नवीन लेखन...

भारतीय मुलूख मैदानी तोफ

सीमा संरक्षणासाठी स्वयंपूर्ण असणे कोणत्याही देशासाठी अत्यावश्यक असते. भारतही त्याला अपवाद नाही. संरक्षण संशोधन विकास संस्था आणि तिच्या अंतर्गत संस्था भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंपूर्ण बनविण्यात अग्रेसर आहेत. ‘पत्रिका’ च्या २०२१च्या अंकात आपण या संस्थांनी विकसित केलेली ‘पिनाक’ या क्षेपणास्त्र प्रणालीची माहिती घेतली होती. या लेखात ओळख करून घेऊ ‘एटॅग्स‘ या मुलूख मैदानी तोफेची….


आयुध संशोधन आणि विकास संस्थापन (एआरडीई) या ‘डीआरडीओ’च्या पुण्यातील संस्थेने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून एटॅग्स (Advanced Towed Artillery Gun System – एटॅग्स) ही तोफ भारतीय सैन्यदलांच्या विशिष्ट गरजांप्रमाणे बनवली आहे. भारत देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या युद्धभूमीवर उत्तमरीतीने कार्य करू शकेल, अशी अद्ययावत व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त ही तोफ, निश्चितच सशस्त्र सैन्य दलांची युद्धक्षमता मजबूत करणारी आहे.

चाचणीमध्ये जगातील सर्व तोफांमध्ये सर्वात लांबचा पल्ला असणारे (४८ कि.मी. पेक्षा जास्त) लक्ष्य गाठून, त्याचा पुरावाही दिला आहे. एटॅग्स ही तोफप्रणाली १५५ मि.मी. व्यास म्हणजेच कॅलिबर असणारी तोफ असून, नळीची लांबी ५२ कॅलिबर म्हणजेच व्यासाच्या ५२ पट, म्हणजेच ८०६० मि.मी. आहे. याच्या उत्पादनासाठी भारत फोर्ज लिमिटेड, टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक इंजिनीयरिंग डिव्हिजन, या खाजगी उद्योगांना ‘विकास आणि उत्पादन भागीदार’ म्हणून निवडले आहे. तर तोफगोळे निर्मितीची जबाबदारी सेनासामग्री कारखान्याकडे दिली आहे. भारतीय सेनेच्या तातडीच्या गरजांची निकड लक्षात घेता, ऑगस्ट २०१८ मध्ये भारत सरकारने १५० एटॅग्स तोफा खरेदीसाठी रु. ३३६४.७८ कोटींची मान्यता दिली.

एटॅग्स ही अत्यंत प्रभावी तोफ असून, सर्व प्रकारच्या अद्ययावत व अत्याधुनिक प्रणालींचा उपयोग, संशोधन करून विकसित केली आहे. तिने अचूक, वारंवार, विश्वसनीय व अतुल्य मारकक्षमतेबरोबरच; अधिक गतिमानता, प्रगत संवाद प्रणाली, पर्यायी तसेच स्वतंत्र अतिरिक्त शक्ती केंद्र (१०० कि.मी.) रात्र दुर्बीण व्यवस्थापन, त्वरित क्रियान्वयन व समापन, स्वयंचलित निर्णयक्षम नियंत्रण संगणकीय प्रणाली, यांचा उपयोग करून अचूकतेचा व ४८.०७४ कि.मी. पल्ल्याचा उच्चांक स्थापित केला; आणि तोही प्राथमिक प्रायोगिक चाचण्यांच्या वेळी (सप्टेंबर २०१७ मध्ये). १५५ मि.मी. x ५२ कॅलिबर या प्रकारच्या जगातील सर्व तोफांमध्ये असणारा ४७.२ कि.मी.चा पल्ला उच्चांक मोडून नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. या तोफेसाठी पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या प्रेरित चालनाचा (ऑल इलेक्ट्रिक सव्र्हों ड्राइव्ह) उपयोग करून, युद्धभूमीवर होणारा देखभाल व दुरुस्तीचा काळ कमी करून, उपयोगी कालावधी वाढविला आहे. या पूर्वी सामान्यतः बहुधा द्रवचलित प्रेरित चालनाचा (हायड्रॉलिक सर्वोड्राईव्ह) उपयोग करत. त्यावेळी तेल गळती, टोकाचे तापमान, धूळ व बारीक वाळू, यांचा परिणाम होत असे.

इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग करून सर्व विद्युतिकरण केल्यामुळे नियंत्रण सबळ, सोपे आणि सुटसुटीत झाले आहे. तोफखान्यांकडे असणाऱ्या नियंत्रण प्रणालीशी एटॅग्स तोफा सुसंगत असल्याने तोफखान्याच्या आदेशाप्रमाणे युद्धक्षेत्रात कार्य करतात. उपलब्ध शस्त्रास्त्रांचा साकल्याने विचार करून योग्य व प्रभावी उपयोग, युद्धभूमी व्यवस्थापन आणि नियोजन, क्रियान्वयन आणि आपूर्ती (लॉजिस्टिक्स) करता येते.

१५५ मि.मी. x ५२ कॅलिबर प्रकारातील एटॅग्सची मारा करण्याची क्षमता अभूतपूर्व आहे. केवळ १५ सेकंदात तीनचा बर्स्ट, १५ तोफगोळे केवळ तीन मिनिटांमध्ये डागणे, आणि ६० तोफगोळे एका तासात डागता येणे, हे आणखी एक वैशिष्ट्य. १८ ते २० टन वजनाची ही तोफ सहा-आठ जवान चालवू शकतात; आणि शत्रुलक्ष्यावर तोफगोळ्यांचा भडिमार करून, ते नष्ट करू शकतात. परिणामकारक कमाल पल्ला साधारण ४८ कि.मी.चा मिळतो. या तोफेसाठी खास प्रकारचे तोफगोळे विकसित केले आहेत. एकाच तोफेतून डागण्यात आलेले पाच तोफगोळे एकाच वेळी शत्रुलक्ष्यावर मारा करतील, असा वेध घेण्याची क्षमता एटॅग्स तोफेमध्ये आहे. अवरक्त दृष्टी आणि स्वचलित नियंत्रण यंत्रणेचा उपयोग करून, रात्रीसुद्धा तोफगोळे डागण्याची क्षमता या तोफेमध्ये अंतर्भूत केलेली आहे. २०१३ मध्ये या तोफ प्रकल्पाच्या विकासाला सुरुवात झाली व प्राथमिक प्रात्याक्षिक चाचण्या २०१६ मध्ये झाल्या. तोफेच्या यशस्वी प्राथमिक चाचण्यांनंतर, २०१७च्या प्रजासत्ताकदिन संचलनात या तोफा पहिल्यांदा जगासमोर जाहिरपणे सादर करून, एका अर्थाने ताकदीची घोषणाच केली गेली. सप्टेंबर २०१७ मध्ये तत्कालीन नूतन संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांना तोफेची सलामीच देऊन, एक प्रकारे भरभक्कम संरक्षण तंत्रज्ञानामधील प्रगती दाखवून देशाला आश्वस्त केले. याचा ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाला बळकटी मिळण्यासाठी उपयोग झाला.

भारतीय सशस्त्र दले जगातील प्रगत सैन्यांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या आघाडीवर आहेतच. त्यास स्वदेशी तंत्रज्ञानाची जोड देऊन शस्त्रास्त्रे व दारुगोळा, तसेच क्षेपणास्त्रे ही भारतीय तंत्रज्ञानाधारित व भारतातच उत्पादन केली, तर कमी खर्चामध्ये भारत स्वयंपूर्ण व मजबूत देश म्हणून उभा राहील; आणि संरक्षण तंत्रज्ञानात अग्रेसर झाला तर परावलंबित्व कमी होईल. याचे सहज परिणाम म्हणून डॉ. अब्दुल कलाम यांच्या अपेक्षेनुसार भारत देश झपाट्याने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे.

लढाईसाठी विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची सैन्याला गरज असते. अगदी छोट्या पिस्तुल, रायफल यांपासून आंतरखण्डीय क्षेपणास्त्रांपर्यंत, तसेच सर्वबाजूने येणाऱ्या शत्रूचा बिनतोड मुकाबला करण्यासाठी विविध तोफखाने, अग्निबाण, विमानविरोधी अस्त्रे, क्षेपणास्त्रे, सुदूर समुद्रात, खोल समुद्रात, हवेमध्ये व अवकाशामध्ये हल्ला करायची किंवा परतवून लावायची वेळ आली; तर जशी लढाऊ विमाने, लढाऊ जहाजे, पाणबुड्या या सर्वांचीच आवश्यकता असली, तरी मुलूख मैदानी तोफांचे महत्त्वही खूपच आहे. ती आवश्यकता एटॅग्स तोफखाने निश्चितच भरून काढतील. १९८५ मध्ये सामील झालेल्या बोफोर्स तोफा आता कालबाह्य होऊ लागल्या आहेत आणि त्याची जागा एटॅग्स तोफा निश्चितच घेतील. जशी अग्निबाण तोफखान्यांसाठी पिनाक क्षेपणास्त्र प्रणाली एआरडीईने दिली, तशीच एटॅग्स ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची तोफ सशस्त्र दलांसाठी तयार करून दिली आहे.

