नवीन लेखन...

मेरा भारत..?

नुकताच संपूर्ण भारत वर्षात 54 वा प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा झाला, अगदी नेहमीप्रमाणे! दिल्लीत लाल किल्ला सजला, पंतप्रधान राष्ट्रपतींनी राष्ट्राला शुभेच्छा संदेश दिले, राजपथावर सैन्याचे शिस्तबध्द दिमाखदार संचलन झाले, विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकतेचे प्रदर्शन यथास्थित पार पडले. 15 ऑगस्टपासून धुळखात पडलेल्या देशभक्तीपर गीतांच्या ध्वनिफिती अगदी रामप्रहरापासून दिवसभर देशभक्तीचा माहौल निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होत्या. लहान-लहान शाळकरी मुलांच्या हातातील कागदी तिरंगा या चिमुकल्यांच्या हातावरील रेषांमध्ये आपले वैभवी स्वप्न शोधत होता. तोरण असो वा मरण, सारख्याच व्यावसायिक नि:स्पृहतेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या कॅमेऱ्यांनी ही सगळी आल्हाददायक दृश्यं व्यवस्थित टिपली, एका बलशाली (?) राष्ट्राचा तितकाच दिमाखदार प्रजासत्ताक दिन एक आभास बनून या छायाचित्रातून साकारला. सगळं कसं अगदी आखीव-रेखीव होते. जितका यंत्रवत, शिस्तबध्द दिल्लीतला प्रजासत्ताक दिन होता तितकाच यांत्रिकपणा राज्य व जिल्ह्यांच्या मुख्यालयीही दिसून आला. दिन कोणताही असो तो ‘साजरा’ कसा करायचा हे जगाने आमच्याकडून शिकावे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन असेल तर सकाळी दोन तास आमच्या डोक्यात,
‘अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं,
सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नहीं’
ही भावना ठासून भरली असते. सूर्य जसा-जसा वर येऊ लागतो तशी-तशी ही भावना वितळत जाते आणि सकाळी मोठ्या दिमाखाने सर्वांची सलामी स्वीकारणारा तिरंगा मग दिवसभर तडफडत फडफडत राहतो. देशभक्तांनी खच्चून भरलेल्या पटांगणाच्या साक्षीने सकाळी आरोहणाचा अनुपम सोहळा अनुभवणाऱ्या तिरंग्याला, सायंकाळी रिकाम्या आणि भकास मैदानाच्या पृष्ठभूमीवर कोणीतरी खाली उतरवून ‘गुंडाळून’ टाकीत असते. गांध जयंती किंवा पुण्यतिथी असेल तर, ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’ च्या आलापीतून उगवणारी सकाळ, दुपारनंतर उत्तररात्रीपर्यंत ‘ला पिला दे साकीयाँ पैमाना पैमाने के बाद’ म्हणत कुठल्यातरी मदिरालयात हरवून गेलेली असते. एकंदरीत दिन कोणताही असो, तो साजरा एकाचप्रकारे होतो. किमान या बाबतीत तरी आम्ही विविधतेत एकता निश्चितच साधली आहे.
वास्तविक स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन आम्हाला आमच्या ऐतिहासिक चुकांची जाणीव करून देणारे, भविष्यात त्या चुका टाळण्याची प्रेरणा देणारे, ज्या कारणाने पारतंत्र्य भोगावे लागले आणि लाखो शहिदांच्या बलिदानाची किंमत मोजून स्वातंत्र्य मिळवावे लागले, त्या कारणांचे पुनरावलोकन करण्यास बाध्य करणारी निमित्ते आहेत. हर्षोल्हासात ते साजरे करतानाच हा हर्षोल्हास आपण किती किंमत देऊन विकत घेतला, याचे विस्मरण होता कामा नये. मागच्या पिढीने ती किंमत मोजली म्हणून पुढच्या पिढीने निर्धास्त राहून चालणार नाही आणि ही जाणीव किमान स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनी तीप व्हावी ही अपेक्षा असते. