नवीन लेखन...

अमेरिकन गाठुडं – ५

एव्हाना मी बऱ्यापैकी येथे (म्हणजे ऑस्टिनच्या घरात) रुळलो आहे. मुलाचे घर ज्या कॉलनीत आहे (येथे याला कम्युनिटी म्हणताना ऐकलंय) तो परिसर देखणा आहे. एका बिल्डिंग मध्ये तीन  घरे मध्ये पॅसेज लगेच त्याला लागून तीन घरांचा रो, अशे तीन माजले, म्हणजे एकंदर आठरा अपार्टमेंट्स. अश्या बऱ्याचश्या बिल्डिंगा आहेत. तीस -चाळीस तरी असतील. कोठेही लिफ्ट नाही. या सर्व इमारतींना एक कंपाउंड घातले आहे, चौकोनी लोखंडी बारचे. सर्व इमारतींना जोडणारा एक चांगला प्रशस्त टाररोड आहे. कार, ट्रक इत्यादी वाहनांसाठी. हा भाग सोडला तर बाकी जमीन हिरवळीने झाकली गेलेली आहे. मॅपल आणि इतरही खूप झाडे आहेत. या हिरवळीची आणि झाडांची देखभाल एक लँडस्केप कंपनी करते. वाढलेले गवत ट्रिमिंग करणे, स्प्रिंकलर्सने पाणी देणे, झाडांच्या वेड्यावाकड्या फांद्याची कापणी करणे, सुकलेल्या पानांची सफाई करणे, पूर्ण देखभाल करते. हेच नाही तर,इतर सेवांचे, जसे इलेक्ट्रिसिटी अँड होमेअप्प्लायन्सेस, प्लम्बिंग, ड्रेनेज, यांचे वार्षिक कॉट्रॅक्ट कम्युनिटीतर्फे केलेले असते. म्हणून लोकांचा कल अश्या कम्युनिटीच्या अपार्टमेंटमध्ये रहाण्याचा असतो. एरव्ही अश्या सेवा खूप महाग असतात. स्वतंत्र घरात त्या स्वतः मॅनेज कराव्या लागतात. एकूणच ऑस्टिन शहर आणि परिसर एक भव्य वेलमेनटेन्ड लँडस्केप आहे. त्यामुळे इथे एखाद्या रिसॉर्ट मध्ये राहिल्याचा फील येतो.

आपल्या कडे कंपाउंड हे भक्कम विटा सिमिटाच्या भिंतीत असते. येथे बहुतेक कंपाउंड हा प्रकार नसतोच. असला तरी लाकडी फळकुटाचे असते, किंवा मग लोखंडी. आमच्या कम्युनिटीला लोखंडाचे आहे. संपूर्ण सेक्युरिटी इलेक्ट्रॉनिक डिव्हिसेसवर. कार गेटजवळ आली कि गेट उघडते. नाही उघडले तर गेटच्या  पोलवरल्या पॅनलवर कोड नंबर प्रेस करावा लागतो. किंवा बहुतेकांच्या घराच्या किल्ल्या सोबत गेटचा रिमोट असतो. कोठेही सेक्युरिटी गार्ड नाही.

