ग्रंथाक्षर या दिवाळी २००९ विशेषांकात रामदास कामत ह्यांनी लिहिलेला हा लेख
काही वर्षांपूर्वी बंगाली रंगभूमी ही अतिशय प्रगत आणि प्रगल्भ आहे आणि ती भारतात प्रथम क्रमांकावर आहे, असं मानलं जात होतं, परंतु प्रथम क्रमांकाची जागा आता सर्वांगानी बहरलेल्या अशा मराठी रंगभूमीने घेतली आहे, असं मानायला काहीच प्रतिवाद नसावा. व्यावसायिक, प्रायोगिक, हौशी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी अशा विविध नाट्यक्षेत्रात नवेनवे प्रयोग चालू आहेत, परंतु मराठी संगीत रंगभूमी, जी महाराष्ट्राने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी अशी मानली जाते, तिची पिछेहाट झालेली दिसते, किंबहुना ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असं म्हटलं जातं.
सध्या संगीत नाटकांचे तुरळक प्रयोग होत असतात आणि नाट्यसंगीत मागे पडल्यासारखे झाले आहे. त्यामुळे रसिकांच्या मनात संगीत नाटकं आणि नाट्यसंगीत कालबाह्य झाली की कुवतबाह्य झाली असा संभ्रम निर्माण झाला आहे. याचा ऊहापोह करण्याआधी संगीत नाटक आजच्या अवनत स्थितीला का व कसं पोचलं, याचा विचार करणं आवश्यक आहे.
१८८० साली अण्णासाहेब किर्लोस्करांचं ‘संगीत शाकुंतल’ नाटक रंगभूमीवर आलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने संगीत नाटकांचा जमाना सुरू झाला. कीर्तनकार एखादं चरित्र/ आख्यान सांगताना वीररसात्मक, करुण रसात्मक वगैरे विविध रसांची गाणी प्रसंगाला अनुरूप अशा रागात गातो. ही गाणी साकी, दिंडी, कामदा, अंजनीगीत, कटाव वगैरे विविध वृत्तात असतात. शाकुंतल आणि त्यानंतर १९९० पर्यंत आलेल्या सौभद्र, शापसंभ्रम, मृच्छकटिक, शारदा वगैरे नाटकांत पुष्कळशी गाणी याच वृत्तात रचली आहेत.
संगीत नाटकं चालू असताना गद्य नाटकंही जोरात चालू होती. असं असताना नाटकात गाण्यांचा समावेश करण्याची आवश्यकता भासली, याचं कारण चारपाच तास गद्य नाटक पहाणं कंटाळवाणं होण्याची शक्यता असते. म्हणून संगीत नाटकात पात्रांचं संभाषण, विचार, मनोगत वगैरे गाण्याच्या रूपात व्यक्त केले गेले. गाणी केवळ मनोरंजनासाठीच होती असं नव्हे, तर कित्येक वेळा भावभानांची उत्कटता व्यक्त करायला कधी कधी गद्य कमी पडतं, तिथं संगीताचा वापर केल्यानं ती परिणामकारकरित्या व्यक्त करता येते.
१९१० पर्यंत आलेल्या संगीत नाटकात गद्य आणि संगीत समांतर रेषेत चालत होते. संगीत गद्याला पूरक होतं, कुरघोडी करत नव्हतं. एक आक्षेप असा घेतला जातो की, जुन्या नाटकांत खूपच म्हणजे दीडशे-दोनशे गाणी आहेत, म्हणजे फारच झाली. पूर्वीच्या काळी पाच साडेपाच तास चालणारी, विस्तारानं लिहिलेली नाटकं होती. नाटकातले बरेचसे संवाद, विचार, भावभावना संगीताच्या रूपात आल्याकारणानं गाण्यांची संख्या जास्त होती, तरी गायन मर्यादित स्वरूपाचं होतं आणि ते संभाषण, विचार किंवा भावभावना व्यक्त करण्यापुरतंच होतं.
