नवीन लेखन...

देहदान हाही अेक अंत्यसंस्कारच

Body Donation - A Kind of Cremation

पारशी समाजात आता दहन संस्कार (लोकसत्ता 25 जून 2016) वाचून खूप समाधान वाटलं. कालमानाप्रमाणं आपल्या रूढी आणि परंपरा बदलल्या पाहिजेत आणि अंधश्रध्दांची जळमटं काढून टाकली पाहिजेत, याचा आदर्श, पारशी समाजानं, अितर धर्मियांपुढे ठेवला आहे. देहदान आणि अवयवदान हेही पर्याय होअू शकतात. आपल्या रूढीनुसार क्रियाकर्मे करून झाल्यानंतर देहदान केलं तर पार्थिवावर धार्मिक अंत्यसंस्कारच केल्यासारखं आहे.

देहदानाचं महत्व हळूहळू समजू लागलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे कार्यकर्ते माननीय नानाजी देशमूख, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू आणि ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी विंदा करंदीकर यांनी देहदान केलं आहे. अिंडियन मर्चन्टस् चेंबरचे सेक्रेटरी रामू पंडित यांनी 16 डिसेंबर 1991 रोजी जे. जे. अिस्पितळास देहदान केलं. त्यांचा सुरत येथे मृत्यू झाला होता.

याचा अर्थ स्पष्ट होतो की भारतातल्या अगदी वरच्या थरातील विचारवंतांना देहदानाची अुपयुक्तता आणि महत्व समजलं आहे आणि त्याबाबतीत त्यांनी प्रत्यक्ष कृती करून आपल्याला अंत्यसंस्काराचा अेक नवा पर्याय दाखवून दिला आहे.

शरीरजन्य पदार्थ म्हणजे रक्त, वीर्य, अस्थिरस, बीजांड वगैरे आणि अवयव म्हणजे अेक मूत्रपिंड म्हणजे, अेक किडनी, यकृताचा काही भाग, त्वचेचा काही भाग वगैरे जिवंतपणी म्हणजे मरणपूर्व आयुष्यात दान करता येतात. तर नेत्रपटल म्हणजे, कॉर्निया, दोन्ही मूत्रपिंडं, ह्रदय वगैरे अवयव मरणोत्तर दान करता येतात.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार देहाचे अनेक घटक, मरणपूर्व आणि मरणोत्तर दान करता येणे शक्य होणार आहे. मरणोत्तर देहाचे अुपयुक्त अवयव काढून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला भाग जाळून किंवा फेकून देण्यापेक्षा, त्यातील प्रथिने, हाडे, विकर, या सारखी जीवरसायनं आणि फॉस्फोरस सारखी असेंद्रीय रसायनं वगैरे मिळविता येतील. शिवाय अुरलेला भाग जमिनीत पुरून त्याचं अुत्कृष्ट खतात रुपांतर करता येअील. हे सर्व दानाचेच प्रकार आहेत.

मरणोत्तर देहाचे अुपयुक्त अवयव काढून त्या अवयवांचं, जिवंतपणे पीडित आणि रोगग्रस्त असणार्या गरजू व्यक्तीच्या देहात रोपण करणं म्हणजे प्रेताची विटंबना करणं नव्हे हे कृपया लक्षात घ्यावं.

देहदान, हे वैद्यकीय महाविद्यालयांत, वैद्यकशास्त्र शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी केलं जातं. अचेतन देहातील बरेचसे कार्यक्षम अवयव, दुसर्या दुखर्या देहात रोपण करण्यासाठी वापरले जाअू शकतात. वैद्यकीय महाविद्यालयात आणि अिस्पितळातच हे अवयवरोपण सहज शक्य होतं. वैद्यकीय विद्यार्थी हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत असतात त्यामुळे मृत देहाची विटंबना कधीच होत नाही. मोठ्या शल्यक्रिया करतांना पूर्ण भूल दिली जाते आणि वैद्यक व्यवसायातील अनेक व्यक्ती त्या शरीरास स्पर्श करीत असतात. पूर्वी अडलेल्या बाळंतिणीची सुटका पुरूष डॉक्टरच करीत असत. मानवतेच्या दृष्टीकोनातूनच हे सर्व केलं जातं. देहाची विटंबना झाली असं कुणीही समजत नाही. अुलट जीवदान दिलं म्हणून कृतज्ञताच व्यक्त करतात.

