नवीन लेखन...

१४ वे नौसेनाप्रमुख ॲडमिरल जयंत नाडकर्णी

भारताचे १४ वे नौसेनाप्रमुख ॲडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म ५ डिसेंबर १९३१ रोजी झाला.

जयंत नाडकर्णी इंग्रजी सहावीत असतानाच (आजच्या नववीच्या समकक्ष) वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांची आय.एम.एम.टी.एस. ‘डफरीन’ या व्यापारी नौदल प्रशिक्षण जहाजावर प्रशिक्षणाकरिता निवड झाली. खरे तर, ‘डफरीन’वर वयाच्या सोळाव्या वर्षीच प्रवेश दिला जात असे; पण नाडकर्णी याला अपवाद ठरले. तीन वर्षांच्या खडतर अभ्यासक्रमाअंती त्यांनी ‘एक्स्ट्रा फर्स्ट क्लास सर्टिफिकेट’ ही ‘डफरीन’वरील सर्वोच्च पदवी मिळविली. तेथून त्यांची भारतीय नौसेनेत फेब्रुवारी १९४९ मध्ये विशेष निवड झाली. भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले असल्यामुळे सेनादलांच्या विशेष प्रशिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांना मार्च १९४९ मध्ये प्रशिक्षणासाठी ब्रिटनमधील डार्टमाउथ येथील ‘रॉयल मरीन नेव्हल कॉलेज’मध्ये पाठविण्यात आले. मे १९५३ मध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले.

भारताने ब्रिटनकडून खरेदी केलेल्या ‘आय.एन.एस. गंगा’ या युद्धनौकेवर त्यांची दिशादर्शक अधिकारी (नेव्हिगेशन ऑफिसर) म्हणून नियुक्ती झाली. जुलै १९५५ मध्ये त्यांना दिशादर्शनातील विशेष अभ्यासक्रमासाठी पुन्हा ब्रिटनला, रॉयल मरीन नेव्हल कॉलेजला पाठविण्यात आले. त्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवून मार्च १९५६ मध्ये भारतात परतल्यावर ‘आय.एन.एस. तीर’ या फ्रिगेट गटातील युद्धनौकेवर त्यांची दिशादर्शन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
ऑक्टोबर १९५६ पासून पुढील पाच वर्षे त्यांनी ‘आय.एन.एस. दिल्ली’ या क्रूझर गटातील युद्धनौकेवर दिशादर्शन अधिकारी म्हणून काम केले.

डिसेंबर १९६१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून गोवा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. त्या वेळी नौसेनेची भूमिका महत्त्वाची होती. तेव्हा जयंत नाडकर्णी यांच्यासह काही जणांना पुन्हा आय.एन.एस. दिल्लीवर जबाबदारी देण्यात आली. या संग्रमात दीवमध्ये शिरणे भारतीय भूसेनेला शक्य होत नव्हते. त्या वेळी ‘आय.एन.एस.दिल्ली’ने दीवच्या किल्ल्यावर अत्यंत जवळून तोफांचा भडिमार करून तेथील पोर्तुगीजांना जेरीस आणले. त्यामुळे भारतीय भूसेनेला दीववर ताबा मिळविणे सोपे गेले. या लढाईत नाडकर्णी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

विविध जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर नोव्हेंबर १९८७ मध्ये त्यांची भारताच्या नौसेनेचे प्रमुख म्हणून ‘ॲडमिरल’पदी नियुक्ती करण्यात आली. नौसेना प्रमुखपदाच्या त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत दोन वर्षे ते भारतीय सेनादलांचे संयुक्त प्रमुख (‘चीफ ऑफ जॉईंट चिफ्स ऑफ स्टाफ’) होेते.

मालदिवच्या बंडखोरांविरुद्धच्या या ‘ऑपरेशन कॅक्टस’ मोहिमेत भारतीय नौसेनेची आणि नौसेनाप्रमुख जयंत नाडकर्णींची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. विशेष म्हणजे या मोहिमेत नौसेनेच्या आय.एन.एस. गोदावरी (एफ २०) आणि आय.एन.एस. बेटवा (एफ ३९) या फ्रिगेट जातीच्या युद्धनौकांनी प्रामुख्याने भाग घेतला होता.

नाडकर्णींना १९६९ मध्ये ‘विशिष्ट’ सेवा पदक, १९७७ मध्ये ‘नौसेना’ पदक, १९८३ मध्ये ‘अतिविशिष्ट’ सेवा पदक आणि १९८५ मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आले.

दिनांक २ जुलै २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..