नवीन लेखन...

आबेल पारितोषिक २०२२

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील विवेक पाटकर यांचा हा पूर्वप्रकाशित लेख 


प्रसिद्ध परंतु अल्पायुषी नॉर्वेजिअन गणितज्ञ नील्स हेन्रिक आबेल (१८०२-२९) यांच्या नावाने एक पारितोषिक, २००३ सालापासून दरवर्षी आहे. एका अर्थाने हे पारितोषिक गणिती जीवनगौरव या स्वरूपाचे असून त्या विजेत्याचे एकूण कार्य विचारात घेते, न की एखादे प्रमेय, सिद्धांत किंवा प्रश्न सोडवण्याची पद्धत. पदक आणि ७५ लक्ष नॉर्वेजिअन क्रोनर्स (सुमारे भारतीय रुपये ६,४८,००,०००) असे या पारितोषिकाचे स्वरूप असून, नॉर्वे सरकारच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाते. पाच आंतरराष्ट्रीय ख्यातनाम गणितज्ञांची समिती प्राप्त नामांकनांतून एका किंवा अधिक गणितज्ञांची या पारितोषिकासाठी निवड करते; आणि त्याची घोषणा मार्च महिन्यात केली जाते.

दिनांक १२ फेब्रुवारी १९४१ रोजी जन्मलेले अमेरिकन गणितज्ञ डेनिस सुलीवन हे आबेल पारितोषिक २०२२ चे मानकरी आहेत. त्यांनी संस्थिती (टोपॉलॉजी) या व्यापक क्षेत्रात केलेले कार्य यासाठी विचारात घेतले गेले आहे. भौमितिक टोपॉलॉजी, संस्थेयता (होमोटॉपी) आणि क्लिनिअन गट सिद्धांत (ग्रुप थिअरी) यात त्यांचे कळीचे योगदान राहिले आहे. याशिवाय सुलीवन यांनी डॉ. मोयरा चास यांच्यासोबत ‘स्ट्रिंग’ टोपॉलॉजी ही नवी उपशाखा विकसित केली आहे. तिचा गणिती भौतिकशास्त्रामध्ये सांस्थितिक पुंजवादी क्षेत्र उपपत्ती ( टोपॉलॉजीकल क्वांटम फील्ड थिअरीज) निर्माण करण्यात भरीव उपयोग होत आहे. गतिक प्रणाली(डायनॅमिकल सिस्टम्स) या क्षेत्रातही त्यांचे कळीचे निष्कर्ष आहेत उदा. सांस्थितिक पॅरी-सुलीवन अविकारी ( इनव्हेरिअंट). त्याचप्रमाणे सुलीवन यांचे नाव असलेल्या संकल्पना, प्रमेय आणि अटकळी संस्थिती विषयात बऱ्याच प्रमाणात प्रचलित आहेत. त्यांनी १९८५ साली सिद्ध केलेल्या ‘नो-वांडरिंग डोमेन’ प्रमेयाने नियमित वैश्लेषिक गतिकशास्त्र (होलोमॉर्फिक डायनॅमिक्स) या विषयाला सुमारे साठ वर्षानंतर परत चालना मिळाली, असे मानले जाते.

सुलीवन यांनी गणितातील पीएच. डी. पदवी (१९६६) अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून प्राप्त केली. त्यांनी अमेरिका आणि फ्रान्स येथील विविध प्रतिष्ठित विद्यापीठात व शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधन केले आहे. ‘Geometric Topology’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. याशिवाय त्यांच्या नावावर शंभरहून अधिक शोधलेख असून, ते जागतिक कीर्तीच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.

भूमितीसाठी ‘ओस्वाल्ड व्हेब्लेन’ पारितोषिक (१९७१), फ्रेंच अकॅडेमी ऑफ सायन्सचे ‘ए. कार्टन’ पारितोषिक (१९८१), अमेरिकेचे ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ (२००४), गणितासाठी ‘वुल्फ’ पारितोषिक (२०१०) तसेच अनेक अकादमींचे सन्माननीय सदस्य, अशा बहुसंख्य पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव यापूर्वी झाला आहे. ओस्लो, नॉर्वे येथे दिनांक २४ मे २०२२ रोजी, भव्य शाही सोहळ्यात सुलीवन यांना या वर्षीचे आबेल पारितोषिक नॉर्वेच्या राजांच्या हस्ते देण्यात येईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे २५ मे २०२२ रोजी, सुलीवन यांचे ओस्लो विद्यापीठात त्यांच्या कामाबाबत व्याख्यान होईल.

आतापर्यंत, म्हणजे २००३-२२ या काळात वीस आबेल पारितोषिक विजेत्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या यादीवरून असे दिसते की, त्यातील बहुतांश विकसित देशातून आलेले आहेत. त्याला अपवाद म्हणता येईल असे २००७ सालचे विजेते एस. आर. एस. वर्धन हे भारतीय, मूळचे अमेरिकन गणिती आहेत.

फक्त एकच महिला गणितज्ञाचा (२०१९ साली) समावेश या विजेत्यांत झाला आहे. आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, आत्तापर्यंतची सर्व पारितोषिके शुद्ध गणितातील कार्यासाठी दिली गेली आहेत; वर्धन यांचे कार्य संभाव्यता सिद्धांतात (प्रोबेबिलिटी थिअरी) आहे, न की संख्याशास्त्राच्या उपयोजनाचे. आशा आहे की, भविष्यात या चित्रात बदल घडेल आणि अधिक भारतीय गणिती यांना हे पारितोषिक प्राप्त होईल.

-विवेक पाटकर
गणितज्ञ
vivekpatkar03@gmail.com

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..