१९११ ते १९३३ हा काळ नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव अशासारख्या असामान्य गायकांनी दिलेल्या अभिजात संगीतातील उत्तमोत्तम चिजांवर आणि चालींवर गाणी बांधली गेली. ही नाटकं रंगभूमीवर येईपर्यंत शास्त्रीय संगीत फक्त विशिष्ट ठिकाणी थोड्याच लोकांना ऐकायला मिळत असे. तिथं सामान्य जनांना शिरकाव नव्हता, परंतु संगीत नाटकांच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत नाट्यसंगीताच्या रूपात महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यात सामान्यजनांपर्यंत पोचलं. मराठी प्रेक्षक नाट्यसंगीतावर लुब्ध झाले आणि संगीत नाटकावर अक्षरशः तुटून पडले.
केशवराव भोसले, बालगंधर्व, मा. दीनानाथ, बापूसाहेब पेंढारकर असे मातब्बर गायक नट रंगभूमीला लाभले आणि त्यांनी नाट्यसंगीतात क्रांती करून ते हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवलं.
या काळातल्या नाटकातल्या गाण्यांची संख्या तुलनेनं कमी झाली, परंतु गायन अमर्याद झाले. संगीताच्या अतिरेकामुळे रंगभूमीची जी हानी झाली, त्यावर सुप्रसिद्ध समीक्षक बाबुराव जोशींनी मल्लीनाथी केली की, “संगीताने प्रथमतः रंगभूमी गाजली खरी, परंतु तीच रंगभूमी अमर्याद संगीतामुळे नंतर गांजली.” पु.ल. देशपांडे या . संदर्भात म्हणाले की, “शिरा तोच, पण सत्यनारायणाचा प्रसाद होऊन आल्यावर आपण द्रोणभरच देतो. तिथं काही बश्या भरभरून शिरा मिळावा अशी अपेक्षा नसते. सत्यनारायणाच्या शिऱ्यावर आडवा हात मारायचा नसतो. कारण पदार्थ तोच असला तरी त्याची भूमिका निराळी असते. रंगभूमीवरील या काळातल्या गाणाऱ्या नटांनी हे तारतम्य पाळलं नाही.’ ”
संगीताचा अतिरेक केल्याचा परिणाम असा झाला की, त्यातलं नाटक आणि अभिनय दोन्हीही आक्रसून गेले. नाटक पाहून आल्यावर नाटक आणि अभिनय चांगला झाला, असं म्हणण्याऐवजी बालगंधर्व काय विलक्षण गायले आणि दीनानाथराव काय आक्रमक गायले, असे उद्गार प्रेक्षक काढू लागले. म्हणजे नाटक पाहायला जायचं ते गाणं ऐकण्यासाठी, त्यातील नाट्य किंवा अभिनय पाहण्यासाठी नव्हे, असं व्हायला लागलं.
मामा वरेरकरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, सुरुवातीच्या काळात बालगंधर्व अभिनयापुरतं किंवा नाट्याला पोषक असंच गात असत, परंतु सवाईगंधर्व रंगभूमीवर फार गायला लागल्यामुळं बालगंधर्वानीही आपलं गाणं वाढवलं. बरं, त्यांचं गाणं काय कमी प्रतीचं होतं? मुळीच नाही. बालगंधर्व तर असं विलक्षण गात की, त्यांचं स्वर्गीय गायन ऐकायला अल्लादिया खाँसाहेबांसारखे गायक नाटकाला येऊन बसत असत. नंतरच्या काळात छोटा गंधर्व सोडून असे गायक निर्माण झालेच नाहीत.
नंतरच्या काळात रंगभूमीवरील पुष्कळसे गायक बालगंधर्व किंवा दीनानाथराव यांच्या गायकीचं अनुकरण करून लागले, परंतु बरेचसे गायक त्यांच्या गुणांचं अनुकरण करायच्याऐवजी त्यांच्या दोषांचं अनुकरण करून आपण बालगंधर्व किंवा दीनानाथराव यांची गायकी गातो असा टेंभा मिरवायला लागले. परिणामत: संगीताचं (नाट्य संगीताचं) अक्षरशः डबकं झालं. गायनकलेची वृद्धी आणि उत्कर्ष व्हायचा असेल तर ती प्रपातासारखी वाहती असायला हवी. नवनवीन स्रोत, नवनवीन विचार, नवनवीन ओघ त्यात मिसळले पाहिजेत. तसं झालं नाही, त्यामुळे नाट्य संगीताचा खळाळता प्रवाह अडूत बसला. १९४२ नंतर कुलवधू वगैरे नाट्यनिकेतनच्या नाटकात ज्योत्स्नाबाई भोळ्यांनी शास्त्रीय संगीतावर आधारित भावगीत गायन करून आणि त्यानंतरच्या काळात छोटा गंधर्वांनी आपल्या वेगळ्या गायकीनं नाट्य संगीताचा अडलेला प्रवाह बराचसा मोकळा केला.
