नवीन लेखन...

नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याबरोबर `संवाद’ लाईव्ह

प्रतिभावंत कवी, कादंबरीकार, कथाकार व नाटककार, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या साहित्याची ओळख करुन देणारा डॉ. अनंत देशमुख  यांनी लिहिलेला हा लेख  `मराठीसृष्टी’ वर रविवार दि. ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार्‍या प्रेमानंद गज्वी यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने प्रकाशित करत आहोत.

ही मुलाखत घेणार आहेत डॉ. सुरेश मेश्राम.  ही मुलाखत रविवार दि. ६ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत https://www.facebook.com/marathisrushti/ येथे Live बघता येईल. आपण आपले प्रश्वही या मुलाखतीच्या वेळी विचारु शकता.


.१. : हिंदू संस्कृती ही मूलतः चातुर्वर्णावर्णाधिष्ठित राहिली आहे. सुरुवातीच्या काळातील सर्व मानव समान आणि वैयक्तिक आत्मीक आणि ऐहिक उन्नती महत्त्वाची हे सूत्र राहिले. श्रमविभागणी सोयीची असल्याने प्रत्येकाच्या कामाची वाटणी केली गेली. कालप्रवाहात मात्र उच्च-नीच अशी तफावत निर्माण झाली. शोषक आणि शोषित असा भेदभाव निर्माण झाला. त्यातून गरीब-श्रीमंत हे वर्ग उदयाला आले. वरचा म्हणवलेला गेलेला वर्गही एकजिनसी नव्हता. त्याच्यातही परंपरागत, गतानुगतिक, अध्यात्मावर वाजवीपेक्षा विसंबून राहाणारे होते तसेच नवविद्याप्राप्त विज्ञाननिष्ठ, बुद्धिप्रमाण्यवादी लोकही होते. लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, रघुनाथ धोंडो कर्वे हे त्यांच्या पैकी होते. ते संख्येने कमी होते, पण होते. त्यांना जे पटले नाही त्यावर प्रहार करायला ते कचरले नाहीत. त्यांना जननिंदा, लोकक्षोभ सहन करावा लागला. सनातनी, परंपरावादी लोक हे आपल्याच समाजातील लोकांना छळत इतकेच नव्हे तर बहुजन समाजालाही ते सतत त्रास देत. बहुजनांना त्याचे परिणाम कित्येक शतके भोगावे लागले.

एकोणिसाव्या शतकात महात्मा फुले आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याविरोधात प्रतिकार केला. स्वसमाजातील हरवलेल्या अस्मितेची पुन:स्थापना करणे आणि वरिष्ठवर्गाला विरोध करून आपले हक्क मिळवण्यासाठी लढा देणे हे काम त्यांना करावे लागले. ‘उठा, शिका आणि लढा’ असा संदेश त्यांना द्यावा लागला. अंधश्रद्धा, अन्याय, अपप्रवृत्ती, अनिष्ट प्रथा यांच्यावर हल्ले करावे लागले. दारिद्र्यात पिचलेल्या समाजाला त्यातून नवचेतना, नवसंजीवनी लाभली. हिंदू समाजातील दलित जीवनाचे त्यातील रूढी, परंपरांचे, शोषणाचे चित्रण करणारे अण्णाभाऊ साठे, बंधुमाधव, बाबुराव बागूल, दया पवार यांच्यासारखे साहित्यिक निर्माण झाले. दलित साहित्याचा कसदार आणि समृध्द प्रवाह सुरू झाला. कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्र इतकेच काय समीक्षा या प्रकारांमध्ये लेखन होऊ लागले. नाटक हा प्रकार ही त्याला अपवाद राहिला नाही. प्राचार्य म. भि. चिटणीस, प्रेमानंद गज्वी, दत्ता भगत, रुस्तम अचलखांब, रामनाथ चव्हाण आणि टेक्सास गायकवाड यांनी दलित नाटक आणि रंगभूमीच्या कक्षा निस्संशयपणे विस्तारल्या.

