नवीन लेखन...

आमचा नाना आप्पा

भागात सर्वपरिचित नाव म्हणजे नाना हुरसाळे. तो नाना, नानाभाऊ, नानादा, नानाआप्पा अशा अनेक नावानी प्रसिद्ध आहे. नाना नावाची माणसे एक वेगळेच रसायन असतात. हे आमच्या नानाआप्पा वरून तरी जाणवते.

नाना आप्पा म्हणजे एक विलक्षण माणूस. क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे, एखाद्या पाखरासारखा त्याचा संचार असतो. नारद मुनी जसे स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे सतत भ्रमण करतात. तसाच हा. जसे नारदाकडे कोणतेही वाहन नाही. तसेच नाना आप्पा कडे ही अद्याप कोणतेही वाहन नाही.

नाना आप्पाची आणि माझी पहिली भेट म्हणजे मी लहान असताना त्यांच्या वाडीतून पार्वताबाई उगले यांच्यासह त्यांच्या दारातून असलेल्या वाटेने चाललो होतो. आत पडवीला नाना आप्पा व दूंदा बांगर बसले होते.

मला पाहताच, पारबते! हे पोर कोणाचं? असा प्रश्न नाना आप्पाने विचारला. त्यावेळी तेथे आमच्या शेजारीच राहत असलेल्या दूंदा बांगर यांनी माझी ओळख त्याला सांगितली.

लगेच मला नाना आप्पाने घरात बोलावून घेतले. बसायला सांगितले. पूर्वी मोठे पितळाचे आतून कल्हई लावलेले ग्लास असायचे. तेवढे भरून गरम दूध साखर टाकून मला प्यायला दिले. साखर टाकून पहिले दूध मी नाना आप्पा यांच्या घरी पहिल्यांदाच पिलो असेल. तेव्हा खऱ्या अर्थाने मला दुधाची चव कळली.

पूर्वी नाना आप्पा ट्रकच्या मागच्या फाळक्यावर उभा राहून, तर कधी ट्रकच्या टपावर बसून किंवा कधी कधी एसटीमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसून प्रवास हा त्याचा ठरलेला असायचा. आता मोटरसायकल वर मागे बसून, किंवा कुणाच्या तरी कारमध्ये बसून त्याचा प्रवास अध्यापही चालू आहे.

गळ्यात तुळशीची माळ,जुन्या पद्धतीचा मळकट पांढरा लेंगा, पांढरी मळकट पैरण डोक्यात टोपी व गळ्यात गुलाबी माफलर आणि पायात कोल्हापुरी वहाणा असा पेहराव घालून नाना आप्पा सदा सर्वकाळ वावरत असतो.

सकाळी उठून म्हशीच्या धारा काढून किटलीत दुध घेऊन डेअरीवर घालून त्याच दुधाच्या गाडीने कोणतेही काम नसले तरी डेहणे या गावी जायचे. हे नाना आप्पाचे दररोजचे काम असायचे. आता मोटारसायकल व इतर फोर व्हिलर गाड्यामुळे त्याचे काम अजून सोपे झाले आहे.

रस्त्याने पायी जात असताना सुद्धा कोणतीही एसटी कारण नसताना हात दाखवून थांबवण्याची जादू त्याच्या हातात आहे. धावत असलेली एसटी थांबवून त्या एसटी मध्ये न बसता ड्रायव्हर बरोबर गप्पा मारणे हे त्याचे आवडत्या कामापैकी एक काम.

एरवी हात दाखवूनही केवळ एसटी स्टॉप नसल्याने प्रवाशांना गाडी न थांववणारे ड्रायव्हर नाना अप्पाने हात दाखवल्यावर हमखास कारण नसतानाही गाडी का थांववतात हे रहस्य अजून कोणालाही कळले नाही.

नाना आप्पा म्हणजे मनात कोणतेही किल्मीश नसलेला साधा भोळा परंतू हट्टी माणूस. फणसासारखं गोड, वाटेने जात असताना कुणी माणूस भेटला व नाना आप्पाला म्हटला की चल माझ्याबरोबर माझे काम आहे. तर हा गडी निघालाच त्याच्याबरोबर. कधीकधी नाना आप्पाच त्याला विचारी कुठे चालला? तेरे उत्तर देण्याआधीच हा त्याच्याबरोबर जायला तयार.

आपले स्वतःचे काम सोडून, दुसऱ्याचे काम करण्यात, किंवा त्याच्याबरोबर कामासाठी दूर गावी जाण्यात नाना आप्पाला आत्मिक समाधान मिळते.

