नवीन लेखन...

अंगद शिष्टाई

अंगद शिष्टाई –
संत एकनाथ.

श्रीराम सैन्यासह लंकेत पोहोचले. राजधर्माला अनुसरून त्यांनी रावणाकडे अंगद याला वकील (राजदूत) म्हणून पाठवले. अंगदाने रावणाच्या सभेत (राजदरबार)  जाऊन त्याला सीतेला परत पाठविण्याविषयी सांगितले, पण रावणाने ते ऐकले नाही. व अंगद श्रीरामांकडे परत आला. या प्रसंगाचे वर्णन यामध्ये केले आहे.

श्रीराम सेतू पार करून लंकेत पोहोचले. तेंव्हा त्यांनी सर्वाना विचारले की आता पुढे काय करायचे ते सांगा. सर्वजण म्हणाले की युद्ध करून लंकानाथाला सैन्यासह मारावे. तेव्हा श्रीराम म्हणाले की राजधर्माला व शास्त्राला अनुसरूनच कार्य करावे त्यामुळेच परमार्थ साधला जातो. त्याप्रमाणे आपला दूत लंकेला पाठवावा. तेव्हा वानर म्हणाले की त्यानी सीता चोरून नेली व आपणच दूत पाठवायचा हे कसे?. युद्ध करण्यात भीती कसली?. तेव्हा श्रीरामांनी राज धर्म व भूत दया परमार्थ सर्वांना समजावून सांगितला. युद्ध धर्म सांगितला. साम , दाम , दंड, भेद हे चार प्रकार व त्यांचे महत्व सांगितले. आणि युद्धाच्या वेळी प्रथम सामोपचाराने शत्रूला समजावणे हा धर्म असलेचे सांगितले. सामोपचाराने आदर निर्माण होतो व ते स्तुत्य कृत्य आहे असे सांगितले. सामोपचाराचा वापर न करता युद्ध केलें तर अनेकजण नाहक मृत्यूमुखी पडतात. हे ऐकून हनुमान, ‌‌‌अंगद, सुग्रीव व बिभीषण यांनी अनुमोदन दिले. तेव्हा श्रीराम म्हणाले दूत म्हणून कोणास पाठवावे ते सांगा. दूत हा भित्रा नसावा, भीड बाळगणारा नसावा, चतुरपणे व स्वत:ची बुद्धि वापरून बोलणारा असावा. अग्रभागी उभे राहून योग्य असे प्रत्युत्तर देण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी. आपल्या राजाचे कार्य सिद्धीस नेणारा असावा.

असे सांगितल्यावर हनुमान म्हणाले, हे श्रीराम ! वानरांची संख्या वीस पद्म इतकी आहे. ते‌ सर्व शक्तीनी परिपूर्ण आहेत. त्यामध्ये वालीचा मुलगा अंगद हा बलवान आहे. तो रावणाच्या सभेत बोलण्यास समर्थ आहे. तो धैर्यवान आहे. तो रावणाच्या सभेत जाण्यास सुयोग्य आहे. त्यालाच दूत म्हणून पाठवावे.

अंगद आल्यावर श्रीरामांनी त्याला हृदयाशी धरले व म्हणाले तूं दूत म्हणून रावणाकडे जा. रावणाला काय सांगायचे ते ऐक. या युद्धाचे कारण तू केलेली चोरी आहे. तू माझ्या पत्नीला पळवून नेले आहेस. मी ( धनुर्धारी राम ) निर्धार केला आहे की तुला याचा दंड (शिक्षा) मिळेल.

परदारा (दुसऱ्याची पत्नी ) हरण हे तुझ्या मरणाचे कारण होणार. माझे अमोघ बाण सूटल्यावर त्यांना कोणी थांबवु शकत नाही. त्यामुळे तू अयोध्येच्या राजाला शरण जाऊन सीतेला परत द्यावेस. तुझ्या लंकेचे, राज्याचे हित बघ. असे सांगून अंगदाला फळे वगैरे देऊन लंकेला जाण्यास सांगितले. अंगद म्हणाला ‘ हे रघुनाथा ! हे समर्था , तुमची आज्ञा प्रमाण आहे. आपणच आपला पराक्रम सांगणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मी आपणास नमस्कार करतो व लंकेस जातो.

