नवीन लेखन...

८ वी ड – भाग ८

८ वी ड ही प्रवृत्ती आहे का? स्थिती आहे का? किंवा अवस्था आहे? असे अनेक विचार मनात येतात आणि हे फक्त लहान मुलांमध्येच दिसतात तर याला उत्तर नाही असेच द्यावे लागेल. अगदी बारावीच्या मुलांपासून मोठ्या माणसामध्ये ८ वी ड असतोच असतो. शिक्षणामुळे माणूस मोठा होतो असे म्हणतात, पण तो त्या शिक्षणाचा वापर कसा करतो हे बघणे महत्वाचे आहे. साधे उदाहरण घेऊ या. मुलगा मोठा होत असताना त्याच्या मनात, शरीरात बदल घडत असतात. त्याच्या वृत्ती बदलत असतात. कधीतरी कुठेतरी असा उलटा फासा पडतो आणि होत्याचे नव्हते होते.

असाच माझा शाळेतील मित्र होता. खूप मस्ती करायचा, अभ्यास करायचा पण जास्त नाही, पास होण्यापुरता. परवा माझ्या अजय गुप्ते नावाच्या मित्राशी बोलताना त्याचा विषय निघाला. परंतु त्याला नवीन गोष्टीची प्रचंड हौस आणि उत्सुकता अर्थात सुरवात सिगरेटने, आम्ही लहान असताना सिगरेट ओढणे म्हणजे प्रचंड पराक्रम करणे, क्रांती करण्यासारखे होते. आम्ही आपले बावळट. कॉलेजच्या दिवसात तो हिरो झाला. त्याला नोकरी पण लागली होती चांगल्या कंपनीत. आम्ही गप्पा मारायचो, भटकायचो. परंतु पुढे तो वेगळा पडत गेला का कुणास ठाऊक. कॉलेजचे दिवस. अनेक मित्र होतात पुढे विरून जातात. पुढे त्याचे काय झाले हे कळलेच नाही. सगळेजण आपापल्या कामाला लागले. एके दिवशी भर पावसात स्टेशनवर दिसला, मला हाक मारली इंग्लिशमधून मला मोठ्याने म्हणाला ५० रुपये दे रे, अरे वडीलांचे मेडिसिन घ्यायचे आहे, भिजला होता तो, मी ५० रुपयाची नोट हातात ठेवली. तो निघून गेला. तितक्यात समोरचा एक माणूस म्हणाला अहो कशाला दिलेत तो आता नशा करणार. मला हे नवीनच होते. मी म्हणालो अहो तो माझ्या वर्गात होता. तो माणूस म्हणाला परत देऊ नका. मग अनेक गोष्टी कळत गेल्या त्याच्याबद्दल, त्याचे घर सुटले, बायको निघून गेली. लक्षात ठेवा मी निरीक्षण केले आहे. ही नशा करणारी बहुतेक माणसे सुरवातीला कपडे मळलेले असले तरी सतत केसाचा भांग व्यवस्थित कंगव्याने सतत पाडतात, का पाडत असतात कुणास ठाऊक काहीतरी मानसिक कारण आहे ते. सकाळी सकाळी तलावपाळीवर अशी माणसे दिसतात अगदी ग्रुपने, त्याचे डोळे सर्व काही सांगतात पण केसाचा भांग सतत पाडत असतात. कदाचित जेणेकरून आपण व्यवस्थित दिसले पाहिजे असे वाटत असेल. दारू प्यायल्यानंतर जसा फाडफाड इग्रजी बोलतो त्यापैकी हा प्रकार असावा असे वाटते. तो माझा मित्र खूप वर्षाने भेटला तेही दिवस पावसाळ्याचे होते, अचानक नौपाड्यावरून जाताना दिसला. धूम पाऊस होता मी घाईत होतो. तितक्यात तो आला म्हणण्यापेक्षा त्याने मला गाठलेच. अवतार भयानक होता रडत होता सतीश अरे माझा बाप मेला काही पैसे दे त्याच्या तयारीसाठी मी १०० ची नोट हातात ठेवली आणि सटकलो. दोन-तीन तासाने येत असताना तो फुल टाइट होऊन समोरून गेला त्याचे लक्षच नव्हते. मग काही वर्षाने कळले तो मेला. कसा मेला, कशाने मेला काहीच पत्ता लागला नाही. परन्तु आजही कधी स्टेशन वर गेलो की आठवते. आम्ही मुलांनी पण धतिंग केली पण या थराला नाही गेलो, वाहत नाही गेलो. अशी अनेक उदहारणे देता येतील. असे मला दुसरे कुटुंब दिसले त्याची दोन्ही मुले तशीच होती एक गेला एक जाण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण घराची वाताहत झाली आणि हे सगळे शिकलेले होते हे महत्वाचे आहे. हे असे का होते याचा विचार केला तर एकच गोष्ट लक्षात येते. मी म्हणजे कोणातरी वेगळा आहे ही मनातून भावना असते आणि ती पुढे इतकी वाढीला लागते की प्रत्येकाला आपले अस्तित्व दाखवायचे असते आणि त्या भरात असे होते. दारू पिऊन काही होत नाही असे सांगणारे मला दिसतात अगदी बाय पास झाल्यावर देखील, समर्थन काय नियमित पण थोडी एक पेग घ्या काहीही होत नाही. परत पुढे हे सांगणे असते डॉक्टरच सांगतात. आयला किती केविलवाणे समर्थन असते. एका घरात पाहिले, घरात दारूचा व्यवसाय, तेच वातावरण, मुबलक पैसा मग मुले नेहमीच फुल टू, घरातून समर्थन काय तर भारीची पितो, फालतू नाही, दारूने काहीही होत नाही, भारी प्यायची. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. मनातच म्हणालो अरे दारूच ती कधीतरी जाळणारच ना?