घरात किंवा शेतात एखादे महत्त्वाचे काम नाना आप्पा कारित असेल आणि अशावेळी एखादा माणूस त्याच्याकडे गेला आणि म्हणाला.

नाना अरे,! जरा अनुक तमूक गावाला जायचे आहे.

कशाला जायचे आहे हे न विचारताच नाना त्याच्याबरोबर जायला एका पायावर तयार असतो. मग आपल्या कामाचे बारा वाजले तरी चालतील. त्याची फिकीर नाना आप्पा कधीच करीत नाही.

नाना आप्पा बरोबर प्रवास करणे म्हणजे अत्यन्त कंटाळवाने काम. रस्त्याने जाताना प्रत्येक माणसाबरोबर कारण नसताना थांबून किंवा त्या माणसाला थांबवून त्याच्याबरोबर बोलत राहणे हा त्याचा आवडता छंद आहे. मग काम कितीही महत्वाचे असुद्या. म्हणूनच त्याच्या एवढ्या ओळखी असुनही त्याला भावकीत कुणी माणूस मेल्यावर नातेवाईकांना निरोप सांगण्यासाठी जाणीवपूर्वक पाठवत नाहीत. कारण त्यांना ही भीती असायची की न जाणो नातेवाईकांना मृतिकेला यायच्या ऐवजी दशक्रियेला यावे लागायचे.

नाना अप्पाचे वडील विठू हुरसाळे नेहमी म्हणायचे.

आमचा नाना एक दिवसात काशीला जाऊन येईल, पण त्याला गणगोत लय..

मी एकदा मोटारसायकल वर अगदी सकाळी काही कामानिमित्त खरोशीला चाललो होतो. तर हे महाशय डेहण्याच्या स्टॉपवर उभे होते. मला पाहताच

अरे थांब, थांब, थांब…. कुठपर्यंत? नाना आप्पा

मी खरोशीला चाललोय…मी म्हणालो.

माझ्या मागे गाडीवर बसत तो म्हणाला चल मी येतो.

तुझे काही काम आहे का तिकडे? – मी

नाही? तुझ्या बरोबर..- नाना आप्पा.

अरे मग ती पिठाची पिशवी इथेच कुठेतरी ठेऊया ना? मी म्हणालो.

नको… राहूदे हातात.. त्याला काय होतंय. नाना आप्पा.

अशा तऱ्हेने आम्ही पिठाच्या पिशवीसह कामासाठी खरोशीला गेलो.

मागच्याच मे महिन्यामधला प्रसंग. नाना आप्पाचे नवीन घराचे काम चालू होते. त्याच्याकडे पाहुणे आले होते. पाहुण्यांना जेवण बनवायचे होते. त्यासाठी नाना आप्पा बाजार आणायला शिरगावला निघाला होता. परंतु वाटेतच कुणीतरी त्याला भेटले. आणि त्या माणसाच्या कामासाठी तो निघून गेला.

रामजी जढर आणि मी आमच्या घरात तेव्हा बसलो होतो. रामजी जढर यांना त्याचा फोन आला.

रामजी, कुठयं तू? मी अमुक तमुक माणसा बरोबर त्याच्या कामासाठी बाहेर चाललो आहे. अर्ध्या तासात परत घरी येईल. तू ताबडतोब दुकानात जा. आणि अमुक तमूक बाजार घरी नेऊन दे. घरी आल्यावर मी तुझे पैसे देईल. आणि फोन ठेवून दिला. असा हा नाना आप्पा.

एकदा असच मी मोटारसायकल वरून संध्याकाळी घरी जात होतो. वाटेत नाना आप्पा भेटला. त्याला गाडीवर बसवून गप्पा मारत त्याच्या स्टॉप जवळ आलो.नाना आप्पा गाडीवरून उतरला व चालायला लागला. मीही गाडी स्टार्ट करून निघणार तर अरे थांब…. थांब… थांब.. असे म्हणून नाना आप्पा माझ्या मागे धावला. मी गाडी थांबवली.

मी घरी जाऊन येईपर्यंत इथेच थांब पुढे जाऊ नको. नाना आप्पा.

अरे पण का? मी

उत्तर द्यायला तो तिथे थांबला नाही. घाई घाईने तो घराच्या दिशेने निघून गेला.

मी सुद्धा तिथेच गाडी थांबवून उभा राहिलो. त्याची वाट पाहत.

थोड्याच वेळात तो हातात छोटीशी किटली घेऊन येताना दिसला. जवळ आल्यावर मला म्हणाला. यामध्ये दोन अडीच लिटर दूध आहे. घरी तुझी पोर आहेत घेऊन जा..