खऱ्या अर्थानं नाटकाला छेद न देता नाटकांबरोबर समांतर रेषेत जाण्याचं नाट्यसंगीत निर्माण केलं, ते १९६० साली आलेल्या ‘पंडितराज जगन्नाथ’ नाटकानं. त्यानंतर १९६० ते १९८५ या काळात आलेल्या नाटकांत वसंतराव देसाई, छोटा गंधर्व, राम मराठे, नीळकंठ अभ्यंकर, प्रभाकर भालेकर वगैरे संगीतकारांनी फार चांगल्या चाली दिल्या.
परंतु १९६४ नंतर आपल्या कल्पक आणि शास्त्रीय संगीतावर आधारित चाली देऊन नाट्यसंगीताला प्रवाही आणि खळाळतं असं स्वरूप दिलं, ते पं. जितेंद्र अभिषेकी यांनी. अभिजात संगीतावर आधारलेल्या चाली त्यांनी तर दिल्याच, परंतु हलक्या फुलक्या ‘लेकुरे उदंड जाहली’ ज्याला संगीतक म्हणता येईल अशा आणि ‘संत गोरा कुंभार’ अशा भक्तिरसप्रधान नाटकाला चालू लावून आपण सर्वंकष अशा रचना करू शकतो हे निर्विवादपणे सिद्ध केले.
पुन्हा १९८५ नंतर संगीत नाटकांचा आणि नाट्यसंगीताचा अंधार सुरू झाला. त्यामुळे बरेचसे शंकेखोर लोक शंकाकूल होऊन नाट्यसंगीत कालबाह्य झालं आहे की कुवतबाह्य झालं आहे? अशी विचारणा करू लागले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, तसं काही झालेलं नाही.
पं. भास्करबुवा बखले, पं. रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव यांनी नाट्यसंगीताच्या लावलेल्या रोपांचं केशवराव भोसले, बालगंधर्व, दीनानाथराव, बापूसाहेब पेंढारकर, यांच्या उत्कृष्ट गायनामुळे वटवृक्ष झाले आणि त्या वटवृक्षाची पाळेमुळे मराठी मनाच्या गाभाऱ्यात खोलवर गेली आहेत. नाट्यसंगीत मराठी माणसाच्या जीवनात एवढं खोलवर रूजलं आहे की, ते महाराष्ट्रातून हद्दपार होणंच शक्य नाही.
मी माझा अनुभव सांगतो. गेल्या सात-आठ वर्षांत बऱ्याच नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मला प्राप्त झाली. हे कार्यक्रम पुणे, नाशिक, नगर, रत्नागिरी, चिपळूण, नागपूर, अमरावती, अकोला, औरंगाबाद अशा महाराष्ट्रातील अनेक शहरांत झाले. या कार्यक्रमांना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून नाट्यसंगीत लोप पावलं आहे किंवा नामशेष झालं आहे, 1 असं मला मुळीच वाटत नाही.
तीन वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे झालेल्या अंतिम स्पर्धेत परीक्षक म्हणून गेलो होतो. सर्व स्पर्धक वेगवेगळ्या शहरांतले होते. भावगीत, लावणी वगैरे सुगम संगीत गायन प्रकाराव्यतिरिक्त प्रत्येकानं एक नाट्यसंगीत म्हटलं होतं. त्यांचं नाट्यसंगीत ऐकून मी प्रभावित
झालो. एवढ्या तादात्म्यतेनं आणि परिणामकारकरित्या ते गायले की, त्यांची गाणी ऐकूण मी स्तंभित झालो आणि मरगळलेल्या माझ्या मनाला उभारी आली. मराठी जनमानसातून नाट्यसंगीत कधीही हद्दपार होणार नाही, याची खात्री पटली. पुणे, मुंबईतच नव्हे, तर इतर शहरांतसुद्धा असे गायक आहेत हे पाहून हृदय अक्षरशः उचंबळून आलं.
