नवीन लेखन...

माध्यमांचे अंतरंग  एक दृष्टिक्षेप

विभागप्रमुख वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र, सोलापूर

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात डॉ. रवींद्र चिंचोलकर  यांनी  लिहिलेला लेख.

माणूस आणि जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्र यात एकच मोठा फरक आहे तो म्हणजे माणसात जिज्ञासा अथवा कुतुहल असते इतर प्राणीमात्रात ती नाही. या जिज्ञासेपोटी माणूस विचार करीत गेला आणि त्याचा मेंदू अधिक तल्लख झाला. माणूस केवळ स्वतः चा विचार करीत नाही तर इतरांचा, जीवसृष्टीचा व त्यापलीकडचाही विचार करतो. या मानवी जिज्ञासेतूनच माध्यमांचा जन्म झाला. ‘माध्यम’ हा शब्द मुळात ‘मिडियम’ या असिरिअन शब्दापासून तयार झालेला आहे. ‘माध्यम’ म्हणजे संवादाचे असे साधन आहे की ज्याव्दारे विचार, भावना, घडामोडी इतरांना कळविता येतात. जेव्हा मोठया जनसमुदयापर्यंत या बातम्या, संदेश पोहोचवायच्या असतात, तेव्हा एखादया यंत्राचा/ तंत्राचा आधार घेतला जातो, तेव्हा याच माध्यमांना प्रसार माध्यमे (मास मिडिया) म्हटले जाते. या प्रसार माध्यमांना सर्वत्र ‘माध्यमे’ असेच संबोधले जाते, त्यामुळे या लेखात प्रसार माध्यमांचा उल्लेख ‘माध्यमे’ असाच केला आहे. माध्यमांचे प्रामुख्याने पाच प्रमुख प्रकार सांगता येतील.

त्यात पारंपरिक माध्यमे (लोकनाटय, गोंधळ, कीर्तन इत्यादी), मुद्रित माध्यमे (वृत्तपत्रे, मासिके), दृकश्राव्य माध्यमे (रेडिओ, टेलिव्हीजन, चित्रपट इत्यादी ), बाहय प्रसिध्दी माध्यमे (होर्डिंग्ज, बॅनर इत्यादी), इंटरनेट माध्यमे ( समाज माध्यमे, ब्लॉग, वेब पोर्टल इत्यादी ) यांचा समावेश होतो.

माध्यमांची प्रमुख कार्ये म्हणजे माहिती देणे, ज्ञान देणे, रंजन करणे, सेवा देणे आणि प्रबोधन करणे ही आहेत. माध्यम शास्त्रानुसार बातमी ही पवित्र असते, त्यामुळे ती आहे तशी दयावी असे शास्त्र सांगते. जर मते व्यक्त करायची असतील तर ती बातमीत नव्हे तर लेख, अग्रलेखातून व्यक्त करावित असे मानले जात होते. एकदा यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री असताना दुष्काळी भागाच्या पाहणीस आले होते, त्यांच्यासोबत पंधरा मोटारींचा ताफा होता. आता ही बातमी ‘मुख्यमंत्र्यांचा आलिशान दुष्काळी दौरा’ या शीर्षकाखाली आली असती आणि त्यात मुख्यमंत्री किती चुकीचे वागत आहेत यावरच टीकेची झोड असती. पण त्यावेळी संपूर्ण बातमीत मुख्यमंत्री कोणाला भेटले, दुष्काळाविषयी काय चर्चा झाली हेच लिहिले होते. बातमीच्या शेवटच्या एका ओळीत फक्त उल्लेख होता की, मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात पंधरा वाहने होती. बातमीच्या मूळ संकल्पनेपासूनच माध्यमे कशी दुरावत गेली ते माध्यमांचा थोडक्यात आढावा घेताना लक्षात येईल. भारतात अठराव्या शतकापर्यंत फक्त पारंपरिक माध्यमे होती आणि ही माध्यमे समाजातूनच उदयाला आली होती. लोकजीवन, लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब त्यातून दिसत होते. दळणवळणाची फारशी साधने नसल्याने, ही माध्यमे व त्यातील संदेश त्या त्या प्रदेशापुरतेच सीमित राहिले. स्वातंत्र्यलढयाच्या काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख इत्यादींनी लोकजागृतीसाठी शाहिरी या माध्यमाचा प्रभावी उपयोग करून घेतला असे काही अपवाद वगळता, लोकमाध्यमांचा प्रभाव सीमित राहिला व ही लोकमाध्यमे पुढे अस्तंगत होत गेली. मुद्रित माध्यमाच्या विकासाची सुरुवात १४५४ मध्ये जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग यांनी हलत्या टंकाचा (टाईप ) शोध लावला तेथून झाली. जगात आणि भारतात मुद्रणाचा वापर प्रथम धर्मग्रंथ छापण्यास झाला, त्यामुळे छापलेले प्रत्येक अक्षर खरे व पवित्र असे मानले जाऊ लागले. त्यापाठोपाठ आलेल्या वृत्तपत्रातील बातम्या, मजकुरालाही समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले. भारतात स्वातंत्र्यलढयाच्या काळात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, लाला लाजपत राय यांच्यासह सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रे स्वातंत्र्य व सामाजिक लढयाचे साधन म्हणून उपयोगात आणली, त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढयास मोठे बळ मिळाले आणि देश स्वतंत्र झाला. माध्यमांची शक्ती किती अफाट असते याचा प्रत्यय सर्वांना आला. त्या काळातील वृत्तपत्रे मतपत्रे होती, ती बहुतांशी समाजहितासाठी कार्य करीत होती. त्यामुळे त्यांचे बाह्यस्वरूप ओबडधोबड आणि कृष्णधवल असले तरी, त्यांचे अंतरंग हे सुंदर, पवित्र होते. आता गुळगुळीत कागदावर बुळबुळीत शब्दात रंगीत, आकर्षक छपाई होत आहे. बाहय स्वरूपात सुंदर भासणाऱ्या या बहुतांशी वृतपत्र, मासिकांचे अंतरंग मात्र कुरुप आहे.

