नवीन लेखन...

अमेरिकन गाठुडं – ४

येथे गरीब असो श्रीमंत असो कार आवश्यक आहे. ‘कार’ हि येथे, रोटी-कपडा-और मकान इतकीच गरजेची आहे. त्याला करणेही आहेत. विरळ आणि विखुरलेली रहिवाशी वस्त्या. दूर अंतरावरील गरजेच्या वस्तूंचे आउटलेटस, सार्वजनिक वाहतूक खूप अविकसित, त्यामुळे तिच्यावर अवलुबुन रहाणे अशक्य. स्वस्त कार्स, आणि त्या साठी सहज, कमी दरावरील कर्ज, उत्तम रस्ते, त्यामुळे चारचाकी वाहन गरजेचे झाले असावे. तसेच येथील कार चालवायला तश्या सुलभ आहेत. ऑटो गेअरचा गाड्या असतात. हाताने टाकण्याचा फक्त एकच गियर, रिव्हर्स गियर. हातात स्टियरिंग, पायात ब्रेक आणि एक्सलेटर!

त्यामानाने टुव्हीलर्स, बाईक नगण्य होत्या. ‘बाईक’ हि येथे लक्सवरी समजली जाते! काही म्हातारे मला बाईकवर, विरळ केस वाऱ्यावर उडवत जाताना दिसले! एक गम्मत माझ्या नजरेने टिपली आहे. येथे सगळ्यात ज्यास्त ‘ऐश ‘ कोण करत असेल? तर ते म्हातारे! सिनेमात बॅटमॅनची जशी कार असते, त्या प्रकारची महागडी कार चालवताना, एका म्हाताऱ्याला मी पाहिलंय! एक मात्र खरं येथे सगळ्यांना कार चालवता येते. अगदी अपंगांना सुद्धा! जरुरत इन्सान को सबकुछ सिखा देती है!
“कारे, येथे जेष्ठ नागरिक खूप हैशी दिसतात! कसे काय? आम्ही साल, प्रत्येक गोष्टी साठी आधार पहातो. मदतीची अपेक्षा करतो!” मी मुलाला विचारले.

“बाबा, येथे लोक स्वतः चा आधी विचार करतात, प्रत्येक गोष्टींचा विमा काढून घेतात. स्वतःच्या सुखाचा विचार जरी करत असले तरी, ‘फॅमिली’ हि त्यांना महत्वाची असतेच, नाही असे नाही. लहान वयापासून एकटं आणि स्वतंत्र रहातात. आपोआप अपडेट होत रहातात. आपल्याकडे आधी फॅमिली आणि मग स्वतः अशी विचारसरणी आहे. म्हातारपणा पर्यंत सर्व फॅमिली कर्तव्ये पार पडलेली असतात. असलेला पैसा लेकराबाळा साठी न साठवता, जीवाची चैन करून घेतात. आणि तसेही येथील बँकात डिपॉझिट वर फारसे व्याज मिळत नाही. कर्ज असो कि डिपॉझिट व्याज दर खूप, म्हणजे भारताच्या मानाने कमी आहेत. पैसे साठवायला काहीच इन्सेन्टिव्ह नाही.” असेल हि म्हणा असे. आपल्या कडे ‘उद्याची चिंता’ आपल्या प्रायॉरिटीवर टॉपला असते. शिवाय आपल्याकडील  ‘कुटुंब’ हि संकल्पना, येथील ‘फॅमिली’ संकल्पने पेक्षा, ज्यास्त घट्ट वीणेची आहे.

आम्हाला झू पर्यंत पोहंचयला साधारण दीडपवणेदोन तास लागले. हे अंतर नगर – पुण्यापेक्षा थोडे ज्यास्तच आहे. पण नगर- पुणे कारने प्रवास मला, या झू च्या प्रवासापेक्षा ज्यास्त सरस वाटतो! का? याला दोन महत्वाची कारणेआहेत, एक तर रस्त्यावर कोठेहि थांबून, झकास चहा पिता येतो. आणि दुसरे म्हणजे, ‘जरा घे रे बाजूला!’ असे ड्रायव्हरला सांगून, रस्त्याच्या कडेला, जगाकडे पाठ करून ‘धार’ मारता येते. हि लॅझुरी अमेरिकेत मिळत नाही!
०००

झू कडे जाताना काही गाडयांना मागे, आपल्या इकडच्या बसच्या आकाराचे ट्रेलर लावलेले दिसले. खूप मोहक रंगात रंगवलेले.

“हे काय आहे?”

“याला कॅम्पर म्हणतात.”

