नवीन लेखन...

आपला प्रवास खूप छोटा आहे…

मी बसने प्रवास करीत होतो. माझ्या पुढच्या बाजूला एक तरुणी बसलेली होती, तिच्या शेजारची सीट सोडली तर संपूर्ण बस भरलेली होती. पुढच्या स्टाॅपवर एक लठ्ठ स्त्री सामानाने भरलेल्या दोन पिशव्यांसह पुढील दरवाजातून बसमध्ये चढली व त्या मुलीच्या शेजारी रेटून बसली. मी तिला न राहवून विचारले की, ‘तू तिला काहीच कसे बोलली नाहीस?’ तिने स्मितहास्य करुन उत्तर दिले, ‘अनावश्यक वाद घालण्यात काही अर्थ नाही, आपला एकत्र प्रवास हा खूप छोटा आहे. मी येणाऱ्या पुढच्याच स्टाॅपवर उतरणार आहे.’
ही तिची ‘प्रतिक्रिया’ प्रत्येकानं आपल्या जीवनात अंगिकारली तर आपलं जीवन नक्कीच आनंदमय होऊ शकतं!
जसा हा बसचा प्रवास काही मिनिटांचा आहे, तसंच आपलं जीवन हे काही वर्षांचंच आहे. माणसाचं आयुष्य हे मर्यादित काळाचं आहे. आपल्याला मिळालेला वेळ इतका कमी आहे की, त्या वेळात भांडणं, निरर्थक वादविवाद, इतरांना क्षमा न करणं, दुसऱ्यामधील दोष शोधत रहाणं, यामध्येच आपल्या वेळेचा व उर्जेचा अपव्यय होतो.

कुणी आपलं मन दुखावलं आहे का?
– शांत रहा, आपला प्रवास खूप छोटा आहे.
कुणी तुमचा विश्वासघात केला आहे का? फसवलं आहे का?
– सोडून द्या, शांत रहा… कारण आपला प्रवास खूप छोटा आहे.
कुणी तुम्हाला त्रास दिला असला तरी लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा आहे की छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे तेही कुणालाच माहीत नाही… आपला प्रवास मात्र खूप छोटा आहे.
आपण आपल्या मित्रमंडळींची व नातेवाईकांची कदर करुया. आपण एकमेकांचा आदर करु, एकमेकांशी प्रेमाने वागू. जर मी तुम्हाला अनावधानानं कधी दुखावलेलं असेल तर मला माफ करा. जर तुम्ही मला कधी दुखावलं असेल तर ते मी कधीच विसरुन गेलोय… कारण आपला प्रवास खूप छोटा आहे.

इतिहासातल्या काही घटना फारच बोधप्रद आहेत, त्यातून शिकण्यासारखं बरंच काही आहे…
अर्ध जग जिंकलेला आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगणारा सिकंदर, आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला होता, ‘माझ्या मृत्यूनंतर माझं प्रेत नेताना माझे दोन्ही हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडा. जगाला कळू द्या, जिवंतपणी जग जिंकायला निघालेला सिकंदर मृत्यूनंतर मोकळ्या हातानेच गेला.
फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट, वाॅटर्लूच्या तुरुंगात खंगून खंगून मेला.
जर्मनीचा शहेनशहा अॅडाॅल्फ हिटलर, ज्यानं दुसरं महायुद्ध घडवलं. त्यालाही शेवटी आत्महत्या करावी लागली.
इराकचा बादशहा सद्दाम हुसेन, ज्यानं इराकवर हुकूमत केली. नको तितकी संपत्ती गोळा केली. त्यालाही शेवटी फासावर लटकावं लागलं.

अमेरिकन सरकारला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन, याला अमेरिकन सैन्यानं सर्जिकल स्ट्राईक करुन कुचलून ठार केलं व त्याचं प्रेत समुद्रात टाकून दिलं.
आपल्या वडिलांना, शहाजहानला तुरुंगात टाकून, भावांचा खून करुन सत्ता मिळविलेल्या, भारतावर साम्राज्य करणाऱ्या औरंगजेब बादशहाच्या थडग्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. आपल्या विनोदी अभिनयानं जगाला हसविणारा चार्ली चॅप्लीन हृदयविकाराच्या झटक्याने गेला. आपल्या सौंदर्याने भल्या भल्यांना घायाळ करणारी मर्लिन मन्रो अति मद्यसेवनाने गेली.
मनोरंजनातून लोकांच्या मनावर राज्य करणारे राजेश खन्ना, विनोद खन्ना, भगवान दादा, परवीन बाबी, एक. के. हंगल यांचे मृत्यू आठवा.

सध्याच्या कोरोना विषाणूने जगावर मोठे संकट आलेले आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की, आपलं आयुष्य हे मर्यादित आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा आपला प्रवास खूप छोटा आहे. काळ कुणासाठीही थांबत नाही. आपल्याकडे जे काही आहे, त्याचा चांगला उपयोग करा‌. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे, उद्या नसेल. पण चांगल्या कर्माने मिळविलेली माणुसकीच आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल. कितीही संपत्ती मिळविली असली तरी ती इथंच रहाणार आहे.
भरकटलेल्या जहाजावर कितीही पैसा असला तरी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले रहा. संपत्ती आणि पदाचा गैरवापर करु नका. जोडलेला पैसा कपाटातच राहतो. जोडलेली माणसं, नातेवाईक स्मशानापर्यंत येतात. सोबत कोणीही येत नाही. पण चांगलं कर्म, सत्कीर्ति सोबत येते.
शेवटी, आपला प्रवास ‘खूप छोटा’ आहे…

– सुरेश नावडकर 
मोबाईल ९७३००३४२८४

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on आपला प्रवास खूप छोटा आहे…

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..