.२. : नागपूरकडल्या परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांना एकांकिका आणि नाट्यलेखनाने आकृष्ट केले. पुढे १९८०-१९८५च्या सुमारास ते मुंबईला आले आणि त्यांची प्रतिभा अधिकच पल्लवीत झाली. ‘देवनवरी'(१९८१), ‘तनमाजोरी'(१९८४), ‘वांझ माती'(१९८४), ‘जय जय रघुवीर समर्थ'(१९८८), गांधी-आंबेडकर(१९८८), ‘किरवंत'(१९९१), ‘पांढरा बुधवार'(१९९५) अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली *आणि विद्यमान मराठी नाटककारांच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले.

पूर्वकालीन आणि समकालीन साहित्य, कला, समाज, संस्कृती आणि इतिहास या बद्दलचा त्यांचा अभ्यास पक्का आहे. त्यातून त्यांची नजर तयार झाली आहे. एखाद्या अनुभवातील नाट्य हेरण्याची आणि ते पुरेशा ताकदीने शब्दबद्ध करण्याची किमया त्यांना साधलेली आहे. मुळात गज्वी हे एक commited writer आहेत. त्यांची बांधीलकी या समाजाशी आहे. त्यांना पडणारे प्रश्न हे मूलभूत स्वरूपाचे आहेत.

“माणूस मूलत: पशूच आहे.. या पशूनं आपल्या बुद्धी च्या सहाय्याने, स्वतःतील पशूत्व लपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला..त्या प्रयत्नाचं फलित..धर्म..आणि त्यातून उभी केलं एक सूत्र जे हितकारक असेल..पण..ते सूत्र राबविणारा अखेर होता, माणूस..ज्याच्या मेंदूत होतं पशूत्व..हा पशू..धर्मसूत्रही मारू शकला नाही..त्यांच्याही मेंदूतलं..जे स्वतः ला देव म्हणवत होते..माणसाच्या मेंदूतच नैसर्गिक असं काही आहे जे..स्री देह..दिसला की उफाळून बाहेर येतं..यावर धर्मही मात करू शकला नाही. उलट धर्माच्या नावाखाली अनाचार जोपासत आला धर्म..आणि भावनांचं दमन करायला सांगणारा धर्मच बदनाम झाला..धर्म अपूर्ण आहे..हे धर्माला..म्हणजे धर्म जोपासणाऱ्यांना कळूनही ते दुर्लक्ष करीत आले..आणि धर्माच्या आत लपून दुर्वर्तन करीत आले..माणसाच्या मेंदूत असं काय आहे जे..लग्न संस्थेच्या निर्मिती नंतरही कुवर्तन घडवून आणते..जे धर्माला अजून आकळलं नाही..जे धर्माला जमलं नाही ते..विज्ञान..सिद्ध करील काय..???..म्हणजे एकांगी धर्मसंस्था च नष्ट करील का..??? की हे जग असंच चालत राहील..आपल्या अपुरेपणाला कुरवाळत..?????”

पण त्यांचे चित्रण करताना ते भडक होणार नाहीत याची ते नेहमीच काळजी घेत आले आहेत. त्या त्या प्रश्नासंबंधी त्यांचे काही म्हणणे असते, point of view असतो. तो प्रेक्षकांपर्यंत कलात्म (इथे नाट्यात्म) पातळीवर पोहोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्यात ते अनेकदा यशस्वीही होतात. याचा अर्थ असा की त्यांच्या नाटकांतून ते message देत असतात आणि त्यामुळे आपण अस्वस्थ आणि अंतर्मुखही होतो. या करिता नाटककारापाशी व्यापक जीवनजाणिवा आणि तीव्रतर सामाजिक भान असणे गरजेचे असते. गज्वींपाशी ते पुरेपूर आहे. त्यामुळे मराठी सारस्वतांना गज्वी नेहमीच चकवा राहिले आहेत.

.३. : शिवाय त्यांच्या नाटकांच्या अर्पणपत्रिकांमधूनही हीच व्यापक जाणीव व्यक्त होताना दिसते-

देवनवरी-“बाजारबसव्या उदात्त संस्कृतीस”
तनमाजोरी-“मूठभर प्रकाशासाठी ज्यांनी उभा अंधार चिरला..”
‘पांढरा बुधवार’ – “आंतरिक करूणेनं व्यथित होणा-या व्यथेला.”
गांधी-आंबेडकर” – ‘ते मानबिंदू’ ज्यांनी व्यतीत केलं आपलं उभं आयुष्य लोकशाहीच्या संवर्धनासाठी-‘
वांझ माती- “भारतीय मनाच्या मानगुटीवर कायम बसलेल्या अंधश्रद्धेला!”
जयजय रघुवीर समर्थ-“बुद्धिवादी जिवंत मढ्यांना!”