मला विलासाची आठवण झाली. मी नुकताच प्रमोट होऊन परभणीला जॉईन झालो होतो. असेच एकदा गप्पा मारत बसलो होतो. सगळेच साधारण आर्थिक परस्थितीतले. खूप पैसे मिळाले तर काय करायचे? या विषया भोवती, आम्ही आपापली स्वप्ने सांगत होतो. कोणी सिनेमा काढणार होता, कोणी पुण्याच्या प्रभात रोडवर बांगला घेणार होता. (त्याकाळी तो आमच्यासाठी सगळ्यात पॉश एरिया होता! आहो आमचं जगच चिमुकलं!) तेव्हा विलास म्हणाला,’ मी एक ट्रक घेणार! त्याच्या मागे सामान ठेवण्याच्या जागेवर छोटीशी सर्व सोयीनी युक्त-(म्हणजे दारूची बाटली आणि उकडलेली अंडी ठेवण्यासाठी फ्रीज, झोपायला एक पलंग आणि वॉश बेसिन. झाल्या सर्व सोई!) खोली फॅब्रिकेट करून घेणार. आणि पेट्रोलची टाकी फुल्ल करून, प्रवासाला निघणार. रात्र होईल तेथे थांबणार. गाडीखाली उतरून काटक्याचा ‘कॅम्प फायर ‘ करून, त्याचा समोर जमेल तेव्हडी दारू पिणार आणि सकाळ झाली कि पुन्हा प्रवास! सगळा भारत फिरून घेणार. शेवटी हिमालयाच्या पायथ्याशी थांबणार! मरे पर्यंत!’ हि त्यावेळेसची त्याची कॅम्परची कल्पना! मला खूप आवडलेली होती.

अमेरिकेत सुसज्ज कॅम्पर भाड्याने मिळतात म्हणे. हायवे वर, कॅम्पर साठी थांबण्याच्या सोई केलेल्या आहेत. आपल्या भारतात टुरिस्टला, अश्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देता येतील. आपल्याकडे खूप आणि विविध स्पॉट आहेत. कॅम्पर मध्ये मला एक नव्या व्यवसायाचा किरण दिसतोय.
०००

एका रविवारी सकाळी, म्हणजे साधारण आकाराच्या दरम्यान (हो आळस झटकून आपण नवीन दिवसात यशस्वी पदार्पण केल्याची जाणीव व्हायला, येथे हीच वेळ येते!) आज करावे या विचारात असताना, मुलाने ‘चला बाबा.’ म्हणून बाहेर काढले. सोबत बायको होतीच!

“कुठे जायचंय?”

“काही नाही, जवळच आहे. जेवणापर्यंत परत येऊ!” याच जवळ म्हणजे दहा बारा किलोमीटर हे माझ्या अंगवळणी पडलंय. दहा बारा मिनिटाच्या ड्राइव्ह करून आम्ही एका इमारती जवळ थांबलो. भल्या थोरल्या पटांगणात एक उतरत्या छताचा भव्य बांगला होता. राजस आसामी, शिसवी पाटावर मांडी घालून बसल्या सारखा, तो दिमाखदार दिसत होता. आणि त्याचा शुभांगी एक ठळक अक्षरात फलक होता.

‘Austin Public Library’!

मुख्य प्रवेशद्वारा समोर उभा राहिलो. ते काचेचे स्लायडिंग दार आपोआप उघडले. येथे (म्हणजे अमेरिकेत ) हि यंत्रणा सर्वत्र दिसून येते. आतल्या वातावरणात पाऊल ठेवले आणि आपण एका सार्वजनिक वाचनालयात उभे आहोत, यावर विश्वासच बसेना. वॉल टू वॉल कार्पेट. आणि पुस्तकांची अनेक रॅक्स. एकही रॅकला दाराचा अडथळा नव्हता! आणि रॅकची उंची हि इतकीच होती कि, वरच्या रांगेतले पुस्तक सहज हाताने काढता यावे! आत नाही म्हणाले तरी, वीस एक लोक होते. काही रॅकच्या रांगेतून फिरत होते. काही मधेच थांबून पुस्तके चाळत होते. कमालीची प्रसन्न शांतता होती.

लहान मुलांचा ‘teen’ या भागात चार वर्ष्याच्या किड्स पासून किशोरावस्थे पर्यंतच्या मुलांच्या पुस्तकांचा  विभाग होता. या प्रकारची विभागणी आपल्या भारतात पण काही ठिकाणी पहाण्यात आली होती. पण या वाचनालयात वृद्धांसाठी विभाग पाहून आश्चर्य वाटले. अर्थात माझी पावले तिकडे वळली. येथे जाड टाइपातली पुस्तके होती! माझ्या पहाण्यात दासबोध, ज्ञानेश्वरी आणि काही पोथ्या, या पलीकडे म्हाताऱ्या माणसांकरता वाचायला, मुध्दाम म्हणून कोणी काही छापत नाही.(आणि असेल तर मला माहित नाही. आपल्याकडे कदाचित मार्केट नसेल!)

आत बरेचसे सोफे ठेवलेले होते. आरामात बसून वाचायची सोय होती. काही संदर्भ हवे असतील तर, पुस्तकाचं संबंधित पृष्ठ झेरॉक्स करून घेण्यासाठी, एक झेरॉक्स मशीन पण होते! येथे ऑडिओ/व्हिडीओ बुक्स पण होती. आणि ती पहाण्यासाठी दहा बारा पीसी, हेडफोन्स हि होते!
मला अहमदनगरचे महापालिकेचे वाचनालत डोळ्यासमोर तरंगून गेले. माझ्या मित्राने ‘अरे तुझ्या घराजवळ महापालिकेचे वाचनालय आहे.’ म्हणून सांगितले. आणि मी गेलो. आसपास चौकशी केली, कोणास माहित नाही! एका जुन्या मोडकळीस आलेल्या वाड्यासमोर आलो, येथेच असावी लायब्ररी असा होरा होता.

