नवीन लेखन...

आम्र यज्ञ

14 मार्चला बाजारात देवगड हापूसच्या पहिली पेटी मिळाली, ती विकत घेऊन, कार मध्ये आपल्या सोबत ठेऊन तो अवीट मधुर आम्रगंध रोमारोमात साठवत, रंध्रारंध्राने शोषत घरी आणला !

त्या गुबगुबीत, रसरशीत राजाचे देखणेपण नजरेत न सामावणारे, त्याचा तो उबदार स्पर्श हवाहवासा वाटणारा, त्याची नजाकत दिल खुश करणारी !

सुरी फिरवताच त्या सुमधुर रसाचे पहिले दर्शन घडले. असे अफाट आणि अचाट फळ निर्मिणाऱ्या विधात्याचे शतशः आभार मानले आणि देवाला नैवेद्य दाखवून, सहकुटुंब, सहपरिवार मनमुराद आस्वाद घ्यायला सुरुवात केली.

पहिला आंबा खाल्ला….
दुसरा आंबा खाल्ला……
तिसरा आंबा खाल्ला ……
पुढे मोजदाद थांबली, पण आंब्यावर ताव मारणे चालूच राहिले.
जणू श्वास घेण जितकं आवश्यक, तितकंच आंबा खाणं !

कधी कापून फोड तोंडात कोंबून दातांना तो केशरी जर्द गाभा साली पासून वेगळा करण्याची संधी दिली, तर कधी सोलुन तो रसरशीत चेंडू जीभ, तोंड, हाताची दाही बोटं आणि मनगटापर्यंत ओघळ येईतो मिटक्या मारत खाल्ला ! कधी कधी हळुवार पणे दाबून आंबा फुटणार नाही याची काळजी घेत कोई पासून रस वेगळा केला आणि मग देठाचा भाग हळुवार कुरतडून तो तोंडाला लावला, जणू काय स्वप्नपरीचे रसाळ चुंबन !!

त्यानंतर मग दाट आमरस त्यात कणीदार तूप ! सोबत कधी पुरी तर कधी घडीची चपाती तर कधी मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी ! साथीदार बदलत गेले पण सर्वांचा स्थायीभाव असणारा आंबा ,अमिताभ सारखे आपले उच्च स्थान मिरवीत राहिला.

आम्ही सगळी पुरुष मंडळी, मुले बाळे, लहान मोठी भावंड, आई, आजी यांच्याकडून कोड कौतुक करून घेत घेत आंबा वहिनीच्या हाती लागला.
मग काय, कोकणातला धोतर नेसून, मुंडाशे बांधून आलेला आंबा सूटा बुटात गेला.

मैंगो विथ क्रीम, पाऊण ग्लास आमरसा वर तो क्रीमचा थर, उगाचच पिताना पांढऱ्या मिशा काढणारा, त्याला कुठली आलीय पिवळ्याजर्द मिशीची सर ! पण वहिनी खुश व्हावी म्हणून आंब्याच्या झाडाला जितका मोहोर आला असेल तितके कौतुक वहिनीचे व्हायचे!

मग दुसरे दिवशी मँगो ज्युस विथ आइस क्रीम ! केशरी आमरसा वर तरंगणारा व्हॅनिला आईस्क्रीम चा पांढरा शुभ्र गोळा !
आईस्क्रीम अमूलचे, कौतुकाचा वर्षाव वहिनीवर !! घरातली नवी सून ना ती !!