आम्हाला या भानगडी माहित नव्हत्या. एके सकाळी मी आणि बायको (सकाळीम्हणजे साडेअकराला) वॉकला म्हणून कानटोप्या घालून घराबाहेर पडलो. लोखंडी कंपाउंडला एके जागी आम्हाला एक छोटे गेट दिसले. साधणारं माणसे जाण्या-येण्या साठी असते तसे, एका दाराचे. कम्युनिटीच्या चारी बाजूना वाहते रस्ते आहेत, आठ पदरी.  रस्त्यांना लागून पायी चालण्यासाठी आणि सायकलसाठी ‘सायकल ट्राक’ आहे. ते छोटेसे गेट बघून मी हिला म्हणालो.
“बाहेरून चक्कर मारून बघायचे, का?”
हिने मुंडी हलवून होकार दिला. गेटचे हॅन्डल फिरवून, गेट उघडून आम्ही बाहेर पडलो. दीड किलोमीटरचा, कम्युनिटीला फेरा मारला. पुन्हा त्याच गेटजवळ आलो, तर गेटचे हॅन्डल फिरवूनही गेट उघडेना!
“आहो, गेटवर नंबरच खोक दिसतंय!”
बोंबला! या गेटला आतून बाहेर यायला काही सायास लागत नाही पण, बाहेरून आत यायला कोडे नंबर लागतो!
“आग, हे डिजिटल लॉक आहे.कोड नंबर शिवाय उघडणार नाही!”
“लावा मंदारला फोन अन विचारा नंबर!”
मी फोन काढला. आमचे दोन्ही पुत्र चतुर. अमेरिकेत ‘तुम्हाला डाटा खूप महाग पडेल’ म्हणून भारतात मुलाने सिम कार्ड रिचार्ज केले नव्हते. आणि ‘मी सोबत असताना, तुम्हाला वेगळा मोबाईल लागणार नाही!’ हे अमेरिकन पुत्राचे मत! घरात wifi आहे. व्हाट्सअप चालतो, म्हणून मी हि फारसा विचार केला नव्हता. आता काय? तर आम्ही दोघे कंपाउंड बाहेर अडकलो. ‘मी कसा बावळट आहे!’ या बायकोच्या मताला बळकटी देणार अजून एक कारण सापडलं! त्याचा ती भारतात आल्यावर वापर करणार, यात मला तिळमात्र शंका नाही! मग मार्ग शोधायला सुरवात केली. आमच्या कम्युनिटीला लागून एक छोटेसे कॅर्शियल कॉम्प्लेक्स आहे. या दोघांच्या मध्ये लाकडी फळकुटाचे कंपाउंड आहे. आमच्या सारख्याच एखाद्याने, दोन उभ्या फळ्या मोडून, चंचू प्रवेशाची सोयी करून ठेवली होती! आम्ही पण तिचा फायदा घेतला. थोडं गिल्टी वाटलं पण, कालांतराने कम्म्युनिटीतले बरेच जण ते वापरताना पाहिल्यावर बरे वाटले. असो.

येथील घरे पहिले कि, पत्याचा बांगला आठवतो. टुमदार, गुटगुटीत नसलातरी सुटसुटीत. नेत्रसुखद बांधकाम असते. आता त्याला ‘बांधकाम’ म्हणणे तशे चुकीचेच. याला ‘इरेक्शन’ म्हणजे, उभारणेच म्हणणे योग्य होईल. मोठी कमर्शियात कॉम्प्लेक्सस, किंवा मल्टीस्टोरी हॉटेल्स यात सिमेंट, वाळू, दगड यांचा वापर होतो. पण रहिवाशी वस्त्याची घरे, लाकडी सपळ्यावर प्री-फॅब्रिकेटेड पॅनलच्या साहाय्याने उभारली जातात. थंडीचे प्रमाण पहाता, सेंट्रल हिटिंग सिस्टीम सर्व घरात असते. या पॅनलच्या भिंतीत आपल्या भिंती सारखे खिळे ठोकता येत नाहित! घरात विजेचा वापर बराच होतो. आमच्या घरात तर, सगळे किचन, बाथरूमच्या गरम पाणी विजेवरच चालते. घरात स्मोक डिटेक्टर आहेत. थोडा जरी धूर झाला तर, लगेच अलाराम वाजतो! याने पण आम्हाला एकदा आपला हिसका दाखवला. त्याच काय झालं कि, एकदा मुलगा आणि सून मॉल मध्ये गेले होते. वेळ लागेल असे वाटत होते. म्हणून बायको म्हणाली.

“यांना यायला उशीर होणार असं दिसतंय, तोवर मी चटकन पोळ्या करून टाकते! आत्ता होतील सुनीताने (सून बाई) कणिक भिजवून ठेवलीच आहे. करू का?”

