नवीन लेखन...

आठवलेली आणखी एक गोष्ट

असाच एक गांव असतो. त्यात एक मल्ल राहात असतो. गोष्टीत काही नेहेमीच आटपाट नगर आणि चक्रम राजाच असायला हवा असं काही नाही. तर, गांव आणि मल्लही असू शकतो. तसा या गांवात एक मल्ल आहे. मल्ल म्हणजे पेहेलवान.

ह्या मल्लाला आपल्या ताकदीचा प्रचंड अभिमान असतो. गेल्या काही वर्षात याने आपल्या ताकदीच्या जोरावर आजुबाजूच्या परिसरातल्या सर्वच मल्लांना स्पर्धेत हरवलेलं असतं आणि माझ्यासमोर एकही मल्ल टिकता कामा नये, असा पणच त्याने केलेला असतो. कुठेही स्पर्धा असली, की आपला लंगोट कसून हा धावलाच तिथे. काही अपवाद वगळता बहुतेक सर्व स्पर्धा याने जिंकलेल्या होत्या. हरलेल्या दोन-चार स्पर्धांही ‘पंचां’मुळे तो हरला असं आपलं त्याचं म्हणणं होतं. पण तो म्हणतो ते नाकारायची कुणाची बिशादच नव्हती. बरं, या स्पर्धा काही फक्त कुस्तीच्याच असायच्या असं नाही, तर ताकदीवर आधारीत कुठलीही स्पर्धा या नरसिंहाला चालायची. याला आता कुणी स्पर्धकच उरला नाही की काय, असं वाटायला लागावं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती खरी..!

अशाच दिवशी एका गांवात एक स्पर्धा असल्याची बातमी पेप्रात येते. ही स्पर्धा असते एक झाड तोडायची. त्या गांवाच्या वेशीवर बरेच दिवसापासून वठलेल्या अवस्थेत उभा असलेला एक भक्तम वृक्षराज गांवकऱ्यांना तोडायचा असतो. खरं तर कोणतंही एखादं जिवंत झाड तोडणं म्हणजे माणसाच्या डाव्या हाताचा खेळ, त्यात हे तर मेलेलं झाड. ते तडायला किती वेळ लागणार? पण त्या तोडण्यातही मजा शोधावी, असं आपल्या त्या गांववाल्यांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी केली स्पर्धा जाहीर. गांवची आपली एक तेवढीच करमणूक. ह्या स्पर्धेची मात्र एक अट असते, की हे झाड एका घावात तोडायचं. स्पर्धा जिंकणाराला भरघोस बक्षिस मिळणार असतं.

आपले पेहेलवान रेशमी लंगोट कसंत स्पर्धेच्या दिवशी त्या गांवात पोहोचतात. आणखीही स्पर्धक आलेले असतात. पण ह्याला पाहून आणि ह्याच्या ताकदीच्या कथा ऐकलेल्या असल्यामुळे, कुणीच ते झाड एका घावात तोडायला पुढे येत नाही. त्या सर्वांकडे तुच्छतेने पाहात, मांड्यां थोपटत (स्वत:च्याच), “माझ्यासमोर ताकद दाखवायची कुणाची हिंमत असेल तर त्याने पुढे यावं आणि ते झाड एका घावात तोडून दाखवावं”, असं तो मल्लेन्द मोठ्या गर्वाने गर्दीला आव्हान देतो..

एक कृश प्रकृतीचा, सदरा- लेंगा-गांधी टोपी परिधान केलेला गोरा मध्यमवयीन माणूस उठतो आणि त्याला ते झाड तोडायची संधी मिळावी, अशी विनंती तो ह्या मर्दाला करतो. त्याच्याकडे तुच्छतेने पाहात आपला मल्ल त्याला मोठ्या उदारपणे झाड तोडायची संधी देतो.

तो माणूस कुऱ्हाड उचलतो. झाडाभोवती प्रदक्षिणा घालून खोडाचं नीट निरिक्षण करतो. एका जागी थांबतो आणि अंगात असेल नसेल तेवढा जोर काढून खोडाच्या त्या जागेवर घांव घालतो. पण हाय रे दैवा, झाड काही तुटत नाही. तो निराश होऊन बाजुला जाऊन बसतो. मल्ल खीं खीं हसत त्याला खिजवायला सुरुवात करतो. पण तो माणूस शांत बसतो.

