नवीन लेखन...

जानेवारी ३० : कर्टली अ‍ॅम्ब्रोजचे एका धावेत सात बळी !

30 January 1993 - Devastating Spell of Curtley Ambrose - 7 for 1 Run !

३० जानेवारी १९९३ रोजी फ्रँक-वॉरेल चषकाचा पाचवा आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामना पर्थमधील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन ग्राऊन्डवर सुरू झाला. या सामन्यापूर्वी १-१ अशी बरोबरी मालिकेत झालेली असल्याने या सामन्याला अंतिम लढतीचे स्वरूप आलेले होते.

ऑस्ट्रेलियाई कप्तान अ‍ॅलन बॉर्डरने नाणेकौल जिंकून फलंदाजी स्वीकारली. जस्टिन लँगर आणि डेविड बून ही ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी होती तर गोलंदाजीत कर्टली अ‍ॅम्ब्रोज आणि इअन बिशप ही सलामीची जोडी होती. ऑस्ट्रेलियाच्या २७ धावा झालेल्या असताना लँगर बिशपच्या एका चेंडूवर यष्ट्यांमागे झेलबाद झाला.

दुसरा बळीही बिशपलाच मिळाला. स्टीव वॉ यष्टीरक्षक ज्युनिअर मरेकडे झेल देऊन बाद झाला. मार्क वॉच्या रुपाने अ‍ॅम्ब्रोजला पहिला बळी मिळाला. कांगारू ३ बाद ८५. मग ९० धावांवर बून आणि बॉर्डर दोघे परतले – हे दोन्ही बळी अ‍ॅम्ब्रोजनेच मिळवले. बॉर्डर भोपळा फोडू शकला नव्हता. तो पहिल्याच चेडूवर बाद झाला पण अ‍ॅम्ब्रोजला त्रिक्रम मात्र साधला नाही.

नंतर इअन हिली आणि मर्व ह्युजेस (मिशीवाला) यांनाही कर्टली अ‍ॅम्ब्रोजने खाते उघडू दिले नाही. ६ बाद १०० आणि ७ बाद १०२.आता ऑस्ट्रेलियाच्या संघाची धावसंख्या ही एखाद्या बुद्धिमापन कसोटीतील संख्यामालिकेसारखी झाली होती :२७, ५८, ८५, ९०, ९०, १००, १०२, पुढे काय?१०४, पुन्हा १०४ आणि अखेर ११९.

डॅमिएन मार्टिन आणि जो एन्जेल यांचेही बळी अ‍ॅम्ब्रोजने मिळविले. शेवटी बाद झालेला फलंदाज शेन वॉर्न धावबाद झाला होता. या डावात दोन बळी बिशपला मिळाले होते आणि उरलेले सात बळी अ‍ॅम्ब्रोजला मिळाले होते.

अ‍ॅलन बॉर्डर ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू पहिला मानून जो एन्जेल (पदार्पणवीर) बाद झाला तिथपर्यंतचे कर्टली अ‍ॅम्बोजने टाकलेले चेंडू मोजल्यास ते अवघे ३२ भरतात आणि या बत्तीस चेंडूंवर अ‍ॅम्ब्रोजने केवळ एक धाव दिलेली होती !!कर्टली अ‍ॅम्ब्रोजचे अंतिम पृथक्करण होते : १८ षटके-९ निर्धाव-२५ धावा-७ बळी.

११९ धावांवर कांगारुंचा डाव आटोपला. वेस्ट इंडीजचे पहिल्या डावात ३२२ धावा केल्या आणि त्यांनी २४ धावा उगीचच जास्त काढल्या. इअन बिशपने दुसर्‍या डावात आपला तोफखाना परजला आणि सहा कांगारुंची शिकार अचूक साधली. दोन बळी मिळण्याची पाळी आता अ‍ॅम्ब्रोजची होती.

कोर्टनी वॉल्श आणि पदार्पणवीर अ‍ॅन्डर्सन कमिन्स यांना पहिल्या डावात बळी मिळाला नव्हता. त्यांनाही आता एकेक बळी मिळाला. वेस्ट इंडीजने एकाच डावात काढलेल्या धावा ऑस्ट्रेलियनांनी दोन्ही डावांमध्ये मिळून काढलेल्या धावांपेक्षा पंचवीस जास्त ठरल्या. तिसर्‍या दिवशी स्थानिक वेळेनुसार दुपारचा एक वाजण्याच्या आतच वेस्ट इंडीजने मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. कर्टली अ‍ॅम्ब्रोज सामना आणि मालिकावीर ठरला. पाच सामन्यांच्या या मालिकेत त्याने तब्बल ३३ बळी मिळविले होते. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या बिशपने २३ बळी मिळविलेले होते.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..