मराठी माणसांना नाट्यसंगीत एवढं आवडत असूनसुद्धा संगीत नाटकं चालत नाहीत, ती पुनरुज्जीवित करायला काय करायला हवं याचं विवेचन मी करतो.
१) मर्मबंधात वसलेली संगीत रंगभूमी पुन्हा जळवून टाकायची असेल तर त्यासाठी काही ठोस उपाय करण्याची गरज आहे. आज संगीत रंगभूमीवर जी थोडीफार नाटके अस्तित्वात आहेत ती पहायला प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत असतात, परंतु संगीत नाटकांकडे तरुण प्रेक्षकांनाही आकर्षित करून घेण्याचे इप्सित साध्य होण्यावर या रंगभूमीचे भवितव्य अवलंबून आहे. संगीत नाटकाकडे तरुण प्रेक्षकांना आकर्षित करून घ्यायचे असेल तर सध्याच्या रंगभूमीचे जुने स्वरूप नाहीसे करून तिला नवे रूप द्यायला हवे. सौभद्र, मानापमान, विद्याहरण, शारदा, संशयकल्लोळ इ. लोकप्रिय संगीत नाटकांच्या गुणवत्तेचे नवे दर्शन घडवायला हवे. सर्वप्रथम या नाटकांच्या संहिता संपादित करून त्या नेटक्या आणि प्रयोगशील करायला हव्यात. त्याचप्रमाणे गाणीही मोजकीच घ्यायला
हवीत. नव्या तरुण गायक अभिनेत्यांना प्राधान्य देऊन, प्रयोगाचे सादरीकरणही नावीन्यपूर्ण असायला हवे. नेत्रसुखद रंगाच्या वेशभूषेतून सौंदर्याचा आविष्कार घडवायला हवा. नेपथ्यही सूचक व आवश्यक तेवढेच उभे करून खास प्रकाशयोजनेने वातावरण निर्मिती करायला हवी. थोडक्यात पूर्वीच्या प्रयोगातील ढोबळपणा व बटबटीतपणा बाजूला सारून संपूर्ण प्रयोगाला सौंदर्यपूर्ण व कलात्मक रूप दिले गेले तरच जुन्या नाटकांचे हे प्रयोग प्रेक्षकांना भावतील, आनंदून टाकतील.
२) जुन्या दुर्लक्षित संगीत नाटकांचा शोध घेऊन, त्यांच्या नव्या रंगावृत्त्या करून त्या प्रयोगक्षम करायला हव्या. उदा. मास्टर दिनानाथांनी एकेकाळी गाजवलेलं विश्राम बेडेकर यांच्या ‘ब्रह्मकुमारी’ या संगीत नाटकाची तीव्रतेने आठवण होते. पौराणिक कथेच्या माध्यमातून आजच्या जीवनातील नैतिक प्रश्न मांडणारे आणि अंतर्यामी आधुनिक असलेलं हे नाटक आहे. त्यात ‘नाटक’ आहे आणि ‘संगीतही’ आहे. नेटका प्रयोग झाला तर आजही हे नाटक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. अशा विस्मृतीत जाणाऱ्या संगीत नाटकांचा शोध घेऊन ती नव्या स्वरूपात सादर करायला हवीत.
३) संगीत नाटक थंडावण्याचे प्रमुख कारण म्हणजे संगीत नाटकांच्या संहितांचा अभाव हे आहे. नवीन संगीत नाटकं केली जात नाहीत, कारण ती लिहिली जात नाहीत आणि ती लिहिली जात नाहीत म्हणून ती केली जात नाहीत, असं हे दुष्टचक्र आहे. विद्याधर गोखले यांच्यानंतर सातत्याने संगीत नाटके लिहिणारा नाटककार मराठी रंगभूमीला लाभला नाही. यासाठी संगीत नाट्यलेखनाच्या कार्यशाळा भरवून नवीन किंवा प्रचलित लेखकांना संगीत नाटकं लिहिण्यास प्रवृत्त करायला हवे. त्यासाठी संगीत नाटक म्हणजे काय, ती कशी लिहिली गेली पाहिजेत हे समजणे आवश्यक आहे. या बाबतीत माझे विचार थोडक्यात मांडतो.
