मला भावलेला युरोप – भाग-६

निसर्गसौंदर्याचा यथेच्छ आस्वाद घेत घेत ल्यूझर्न येथे पोहोचल्यानंतर रात्रीच्या जेवणावर मस्तपैकी ताव मारला. युरोपात जेवणाचे फार हाल होतात, त्यातही व्हेज खाणाऱ्यांना तर विचारायलाच नको वगैरे काही गोष्टी मात्र येथील जेवणाने फोल ठरवल्या. तेथील स्थानिक लोक खास इंडियन डिशेश चाखण्यासाठी हॉटेलमध्ये येतात हे ऐकून छान वाटले. आम्हाला भारतीय रेसिपीने तयार केलेले शाकाहारी जेवण सर्वत्र उपलब्ध झाले. गंम्मत अशी होते की, तेथील हॉटेल्समध्ये काम करणारी माणसं खूप कमी असतात. कारण कमी लोकसंख्येचा परिणाम. शिवाय त्यांना एकदम येणाऱ्या गर्दीची सवय नसते. त्यात आपल्या भारतीय लोकांचा उतावळेपणा.तो कुठेही गेलो आपण तरी तात्पुरता सुद्धा दूर करण्याची सवय नसते आपल्याला. त्यामुळे हे हॉटेल्स मालक गोंधळून जातात बिचारी. तरी बरं,ते अशावेळी आपल्याच अख्ख्या कुटुंबाला कामाला लावतात हॉटेल्समध्ये.

दुपारचे, रात्रीचे जेवण चांगले तर मिळालेच पण सकाळचा नाश्ता सुद्धा अगदी चौरस मिळायचा.नाही म्हणायला नाश्त्याचे हाल झाले थोडे,ते इटलीत गेल्यानंतरच.पण युरोपात असेपर्यंत वेगवेगळ्या फ्लेवर्स च्या आइस्क्रीमचा फडशा पाडताना फार मजा आली.थंडीत आइस्क्रीम खाण्याची खरी मजा काय असते हे अनुभवले.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

रात्री मस्तपैकी आराम करून शारीरिक थकव्याला पळवून लावले. हवामान एवढे आल्हाददायक असते की, मानसिक थकवा कधी जाणवलाच नाही मुळी.
दुसरा दिवस उजाडला तो मनाच्या प्रसन्नतेच्या वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची शिंपण करतच. आम्हा दोघांसाठी तर हा अगदीच खास असा दिवस होता.अहो, आमच्या दोघांच्या सहजीवनाच्या बांधलेल्या अनुबंधाचा वाढदिवस होता तो!

युरोपात फिरण्यासाठी सिझन चांगला म्हणून मे महिन्यात,हा एकच हेतू ठेवून केलेली टूर पण यथावकाश तारखा बघितल्यानंतर आमच्यासाठी ‘सोने पे सुहागा’ अशी ठरली. आत्तापर्यंतच्या आयुष्यात लग्नाच्या वाढदिवसाला कधीच ठरवून असे मुद्दाम कुठेही गेलो नव्हतो आम्ही. पण यावेळी योगायोगाने थेट स्वित्झर्लंड मध्येच.आणि तेही माउंट टिटलिस ला!माझा विश्वासच बसत नव्हता,पण खरे होते हे!

अशा या प्रसन्न सकाळी नाश्ता करून आम्ही माउंट टिटलिस च्या दिशेने बर्फाच्छादित पहाडांच्या सानिध्यात काही वेळ राहण्यासाठी निघालो.त्यावेळी मराठीतील एक प्रसिद्ध नाट्यगीत रामदास कामत यांनी गायलेलं, ‘साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची’ हे गाणं वारंवार ओठांवर येत होतं.

पुन्हा एकदा निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठवत साठवत आनंदाच्या रोमांचकांची शॉल अंगावर ओढत आमची बस हिमशिखरां कडे धाव घेत होती.
जाताना रस्त्यात स्वित्झरलँड मधील पारंपारिक घरं मोठ्या विनम्रतेने आमचे स्वागत करत आहेत असे वाटले. अंतराअंतरावर असलेल्या, मोठ्या झोपडीवजा डिझाइन्स असणाऱ्या या घरांना ‘शॅलेट’असे संबोधले जाते. किमान टू बीएचके असणारी ही शॅलेटस् दिसावयास अतिशय गोड लहान मुलांसारखी वाटतात.

एकूणच युरोपात घरांच्या खिडक्या रंगीबेरंगी फुलझाडांनी सजवलेल्या दिसतात. ज्या घरातील खिडक्यां मधील बागेची जास्त निगा घेतलेली दिसून येते, त्या घरातील गृहिणी या संसारामध्ये रमणाऱ्या संसार करण्याची आवड बाळगणाऱ्या असतात.असा येथील लोकांचा समज आहे. हे ऐकताना मला आपली एक म्हण आठवली,’अंगणा वरून त्या घराची शोभा कळते’ म्हणतात ते खरंच आहे.