एटॅग्स तोफ ही न्यूटनच्या दुसऱ्या नियमावर आधारित, तर पिनाक क्षेपणास्त्रप्रणाली ही न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार कार्य करते. एटॅग्स तोफ याला मुलूख मैदानी तोफ म्हणतात. कारण, ही केवळ मैदानांमध्येच नाही, तर डोंगरी भागातसुद्धा तितक्याच प्रभावीपणे व क्षमतेने सेवा देते. आवश्यक्तेनुसार – ३० ३° ते ७०° उन्नतांश (एलेव्हेशन) तर +/- २५° म्हणजेच डावीकडे व उजवीकडे २५० इतक्या वर्तुळ पाकळी क्षेत्रातील, ४८ कि.मी. कमाल पल्ल्यावरील शत्रुलक्ष्य अचूक टिपून उद्धस्त करणे, हे एटॅग्सचे खास वैशिष्ट्य आहे.

एटॅग्स तोफ याचे मुख्य भाग व यंत्रणा या भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून बनवल्या आहेत. तोफ डागताना आवश्यक ते स्थैर्य प्रदान करणारी ‘तोफगाडी’ ही ‘वाहन संशोधन विकास संस्थेने विकसित केली आहे; तर तोफगोळ्यांसाठी लागणारी स्फोटके/नोदक प्रणाली ही ‘उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळे’ च्या साहाय्याने बनवली आहे. तोफगाडीस दोन प्रकारांनी गतिमानता मिळते. तोफ जवळच्या हालचालीसाठी स्वत:चे १०० किलोवॅट क्षमतेचे शक्ती केंद्र वापरते. तोफखाना अथवा तोफा मोठ्या प्रमाणावर, जास्ती अंतरावर नेण्यासाठी वाहनाच्या मागे बांधून ओढून न्यायची व्यवस्था असते. म्हणूनच या तोफ प्रकाराला खेचलेली तोफ (TOWED GUN) म्हणतात. अशा वेळी तोफा वाहून नेतानाचा वेग ताशी चाळीस किलोमीटर, तर स्वतःचे शक्तिकेंद्र वापरून तो वेग ताशी अठरा किलोमीटर आहे. त्याला स्वनोदित (सेल्फ प्रॉपेल्ड) वेग म्हणतात.

१५५ मि.मी. व्यासाच्या अतिविस्फोटक (हाय एक्स्प्लोझिव्ह – एचई) तोफगोळ्यांचा पल्ला वाढविण्यासाठी दोन प्रकार केले आहेत: एचई-बीटी आणि एचई- बीबी. बीटी म्हणजे बोट ट्रेट. या प्रकारच्या तोफगोळ्याच्या पुढील बाजूस वात म्हणजे फ्युज असतो; व मागील बाजूस त्याचा आकार बोटीसारखा थोडा निमुळता करतात. त्यामुळे हवेमधून जाताना, त्याला मागील बाजूकडून होणारा विरोध (कर्षण) कमी होतो. पर्यायाने पल्ला थोडा वाढतो. ‘एचई- बीबी’मध्ये तळस्त्रावाचे (बेस ब्लीड ) तंत्रज्ञान विकसित केले आहे. तोफगोळ्याच्या मागील खोबणीमध्ये विशिष्ट नोदक (प्रॉपेलंट) भरून ठेवतात. तोफेतून तोफगोळा डागल्यावर, हवेतून लक्ष्यापर्यंत मार्गक्रमण करत असताना, पाठीकडील गोळ्याच्या खोबणीतील नोदक जळायला सुरुवात होते, व तप्त वायू बाहेर सोडला जातो. यामुळे तोफगोळा मागून खेचला जाणे बंद होते व पल्ला वाढतो. याच तोफगोळ्याने ४८.०७४ कि.मी. पल्ला देऊन जागतिक उच्चांक स्थापित केला आहे.