अरे पण एवढे दूध कशाला देतो.- मी

राहू दे.. घरी घेऊन जा. असा हा नाना आप्पा.

एवढ्या माणसात राहूनही नाना आप्पा कधी लबाड बोलत नाही. किंवा कुणाच्या लावालाव्या करत नाही. राजकारणाचा तर त्याला खूप राग. गावातल्या कोणत्याच भानगडीत तो पडत नाही. किंवा निवडणुकीच्या कोणत्याच प्रचाराला सुद्धा जात नाही. उलट उलट भेटल्यावर मला सांगणार. तु या राजकारणाच्या भानगडीत पडू नको.

एखाद्या माणसाला जर जीव लावला तर त्याला अंगातले कपडे काढून सुद्धा देईल. परंतु जर एखादी गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध झाली किंवा त्याला पटली नाही तर ब्रह्मदेव जरी आला आणि त्याला समजावून सांगितले तरी ऐकणार नाही. एकदा तो कुणावर रुसला की मग दोन दोन तीन वर्ष त्याच्याबरोबर बोलणार नाही.

एकदा माझे घर बांधायचे काम चालू होते. मला पाणी साठवण्यासाठी बॅरल कुठे मिळतील का या विचारात मी असतानाच कुणीतरी सांगितले नाना आप्पाकडे लोखंडी तीन बॅरल आहेत.

मी दोन माणसे घेऊन नाना आप्पाच्या घरी गेलो. तेव्हा नाना आप्पा जेवण करीत होता.

तिथे गेल्यावर लगेच बसायला देऊन त्याने आमच्या काकूला चहा ठेवायला सांगितला. आम्ही नको नको म्हणत असतानाही त्याने आमच्याकडे साफ दुर्लक्ष केले. आणि येण्याचे कारण विचारले.

मी म्हणालो नाना आप्पा मला पाण्याची बॅरल पाहिजे होती. घरांच्या भिंतींचे काम चालू करायचे आहे. एवढे म्हणेस्तोवर अर्धवट जेवणावरून नानाभाऊ उठला. व बॅरल मध्ये भरून ठेवलेले भात खाली करू लागला.

अरे एवढी काही घाई नाही. आधी जेवण तर करून घे. मग आपण बॅरल रिकामी करू की? आम्ही सर्वजण म्हणालो.

परंतु त्याने आमचे ना ऐकता माझ्याकडील दोन माणसे मदतीला घेऊन बॅरल मधील भात खाली केले. आणि बॅरल अंगणात नेऊन ठेवली. मगच जेवायला बसला.

एकदा नाना आप्पाला हृदयाचा छोटा स्ट्रोक आला. चाकण मध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाना आप्पाला ऍडमिट केले. व्यवस्थित ऑपरेशन झाले. यावेळी नाना आप्पाचा मुलगा बबन याने त्याची खूप काळजी घेतली.

नाना आप्पाला पाहण्यासाठी मी व आमचे नामदेव तळपे साहेब पाहायला गेलो. तेव्हा नाना आप्पा आयसीयू मध्ये होता. तिथे गेल्यावर एकेकाला पाहण्यासाठी आयसीयू मध्ये सोडण्यात आले. मी जेव्हा आयसीयू मध्ये गेलो. तेव्हा त्याला नाका तोंडातील नळ्यांनी जखडले होते. तोंडावर प्लॅस्टिकचा मोठा मास्क होता. व्हेंटिलेटर सुद्धा चालू होते. मी तिथे गेल्यावर मी खुणेनेच त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला.

परंतु माझी सूचना धुडकावून नाना आप्पा तिथेच कॉटवर उठण्याचा प्रयत्न करू लागला. नाका तोंडात लावलेल्या नळ्या व मास्क काढण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला माझ्याशी बोलायचे होते.

या मोठ्या आजारातून नाना आप्पा सुखरूप बरा झाला.

गावाकडे गेल्यावर नाना आप्पा नेहमी भेटतो. चार शब्द बोलतो. परवाच मी गावाला गेलो होतो. मोटर सायकल वर जाताना त्याने मला पाहिले. तेव्हा तो जनावरांकडे होता. मला पाहताच तिथूनच हाक मारून अगदी पळतच माझ्याकडे आला. व माझ्याबरोबर चार शब्द बोलला. असा आमचा हा नाना आप्पा.

लेखक:- रामदास तळपे.
https://aapliaawad2.blogspot.com/2025/11/blog-post_08.html

Avatar
About रामदास किसन तळपे 14 Articles
ग्रामीण संस्कृती
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..