नवीन लेखन...

जादू की झप्पी

रविवार दुपार …….आपल्या नुकत्याच दहावीत गेलेल्या मुलाची नवीकोरी पुस्तकं सहज चाळत हा सोफ्यावर बसला होता. स्वयंपाकघरातलं सगळं आवरून जरा विरंगुळा म्हणून बायकोने रिमोट हातात घेतला . टीव्हीवर एकामागून एक चॅनलची सुरू असलेली ढकलगाडी एकदम मुन्नाभाई एम बी बी एस वर येऊन थांबली .. त्यात “जादू की झप्पी” चा प्रसंग सूरु होता . यानी त्या शाळेच्या पुस्तकातून नजर वर करत टीव्हीकडे बघितलं आणि गालातल्या गालात थोडा हसला . बायकोनी हेरलं ते .

“ काय रे ? काय झालं हसायला ? बरेच दिवसांनी लागला हा पिक्चर म्हणून ??”

“ हाहाss .. म्हणून नाही .. असंच काहीतरी आठवलं !!” ..

“ काय ते ?? सांग ना मला !!”

“ जाऊ दे गं ! वो एक लंsssबी कहानी है !! “ …

“ चालेल … आवडेल मला ऐकायला …. सांग आता !!!” .. टीव्ही बंद करत बायको कुतुहलाने म्हणाली

“हम्ममम् .. माझ्या शाळेतून सुरू होते ती गोष्ट !! “ ..

“आमच्या शाळेचे मुख्याध्यापक … बहूआयामी आणि करारी व्यक्तिमत्व. गोरा पान रंग , मध्यम उंची , काहीसे सडपातळ आणि निळसर घारे डोळे .. त्या डोळ्यात ना ss एक जरब होती . अतिशय शिस्तप्रिय होते सर . शाळेतून उत्तम दर्जाची पिढी समाजाला देणं हाच एकमेव ध्यास होता त्यांचा . शाळेत एक प्रकारचा दरारा होता. बाकीच्या वर्गांमध्ये चालू असणारा दंगा जर अचानक थांबला आणि नीरव शांतता पसरली की समजायचं सर वर्गाबाहेरच्या पॅसेज मध्ये फेरी मारतायत. पण ही नुसतीच भीती अशी नव्हती , त्यात नक्कीच एक “आदर भावना” सुद्धा होती . शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी ते अखंड प्रयत्नशील असायचे , खूप मेहनत घ्यायचे. शाळेच्या बोर्डाच्या निकालांमध्ये वर्षानुवर्ष सातत्य ठेवत शाळेला अनेक पुरस्कार मिळवून दिले . त्यानाही आदर्श शिक्षक / मुख्याध्यापक असे पुरस्कार प्राप्त झालेत !!” ..

“तसे सगळे धाकात असायचेच पण तरीही कुणी शिस्तभंग किंवा खूपंच गैरवर्तन केलं तर मात्र त्या विद्यार्थ्यांची एका मस्तशा लांबसडक वेताच्या छडीशी गाठभेट घडवून आणायचे. तुझ्या नवऱ्यावर कधी तशी वेळ आली नाही बरंका पण आमच्या कुठल्यातरी इयत्तेच्या वर्गातून अगदी समोर त्यांचं ऑफिस दिसायचं. तेव्हा तिथून असे “थर्ड डिग्री” शिक्षेचे प्रकार बरेचदा बघितलेत. त्यांचं हे धोरण आणि या कडक स्वभावामुळे बरेचदा त्यांना अनेकांच्या टिकेला सामोरंही जावं लागलं. अर्थात हे सगळं करण्यामागे आम्हा विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत हाच प्रांजळ हेतु असायचा. त्यासाठी त्यांना कठोर राहणंही गरजेचंच होतं. शाळेला एक नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे !!”..
“ एकदा गंमत झाली ss .. आमच्या वर्गातले आम्ही ३-४ जण दर मंगळवारी शाळा सुरू होताच शाळेच्या माईकवरून प्रार्थना आणि राष्ट्रगीत म्हणायला जायचो. अशाच एका मंगळवारी आम्ही प्रार्थना म्हणायला म्हणून ऑफिसच्या बाजूच्या छोट्या खोलीत जमलो. आधल्याच दिवशी मी नवरात्राच्या जत्रेतून सहज एक कडं घेतलं होतं .. खरं तर मला कधीच असं काही घालायला आवडत नाही पण त्या दिवशी काय दुर्बुद्धी झाली आणि ते कडं मनगटात अडकवून मी शाळेत आलो. प्रार्थना म्हणायला चालू करणार इतक्यात बाजूला सर उभे … त्यांचं लक्ष बरोब्बर माझ्या कड्याकडे गेलं … आता हा प्रार्थना म्हणणाऱ्यांच्या गटात आहे म्हणजे जरा बरा मुलगा असावा म्हणून कदाचित ते मला ओरडले नाहीत पण फक्त डोळे काहीसे मोठे केले आणि लांबूनच खुणेनी मला ते कडं काढून ; बाजूला ठेवायला सांगितलं …बाप रे sss !! पोटात गोळा येणे , काळजात धस्स होणे , पायाखालची जमीन सरकणे , बोबडी वळणे वगैरे अशा सगळ्या मराठीच्या बाईंनी शिकवलेल्या वाक्प्रचारांचा प्रत्यय आला तेव्हा. हाहा sss !!”..