तोफेमध्ये तोफगोळे भरणे हे जिकिरीचे काम असते, कारण मोठ्या तोफांचे तोफगोळे हे मोठे व वजनाने जास्त असल्याने, ते भरणा करताना जवानांची दमछाक होऊ नये व त्वरित डागता यावेत, यासाठी तोफगोळे तोफेमध्ये भरणारी यंत्रणा – क्रेन – विकसित केली आहे. तोफेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तोफनळी (गन बॅरल). यासाठी उच्च प्रतीच्या पोलादाचा मिश्र धातू वापरला जातो. त्यामध्ये विविध धातू विशिष्ट प्रमाणात मिश्रित करतात, ज्यामुळे यांत्रिक गुणधर्माबरोबरच अन्य भौतिकी, रासायनिक गुणधर्म सुधारून कमी झीज शक्य असते, तसेच तोफनळी गंजविरोधी बनते. तोफ डागल्यानंतर निर्माण होणारे स्फोटवायू, उच्च तापमान व उच्च दाब यांपासून टिकाव धरणे; व असे असंख्य वेळा तोफगोळे डागले, तरी तोफनळी तशीच बळकट राहील, अशी बनवतात. तोफनळीला आतून सर्पिलाकार खाचांचा संच असतो, तो कोरून काढावा लागतो. यालाच रायफलिंग म्हणतात यामुळे तोफगोळा नळीतून बाहेर शत्रुलक्ष्याकडे फेकल्यावर प्रचंड गतीने स्वतःभोवती फिरत जातो, ज्यामुळे त्याच्या अपेक्षित हवाई मार्गावर प्रवास करताना स्थैर्य मिळते.

तोफनळीच्या ज्या बाजूने तोफगोळा भरला जातो, तिथे तोफगोळा फायर करायच्या आधी संपूर्ण व मजबुतीने बंद करावे लागते. कारण, जेवढे बल तोफगोळ्यावर कार्य करते, तेवढेच बल मागील/ सर्व बाजूंवर कार्यरत असते. मात्र, तोफगोळा सोडल्यास सर्व बाजू ते सहन करतील, एवढ्या मजबूत बनवाव्या लागतात. नळीच्या सभोवतालची भिंत जाड बनवलेली असते, परंतु मागील बाजू भक्कमपणे बंद करणारी यंत्रणा असते. ही बाजू अशा ‘हवाबंद’ पद्धतीने काम करते, की उच्च दाब व उच्च तापमानाचे स्फोटवायू येथून बाहेर पडू दिले जात नाहीत.

तोफनळीच्या ज्या बाजूकडून तोफगोळा बाहेर फेकला जातो, त्याला ‘मझल’ असे म्हणतात. तोफगोळा जेव्हा खूप वेगात बाहेर पडतो, तेवढाच संवेग तोफेवर कार्य करतो व तोफ मागच्या दिशेने ढकलली जाते. त्याला ‘प्रतिक्रिया बल’ (रिकॉइल फोर्स) असे म्हणतात. या बलाला मध्येच जिरवले, तर तोफेवरील बल कमी होते. यासाठी दंडगोल आकाराच्या बंद जागेत हवा व चिकट तेल घालून, दट्ट्याची रचना करून प्रतिक्रिया बल जिरवतात. मझलकडून तोफगोळा बाहेर पडल्यावरही नोदकवायू तेथून हवेमध्ये सोडले/ फेकले जातात. या वायूंचा उपयोग करून, प्रतिक्रिया बलाच्या विरुद्ध बल लावून, ही प्रतिक्रिया कमी केली जाते.

अद्ययावत व अत्याधुनिक विविध यंत्रणा आणि विविध प्रकारच्या अद्ययावत तंत्रज्ञानाधारित प्रणाली यांची जोड दिल्यामुळे, एटॅग्स ही जागतिक दर्जाची तोफ झाली आहे. त्यामुळे भारत तोफ विभागात स्वयंपूर्ण होत आहे. बोफोर्सची जागा भरून काढून भारतीय तोफखाने समृद्ध, सशक्त व बळकट करण्यासाठी एटॅग्स तोफा निश्चितच उपयोगी सिद्ध होत आहेत. म्हणूनच संरक्षण मंत्रालयाने १५० तोफा बनवण्यासाठीचा कार्यादेश देऊन, दोन खाजगी कंपन्यांशी ३३६४.७८ कोटी रुपयांचा करार ऑगस्ट २०१८ मध्येच केला आहे.

एआरडीईने ‘पिनाक’ व ‘एटॅग्स’ या दोन्ही तोफखान्यांच्या पूर्ततेसाठी अद्ययावत व अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले; व ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत त्यांचे उत्पादन सुरू केले. इथून पुढेही संशोधनात खंड न पडता उत्तरोत्तर नवनवीन शस्त्रे विकसित करून, एआरडीई भारत अजिंक्य होण्यासाठी आपले योगदान अखंडपणे देत राहील, हा विश्वास वाटतो.

। जय हिंद ।

 -काशीनाथ देवधर

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..