कुठल्याही नाटकात गाणी घातली म्हणजे ते संगीत नाटक होत नाही किंवा तू गाणं म्हण, मग मी गाणं म्हणतो असं सांगून पात्रांनी एकमेकांना म्हटलेल्या गाण्यांनी संगीत नाटक होऊ शकत नाही. संगीत हा नाटकाचा अविभाज्य भाग असायला हवा. त्या नाटकातून गाणी वजा केली तर ते नाटकच अशक्य व्हायला हवे. उदाहरण द्यायचंच झालं तर जुन्या सौभद्र, शारदा, मृच्छकटिक वगैरे नाटकातील काही गाणी वगळली तर ते नाटकच पुढे जात नाही, कारण त्या गाण्यामध्ये नाटकाचा अंतर्भाव असतो.
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, नाटकासाठी संगीत असावे, संगीतासाठी नाटक नसावे. हा संगीत नाटकाबद्दलचा विचार सर्वाधिक महत्त्वाचा आहे आणि ही गाणी अशी हवीत की, प्रत्यक्ष प्रयोगातूनच त्यांची गुणवत्ता, रसवत्ता आस्वादायला मिळावी.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट. साधारणपणे अशी समजूत आहे की, संगीत नाटकाचा विषय पौराणिक किंवा काल्पनिक किंवा लाईट कॉमेडी असावा ही समजूत मुळी चुकीची आहे.
कुठल्याही विषयावर किंवा वातावरणावर किंवा संघर्षात्मक विषयावर संगीत नाटक होऊ शकते. याचं उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे जुन्या पिढीतले संगीत ‘एकच प्याला’ आणि आधुनिक काळातली ‘मत्स्यगंधा’ आणि ‘ययाती आणि देवयानी’ ही नाटके संघर्षात्मक विषय असूनही संगीत नाटके म्हणूनच गाजली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगीत नाटक हे आनंदाचे आणि सुगंधाचे सुख निधान असायला हवे. प्रसन्नतेने आनंदाचा शोध घेणे हे संगीत नाटकाचे अंतिम ध्येय झाले, तर संगीत नाटक निखळ आणि स्वच्छ करमणूक देऊ शकेल आणि प्रेक्षकांची रंजकतेची, अभिरुचीची, प्रतिष्ठित भूक भागवू शकेल.
४) पारंपरिक संगीत नाटके ही उत्तमच आहेत, परंतु अशीही काही नाटके आहेत की, ज्यांचे संवाद तालबद्ध, लयबद्ध असतात. काही मुक्त छंदात्मकही असतात. त्या संवादातही गाणं आणि संगीत दडलेलं असते. प्रयोगात नृत्य सदृश्य हालचालीही बसवल्या जातात. ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ही अशा संगीताची उत्कृष्ठ उदाहरणे आहेत. पारंपरिक प्रकृतीची नसली तरी लाईट प्रकृतीची अशी ही उत्तम ‘संगीतकं’ म्हणता येतील, अशा प्रकारची नाटकंही रंगभूमीवर अवश्य यावीत.