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. आम्ही स्वतंत्र आहोत आणि हे स्वातंत्र्य आता कधीच हिरावून घेतले जाऊ शकत नाही, या निश्चिंततेतूनच एक बेफिकर वृत्ती जन्माला येत आहे. या बेसावधपणाची भारी किंमत आम्हाला चुकवावी लागू शकते. इतिहासापासून आम्ही काही बोध घेऊ शकलो नाही तर इतिहास आणि इतिहासासोबतच भविष्यकाळसुध्दा आम्हाला माफ करणार नाही. त्यासाठीच प्रत्येक पाऊल समोर टाकतांना मागे वळून पाहणे तितकेच आवश्यक आहे.
‘मेरा भारत महान’ हे बोलायला ठीक वाटते, ऐकताना उगीच छाती फुगल्यासारखी भासते, परंतु प्रजासत्ताकाच्या 53 वर्षानंतर ‘मेरा भारत महान’ ही तर फारच दूरची गोष्ट राहिली; तो भारत ‘मेरा’ तरी आहे की नाही, ही शंका येण्याइतपत परिस्थिती ढासळली आहे. शाब्दिक बुडबुड्यांनी कोणाला महान करता येत नाही आणि करता आले तरी त्या महानतेचे आयुष्य त्या बुडबुड्याइतकेच असते. प्रसार माध्यमातून रंगविले जाणारे प्रगतिशील भारताचे चित्र फसवे आहे, अर्थशास्त्रातील आकड्यांसारखे ते निर्जीव आहे. जी काही थोडी फार दिसते ती प्रगती नाही तर सूज आहे. आपला देश प्रजासत्ताक बनून 53 वर्षे झालीत, परंतु या 53 वर्षात आपण 53 पावलंसुध्दा पुढे आलो नाही. 53 वर्षापूर्वी होत्या त्याच समस्या आजही कायम आहेत; नव्हे त्यात वाढ झाली आहे. त्याकाळी जो वर्ग शोषित होता तो वर्ग आजही पिळल्या जात आहे आणि काही नवीन शोषितांची त्यात भर पडली आहे असे खेदाने म्हणावे लागते की, केवळ लुटारु बदलले. शस्त्रे तीच आहेत, लुटल्या जाणाऱ्यांचे नशीबही तेच आहे आणि हे असं का, असा प्रश्न कोणाला पडत नाही, ही त्यापेक्षा अधिक खेदाची बाब आहे. हे असे का होत आहे, या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर उत्तरासाठी थेट 1947 च्याही पलीकडे उडी मारावी लागेल. आपल्या देशावर अनेक परकियांनी राज्य केले, अनेकांनी आपल्याला लुटले. 12 व्या शतकानंतर आपल्या देशाची अवस्था खास बळी देण्यासाठी पोसल्या गेलेल्या बोकडासारखी झाली होती. सुरुवातीला यवनांच्या लोधी, खिल्जी, मोगल आदी विविध टोळ्यांनी या देशाची यथेच्छ लूट केली आणि नंतर आले इंठाज. आधीच्या लुटारुत आणि या लुटारुत बराच फरक होता. ओरबाडणे, हिसकावणे, बळजोरी करणे ही आधीच्या लुटारुंची व्ययच्छेदक लक्षणे होती. इंठाज मात्र मुळातच चाणाक्ष असल्यामुळे त्यांनी ही पध्दत अवलंबिली नाही. तीप प्रतिकाराचा धोका या पध्दतीत होता आणि मूठभर इंठाजांना तो कधीच परवडला नसता. त्यामुळे त्यांनी लूटमारीचे प्रगत तंत्र शोधून काढले. अलीकडील भाषेत त्याला शोषण म्हणतात. तलवारीचा एकच घाव घालून शिर धडावेगळे करताना मिळणारे समाधान अल्पजीवी ठरते, त्यापेक्षा जळवासारखे रक्त शोषून कणाकणाने एखाद्याचा बळी घेतांना मिळणारे समाधान दीर्घकाळापर्यंत उपभोगता येते. शिवाय अशाप्रकारे रक्त शोषल्या जात असताना बरेचदा त्या बळीला आपण आस्ते-आस्ते मृत्यूकडे चाललो आहोत, याची पुसटशी कल्पनासुध्दा येत नाही आणि म्हणून तो प्रतिकारही करीत नाही.