१९१३ मध्ये सिनेमा हे नवे माध्यम भारतात उपलब्ध झाले. दादासाहेब फाळके, बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, सत्यजित रे, मृणाल सेन, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली. मात्र भारतीय समाजमन मसाला चित्रपटांच्या दुनियेतच रममाण झाले. त्यामुळे गोलमाल सारख्या भंपक चित्रपटाचे पाच-पाच भाग निघतात आणि प्रत्येक भाग १०० कोटीपेक्षा अधिक कमाई करतो हे चित्र दिसते. सिनेमाला केवळ रंजनाचे साधन मानले गेल्याने, या माध्यमाच्या खऱ्या शक्तीकडे दुर्लक्ष झाले. मारधाड, हिंसाचार, बलात्कार, प्रेमदृश्ये, आयटेम सॉग हेच सिनेमाच्या यशाचे गमक बनले आहे. त्यामुळे या सिनेमाचे अंतरंगही कलुषित झाले आहे.

१९२७ नंतर नभोवाणीची (रेडिओ ) सुरुवात झाली. या माध्यमाला प्रारंभी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारने बंधनात ठेवले. १९९० नंतर खाजगी एफ. एम. ला परवानगी देण्यात आली मात्र, फक्त गाणी वाजविण्यासाठीच. त्यामुळे या माध्यमाची शक्ती शासकीय प्रचार आणि रंजन या बंधनात अडकून पडली आहे. या माध्यमाचे खरे अंतरंग उघड होऊच शकलेले नाही.

१९५९ नंतर चित्रवाणीचा (टेलिव्हिजन ) उदय झाला. या माध्यमालाही प्रारंभी सरकारी बंधनात ठेवले गेले, १९९० नंतर अचानक बंधनातून मुक्त करण्यात आले. आता बातम्यांच्या ४०० आणि इतर ५०० अशा एकंदर ९०० पेक्षा अधिक चित्रवाहिन्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या क्षेत्रावर कब्जा केला आहे. जाहिरातींसाठी वाटेल त्या तडजोडी करण्यात आणि पाश्चिमात्य कार्यक्रमांची भ्रष्ट नक्कल करीत विदेशी संस्कृती लादण्यातच हे माध्यम धन्यता मानत आहे. त्यामुळे चित्रवाणीनेही निराशाच केली.

१९९० नंतर इंटरनेट व त्यानंतर समाज माध्यमांचा (सोशल मिडिया) उदय झाला. प्रत्येक भारतीय माणूस फेसबुक, व्हॉटसअप, व्टिटर, यू टयूब किंवा इतर कोणत्या तरी समाज माध्यमाचा भरपूर वापर करतो आहे. या माध्यमातून कोणालाही व्यक्त होता येते. आपली मते, विचार, व्हिडिओ पाठविता येतात. या माध्यमाच्या अमर्याद शक्तीचा समाजहितासाठी सकारात्मक वापर करण्याऐवजी, व्देष, जातीयता, हिंसक विचार पसरविण्यासाठी या माध्यमाचा वापर अधिक होतो आहे. त्यामुळे दंगली उसळतातच अथवा तणाव असल्यास सर्वप्रथम समाज माध्यमांवर बंदी घातली जाते. समाज माध्यमांव्दारे खोटया, प्रचारकी बातम्या पसरविण्याचा धंदा राजरोस सुरू झाला आहे. या कामासाठी ट्रोल आर्मी तैनात करण्यात आली आहे. या समाज माध्यमांचे मालक परदेशात असल्याने, त्यातील मजकुरावर प्रतिबंध घालण्यास सरकार व कायदे अपुरे पडत आहेत. मुले-मुली समाज माध्यमांच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालक चिंताग्रस्त आहेत.