या अर्पणपत्रिकांमधून अखिल मानवजातीच्या उद्धाराबद्धलची गज्वी यांची उत्कट इच्छाच व्यक्त होताना दिसते आणि ज्यांच्या मनात आणि लेखनात “विश्वां परस्परां पडो मैत्र जीवांचे” ही विशाल जाणीव आहे. मग त्यांना संकुचित कसे म्हणायचे? ते तर मराठी समाज आणि संस्कृतीची नस अचूकपणे त्यांनी ओळखली आहे. म्हणूनच ते एक अग्रगण्य नाटककार होऊ शकले.

.४. : ‘देवनवरी’ या पहिल्याच नाटकात गज्वींनी रचनेच्या दृष्टीने अनेक गोष्टी साधल्या आहेत. (पहिली) आपल्या पुराणातील जमदग्नी.. रेणुका (यल्लमादेवी).. परशुराम कथा स्पष्ट केली आहे. (दुसरी) देवदासी प्रथेचे चित्रण त्यासाठी नाट्यवस्तूला सद्यकाळात आणून एका खेड्यातील देऊळ, देवळाचा पुजारी, परिसरातील लोक, त्या अंधश्रद्धेला बळी पडणारी माणसे, त्यांचा गैरफायदा घेणारे इनामदार यांच्या परस्पर संबंधितांचे, त्यात गरीबांच्या होणा-या शोषणाचे याचबरोबर (तिसरी) नवस बोलणं आणि देणं याचे चित्रण गोकर्णच्या रूपाने साधले आहे. पुत्रप्राप्ती झाल्यावर २१दिवसांनी आपण देवीला गोमाता सोडू असा नवस त्याने केलेला.. देवळाचा पुजारी आणि गावचा इनामदार हे इथले शोषक. याचेच पर्यावसन म्हणजे पुजारी देवीला दिलेल्या मुलींना नासवतो. गावचा इनामदार म्हणून या मुली भोगण्याचा अधिकार आपला आहे असे समजून त्या साठी पुजा-यावर सतत दबाव टाकणारा इनामदार. नासवलेल्या मुलींना पुजारी अन्वरला विकतो..त्याला विरोध करणा-या पंढरीचा तो चाकूने खून करतो.
या नाट्यकृतीद्वारे गज्वी यांनी हिंदू समाजातील खुळचट चालीरीती, ईश्वरविषयक कल्पनेचा चाललेला बाजार, समाजमनावरचा धर्मश्रद्धांचा पगडा, प्रस्थापितांचा भोंगळपणा, मूल्यभ्रष्टता, अनाचार आणि शोषितांचे प्रत्ययकारी चित्रण केले आहे.

.५. : त्यांचे ‘किरवंत’ हे नाटक घेऊ. यात ब्राह्मणवर्गातील कर्मकांडाच्या संबंधातून निर्माण झालेल्या दोन शाखांमधील संघर्ष त्यांनी नाटकाचा विषय बनवला आहे. ‘किरवंत म्हणजे मृताच्या संबंधातील क्रियाकर्म करणारा ब्राह्मण. या कर्मांकडे इतर ब्राह्मण अशुभ म्हणून हलके काम समजतात. ही कर्मे करणारांशी ते तुच्छतेनेच वागतात. ब्राह्मणवर्गातील दोन शाखांमधील हा सनातन संघर्ष गज्वी यांनी नाटकात मांडला आहे. यासंबंधात त्यांनी नाटकाला ‘मनातलं’ शीर्षकाचे जोडलेले टिपण महत्त्वाचे आहे. ते लिहितात-