मूठभर इंठाजांनी त्याचसाठी ही सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी शोषणाची पध्दत वापरली. इंठाजांची ही पध्दत इतकी प्रभावी ठरली की, पाच-सातशे वर्षाच्या मोगल वावटळीतही टिकून राहिलेला हा देश इंठाजांनी केवळ शंभर वर्षात झोपवला. या इंठाज जळवा इथले रक्त शोषित होत्या आणि तिकडे साता समुद्रापलीकडे लंडन, मॅन्चेस्टरची श्रीमंती फुगत होती. शेकडो जहाजं भरुन इंठाजांनी इथली संपत्ती आपल्या देशात नेली आणि आज या लुटीच्या संपत्तीवरच इंग्लंड स्वत:ला पुढारलेला देश म्हणवून घेत आहे. दुसऱ्या महायुध्दात बसलेल्या जबर तडाख्याने इंठाजी जळवांना नाइलाजाने हा देश सोडावा लागला, परंतु जाता-जाता त्यांनी अशा काही पाचरी मारुन ठेवल्या की, हा देश पुन्हा ताठ कण्याने उभाच राहू नये. आपली प्रत्यक्ष राजवट आवरती घेणाऱ्या इंठाजांनी जणू काही अप्रत्यक्ष राजवटच या देशावर लादली. विविधतेत एकता हे आपल्या प्रजासत्ताक भारताचे वैशिष्ट्य असल्याचे अभिमानाने सांगितले जाते. परंतु वस्तुस्थिती काय आहे? बारीक वीणीची, सुंदर आणि नक्षीदार असलेल्या या जाळीला आता मोठी भगदाडं पडली आहेत. ही जाळी केव्हांही तुटू शकते. ती तशी तुटावी, यासाठीच इंठाजांनी जाता-जाता धर्म, जातीचा स्वाभिमान फुंकर घालून चेतविला आणि आम्ही तो विझवायच्या ऐवजी तो अधिक कसा फुलेल, याचीच काळजी घेतली. इकडे त्यामुळे देश पेटायला लागला तरी आम्हाला त्याचे काही सोयरसुतक नाही. आमच्या राज्यकर्त्यांनी इंठाजांचे मांडलिकत्व पत्करल्याचेच यावरुन स्पष्ट होते. आपली आर्थिक धोरणं, आपले राजकीय निर्णय एवढेच नव्हे तर अगदी सामाजिक पातळीवरसुध्दा इंठाजांच्या प्रभावाची आणि पर्यायाने आपल्या गुलामीची छाप ठळकपणे दिसून येते. या आपल्या आंग्लाळलेल्या मानसिकतेने आपली एकत्र कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त केली. समाजातील ज्ञानवृध्द, वयोवृध्दांविषयीचा आदर संपविला, समाजातील एक मोठा वर्ग व्यापार, उदीम आणि उद्यमशीलता गमावून बसला. एकंदरित गोऱ्या इंठाजांची काळी छाया या देशाला व्यापून उरली आहे. ही काळी छाया दूर होत नाही तोपर्यंत तरी ‘मेरा भारत महान,’ म्हणण्याचे धाडस होत नाही. त्याचमुळे आपला देश प्रजासत्ताक आहे याचा अभिमान बाळगत असताना तो अभिमान सार्थ ठरविण्याची जबाबदारीदेखील आपण ओळखायला पाहिजे. हा देश माझा आहे, एवढे म्हणणेच पुरेसे नाही. मी या देशाचा आहे, हेसुध्दा लक्षात ठेवावे लागेल आणि केवळ याच देशातील मूल्यांवर, याच देशातील परंपरांवर माझी श्रध्दा आहे, असे ठासून सांगितले पाहिजे. हा अभिमान केवळ वर्षातूनच नव्हे तर कृतीतूनदेखील प्रगट व्हावा, अन्यथा प्रजासत्ताकदिनाचे चिरायुत्व धोक्यात येऊ शकते.

— प्रकाश पोहरे

प्रकाशन दिनांक :- 02/02/2003

Last summer, I had https://justdomyhomework.com my homework the fortune to be part of the intern class of 2014

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..