५) संगीत नाटकात संगीत कशा प्रकारचं असावं? अभिजात किंवा शास्त्रीय संगीतावर आधारलेलं असलं तर फारच उत्तम. फरक एवढाच की, शास्त्रीय संगीतावर आधारलेलं आहे म्हणून फार वेळ गाऊन किंवा ताना मारून चालणार नाही. भाव आणि रसोत्पती साधेपर्यंतच, पण कसदार गायन असावं. सर्वच गायक/ गायिकांना शास्त्रीय संगीतात गाणं म्हणणं जमणार नाही, म्हणून इतर सुगम संगीताचा उपयोग करून घ्यायला हवा. सुगम संगीत म्हणजे मला अभिप्रेत आहे ते भावगीत, लावणी, दिंडी, कामदा, लोकसंगीत वगैरे गायनप्रकार. अशा प्रकारचे गायन प्रकार सुरुवातीच्या काळात अण्णासाहेब किर्लोस्कर, देवल यांनी आपल्या नाटकात मुक्त हस्ताने वापरले होते. माझ्या मतानं सुगमसंगीतानं भाव, भावना आणि रस यांची उत्पत्ती आणि उत्कर्ष चांगल्या प्रकारे साधता येतो. शास्त्रीय आणि सुंगम संगीताच्या सुमधुर चाली द्यायला आपल्याकडे उत्तम दिग्दर्शक आहेत. उदाहरणार्थ पं. यशवंत देव, पं. हृदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की, रघुनंदन पणशीकर वगैरे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, उद्याचं नाटक केवळ ज्येष्ठ नागरिकांच्या आश्रयावर चालणार नाही. ते चालायचं असेल आणि अधिकाधिक प्रतिसाद मिळवायचा असेल तर तरुण रसिक वर्गात लोकप्रिय व्हायला हवे. म्हणून अभिजात संगीताबरोबर सुगम संगीताचाही वापर मुक्त हस्ताने व्हावा.
६) सध्या महाराष्ट्र राज्याच्या संगीत नाटकांच्या स्पर्धा होतात. त्यात जुनीच नाटके जुन्या पद्धतीने सादर केली जातात. मग त्यातल्या त्यात बऱ्या वाटणाऱ्या नाटकाला पारितोषिक मिळून जाते. जुन्या नाटकाचा नावीन्यपूर्ण प्रयोग किंवा सादरीकरण करण्याचा कुणी प्रयत्न करीत नाही. या प्रयत्नातून संगीत रंगभूमीच्या उन्नतीसाठी काही साध्य होत नाही. यासाठी गद्य नाट्यस्पर्धेचा नव्या सहिंतेचा नियम याही स्पर्धेला लागू करून नावीन्यपूर्ण संगीत नाटकाच्या प्रयोगालाच पारितोषिकासाठी प्राधान्य द्यायला हवे.
मुद्दाम लिहावेसे वाटते की, १९६० साली धी गोवा हिंदू असोसिएशनने राज्य नाट्यस्पर्धेसाठी ‘मृच्छकटिक’ नाटक तीन अंकात बसविले होते. जुन्या नाटकावरून नवीन संहिता विद्याधर गोखले यांनी केली होती आणि प्रभाकर भालेकरांनी थोड्याशा चाली बदलून दिल्या होत्या. त्यात मी चारूदत्ताची भूमिका केली होती. हे नाटक मान्य झाले होते.
७) महाराष्ट्रात एकही शहर असे नाही की, जिथे एकांकिका स्पर्धा होत नाहीत. आता संगीत एकांकिकांच्या स्पर्धा कुणीतरी आयोजित करून त्याला घवघवीत पारितोषिके ठेवायला हवीत. बालरंगभूमीच्या संदर्भात म्हणजे संगीत बाल नाट्यांच्या स्पर्धा आयोजित करायला हव्यात.
८) बरेचसे शास्त्रीय संगीत गायक आपल्या शिष्यांना नाट्यसंगीत गाण्यापासून परावृत्त करतात. नाट्यसंगीतात सूर, शब्द आणि मुख्यत्वेकरून भाव यांचा योग्य मिलाफ करण्यासाठी रागातल्या एखाद्या वर्ज्य स्वरांचा आधार घ्यावा लागतो. कडव्या किंवा सनातनी वृत्तीच्या संगीतकारांना हे मान्य नाही म्हणून आपल्या शिष्याला शास्त्रीय संगीत शिकवताना नाट्यसंगीत अशिष आहे, त्याज्य आहे असं सारखं त्यांच्या मनावर बिंबवत असतात. यातले काही संगीतकार तर लबाड आहेत. आपण नाट्यसंगीत गात नाही असा ढोल बडवत असतात, पण आपलं संपूर्ण शास्त्रीय संगीत लोक ऐकून घेत नाहीत, असं पाहिल्यावर मग नाट्यसंगीत गातात. म्हणजे त्यांना गावंच लागतं. यासाठी त्यांनी आपला दुराग्रह सोडून द्यावा आणि आपल्या शिष्यांना नाट्यसंगीत गायला प्रतिबंध करू नये.