“काही कारणासाठी किंवा कशावर सही वगैरे घेण्यासाठी त्यांना ऑफिसमध्ये भेटायला जायचं असेल तर आधी कितीतरी वेळ मानसिक तयारी करायला लागायची. त्यांच्यासमोर जास्तीत जास्त “गुणी बाळ” कसं दिसता येईल हा प्रयत्न करायचा. पण उगीच फार इंप्रेशन मारायला गेलो तर आपल्या अंगाशी येईल ही उलटी भीती असयाची ती वेगळीच. पण एक मात्र खरं आहे की एरव्ही सगळ्यांना हे असं कितीही टेन्शन असलं तरी गॅदरिंगच्या वेळेस त्यांच्या हस्ते बक्षीस घेताना किंवा नाटक, नृत्य, गाणं वगैरे सादर करणाऱ्यांना तितकाच आनंदही असायचा. त्यांची दाद हवीहवीशी वाटायची. शिकवायला क्वचितच होते आम्हाला किंवा ऑफ पिरेड असला की यायचे कधीतरी वर्गावर . तेव्हा मात्र एका मुख्याध्यापकापेक्षा त्यांच्यात भिनलेल्या हाडाच्या शिक्षकाचं रूप आम्हाला बघायला मिळायचं. शिकवण्यासाठी असलेली तळमळ दिसयाची त्यांची !!” .

“दहावी झाली , आमची शाळा संपली आणि बहुतेक आमची बॅच बाहेर पडल्यावर एक दोन वर्षातच सरसुद्धा निवृत्त झाले. त्यानंतर कित्येक वर्ष काहीच संपर्क नव्हता आमचा . ४-५ वर्षांपूर्वी शाळेच्या इमारतीच्या पुनर्बांधणीच्या निमित्तानी काही कार्यक्रम केले तेव्हा भेट झाली बऱ्याच वर्षांनी . मग भेटीगाठी वाढल्या .. नव्याने ओळख झाली .. पण अगदी आज सुद्धा त्यांच्यासमोर उभं राहताना खूप आदर आणि दडपण असतंच हांss !!”

“आठवत असेल ना तुला ss .. मी काम करतो त्या सामाजिक संस्थेनी दोनेक वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सरांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं होतं ते ? तेव्हाचा किस्सा आहे हा !! …आमच्या संस्थेचं आणि कामाचं सरांना नेहमीच खूप कौतुक वाटतं ; म्हणून कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्या दिल्या लगेच होकार दिला होता त्यांनी यायला. ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सरांचा उत्साह आज सुद्धा तरुणांना लाजवेल असा आहे … सर आले , अतिथी कक्षात बसून थोड्या गप्पा झाल्या , चहा वगैरे घेतला , व्यासपीठावर गेले, ठरल्याप्रमाणे कार्यक्रम पार पडला आणि सर जायला निघाले. मी त्यांना सोडायला म्हणून प्रेक्षागृहाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत त्यांच्यासोबत गेलो .. आणि निघता निघता काय वाटलं कुणास ठाऊक ss ; पण मी एकदम त्यांना वाकून नमस्कार केला . सरांनी मला हाताला धरून वर केलं . त्यांचे दोन्ही हात अगदी ताठ करून माझ्या खांद्यावर घट्ट धरले . त्यांच्या घाऱ्या आणि आपुलकी दाटलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे काही क्षण बघितलं आणि गहिवरल्या आवाजात फक्त ४ शब्द उच्चारले .. “ खूप चांगलंss काम करताय !!” .. इतकंच बोलून त्या पितृतुल्य व्यक्तिमत्वाने मला अगदी प्रेमानी जवळ घेत घट्ट मिठी मारली आणि पाठीवर तीन-चारदा अलगद हात फिरवला … एकेकाळी ज्या सरांच्या जवळपास जायला सुद्धा आम्ही टरकायचो त्याच सरांनी अशी आपुलकीनी मारलेली “झप्पी” ..आणि पाठीवर कौतुकाची थाप .. बाप रे !! . केवळ आणि केवळ अवर्णनीय असा क्षण होता माझ्या आयुष्यातला तो!!!!” ..

“जाहली मज अशी अनुभूती । न भूतो न भविष्यति ।।”

आई शप्पथ !! हे बघ .. सांगता सांगता आत्ता सुद्धा किती दाटून आलं मला आणि काटा आला बघ अंगावर !!… मगाशी सिनेमातला प्रसंग बघून सारं काही तरळलं अगदी … हे “जादू की झप्पी” वगैरे सगळं सिनेमात बघायला ठीक आहे पण अशा निकोप “झप्पीतली खरीखुरी जादू” काय असते हे तेव्हा समजलं .. प्रत्यक्षात अनुभवली मी “जादू की झप्पी”…

— क्षितिज दाते.

ठाणे .

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 56 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..