संस्था सहाय्यक देहदानाची चळवळ अगदीच नवी नाही. यापूर्वीही देहदानाचं महत्व ध्यानी ठेवून अनेक विचारवंतांनी देहदान केलं आहे आणि जिवंतपणीही देहदानाचा प्रचार आणि प्रचार केला आहे. पुण्याचे श्री. ग. म. सोहोनी यांनी देहदान सहाय्यक मंडळ स्थापन करून देहदानाचा प्रसार करण्याचं सत्कार्य सुरू केलं. त्यांच्या पत्नी आशाबाअी सोहोनी यांनी 18 सप्टेंबर 1986 या दिवशी देहदान केलं. गेल्या 20-25 वर्षातील देहदानाची अनेक अुदाहरणं देता येतील.

डोंबिवली येथे दधीची देहदान मंडळ, 1988 सालापासून देहदानाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात डोंबिवली, कल्याण, ठाणे, कळवा, अंबरनाथ, बदलापूर आणि मुंबअी वगैरे ठिकाणाहून मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानासाठी हजारो लोकांकडून अिच्छापत्रं भरून घेतली आहेत. या मंडळाकडून आतापर्यंत सुमारे 200 देहदानं करवून घेतली आहेत. आणखी काही देहदान सहाय्यक संस्थांची माहिती कुणास असल्यास लेखकाशी अवश्य संपर्क साधावा म्हणजे अशा संस्थांची सूची तयार करता येअील.

देहदानासंबंधी, सरकारमान्य अशी कायदेशीर पद्धत आहे. हयातीतच, देहदानपत्रक भरून, त्यावर वारसांच्या स्वाक्षऱ्या घेवून ते जवळच्या सरकारी अिस्पितळात नोंदवावं लागतं. यासाठीचे फॉर्म देणं, त्यांची योग्य ठिकाणी नोंद करणं आणि मार्गदर्शन करणं वगैरे कामं ही देहदान मंडळं करीत असतात. म्हणूनच अशा अेखाद्या देहदान मंडळाशी संपर्क साधणं आवश्यक आहे.

सजीवांचं शरीर अचेतन झालं म्हणजे निसर्गच त्याची विल्हेवाट लावायला सुरूवात करतो. पेशी विघटन पावू लागतात, त्यात जीवाणूंची वाढ होअू लागते आणि शरीर कुजायला लागतं. विज्ञानीय दृष्टीकोनातून पाहता अचेतन शरीर हे दगड, माती किंवा तोडलेलं लाकूड या पेक्षा वेगळं नाही.

वेगवेगळ्या धर्मात अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्व धर्माचरणांच्या पद्धतींचा खोलवर अभ्यास केल्यास असं आढळतं की, त्या पद्धतीस विज्ञानाचा आधार आहे. परंतू कालमानानुसार, धर्मसंस्कारात अंधश्रध्दांचा प्रवेश झाला. आत्म्याला मुक्ती, मोक्ष, पिशाच्य योनी, श्राध्दपक्ष वगैरे संकल्पना रूढ झाल्या आणि खरं विज्ञान झाकलं गेलं. आता आपण डोळसपणे विचार करून विज्ञानाधिष्ठीत पध्दतींचा वापर केला पाहिजे. निधन पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून, बरीच धार्मिक क्रियाकर्मे आणि विधी केले जातात. क्रियाकर्मे करणं, हेही काही व्यक्तींचं चरितार्थाचं साधन आहे. क्रियाकर्मे करून देणं ही सेवा ते लोक अुपलब्ध करून देतात, मानसिक समाधान प्राप्त करून देतात आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्या चरितार्थासाठी धनप्राप्ती होते.