आपल्या मल्लाला चेव चढतो. ‘और कोई है माय का लाल’ असं तो त्या गर्दीला आव्हान देतो. ह्या मर्दाला आनंदाच्या वेळी राष्ट्रभाषेत बोलायची सवय असते. बराच वेळ कुणी उठत नाही. ह्या मर्दाची आधीच फुगलेली छाती गर्वाने आणखी फुगते. एवढ्यात आणखी एक माणूस हात वर करतो. गोरटेलासा, पातळ केसांचा, सौम्य-स्निग्ध चेहेऱ्याचा, मध्यमवर्गीय प्रकृतीचा हा माणूस पाहून ह्या माणसाला पाहून आपले मर्देश चेकाळतातच. “तो क्या तुम यह पेड एकही झटके मे तोडोगे’”, आपला मल्ल त्याला तुच्छतेने सवाल करतो. “हमने हात उपर किया हा नही था, किसीने पिछेसे मेरा हात पकड के उपर किया. हम इस पेड कटाईं के बारे मे कुछ नहा जानते हैं. हम तो यंहाॅ से गुजर रहे थे और ये मुकाबला देखने रुक गये थे”, असं तो म्हणू लागला. आपल्या मल्लाला वाटलं, की तो घाबरला म्हणून असं म्हणतोय. आता ह्या मल्लाला चेंव चढला. “बहाना मत बनाव”, मल्ल म्हणाला, “अब तुमको इस पेड पर घांव डालना ही पडेगा”. आता आपल्याला यात पडल्याशिवाय काही गत्यंतर नाही असं म्हणत, तो माणूस कुऱ्हाड उचलतो, निशाणा साधतो आणि झाडावर घांव घालतो. पण झाड तिथेच.

आता मात्र आणखी कुणीही पुढे येत नाही. बराच वेळ जातो. कुणीही स्पर्धक पुढे येत नाही असं पाहून, शेवटी आजुबाजूला गर्वाने पाहात आपले मल्लेश्वर छाती पुढे काढून झाडाजवळ येतात. झाडाला वाकून नमस्कार करतात. कुऱ्हाड उचलतात, तेहेतीस कोटी देवांपैकी एका देवाचं नांव घेतात आणि घालतात घांव त्या वठलेल्या वृक्षाच्या खोडावर. त्या बरोबर झाड उजव्या बाजूला जाऊन कोसळतं.

मल्ल महाराज आजुबाजूला जमलेल्या गर्दीकडे मोठ्या अभिमानाने पाहातात. जे ही दोन माणसं करु शकली नाहीत, ते मी केलं अशी दर्पोक्ती करतात. लोकंही टाळ्या वाजवतात आणि त्याचा जयजयकार करतात. लोकांचं काय, कशालाही टाळ्या पिटतात.

आता बक्षिस समारंभाची वेळ येते. आता आपलंच नांव पुकारलं जाणार म्हणून मल्ल सावरून बसतो, तोच एक अनपेक्षित घटना घडते. स्पर्धेचा विजेता म्हणून तिनही स्पर्धकांना बक्षिस दिलं जातं. झाडावर शेवटचा घांव घातलेला मल्ल पहिला अचंबित होतोआणि मग चिडतो. ‘मी एका घावात झाड तोडलं असल्याने, ह्या बक्षिसावर माझाच हक्क आहे. ह्या दोन माणसांना संधी मिळूनही ते हे वठलेलं झाड तोडू शकले नाहीत. मी मात्र एका घावात हे झाड तोडलं. ह्या दोघांचा बक्षिसावर काहीच हकक नसताना, गांवाने ह्यांना बक्षिस दिलं हा माझ्यावर अन्याय आहे” असं म्हणत तो चिडून थयथयाट करु लागतो. वेड्यासारखं बरळू लागतो.

सरपंच शांत असतो. तो म्हणतो, “मल्ल महाराज, आपण एका घांवात हे झाड तोडलं हे खरंय. पण तुम्ही ते तोडू शकलात कारण, त्या दोघांनी प्रथम घातलेल्या घांवावरच तुम्ही तुमचा घांव घातलात. सर्वात महत्वाचा पहिला घांव होता, कारण तो घांव घालणाऱ्या त्या शहाण्या माणसाला, तो घांव नेमका कुठे घालायला हवा हे बरोबर माहित होतं, दुसऱ्याला काही माहित नसल्याने, त्याने पहिल्याच्या घावावरच घांव घातला आणि दोन नेमक्या जागेवरच्या घांवांनी कमकुवत झालेलं ते झाड, तुमच्या शेवटच्या घांवाने तुटलं. खरा बक्षिसपात्र तो पहिला इसम आहे. तो शांत आहे, कारण एका घांवात हे झाड तुटणार नाही याची त्यांला कल्पना होती आणि तुम्ही मात्र मीच सर्व केलं असं सांगत आहात. आमच्या गांवची जनता सुज्ञ आहे आणि आम्ही विचार करुनच तुम्हा सर्वांना श्रेय देण्याचं ठरवलं आहे”

आपल्या मल्लाला गांवच्या जनतेच्या वतीने सरपंचाने दिलेलं हे उत्तर पटलं की नाही ते माहित नाही.

गोष्ट तूर्तास समाप्त..!

— नितीन साळुंखे
9321811091
03.04.2019

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on आठवलेली आणखी एक गोष्ट

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..