झोंबणारा हवेतील थंडावा आपण हिमशिखरांच्या अगदी जवळ आलो आहोत,याची वर्दी देत होता. गाडीतूनच दृष्टिक्षेपात आलेली ही शुभ्र बर्फाच्छादित शिखरं आम्ही आपल्या काश्मीर भेटीच्या वेळी जम्मूला जाताना दिसणाऱ्या हिमशिखरांची पुन्हा आठवण करून देत आहेत असे वाटले. आजच्या प्रवासाला सुरुवात करतानाच, आमचा टूर लीडर आणि सहकारी मित्र मैत्रिणी या सर्वांनी चॉकलेटस्, ग्रीटिंग आणि हॅपी कपलचा बॅच देऊन आम्हाला दिलेल्या शुभेच्छा आमच्या आजच्या खास दिवसाची रंगत वाढवत होताच.

अशा आल्हाददायक वातावरणात, स्वच्छ निळ्या पाण्याने भरभरून व झुळझुळ मंजुळ आवाज करत अशी बाजूनेच वाहणारी नदी जणू आम्हाला तिच्या उगमस्थानाकडे जाण्याचा मार्ग दाखवत होती.आम्ही माउंट टिटलिस च्या केबल कारच्या स्टेशनवर पोहोंचलो. काय सुंदर निसर्ग होता तो! चौफेर नजर फिरवताना कोणते दृश्य जास्त छान याचा अजिबात अंदाज येत नव्हता. वातावरणातील नितळपणा मनाला भूल घालत होता व हिम कड्यांवर जाण्यासाठी आतुर बनवत होता.

येथून चालू झाला आमचा केबल कारचा प्रवास. सेंट्रल स्वित्झर्लंडच्या सर्वांत उंच ठिकाणी जाण्यासाठीचा.खूपच मस्त असा अविस्मरणीय.केबल कारमध्ये बसून न्याहाळलेला निसर्ग फंटास्टिकच. असे दृश्य भारतीयांना अगदी दुर्मिळच. या हिमाच्छादित पहाडांच्या रांगा, त्यांच्या कुशीत निर्धास्तपणे विसावलेल्या अरुंद दिसणाऱ्या नागमोडी दऱ्या तर त्यातील ती हिरवीगार काळपट रंगाची उंचच उंच झाडी,आम्ही येत आहोत याचा सांगावाच जणू देण्यासाठी आलाय असे वाटणारा एखादा मध्येच उडणारा पक्षी आहाहा अवर्णनीयच!बर्फाळ पहाडांत मिळेल त्या ठिकाणी सपाट जागा बघून स्किईंग करणारी हौशी आणि अर्थातच शूर असणारी मंडळी दिसत होती.बर्फावरून घरंगळत खाली येताना त्यांना बघून आपल्याच काळजाचा ठोका चुकेल की काय असे वाटत होते.

अपेक्षित स्टेशनवर पोहोचल्या नंतर चौफेर असणाऱ्या बर्फा मध्ये खेळताना शुभ्र सफटिकासारखा चकाकणारा बर्फच बर्फ बघून, अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटत होते.पायी चालताना काय कसरत करावी लागली!आपण खाली पडलो तर कपाळमोक्ष होणार नाही, पण थिजून बसण्याची धास्ती मात्र होती. त्यामुळे खूप विचार करत एक एक पाऊल टाकताना नव्यानेच चालता येणाऱ्या बाळाच्या पावलांची आठवण झाली.

अशा या शुभ्र बर्फावर ऊन्हं चमकण्याचा नजारा तर फारच सुंदर दिसला. चहूबाजूंनी बर्फच बर्फ होता, तरीही ऊन पडल्यानंतर बर्फावर असताना सुध्दा भासणारी उन्हाची तीव्रता जाणवून आश्चर्य वाटले. आईस फ्लायर नावाच्या एका बेंच सारख्या,पडू नये यासाठी समोर रॉड लावलेल्या एका केेबल प्रकारातून बर्फाच्छादित प्रदेशात सैर करून येणे, हा सुद्धा खूपच रोमांचकारी अनुभव होता.

भरपूर फोटो काढून समाधान झाल्या नंतर आम्ही तिसर्‍या माळ्यावर असणाऱ्या एका खास फोटो स्टुडिओ मध्ये गेलो.या बर्फाच्छादित प्रदेशावर या ठिकाणी पाच माळ्यांवर वर्गीकरण करत आवश्यक त्या सोयी पर्यटकांना उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. शिवाय तापमानाचे नियंत्रण करून मोठ्या मोठ्या हॉल्सची रचना अतिउत्कृष्ट.पर्यटकांचा एवढा विचार जर आपल्याही देशात झाला असता तर, निश्चितच पर्यटन हे एक उत्तम प्रकारचे आर्थिक साधन बनले असते आपल्या देशासाठी असे वाटते.