कुणाकुणाला सांगणार? वय कुठलेही असो परंतु माणसाला त्याची प्रवृत्ती स्वस्थ बसून देत नाही. मुलांचे तसे मोठ्या माणसांचे स्वतःबद्दल खूप भ्रम असतात. अन्य त्या चक्रात तो अडकला की गुरफटतोच, बाहेर येणे मुश्कील नसते पण योग्य वेळी बाहेर पडणे महत्वाचे असते. आज आपण अनेक घरात पाहतो खूप अडचणी असतात पण त्यातील किती स्वयम निर्मित असतात याचा शोध घेतला तर अनेकवेळा जाणवते की अनेकजणांची स्थिती ‘आ बैल मुझे मार’ ह्या कारणामुळे झालेली असते. आपण काहीतरी जगावेगळे करत आहोत आणि ते करणारे फक्त आपणच आहोत हा त्याचा भ्रम असतो, तो भ्रम सहसा कधीही जात नसतो कारण तितका वेळ त्याच्या मेंदूला नसतो, तो नशेमध्ये सतत गाफील असतो आणि मग येते ते बेवारशी मरण जसे माझ्या मित्राला आले. वाईट वाटते पण ईलाज नसतो.

परंतु आपण एखादी गोष्ट करण्याआधी नीट विचार करणे महत्वाचे असते. मला माझेच उदाहरण द्यावेसे वाटते, माझे शिक्षण चालू असताना कामाला एका बांधकाम करणाऱ्या मोठ्या कंपनीत लागलो. साईटवर काम होते अगदी पार खाडीत त्यावेळी समुद्रात माती टाकून रस्ता करावा लागत असे. कारण समुद्रात टॉवर उभे करण्याचे काम असे. तिथे दारूच्या हातभट्ट्या लागत असत. तिथे ते दारू गाळत असत, काम करता करता त्यांच्याशीही गप्पा होत असत ते अगदी तन्मयतेने मला गुळ कसा सडवयाचा, नवसागर कसा टाकायचा, मग त्या भट्टीखाली टायर जाळून कशी वाफ करून त्याचे पाणी होते आणि त्याला दारू म्हणतात, ती नळीने बाटलीत किवा डब्यात जमत असे, ती आगीवर टाकली की भपकन जळत असे. याबद्दल ते माझाही क्लास घेत असत, कारण मी साहेब होतो. मला पहिल्या धारेची म्हणून एकदा देऊ करत होते पण मी मात्र सावधपणे नाही म्हणालो कारण याच्याशी पंगा कोण घेणार. काही लोक फुकट म्हणून घेत असत परंतु मी मला वेळीच सांभाळले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच परंतु आपण कुठे वळायचे हे मात्र कळले पाहिजे.

माणूस काय मुलगा काय प्रत्येकाकडे विचार करण्याची शक्ती असते ती त्याच्या त्याच्या अनुभवावरून, परिस्थितीनुसार वाढत असते. परंतु काहीजण विचारशक्ती असून वापरत नाहीत आणि आपण कोणीतरी वेगळे आहोत असे समजतात आणि भासवतात आणि तिथेच त्या ८ वी ड च्या पायरीवर उभेच रहातात कायमचे अगदी संपेपर्यंत.

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..