मग ती बनवायची मँगो स्मूदी !
दाट रसात, दूध आणि बर्फ घालून तो पांचट का करायचा हे समजत न्हवते आणि विचारायची बिशाद न्हवती.
मग वहिनीने मँगो शेक केला ! बुळबुळीत कस्टर्ड केले !! वा वा !! छानच झाले होते ! असे म्हणून आम्ही आमचे संस्कार दाखवले !
आंब्याच्या बारीक फोडी करून, त्यात चिक्कु, सफरचंद,केळीचे तुकडे घालून फ्रुट सलाड बनवले आणि अनभिषिक्त सम्राटाला,चपराशी,हुजरे यांच्या  पंक्तीत नेऊन बसवल्याचा फील आला .
त्यातुन बाहेर पडण्या अगोदर आई आणि वहिनीने मोदकात आंबा फील केला आणि आंबे मोदक खाऊन गजाननसह आम्ही सर्वांनी पोटावरुन हात फिरवून तृप्तीचे ढेकर दिले.

असा हा आंबा, कोकणच्या अर्थ व्यवस्थेचा कणा, पण सगळं काही निसर्गावर आणि आंबे खंडून घेणाऱ्या दलालावर अवलंबून. आम्ही दलालाला दोन हजाराची नोट दिली की शेतकऱ्याला वरची शून्य पुसली जाऊन दोनशे मिळायचे.हेच त्या शेतकऱ्याचे दुःख आंबा खाताना कधी केसर बनून दातात अडकते तर कधी आंबा लागतो आणि आमचे पन्नास रुपयाचे नुकसान करते.आणि आंबा पिकवणाऱ्याच्या दुःखात आम्हाला भागीदार बनवतो. असो.

असा हा आंबा, रोज नव्या रुपात, नव्या ढंगात आम्हाला भेटत रहातो, वाढता उन्हाळा सुखद बनवतो. आमच्याकडे 38 डिग्री, तुमच्याकडे किती असले प्रश्न बोथट करतो.

असा हा उण्या पुऱ्या दोन महिन्याचा सहवास, जशा आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात, त्याप्रमाणे आंबा हि संपतो. रहातात त्या तृप्तीच्या आठवणी आणि बनियन वर पडलेले डाग !

गुडी पाडवा आणि अक्षय तृतीया हे सण घराघरात हा साजरे करतो, ज्यांना देवगड चा रुबाब परवडत नाही, त्यांच्यासाठी रत्नागिरी हापूस असतो. तो हि खिशाला जड वाटला तर कर्नाटकी, पायरी इत्यादी चुलत-मावस भावंडे तृप्तीचा ढेकर सोबत घेऊन येतातच.

जसे गणरायाचे दर्शन वेगवेगळ्या रुपात, भावमुद्रात होते तसेच हा कोकणचा राजा रोज वेगवेगळ्या रंग रुपात आम्हाला भेटत रहातो…..

आज शेवटची पेटी आली …..सिझन संपला. आता परत पुढच्या मार्च पर्यन्त प्रतीक्षा…..विरह सहन करत…ते सहवासाचे सुखद क्षण आठवत !

अधुन मधून आंबावडी, आंबा पोळी यातून तो ओझरता भेटत असतो पण सिझन मधल्या गर्द केशरी, रसाळ आंब्याचे आलिंगन,चुम्बन याची मजा या शुष्क पोळी,वडीत अजिबात येत नाही.

डबा बंद रस वर्ष भर मिळतो …पण आपल्या लाडक्या प्रेमाला असे कैदेत पाहुच शकत नाही मग ती डब्यातली कैद असली म्हणून काय झाले !!

त्याचा राजसी रुबाब फ़क्त तो जेंव्हा ताजा रसरशित असतो तेंव्हाच् असतो.

जगात उत्तम गोष्टी मिळण्यासाठी प्रतीक्षा कराविच लागते …..आम्ही हि करू दर वर्षी प्रमाणे !

लवकरच ये …तुझा घम घमाट आणि अविस्मरणीय चव आणि अफलातून माधुर्य घेऊन ….तुझे झाड लावणाऱ्या, तुला खत पाणी देणाऱ्या, निगा राखणाऱ्याला आनंदी, समाधानी करून ! भले थोडा महाग झालास तरी हरकत नाही, पण तुझे संगोपन करणाऱ्याचे चेहरे समाधानाने तुझ्या रंगासारखे खुलले आणि तुझ्यासारखे गोबरे झाले असतील तर तुझी चव अजून वाढेल !

