नवीन लेखन...

३३ वर्षं ‘अशी ही बनवाबनवी’ मराठी चित्रपटाची

१९८८ साली २३ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि अर्थात प्रेक्षकांनी ‘अशी ही बनवाबनवी’ ला जो काही उदंड प्रतिसाद दिलेला तो आपण आजही ‘ह्याची देही ह्याची डोळा’ पाहत आहोत. व्ही. शांताराम प्रॉडक्शन निर्मित ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट तर मराठी सिनेरसिकांच्या मनात कायमचं घर करून बसला आहे. अगदी आजच्या पिढीला देखील या चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत.

एवढ्या वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही. मराठी चित्रसृष्टीत विनोदी चित्रपटांच्या आलेल्या लाटेतील हा एक विशेष महत्त्वाचा चित्रपट असून अजूनही सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय आहे.

“अशी ही बनवाबनवी” या चित्रपटाची कथा व पटकथा होती वसंत सबनिस यांची, दिग्दर्शक होते सचिन पिळगावकर,निर्माते लता नार्वेकर, संगीत होते अरुण पौडवाल यांचे, व कलाकार होते, लक्ष्मीकांत बेर्डे (परशुराम), अशोक सराफ (धनंजय माने), सुशांत रे (शंतनू माने), सचिन पिळगांवकर (सुधीर), सुप्रिया पिळगांवकर (मनीषा), निवेदिता जोशी (सुषमा), प्रिया अरुण (कमळी), अश्विनी भावे (माधुरी), सुधीर जोशी (विश्वास सरपोतदार), नयनतारा (लीलाबाई काळभोर) आणि विजू खोटे (बळी).

चित्रपटाची कथा होती, धनंजय, शंतनू, परश्या आणि सुधीर हे चौघे एकाच गावात राहणारे परममित्र. नोकरीसाठी धनंजय गाव सोडून पुण्याला येतो. त्याचा धाकटा भाऊ शंतनू हा वैद्यकीय शिक्षण घेत असतो. त्याला अभ्यासाची सुटी लागल्यामुळे तो आपल्या भावाकडे पुण्याला येतो. धनंजयचे घरमालक विश्वास सरपोतदार हे टिपीकल पुणेरी व्यक्तिमत्व असते. धनंजयचा भाऊ त्याच्याकडे (म्हणजे आपल्या मालकीच्या खोलीत) राहणार हे त्यांना पटत नाही. जास्त भाडे आकारुन ते शंतनूला तिथे राहण्याची परवानगी देतात. थोड्याच दिवसांनी आपल्या काकाबरोबर भांडण झाल्यामुळे सुधीर आणि आपल्या प्रेमप्रकरणाचा मुलीच्या बापाला पत्ता लागल्यामुळे नोकरी गमावलेला परश्या आपले नशीब आजमावण्यासाठी एकामागे एक पुण्याला येतात. पुण्यात त्यांच्या ओळखीचे दुसरे कोणी नसल्यामुळे त्यांना अर्थातच धनंजयकडे राहावे लागते. खडूस घरमालक घरात राहण्याची परवानगी देणार नाहीत हे जाणून धनंजय त्या दोघांनाही चोरून घरात राहण्याची सोय करतो.

दरम्यान सुधीरला एका संगीत विद्यालयात नोकरी मिळते. त्या आनंदात सुधीर, धनंजय, परश्या दारु पिऊन घरी येतात आणि घरमालकाच्या घरी गोंधळ घालतात. येथे सुधीर आणि परश्या हे दोघे चोरुन घरात राहत असल्याचे बिंग फुटते आणि घरमालक धनंजयला एका आठवड्याच्या आत घर खाली करण्यास सांगतात. मात्र या अविवाहित तरुणांना पुण्यात घर मिळणे अतिशय अवघड जाते. शेवटी त्यांना हवी तशी जागा सापडते पण घराच्या मालकीणबाई लीलाबाई काळभोर यांची अट असते की त्या भाडेकरु म्हणून केवळ लग्न झालेल्या दांपत्याचाच विचार करतील. लीलाबाईंचा पुतण्या बळी त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असतो आणि लीलाबाईंची मोलकरीण तानू हीसुद्धा त्याला सामील असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने लीलाबाईंसाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो.

येथे धनंजय अशी युक्ती सुचवतो की परश्या आणि सुधीर यांनी अनुक्रमे धनंजय आणि शंतनूची बायको व्हायचे ज्यामुळे काळभोरांच्या बंगल्यात राहण्यासाठी आवश्यक असलेली दांपत्याची अट ते पाळू शकतील. दरम्यान चौघांनीही दुसरे घर शोधण्यासाठी चालू असलेला खटाटोप सुरुच ठेवायचा. सुरुवातीला परश्या आणि सुधीर या प्रस्तावाला विरोध करतात पण दुसरा काहीच पर्याय राहिला नसल्याने शेवटी तयार होतात.

अशा प्रकारे धनंजय – पार्वती (परश्या) आणि शंतनू – सुधा (सुधीर) हे जोडीने लीलाबाईंच्या बंगल्यात राहायला जातात. त्यांचे नाटक अपेक्षेप्रमाणे यशस्वी होत असतानाच लीलाबाईंची भाची मनीषा आपली मैत्रीण सुषमा हिच्यासोबत सुटीसाठी पुण्याला येते. सुषमा ही कॉलेजमधली शंतनूची प्रेयसी. मनीषाला पाहून सुधीर तिच्या प्रेमात पडतो. या काळातच धनंजयने त्याच्या बॉस माधुरी आणि परश्याने आपली बालमैत्रीण कमळी यांच्याबरोबर सूत जमवलेले असते. अनेक समज-गैरसमजांनंतर शेवटी धनंजय-मित्रमंडळींचे भांडे फुटतेच. मात्र लीलाबाईंना त्यांनी केलेली मदत आणि बळीपासून लीलाबाईंचा केलेला बचाव पाहून लीलाबाई त्यांना क्षमा करतात आणि इथे चित्रपटाची इथे सुखद द एंड होतो.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..