मी ‘हो’ म्हणालो. (हिला ‘नको’ म्हणजे कठीणच असत!)

चार पाच पोळ्या झाल्या असतील. टर-टर  लागला अलार्म वाजायला. मला आधी कळेना आवाज येतोय कुठून. हॉल मधून कि बेडरूम मधून? आणि हा कसला आवाज आहे?

“आहो, ठोंब्या सारखे बघताय काय? वार घाला कि!”

मी आजून गोंधळलो,’ वार घाला? ‘

“कशाला? काय पेटलं कि काय?”

“माझं डोम्बल!” असे म्हणत तीच किचन मधून एक फडकं घेऊन आली, आणि छताला वार घालू लागली. आणि तो अलाराम, माईच्या हातात लेकरू शांत व्हावं तसा शांत झाला! मग माझ्या लक्षात आले कि, हा फायर अलार्म होता! आणि हि, जे छताला वार घालत होती तेथे, स्मोक डिटेक्टर होता! हिने कधीतरी असा धूर घालवताना, मुलाला पहिले होते. उर्वरित पोळ्या होजीस्तोवर अस्मादिक त्या ‘धूम्र शोधकाला’ हवा देत होते! कर्मा रिटर्न्स म्हणतात, त्या प्रमाणे मला झोपलागे पर्यंत, बायकोला हात दाबावा लागला होता!(खूप दुखलं हो!)

चिरंजीव बाजारातून आले. बायकोने घडलेला प्रसंग ‘तडका मारके’ सांगितला (निंबू +चाट मसाला+हिरवी मिर्ची!) पोटभर हसले, अन पोटभर जेवून पुन्हा हसले!

“मग,वाजू दिला असता तसाच अलाराम तर काय झालं?”

” काही नाही, घरा समोर तीन गाड्या उभा राहिल्या असत्या! एक एम्बुलन्सची, एक फायर ब्रिगेडची आणि एक पोलिसांची!”

दोन घराच्या रोच्या पॅसेज मधील आणि कम्युनिटीतील सार्वजनिक विजेचे दिवे, एकदा ढगाळ वातावरणत दिवसा पण चालू दिसले. नंतर असे कळाले कि या कम्युनिटीतले दिवे हे फोटोसेन्सेटिव्ह स्विचेसवर जोडलेले आहेत. म्हणजे पुरेसा प्रकाश पडला कि वीजतात आणि कमी प्रकाशात पेटतात.  आपल्या भारतात हे केले तर गावभर दिवसा उजेड पाडणारे स्ट्रीट लाईट बंद ठेवता येतील. तेव्हडीच वीज बचत होईल!

इतक्या मोठ्या घरांच्या संकुलात इंचभर जागा सुद्धा लहान मुलांच्या खेळण्यासाठी सोडलेली नाही, पण डॉग पार्क मात्र आहे! ‘हर कुत्तेके दिन आते है!’ हे आपल्या कडे म्हणतात. इथे कुत्र्याच्या जन्माला यायला, स्पेशल पुण्याचं गठुडं लागत! अमेरिका, जितका स्वयंचलित वाहनाचा आहे, त्यापेक्षा तो श्वानांचा आहे असे वाटते! त्यांचे स्पा आहेत, डॉक्टर्स आहेत, मॉल मध्ये त्यांच्या टॉय आणि फूडचा स्वतंत्र सेक्शन असतोच, हिवाळ्यात स्पेशल सूट्स घालून हि मंडळी, मालकाला घरा बाहेर पडण्यास भाग पडतात!

येथे आल्या पासून मी दोन गोष्टी मिस करतोय. त्यातली एक आहे, वाहनाचे हॉर्न! या सत्तर दिवसात फक्त एकदाच हॉर्न वाजलेला ऐकलंय! आणि दुसरी गोष्ट म्हणजे भटकी कुत्रे! एकही दिसलं नाही!

(क्रमशः)

सु र कुलकर्णी

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..