अजुन तू पूर्णतः गेला नाहीस … दोन महिने सतत घरी चालू असणाऱ्या आम्र यज्ञाची आता सांगता होईल. तू मिळणार नाहीस याचे दुःख आहेच, पण तू पुनः येणार आम्हा सर्वांना तुझे अमृत प्राशन करायला मिळणार, याचा आनंदहि आहे.

तुझ्या पुढील वर्षीच्या स्वागताला उत्सुक आहोत …. ये रे आंब्या, लवकर ये !!

— © अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०

आपल्या अभिप्रायचे स्वागत.
जरूर फॉरवर्ड करा.

आपल्या देशात उपलब्ध असणारे आंब्यांचे प्रकार :-(सौजन्य: रवींद्र भोकरे)

(०१) केशर
(०२) देवगड / रत्नागिरी हापुस
(०३) दूध पंडो
(०४) निलेशान
(०५) रूमी हापुस
(०६) जमरुखो
(०७) जहांगीर पसंद
(०८) कावसजी पाटल
(०९) नील फ्रंजो
(१०) अमीर पसंद
(११) बादशाह पसंद
(१२) आंधारियो देशि
(१३) नारिएरी
(१४) कालिया
(१५) पीलिया
(१६) बाजारिया
(१७) हठीलो
(१८) बाटली
(१९) कालो हापुस
(२०) कच्चा मिठा
(२१) देशी ामबडी
(२२) बदंदी
(२३) सिंधडी
(२४) कल्याण बघि
(२५) राजपुरी
(२६) अषाडी
(२७) लंगदा
(२८) रूस
(२९) जंबो केशर
(३०) सुपर केशर
(३१) अगासनो बाजारिया
(३२) सफ़ेदह
(३३) मालदा
(३४) गोपालभोग
(३५) सुवर्ण रेखा
(३६) पितर
(३७) बेगान पलि
(३८) ाण्डूस
(३९) याकूत रूमानि
(४०) दिल पसंद
(४१) पोपटिया
(४२) गढीमार
(४३) ामीनि
(४४) चम्पिओ
(४५) वलसाड हापुस
(४६) बदमि
(४७) बेगम पलि
(४८) बोरसिया
(४९) दधमिया
(५०) दशेरि
(५१) जमादार
(५२) करंजियो
(५३) मक्का रम
(५४) मलगोबा
(५५) नीलम
(५६) पायरि
(५७) रूमानि
(५८) सब्जी
(५९) सर्दर
(६०) तोतपुरी
(६१) ाम्रपालि
(६२) मल्लिका अर्जूं
(६३) रत्नगिरि हापुस
(६४) वनराज
(६५) बार्मासि
(६६) श्रावनिया
(६७) निलेश्वरी
(६८) वासी बदमि
(६९) गुलबाडी
(७०) अमृतंग
(७१) बनारसी लंगदा
(७२) जामिया
(७३) रसराज
(७४) लाड़वियो
(७५) ीालचि
(७६) जीतहरिया
(७७) धोलिया
(७८) रतना
(७९) सिंधु
(८०) रेशम पायरि
(८१) खोडी
(८२) नीलकृट
(८३) फ़ज़्लि
(८४) फाज़ली रांगोळी
(८५) अमृतिया
(८६) काज
(८७) गाजरिया
(८८) लिलिया
(८९) वजीर पसंद
(९०) ख़ातियो
(९१) चोरसा
(९२) बम्बई गल्लो
(९३) रेशमडी
(९४) वेलिया
(९५) वलोति
(९६) हंसराज
(९७) गिरिराज
(९८) स्लगं
(९९) टाटा ाम्ब्दी
(१००) सलामभाई ामबडी
(१०१) अर्धपुरी
(१०२) श्रीमंति
(१०३) निरंजण
(१०४) कण्ठमालो
(१०५) कुरैशी लंगदा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..