अंगद रामबाणाप्रमाणे उडाला व वेगाने मार्गक्रमण करत लंकेत पोहोचला. रावणाच्या सभेत त्याची उडी पडली तेव्हा रावण दचकला. धरती कांपू लागली. सर्व जण भयभीत झाले. हा अवघ्यांचा घात करावयास आला आहे असा सर्वत्र पुकारा झाला. राक्षसांमधे हाहाकार माजला. अंगदाला समोर पाहताच रावण स्तब्ध झाला. सर्व राक्षस टकमक बघत होते पण कोणीच काही बोलत नव्हते. अंगद म्हणाला, मी आपला अतिथी आहे, तरी आपण माझे स्वागत करीत नाही. भयभीत झाला आहात. अरे राक्षसांनो, हनुमंताने अशोकवनाचा व राक्षसांचा नाश केला त्यामुळे तुमची दातखिळी बसली आहे. तुम्हाला बोलण्यास शब्द सापडत नाहीत.

हे अंगदाचे मर्मभेदक असे बोलणे ऐकून रावण स्वत: बोलला. तू राजवाड्याच्या दरवाजाच्या मार्गाने न येता दुसऱ्याच मार्गाने आलास यामुळे आम्ही मौन राहिलो होतो. असे चुकीच्या मार्गाने आलेल्याबरोबर संभाषण करणे आम्हाला दुषणास्पद आहे. अंगदाला हे बोलणे ऐकून हसू आले व तो म्हणाला समोरच्या व्यक्तिचे अवगुण तुम्हाला दिसतात पण स्वत:चे अवगुण दिसत नाहीत. खरे तर चोरी करणे अधर्म आहे, त्यातून परदारा हरण हे तर मोठें पाप आहे. तू पापी आहेस. तुझी तिन्ही लोकांत दुष्कीर्ती झाली आहे. अंगद रागावलेला पाहून रावण घाबरला. राक्षस म्हणू लागले की हे तर मोठे संकट आहे. पहिल्या ने होळी केली आणि हा तर त्याहूनही बलवान वाटतो. राक्षस चळचळा कांपू लागले. अंगद शेपटीचे उंच आसन करून त्यावर बसला. डोळे मिचकावत फळे खाऊ लागला.

अंगद बसलेला पाहून रावणाने हळूच विचारले तू हनुमान नाहीस तर कोण आहेस ? इथे कां आला आहेस? असे रावणाने विचारता अंगदाने आपला वृतांत सांगितला. ज्या रामाने मारिच राक्षसाचा वध केला, खर, दुषणाचा वध केला त्या रामाचा मी दूत आहे. मी महाबली वालीचा पुत्र अंगद आहे. ज्या वालीने रावणाला कांखेत घेऊन आंघोळ केली होती त्याचा मी अती बलशाली पुत्र आहे. ‌‌‌मी इथे का आलो आहे ते ऐक. तू सीतेला परत करावे. सीतेला परत केले तर लंकानाथ वाचेल नाही तर मी त्याचा वध करीन असे श्रीरामांनी सांगितले आहे.
रावण म्हणाला, रामाचा धिक्कार असो. तुझ्या बलवानपणाचा धिक्कार असो. ज्याने पित्याचा वध केला आहे त्याचा दूत असे स्वतःला म्हणवतोस. ज्याने तुझ्या पित्याचा फसवून वध केला असा जो वाईट असा रघुनाथ त्याचा मी दूत आहे असे निर्लज्ज पणे म्हणत आहेस.

अंगदा ! तुझ्या सारखा निर्लज्ज मला दुसरा कोणी दिसत नाही. तू खरेतर सागरात जीव दे, विहीरीत जीव दे किंवा पोटात सुरी मारून घे. तू मोठेपणा काय सांगतोस तू निंदनीय आहेस. मला असे वाटते की तू पितृकार्यासाठी आला आहेस. तू स्वतःला रामदूत म्हणवत असलास तरी मला तू शरण आला आहेस. राम लक्ष्मण व सुग्रीवाला मारून तुला किष्किंधा नगरीचे राज्य देईन. मी हे खरे बोलत आहे. विचार कर.