मोबाईलच्या माध्यमातून नवे डिजिटल माध्यम आता अवतरत आहे. उद्याचे भविष्य हे मोबाइलभोवतीच फिरणारे असणार आहे, याची झलक यातून पाहायला मिळते. सिनेमापेक्षा टीव्हीचा पडदा छोटा म्हणून त्याला छोटा पडदा म्हणून हिणवले जायचे. त्याहीपेक्षा छोटया मोबाईलच्या पडद्यावर आता सारे जग सामावले जात आहे. या मोबाइलवरील गेम्स आणि वेब सिरिजने पुढच्या काळाची चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढच्या काळातील माध्यमांचे अंतरंग हे अधिक संकुचित, अधिक भयावह असेल अशीच शक्यता अधिक आहे.

खरे तर भारतातील माध्यमे बडया भांडवलदारांच्या आणि जाहिरातदारांच्या कचाटयात जाऊ नयेत अशी महात्मा गांधी आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. माध्यमांनी समाजाचे विश्वस्त बनून समाजाच्या हिताचाच विचार सदैव मांडावा अशी त्यांची धारणा होती. आपल्या वृत्तपत्रातून या दोन महामानवांनी हाच आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. पहिल्या आणि दुस – या वृत्तपत्र आयोगांनीही यासाठी अनेक सुधारणा सुचविल्या व त्यानुसार सरकारनेही काही कायदे केले.

मात्र या कायदयांना बडया माध्यम समूहांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयात सरकारने केलेले कायदे रद्द ठरले, त्यामुळे भारतातील माध्यमांतील गळेकापू स्पर्धेला मोकळे रान मिळाले आहे. बडे उद्योजक अथवा राजकारणी हेच माध्यम सम्राट बनले आहेत. छोटी वृत्तपत्रे, वाहिन्यांना गिळंकृत करीत, आठ-दहा माध्यम सम्राटांनी आपल्या साम्राज्याचा भारतात प्रचंड विस्तार केला आहे. या माध्यम सम्राटांच्या हाती ७० टक्के माध्यमे आहेत आणि ९० टक्के जनतेचा कब्जा त्यांनी मिळविला आहे. या माध्यम सम्राटांनी माध्यमांच्या मूळ उद्देशांना आणि नैतिकतेला तिलांजली दिली आहे. त्यामुळे आजच्या माध्यमांचे अंतरंग खूपच विपरित आहे.

जनहिताचा विचार करून माध्यमे समाजप्रहरी म्हणून कार्य करतील या भाबडया आशावादाला आता अर्थ राहिलेला नाही. माध्यमांमधून दिल्या जाणाऱ्या बातम्यांची विश्वासार्हता केव्हाच हरवलेली आहे. त्याउलट माध्यमांव्दारे दिल्या जाणाऱ्या खोटया बातम्या ओळखणे हेच मोठे आव्हान बनले आहे. ही माध्यमे आता जनतेसाठी नव्हे तर बडया राजकारण्यांसाठी, जाहिरातदारांसाठी काम करीत आहेत. विलबर ग्रॅम या माध्यम अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार माध्यमे अनेकपटींनी जादुई प्रभाव वाढवित आहेत. मात्र ही जादू केवळ पैशांसाठी मिंधे होऊन फेक न्यूज आणि पेड न्यूज देणाऱ्या माध्यमांपुरतीच मर्यादित आहे. माध्यमांमध्ये आता समाज बदलण्याची शक्ती राहिलेली नाही, त्यामुळे जनतेला रंजनाच्या मोहपाशात गुंगवून ठेवण्याचे काम ही माध्यमे करीत आहेत.

शेवटी खलील जिब्रानची गोष्ट आठवते. सुंदरता आणि कुरुपता या दोघी एकदा वस्त्रे काठावर ठेऊन एका तलावात अंघोळीस उतरतात. कुरुपता बाहेर येऊन सुंदरतेची वस्त्रे घालून पळून जाते. सुंदरतेला नाईलाजाने कुरुपतेची वस्त्रे परिधान करावी लागतात. खरे सुंदर काय ते आता आपणाला ओळखावे लागणार आहे.

या परिस्थितीतही आशेचा एक किरण आहे. आजही जनहितासाठी निष्ठापूर्वक कार्य करणारे मोजके पत्रकार आहेत. माध्यमांनी संधी दिली नाही तरी ब्लॉगव्दारे, समाज माध्यमांव्दारे सत्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते पत्रकार करीत आहेत. त्यांचे विचार आपण जाणून घेऊन अंगीकारायला हवेत. यावेळी प्रत्येक माणसाला आवर्जून सांगावेसे वाटते की ‘जागा राहा रात्र माध्यमांची आहे, त्यांच्यावर विसंबू नकोस; खरे काय ते तुझे तूच पारखून घे’.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी  लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..