दिसणारी महाराष्ट्रीयन माणसांची सायकलची दुकानं नामशेष होऊ लागली. एखादं दुकान हवा भरुन देण्यासाठी दिवसभर गिऱ्हाईकाची वाट पहात उघडं असतं. ‘रतन’चं तेच झालं. ग्राहक नसल्याने दुकान चालविणे कठीण होऊ लागलं. नोकरांना बसून पगार देणं मालकाला परवडेनासं झालं. शेवटी मालकाने काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला.. दुकान ‘भाड्यानं’ देण्याचा!
उद्या त्या मोक्याच्या जागेवर एखादा परप्रांतीय मोबाईलची शोरुम सुरु करेल आणि एक होतं ‘रतन सायकल मार्ट’ ही आठवण हळूहळू काळाच्या पडद्याआड धूसर होत जाईल…
– सुरेश नावडकर १३-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..