दशानन असे बोलल्यावर अंगद खोंचकपणे हसून काय उत्तर देत आहे ते लक्षपूर्वक ऐका. तू स्वयंवराच्या वेळी धनुष्याला बाण लावताना उलथून पडला होतास, तू कसला शूर . मी तुला कसा शरण येईन. तुझे बोलणे खुप ऐकले. तू दहा तोंडाचा किडा आहेस. बळी राजाने तुझ्याकडे पाहिलेही नाही. तू एखाद्या घुंगुरट्या सारखा आहेस. कोणतरी विचित्र प्राणी दिसतोय असे वाटून माझ्या पाळण्याला सोन्याच्या साखळीने तुला बांधले होते. माझ्या पायांचे ( मारलेले वळ ) तुझ्या मुखावर अजून दिसत आहेत. तू अतिशय हीनदीन आहेस. तू सिंहासनावर बसला आहेस पण तू रामाशी युद्ध करण्यास समर्थ नाहीस.

अंगदाचे वाग्बाण रावणाच्या ह्रदयात खोंचले गेले. तो म्हणाला हे वानरा सभेत बसून तू किती बडबड करीत आहेस. तुझ्या तोंडाला प्रतिबंध नाही. तू अजून या दशशिराला ओळखले नाहीस. माझा पराक्रम ऐक. मी सुर-गणांना बंदीवासात टाकले. माझ्याशी युद्ध करणारा हा बापुडा राम कोण ? इंद्र, चंद्र इत्यादि देवांना मी चाकर केले आहे. माझ्या भयाने ते थरथर कापतात. अहोरात्र माझ्याकडे राबत आहेत. राम तर मनुष्य आहे. आमचे एका घासाचे खाद्य आहे. वानर तर वनचर आहेत, ते तर संग्रामात मरतीलचं पण मुख्य भक्ष्य राम लक्ष्मण आहेत. माकडे म्हणजे कोशिंबीर आहेत. कुंभकर्ण एका घासात सर्वांचे भक्षण करील.

अंगद म्हणाला अरे दुर्बुंद्ध रावणा ! तू दुष्ट बुद्धिचा आहेस. श्री राम ज्ञानस्वरूप , चैतन्य स्वरूप आहेत. त्यांना तू मनुष्य म्हणत आहेस. श्रीरामांचा सेवक “हनुमंत” हा एकटाच असून त्याने तुझे वन जाळले होते. रामाला शरण गेलास तरचं तुझे प्राण वाचतील नाहीतर तुझे मरण निश्चित आहे. तू जर सीतेला श्रीरामाना परत दिले नाहीस तर तुला कोण वाचवणार ?. मीच तुझा प्राण घेईन. रावणा तुझी डोकी मी नखांनी कापीन. पण तू ती शिवाला (महादेव) वाहिलेली असल्याने मी ते पाप करू शकत नाही. अंगद रावणावर धावून आला. अंगदाची निष्ठूर वाक्ये ऐकून व अंगद रावणावर धावून गेल्याने रावण कासावीस झाला व रागाने प्रधानांना म्हणाला, या वानराला पकडा व मारा, सभेमध्ये कोणतीही भीड न धरता हा माझे तोंड काळे म्हणत आहे याचे तुकडे तुकडे करा.

हे रावणाचे बोलणे ऐकून रावणाचे सेनानी गर्जना करीत उठले व अंगदावर धावून गेले. तेव्हा अंगदाने त्यांना हातात, कमरेवर, शेपटी मधे धरले व तो सर्वांसह आकाशात उडाला. व अंतराळात गेल्यावर अंग झाडले तसे राक्षस जमीनीवर पडून त्यांची रांगोळी झाली. आपण रावणाला मारू नये म्हणून त्याने रावणाला पायाखाली दाबून त्याचा मुकुट काढून घेऊन वेगाने उड्डाण केले , त्याच्या डोक्यावर मंडप उचलला गेला हे त्याच्या लक्षात आले ‌‌‌नाही. मंडप डोक्यावर बघून रघुनाथ रागावले ते म्हणाले हा अधर्म आहे. लंकेचे राज्य बिभिषणाला दिले असलेने मंडप आणणे बरोबर नव्हते. अंगद म्हणाला मी जोरात उड्डाण केल्याने मला कळले नाही व त्याने मंडप परत लंकेत नेऊन ठेवला. श्रीरामाने मुकुट घेऊन बिभिषणास बोलावून तो मुकुट त्यांच्या डोक्यावर ठेवला.

— गिरीश अनंत श्रीखंडे

Avatar
About गिरीश अनंत श्रीखंडे 3 Articles
Matrubharati, Moj, youtube, sharechat, Bluepad, storymirror
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..