९) नाटकातलं संगीत गायला आवाजाला फोकस असावा लागतो. प्रयत्न केल्यास आवाजाला फोकस असणारे गायक-गायिका मिळू शकतील.
१०) संगीत नाटकाच्या उर्जितावस्था व उन्नतीसाठी मी एक महत्त्वाची सूचना करूइच्छितो. नव्या संगीत नाटकाच्या उभारणीसाठी आज सर्वाधिक गरज आहे, ती शासकीय पातळीवर ‘स्कूल ऑफ म्युझिकल ड्रामा’ची (SMD). असे विद्यालय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (NSD) धर्तीवर स्थापन करण्याची गरज आहे.
नाट्यशिक्षणाचे अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे आता घेतले जातात, पण कुठल्याही नाट्यविद्यापीठात संगीत नाटकाचा वेगळा विभाग नाही. त्यासाठी संगीत नाटकांचा आणि त्यांच्या प्रयोगांचा स्वतंत्र विचार किंवा अभ्यास केला जात नाही. या विद्यापीठातील परीक्षार्थी परीक्षेसाठी म्हणून संगीत नाटकांचा प्रयोग सादर करत नाहीत. ही त्रुटी संगीत नाटकांवरच भर देणारे वेगळे (SMD) विद्यालय स्थापन झाले तरच भरून काढता येईल. शिक्षण व्यवसायाभिमुख असेल तर विद्यार्थ्यांचा ओढा ते प्राप्त करण्याकडे असतो. केवळ कलेसाठी कला आत्मसात करून घेण्याचे दिवस संपले आहेत. तो भाबडा आदर्शवाद ठरेल, म्हणूनच म्युझिकल ड्रामा स्कूलमधल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक रंगमंडळ (रेपरटरी) उभारणे आवश्यक असेल. गुणी विद्यार्थ्यांचे सुविहित संगीत नाटकांचे प्रयोग या रंगमंडळातर्फे महाराष्ट्राभर आणि महाराष्ट्राबाहेर होत राहतील आणि संबंधित सर्व कलांवतांना त्यासाठी घसघशीत वेतन/मानधन द्यावं लागेल.
तसं झालं तर त्या कलावंताच्या उपजीविकेचा प्रश्न सुटेल आणि आपला कलाविष्कार ते अधिकाधिक विकसित करू शकतील.
ज्या रंगकर्मीींना अशा रंगमंडळाकडून संधी मिळणार नाही त्यांच्यासाठी संगीत नाट्यक्षेत्रातलेच पार्ट टाईम जॉब्स उपलब्ध करून दिले पाहिजेत. संगीत शिक्षक, कार्यशाळा घेणे, संगीताचे कार्यक्रम आयोजित करणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे इत्यादी कार्यक्रमांतून आपल्या प्राप्त ज्ञानाचा आणि गुणवत्तेचा योग्य उपयोग त्यांना करता येईल आणि त्याचवेळी त्यांना अर्थप्राप्तीही होऊ शकेल.
शेवटी मी लिहू इच्छितो की, मी कुणी नाट्यतज्ज्ञ नाही वा नाट्यअभ्यासकही नाही. गायक नटाची भूमिका इमाने इतबारे वठवणारा मी एक कलावंत आहे. संगीत रंगभूमीवर जवळजवळ पंचवीस प्रमुख भूमिका केलेला असा संगीत रंगभूमीचा निष्ठावंत सेवक आहे. त्यामुळे माझे हे विचार कुणाला हवेतले वाटतील, भासमय वाटतील आणि कदाचित स्वप्निलही वाटतील, पण माझी खात्री आहे की, माझे हे मनोवांछित कालांतराने सत्यात उतरेल आणि मला प्रिय असलेल्या संगीत रंगभूमीला पुन्हा नवसंजीवनी मिळेल.
-ॐ तत्सत
रामदास कामत
ग्रंथाक्षर या दिवाळी २००९ विशेषांकात रामदास कामत ह्यांनी लिहिलेला हा लेख


Leave a Reply