‘प्रश्नोपप्रश्नांच्या भोव-यात मन गरगरून गेलय! सातशे वर्षांची मराठी साहित्याची परंपरा, पण इतक्या वर्षात ‘कोणत्याच सारस्वताचं’ लक्ष स्मशानकर्मे करणा-या किरवंताकडे कसं गेलं नाही? कुणाच्या घरी कधी काळी मर्तिक झालं नाही, की..’ याचा अर्थ हा प्रश्न साहित्यकृतीचा विषय होऊ शकतो, पण तो आजवर अलक्षितच राहिला आणि आपणच प्रथम तो इथे नाटकामध्ये मांडत आहोत हे ते सांगतात. ‘किरवंत’ च्या लेखनामागील स्पष्ट करताना ‘किरवंत’ शीर्षकाखाली त्यांनी सुहास व्यवहारे या आपल्या तरुण दिग्दर्शक मित्राच्या अनुभवासंबंधी केलेले निवेदनही त्याला पुष्टी देणारे आहे. त्यामुळे समाजविषयक व्यापक निरीक्षण आणि सूक्ष्म भान त्यांना आहे हे स्पष्ट होते.

.६. : गज्वी हे एक सतत अस्वस्थ असलेले कलावंत आहेत. समाजातील विविध थरांतील अनेकानेक प्रश्न त्यांना अस्वस्थ करतात. या भिन्न प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा, त्यासंबंधी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा आणि ती सर्वार्थाने मनात मुरवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यासंबंधात ‘जय जय रघुवीर समर्थ’या नाट्यकृतीच्या निर्मितीसंबंधी त्यांनी केलेले विवेचन बोलके आहे. ते लिहितात-

“मी ‘मनाचे श्लोक’ वाचून काढले. जाणीवपूर्वक.भक्तिरसात बुडवून काढलेल्या त्या श्लोकात ‘जनी निंद्य ते ,सर्व सोडोनी द्यावे’ वगैरे चांगल्या गोष्टी वाचून मन सुखावलं. जागोजाग दिसणारी मंदिरं, पूजाअर्चा, आरत्या. सारा समाज भक्तिरसानं पार न्हाऊन निघतो आहे. सर्वत्र छान आणि छानच. आणि तरीही रोज खून, बलात्कार,दरोडे, एकमेकांचा द्वेष, जातीय दंगली, एकजात सगळी हीन कृत्यं. संतमहंतांच्या भक्तिमय संस्काराचं हेच फलित? मन सुन्न झालं.”

प्रा. म. द. हातकणंगलेकर यांनी यासंबंधात पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे-

“त्यांची दृष्टी दलितांच्या परिस्थितीपुरती आणि दु:ख दैन्यापुरती मर्यादित नाही. ती आपल्या समाजातील दलितत्वाच्या मुळापर्यंत जाते. हे तत्त्व केवळ दलितांचीच उपेक्षा करते आणि त्यांनाच मानहानीचे जिणे पत्करायला लावते असे नाही, तर समाजातील इतर लहानसहान गटांच्या वाट्यालादेखील असलेच दु:ख आणून ठेवते. ही माहिती गज्वींसारख्या सर्जनशील लेखकाने शोधून काढावी आणि ती समाजासमोर मांडण्याची कळकळ दाखवावी, हे अतिशय अर्थपूर्ण आहे.”

.७. : प्रेमानंद गज्वी यांनी चरित्रात्मक नाट्यलेखनाचे आवाहनही अत्यंत ताकदीने पेललेले आहे. अशा प्रकारच्या लेखनासाठी लेखकापाशी अभ्यस्तवृत्ती असावी लागते. ज्या लोकोत्तर पुरुषांच्या जीवननाट्य तो टिपत असतो त्या संबंधी त्याचे आकलन शक्यतो परिपूर्ण आणि वस्तुनिष्ठ असावे लागते, शिवाय ज्या कालपटावर त्या व्यक्ती होऊन गेलेल्या असतात तो काळ, त्या वेळची युगप्रवृत्ती, आचार पद्धती, मूल्यविचार त्याला समजावून घ्यावे लागतात आणि या सा-यांचे कलात्म चित्रण त्याला करता आले पाहिजे. याबाबतीत गज्वींनी कमालीचे भान दाखवल्याचे दिसून येते.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे ब्रिटिश राजवटीत सामाजिक, राजकीय संघर्ष फार मोठ्या प्रमाणात पुढे आले. त्यातही भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर, महात्मा गांधी, वि.दा. सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महम्मद अली जिना, सुभाषचंद्र बोस या त्यापैकी महत्त्वाच्या होत. त्यांचे कार्य एकेका जीवनसिद्धांतावर आधारलेले होते आणि त्यांच्या निष्ठा वादातीत होत्या. शिवाय त्या़ंच्याकडे समाजाचे नेतृत्व करण्याचे असाधारण गुण होते. यापैकी गांधीजी आणि आंबेडकर यांच्यातील आंतरिक,सामाजिक आणि राजकीय संबंधितांचे आणि संधर्षाचे चित्रण करण्याचे आवाहन गज्वी यांनी स्वीकारले आणि ‘गांधी-आंबेडकर’ हे नाटक त्यांनी लिहिले. त्याविषयी शांता गोखले लिहितात:

