नवीन लेखन...

०५ जानेवारी १९७१: पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना

कालच्या प्रश्नचिन्हाच्या जागी आज आहे एक आकडा : १४६.
मंगळवार, ५ जानेवारी १९७१ रोजी, ज्या सामन्याला मागाहून पहिला अधिकृत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना असा दर्जा दिला गेला तो सामना खेळला गेला होता. इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड. ४०-४० अष्टकांचा सामना.

कांगारू कर्णधार बिल लॉरीने नाणेकौल जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ३९.४ अष्टकांमध्ये इंग्लिश संघाने सर्वबाद १९० धावा काढल्या. तब्बल ४२ चेंडू राखून ऑस्ट्रेलियाने ५ बाद १९१ धावा करीत ही लढत जिंकली. ८२ धावा काढणारा इंग्लिश सलामीवीर जॉन एड्रिच सामनावीर ठरला.

या पहिल्यावहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लढतीनंतर आणखी ९९९ सामने होण्यासाठी २४ वर्षे जावी लागली. त्यानंतरच्या आठ वर्षांतच आणखी १००० एदिसा झाले आणि पुढचे १००० तर केवळ सात वर्षांमध्येच.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा एदिसा नियोजित नव्हता. १९७०-७१ च्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा सामना मेलबर्नमध्ये होणार होता. ५ जानेवारी हा त्या नियोजित कसोटीचा पाचवा दिवस होता. मेलबर्नमधील पावसामुळे पहिल्या दोन दिवसांचा खेळ वाया गेला. रविवारपासून सामना सुरू करून वेळ भरून काढण्याची कल्पना कुठल्याही मंडळाच्या पचनी पडली नाही. रविवारीही तुफान पाऊस झाल्याने कसोटी सामना रद्द करण्यात आला.
ऐंशी हजार पौंडांचे नुकसान मानवण्यासारखे नसल्याने दोन्ही मंडळांनी एक कसोटी जास्त खेळली जावी (सातवी) असे ठरविले पण अशा सहमतीमुळे इंग्लिश खेळाडू संतप्त झाले आणि त्यांनी अधिक मानधनाची मागणी केली. ४० दिवसांमध्ये ४ कसोटी सामने एवढा ‘प्रचंड’ ताण सहन करण्याची त्यांची तयारी नव्हती.

अखेर, लोकांच्या समाधानासाठी, इंग्लंडमध्ये त्याकाळी खेळल्या जात असलेल्या जिलेट कपप्रमाणे एक सामना खेळविण्याचे घाटले. लगेचच अधिकृतता देण्यास दोन्ही मंडळे तयार नसल्याने या सामन्याच्या धावफलकात संघांची नावे इंग्लंड एकादश आणि ऑस्ट्रेलिया एकादश अशी आढळतात.

अखेरच्या क्षणी रॉथमन्स या तंबाखूजन्य उत्पादनांच्या कंपनीने ५,००० पौंडांचे पुरस्कृत्य केले. सामनावीराला ९० पौंड मिळणार होते.

सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांमधील खेळाडू एकत्र आले आणि एका बाकावर उभे राहून डॉन ब्रॅडमन यांनी छोटेसे भाषण केले. शेवटी ते म्हणाले : “इतिहास घडतानाच तो तुम्ही पाहिलेला आहे.”
कसोट्यांचा जादुई करिश्मा असा होता (आणि आजही आहे) की काही वृत्तपत्रांनी या सामन्याचे वार्तांकन करताना “वन-डे टेस्ट” असा शब्दप्रयोग केला होता!

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..