“कोण पायजे?”

“येथे एक सार्वजनिक वाचनालय आहे. कोठे आहे? काही कल्पना आहे का?”

“हे काय हेच हाय!”

मी आत गेलो. या पेक्षा एखाद्या रद्दीचे दुकान तरी वेलऑर्गनाईझ्ड असेल. उजेडाचा पत्ता नाही.(अहो, सरकारी खातंय लाईट बिल भरत नाहीत. उजेड कुठून येणार! तो लाइब्ररीयन हताशपणे म्हणाला. पुस्तकाची निदान आणि इतर खर्चाचं बजेट, कोटेशन्स मात्र दर वर्षी निघतात!)

अनेक उत्तम ग्रंथ संपदा, कडी कुलुपात जखडून पडलेली. त्या क्षणी खूप वाईट वाटले. हि कसली लायब्ररी? हे तर पुस्तकाची बंदी शाळा! कपाटात पुस्तक आणि त्याला भली थोरली कुलुप! खरेच आपल्या कडे या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष होतय.

या निमित्याने मला परळीच्या नगरपालिकेच्या वाचनालयाची आठवण झाली. वाघमारे नावाचे अत्यंत सालस ग्रंथपाल तेथे होते. माझ्या सारख्या पोरासोराला, त्यांनी खूप छान छान पुस्तके मिळवून दिली. माझ्यातला वाचक त्यांनीच घडवला. असो.

आम्हाला या लायब्ररीत येऊन तास उलटून गेला होता. अनंत विषयाची अनंत पुस्तक! अलिबाबाच्या गुहेत अल्लाउद्दीनची जी अवस्था झाली असेल, त्या पेक्षा माझी वेगळी नव्हती. त्यातल्या त्यात वेळ काढून मी बायको कडे पहिले. ती हि एक रंगीत चित्राचं पुस्तक मन लावून पहात होती. वातावरणाचा परिणाम. दुसरं काय?

मी माझा मोर्च्या कला विभागाकडे वळवला. अनेक नामवंत चित्रकारांच्या चित्रांचे समीक्षण केलेली पुस्तक पाहून नवल वाटले. ओरोगामी, मेटल क्लये ज्वलरी मेकिंग, आणि बरेचसे क्राफ्ट वरील पुस्तके. कुकिंग वर तर, दोन रॅक भर पुस्तक होती!
सायकॉलॉजिवरील पुस्तके तर भुरळ पडणारी होती! खरं तर यातली काही वाचायला पाहिजे होती. पण आज फक्त आम्ही पहायला आलो होतो. तरी मी मुलाला हळूच विचारले.

“या वाचनालयाचा तू मेम्बर आहेस का?”

“नाही. पण का?”

“नाही. म्हणजे खूप छान छान अन वाचनीय पुस्तक आहेत —”

“तुम्हाला वाचायला पाहिजेत का?”

“हो, पण फी खूप असेल तर नको!”

” मी विचारतो, तोवर तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे ते काढून घ्या.”

“दोन घेऊ, का एक?”

“तुम्हाला हवी तीतकी काढा! आपण किती न्यायची ते नन्तर ठरवू!”

या वाचनालयात अजून एक वैशिष्ट्य मला दिसले. सगळी पुस्तके सुस्थितीत होती. पानाची कोपरे मुडपलेली, फाटलेल्या कव्हरची, किंवा फाटक्या पानाचं एकही पुस्तक आढळले नाही. एक वेलफर्निश्ड मीटिंग रूम होती. चर्चा करण्यासाठी!

आम्ही जेव्हा त्या वाचन मंदिरातून निघालो तेव्हा, दोन हाताच्या बेचक्यात हनुवटी पर्यंत टेकेल, इतका उंच पुस्तकांचा मनोरा होता!
कारण,

येथे सार्वजनिक वाचनालयात फी नावाचा प्रकार नाही!

पुस्तके तीन आठवड्या पर्यंत घरी ठेवता येतात!

त्यानंतरही हवी असल्या, ऑन लाईन मुदत वाढवून घेता येते!

डिले पेनल्टी पंचेवीस सेंट पर डे, पर पुस्तक!

आणि पन्नास पुस्तके एका वेळेस घरी घेऊन जाऊ शकता!

येथे शिक्षण खूप खर्चिक असते म्हणे. पण वाचन मात्र फुकट असल्या सारखेच आहे. या बाबतीत आम्ही खूप भाग्यवान आहोत. वाचन दुस्तर आणि खर्चिक असले तरी, शिक्षण मोफत आहे. पैशासाठी शिक्षण नाकारलं जात नाही.

पण आमचा ओढा जिल्हा परिषद शाळां पेक्षा, मातृभाषा बिघडवणाऱ्या स्कुलांकडेच ज्यास्त असतो!

अस्तु.

— सुरेश कुलकर्णी 

(क्रमशः)

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..