बर्फाळ हवामानाचा मनसोक्त आनंद घेत तिसर्‍या माळ्यावर असणाऱ्या खास अशा स्टुडिओमध्ये ओळीत उभे राहिलो. तेथे केवळ एकाच प्रकारचे फोटो काढले जातात. जे की आपल्या भारतीयांना चक्क इंग्रजी पोशाख चढवून वरकरणी इंग्रजाळलेले बनवतात आणि झटकन फोटो काढून पटकन आपल्याला त्याची कॉपीही देतात. आपल्या दृष्टीने अति महागडा असणारा हा फोटो हौशी माणसं नक्कीच एक आठवण म्हणून काढतात. आणि ही आपलीच छबी आहे का! याचा विचार करत हसू लागतात.

आमची मॅरेज एनिव्हर्सरी होती त्या दिवशी,म्हणून त्या दिवसाची एक खास आठवण आम्हीही फोटोत कैद केली. त्याच माळ्यावर बर्फाची गुहा बघितली. आश्चर्य वाटलं ना? अक्षरशः पहाडात जशी गुहा आपण बघतो,तसेच या बर्फाळ पहाडात कोरलेली ही गुहा चारही बाजूंनी बर्फच बर्फ आणि त्यात आपण. हे चित्र खरोखर आपल्यासाठी आश्चर्यकारकच.

पाचपैकी एका माळ्यावर प्रशस्त असे हॉटेल आहे. एवढ्या उंचावर आणि चोहोबाजूंनी बर्फच बर्फ असणाऱ्या या ठिकाणी गरमागरम इंडियन जेवणाचा आस्वाद घेतला. आहे की नाही गंम्मत!शिवाय चहा, कॉफी,हॉटचॉकलेट या पेयांचा आस्वादही थोडी गर्मी निर्माण करत मजा आणतो. सर्वात कडी म्हणजे, एवढ्या थंड वातावरणात आम्ही तेथे चक्क आईस्क्रीम चाखून पाहिले.लढाई फत्ते केल्याचा फील आला अक्षरशः यावेळी. बर्फाळ पहाडांवर येथेच्छ आनंद लुटल्यानंतर आम्ही माउंट टिटलिस वरतून पुन्हा खाली ल्यूझर्न शहरात उतरलो.

लॉयन मोन्यूमेंट हे एक आकर्षण आमची वाट बघत होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंड मध्ये ६५० सैनिक कामी आले होते, तर काहींना फासावर लटकवले गेले होते. त्यांच्या स्मरणार्थ १० ऑगस्ट १८२१मध्ये खुले झालेले हे लॉयन मॉन्युमेंट होय. येथे एका तलावाच्या काठावरील पहाडाच्या कपारीत पाठीत खंजीर खुपसून मारलेल्या सिंहाचा पुतळा आपल्याला बघावयासही उदासवाणा वाटतो. शिल्प बनवणाऱ्याने सर्व भाव व्यवस्थित कोरलेले दिसतात.

अतिशय प्राचीन, आजही चांगल्या स्थितीत आहे असा वाहतुकीसाठी खुला असणारा, फुलांनी व पेंटिंग्जने सजवलेला वुडन ब्रिज दुरूनच बघितला.
ल्यूझर्नच्या बाजारपेठेतही फेरफटका मारला. पण प्रकर्षाने घ्यावे असे आपल्या ‘बजेट ‘मध्ये बसणारे काहीच नव्हते. आपल्या देशातही हल्ली सगळेच मिळते. शिवाय, बॅगांचे वजन वाढवू द्यावयाचे नाही. या सबबीखाली आम्ही शॉपिंग करणे टाळलेच. चॉकलेट्स मात्र भरपूर खरेदी केले त्याचा मोह नाही सुटू शकला.

युरोपात साधारण नेदरलँड पासून ठिकठिकाणी छोट्या मोठ्या अशा काऊ बेल्स ,(गाईंच्या गळ्यात बांधण्याची घंटी.) विकण्यासाठी ठेवल्याचे दिसले. त्यांचा आवाज ऐकून मला लहानपणी आजोबांकडे गोठ्यात, रानातून चरत परत आलेल्या गाईंच्या वाजणाऱ्या गळ्यातील घंटीच्या आवाजाची आठवण झाली.तो आवाज व हा घंटीचा आवाज अगदी हुबेहूब होता.

ल्यूझर्न मधील त्या दिवशीची संध्याकाळ ही सुध्दा खूप खुश करणारी ठरली. तेथील भव्य अशा स्वच्छ निळ्याशार पाण्याच्या लेक वर,ज्याच्या काठावर बसून आम्ही बदकांना मनसोक्त बागडताना बघितले होते.अशा या लेक वर क्रुझ डिनरचा एक वेगळाच अनुभव मिळाला. संगीत वाद्यांच्या संगतीने वेटर कडून टेबलवर सर्व्ह होणारे, मस्तपैकी एन्जॉय केलेले हे डिनर आजही लक्षात आहे. त्यानंतर हौशी लोकांनी डीजे वर केलेले नृत्य तर झपाटून टाकणारे असेच. अशा पध्दतीने आमच्या उभयतांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा होऊन आमच्यासाठी एक अविस्मरणीय आठवण बनून राहिला हे मात्र खरे.

भाग-६ समाप्त.
क्रमशः

© नंदिनी म. देशपांडे

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....