नवीन लेखन...

आली माझ्या घरी ही “शाळा “!

यमक जुळवायचं होतं – ” आली माझ्या घरी ही दिवाळी ” या अष्टविनायक मधल्या गाण्याशी, पण कमी पडलं .
परंपरेनुसार रामकृष्णापासून आपण गुरुकुलात/शाळेत शिकायला जातो. माझ्या लहानपणी घर हे गृहपाठ करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने वापरलं जायचं क्वचित घरच्यांनी काहीतरी शिकविण्यासाठी.

आता कोरोना ने शाळाच घरात आणली आणि घर/ शाळा यांना अभिन्न केलं.

शाळेत जायचं म्हणजे मित्र/वर्गखोल्या/प्रयोगशाळा/ग्रंथालय/घंटा/मधल्या सुट्टीतील खायचा डब्बा + पाणी पिण्याची टाकी आणि हो सुवचनांचा फळा !

शाळा सुटल्यावर हिशेब चुकती करणारी मारामारी – जी वर्गात ट्रिगर व्हायची, एकमेकांच्या अंगावर शाई फेकून वगैरे आणि ” शाळा सुटल्यावर बघून घेईन तुला ” या खुन्नस देणाऱ्या डोळ्यांच्या साक्षीने पण सरांची नजर चुकवून ! बालपणीच्या मारामारीला आणि नंतरच्या बट्टीला काही कारण लागत नसे.

“जाने कहाँ ——- ” हेच खरे !

गेले काही महीने माझ्या घरात माझ्या नातीसाठी सकाळी नऊ ते अकरा चाळीस असा पहिलीचा वर्ग बसतो. चाळीस चिल्लीपिल्ली आपापल्या घरट्यातून स्वतःच्या घरून वर्ग घेणाऱ्या टीचरना हैराण करून सोडतात. नातीबरोबर मी वर्गाला बसतो- वही शोधून दे, पेन्सिलला टोक, पान नंबर हुडकून दे वगैरे मदतनीसाची कामे करत. मस्त मनोरंजन असतं ते आणि माझ्या आज्जी म्हणायच्या तसे “गुरं वळणं ! ”

दिवसाची सुरुवात आणि नंतरच्या प्रत्येक ब्रेकनंतर “गुड मॉर्निंग टीचर ” चा हैदोस. टीचरच्या सकाळवर पाणी फेरणारा. क्वचित त्या चिरडीला येतात,पण बच्चे कंपनीला त्याचे काही नसते.कसाबसा विषय सुरु करण्याचा त्यांचा प्रयत्न मध्येच कोणीतरी बोलून मागे ढकलतात.

अधून-मधून तंत्रज्ञान त्यांची परीक्षा घेत असते- ” मी आता स्क्रीन शेअर करते ” म्हणतात पण काही दिसत नाही. मुले हाताचा अंगठा डाऊन करून फीडबॅक देतात. कधी कधी त्या स्क्रीनवर काहीतरी सोडवून दाखवितात. रोजच्या टाइम टेबलच्या, परीक्षेच्या सूचना वेगळ्या- पालक त्या जीवाचे कान करून ऐकतात.

क्वचित टीचर चिडतात- ” अनम्यूट युवरसेल्फ ” म्हणत एखाद्याला झापतात. कोणीतरी खात असतो, कोणी घरात लोळत असतो, मध्येच एखादा मुलगा ‘टीचर मी वॉशरूमला जाऊ ?” म्हणून निरागस परवानगी मागतो. कसंबसं हास्य सावरत टीचर एवढंच विचारतात- ” आता ब्रेक होता ना रे!”

शेजारी बसलेले माझ्यासारखे घरचे मधूनच मदत करतात. टीचर कळवळून ” अरे, आपला वर्ग आहे नं, मग अभ्यास कोणी करायचा आहे,पालकांनी कां ” असंही विचारतात मग ! कधीतरी पालकांनाही दटावतात.

मध्येच एखाद्याला वेगळंच काहीतरी दाखवायची/सांगायची हुक्की येते, मग ” ब्रेकमध्ये हं, आपलं सेशन संपलं की ” अशी गाडी रुळावर आणावी लागते आणि उत्साह आवरावा लागतो. बरेचजण व्हिडीओ बंद करून बसतात त्यांची खबरबात घ्यावी लागते. काहीजण चॅट बॉक्स मध्ये लिहितात त्यांना टप्पल मारावी लागते.

अशा वाटा वळणांमधून “शिक्षण ” चाललेलं असतं – अजिबात आनंद न देणारं, पण परिस्थितीच्या अपरिहार्यतेमुळे पर्याय नसलेलं !

एरव्ही शिक्षक/शिक्षिका वर्गात काय करतात याची पालकांना कल्पना नसते,पण या ऑनलाईनने शिक्षकांची प्रायव्हसी संपुष्टात आणलीय. ते सरळ पालकांना दिसत असतात. त्यामुळे शिक्षकांचे अभिनयकौशल्य कसाला लागते. चिडता येत नाही, भाषा हसरी ठेवावी लागते. फारतर ” मी तुला वेटिंग रूममध्ये ठेवीन ” इतपतच त्रागा करता येतो. आणि (पूर्वीसारखे) मारता तर अजिबात येत नाही.

आम्हीं कासवेकर किंवा वैद्य सरांच्या तासाला गोंधळ घालायचो तेव्हा पीटीचे कोष्टी सर सरळ वर्गात शिरून आम्हांला पट्टीने प्रसाद द्यायचे.

आणि सेशन संपल्याची खूण आय पॅड च्या स्क्रीनवर दिसली की आम्ही जसे दप्तरं घेऊन किंचाळत वर्गाबाहेर पडायचो तद्वत माझी नात ओरडत पळ काढते.

तिकडे टीचर आणि इकडे घरी आम्ही सुटकेचे श्वास टाकतो आणि दुसऱ्या दिवसाची वाट पाहात बसतो.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..