‘One remembers with wonder Gajvi’s thoroughly researched, powerfully written play “Gandhi-Ambedkar”, where a finely articulated argument between the two giants of the freedom struggle was presented. The playwright had chosen to cast the argument in the form of a debate to give both sides equal space, while nudging us towards his viewpoint.’

भारतीय स्वातंत्र्याचा लढा, हिंदू समाजातील प्रचंड आर्थिक दरी, जाती व्यवस्थेतेने विखुरलेला समाज, त्याचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील वैचारिक दरी, नेतृत्व आपल्याकडे राहावे यासाठीची स्पर्धा यासंदर्भातील गांधी-आंबेडकर यांच्यातील संबंध खणि संघर्षाचे चित्रण गज्वी आपल्या पु-या ताकदीनिशी करतात.कुठे ही ऐतिहासिक सत्याला धक्का लागणार नाही आणि तरीही त्या दोघांचे उत्तुंग व्यक्तित्व ठळकपणे उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

.८. : ‘वांझ माती’ मध्ये गावातील वरिष्ठ आणि कनिष्ठ गटांतील परस्परांमधील छुपे राजकारण, व्यूहरचना, एकमेकांवर केलेली कुरघोडी, परिणामत: सूडबुद्धीने चालवण्यात येणारे राजकारण, वरवर पाड्यावर दोन्ही गटामध्ये सामंजस्य आणि ऐक्य असल्याचा दिखाऊपणा

.९. : ‘डँम इट अनू गोरे’ या नाटकामध्ये त्यांनी भारतात नद्या आडवून नवनवीन मोठे डँम बांधताना विस्थापतांच्या अनेक प्रश्न निर्माण होणा-या अनेक प्रश्नांविषयी लेखन केले आहे.

.१०. : गज्वींच्या नाटकांच्या भाषेचा स्वतंत्रपणे विचार व्हायला हवा असे मला मनापासून वाटते. त्यांच्या बहुतांश नाटकांचा आशयप्रदेश हा मराठवाडा, नागपूर परिसरातील.ग्राम जीवन आहे. त्यामुळे तिथला समाज, संस्कृती, लोकाचार,चालीरीती , तिथल्या माणसांतील स्तरभेद, मानवी संबंध, त्यांचे व्यवसाय, व्यवहार, त्यांची भाषा, त्यांनी वापरलेले वाकप्रचार, म्हणी यांचा गज्वींनी केलेला उपयोग मोलाचा आहे. शिवाय आशयाच्या मागणीनुसार ठिकठिकाणी वापरलेल्या स्वरचित कवितांचा स्वतंत्रपणे विचार करण्यात यावा इतकी ताकद आणि गुणवत्ता त्यामध्ये आहे.

सारांश, एकोणिसशे ऐशीनंतरच्या मराठी नाटक आणि रंगभूमीवर प्रेमचंद गज्वी यांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण नाममुद्रा उमटवली आहे!

* नूरमहंमद साठे • शुद्ध बीजापोटी • छावणी• हवे पंख मज
• एक अभिजात जंतू • एकूण १३ नाटके
या शिवाय एकांकिका, कविता, कादंबरी, वैचारिक लेखन आणि मुलाखाती प्रसिद्ध आहेत.

— डॉ. अनंत देशमुख  

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..