निधन पावलेल्या व्यक्तीच्या अतृप्त अिच्छा, त्याच्या आत्म्याला चिरशांती, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती, भूतपिशाच्च योनी, 84 लाख योनी, मोक्ष, पुनर्जन्म, पापपुण्य वगैरे संकल्पनांचा पगडा आपल्या समाजावर अितका घट्ट बसला आहे की, पैसा खर्च झाला आणि वेळ खर्ची पडला तरी चालेल पण मानसिक समाधान मिळविण्यासाठी तेव्हढं मोल ते देतात. ही क्रियाकर्मे केली नाहीत तर त्या कुटुंबातील व्यक्तीचं कोणतं आणि किती नुकसान होतं आणि त्याला मृत व्यक्ती, मृत्यूनंतर कितपत जबाबदार असते, याचं मूल्यमापन कसं करावं हे कुणालाच माहित नाही. परंपरागत संकल्पनांमुळे मानसिक समाधान मिळतं येव्हढं मात्र खरं. क्रियाकर्मे करण्यानं काही नुकसान न होता मानसिक समाधान मिळतं आहे ना असा विचार केला जातो. कोणती, कशी आणि किती क्रियाकर्मे करावीत हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा विषय आहे.

देहदान करणं म्हणजे ही परंपरागत क्रियाकर्मे करू नयेत असं नाही. आपल्या रूढीनुसार क्रियाकर्मे करून झाल्यानंतर देहदान केलं तर पार्थिवावर धार्मिक अंत्यसंस्कारच केल्यासारखं आहे.

अंत्यसंस्काराचे दोन मुख्य प्रकार आहेत. ‘दहन’ म्हणजे प्रेत जाळणं आणि ‘दफन’ म्हणजे प्रेत जमिनीत पुरणं. नद्या आणि समुद्रातही प्रेतं टाकून अंत्यसंस्कार केले जातात पण हे प्रमाण खूपच कमी आहे. पारशी लोक, ‘शांतता विहीरीत’, गिधाडांना खाण्यासाठी, प्रेतं ठेवतात. ममीकरण ही देखील अंत्यसंस्काराची अेक पद्धत आहे. अितीहास काळात ही पद्धत, राजेमहाराजे यांच्या अंत्यसंस्कारासाठी, अिजिप्त आणि अितर काही देशात रूढ होती. आता ती कालबाह्य झालेली आहे.

दहन पद्धतीत, धार्मिक विधी झाल्यानंतर देह चितेवर ठेवला जातो. अेक प्रेत जाळण्यासाठी दोन ते तीन झाडांचं लाकूड, काही किलोग्रॅम गोवर्या आणि पाच दहा लिटर रॉकेल लागतं. हल्ली विज किंवा गॅस दाहिन्याही वापरल्या जातात. म्हणजे मृतदेह अग्नीला दान केला जातो. दफन पद्धतीत देह प्रथम अुची लाकडाच्या, कलाकुसर केलेल्या शवपेटीत ठेवला जातो. नंतर ती शवपेटी प्रेतासहित दफन स्मशान भूमीत पुरली जाते. नंतर त्या जागेवर अैपतीनुसार थडगं बांधलं जातं आणि वर्षानुवर्ष ती जागा आरक्षित केली जाते. म्हणजे मृतदेह पृथ्वीला दान केला जातो. पारशी लोक मृतदेहाचे गिधाडांना दान करतात. नद्यांच्या प्रवाहात किंवा समुद्रात पार्थिव सोडणं म्हणजे देहदानाचाच प्रकार आहे.

अिस्पितळांना देहदान करणं हाही अेक आधुनिक अंत्यसंस्काराचाच प्रकार समजला पाहिजे.

— गजानन वामनाचार्य

180/4931, पंत नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई 400 075.
022-25012897, 9819341841.

शनिवार 18 फेब्रुवारी 2017
शनिवारचा सत्संग : 13

मूळ लेख गुरूवार, 10 मार्च 2011 रोजी मराठीसृष्टीवर प्रकाशित झाला.

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

1 Comment on देहदान हाही अेक अंत्यसंस्कारच

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..