नवीन लेखन...

धोक्याची घंटा




प्रकाशन दिनांक :- 02/03/2003

एखादे राष्ट्र उभे राहते, टिकते, विकसित होते ते कशामुळे? त्या राष्ट्रातल्या नैसर्गिक साधन संपत्तीमुळे, वाहणाऱ्या नद्यांमुळे, जमिनीच्या पोटात सापडणाऱ्या खनिजामुळे, दूरवर पसरलेल्या डोंगररांगामुळे की, विपुल पीक देणाऱ्या शेतीमुळे? नाही! राष्ट्र यामुळे उभे राहू शकत नाही. भलेही एकवेळ उभे झाल्यावर धावण्याची क्षमता वरील बाबींमुळे त्या राष्ट्रात निर्माण होऊ शकेल, परंतु राष्ट्र उभे करायचे असेल, उपलब्ध क्षमतांचा वापर करून त्या राष्ट्राला विकास साधायचा असेल तर एकमात्र महत्त्वाचा घटक ठरतो तो राष्ट्राचा सामान्य नागरिक! राष्ट्र माणसांमुळे, त्या माणसांच्या कर्तबगारीमुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या योगदानामुळेच उभे राहू शकते.
इस्त्रायल, जपानसारख्या राष्ट्रांजवळ काय आहे? नैसर्गिक साधन संपत्तीची वानवा, अत्यंत प्रतिकूल पर्यावरण आणि त्यात भरीस भर म्हणून सातत्याने कोसळणारी संकटं! प्रखर राष्ट्रप्रेमाने भारावलेले नागरिक या एकमेव पुंजीच्या आधारे ही राष्ट्रे आज ताठ मानेने उभी आहेत. त्या पृष्ठभूमीवर आपल्या देशाकडे पाहिल्यास कोणती परिस्थिती दिसते? निसर्गाने आपले माप अगदी भरभरून या देशाच्या पदरात टाकले आहे. आपल्यापेक्षा विकसित असलेल्या इतर काही देशांच्या तुलनेत विचार केला तर नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत आपण अतिशय समृध्द आहोत. मनुष्यबळाचा प्रश्नच नाही. 200 कोटी हातांचा आधार (अर्थात त्यातले प्रत्यक्ष आधार देणारे हात किती, हा भाग वेगळा) या देशाला लाभला आहे, पण तरीही आपण मागासलेलेच. असे का? उत्तर स्पष्ट आहे. ज्या हातांनी या देशाला आधार द्यावा, आकार द्यावा ते हातच आज अधू झालेले आहेत. आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याची क्षमताच हे हात घालवून बसले आहेत. गर्दी खूप दिसते आहे, परंतु त्यात बाजारबुणग्यांचीच संख्या अ
िक आहे. मागच्या पिढीत अवस्था बरी होती. या पिढीतही तशी ती चांगली आहे, परंतु पुढच्या पिढीच्या हातात जेव्हा या राष्ट्राचे भाग्य सोपविले

जाईल, तेव्हा मोठ्या कष्टाने तग

धरून राहिलेले हे राष्ट्र कोसळायला वेळ लागणार नाही. ही केवळ भीती नाही तर वर्तमान परिस्थितीवरून घेतलेला हा भविष्याचा वेध आहे. पुढची पिढी शारीरिक, मानसिक, भावनिक सर्वच दृष्टीने खचलेली गलितगात्र झालेली असेल. अपंग आणि अधू वारसदारांच्या हाती हा वैभवशाली देश सोपविण्याची तयारी आम्ही चालविली आहे आणि अशा पिढीच्या हाती हे राष्ट्र कसे सुरक्षित राहू शकेल? त्यासाठी एकमेकांना दोष देण्यात अर्थ नाही. कमी-अधिक प्रमाणात सगळेच दोषी आहेत. मुलांचे आई-बाप दोषी आहेत, समाज दोषी आहे आणि शासनकर्ते तर अत्याधिक प्रमाणात दोषी आहेत.
मुलांचा भावनिक विकास जपण्याची, त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आई-वडिलांची असते; परंतु बहुतेकांनी ही जबाबदारी दूरचित्रवाणी, चित्रपट, चटपटीत मासिके यांच्यावर सोपविली आहे. परिणामस्वरूप आजची किशोर किंवा युवा पिढी अत्यंत हिंसक, उथळ विचारांची आणि विकृतीकडे झुकलेली आढळते. समाजही त्यांच्यासमोर चांगले आदर्श ठेवण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे प्रेम, बंधुभाव, राष्ट्राप्रती निष्ठा आदी मूल्यांना या पिढीत कुठलेच स्थान नाही. केवळ मौजमस्ती आणि ती करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी हीच आजच्या युवापिढीची मानसिकता बनली आहे. हे अध:पतन केवळ मानसिक किंवा भावनिक स्तरावरच थांबले आहे अशातला भाग नाही. शारीरिकदृष्ट्याही ही पिढी पार नेस्तनाबूत झाल्याचे दिसत आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून जीवनाच्या पर्यायाने राष्ट्राच्या प्रगतीसाठी लागणारे कौशल्य ही पिढी हरवून बसली आहे. प्रश्न विचारण्याची क्षमता नसलेली, उत्तर शोधण्याची इच्छा नसलेली, चिंतन-मनन वगैरे गोष्टींना फ
टा दिलेली अशी एक केवळ सांगकाम्याची फौज उभी होत आहे. मायबाप सरकारचीदेखील यात मोठी कृपा आहे. ‘शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ म्हणणाऱ्या तुकोबारायाला वेशीवर टांगत सरकारने चक्क विषाक्त बिजे शेतकऱ्यांना पुरविली आणि वर त्याला संकरित बियाणे असे गोड नावसुध्दा दिले. सोबतीला रासायनिक खते, कीटकनाशके आहेतच. हे जहर बळीराज्य शेतात पेरतो आहे, कापतो आहे आणि त्यावरच पोसले जात आहेत या महान राष्ट्राचे उद्याचे आधारस्तंभ! आपल्या वितभर छातीचा कोट करून हे आधारस्तंभ राष्ट्राचे रक्षण करणार आहेत म्हणे!!
आमच्या माता, भगिनींची अवस्था काही वेगळी नाही. सिझेरियनशिवाय आजकाल मूल जन्माला येतच नाही. त्यांची नैसर्गिक प्रसव क्षमताच नष्ट होऊ पाहत आहे आणि जन्माला आलेले मुलही निरोगी, सुदृढ नसते. काचेच्या पेटीतूनच त्याच्या जीवनाचा प्रवास सुरू होतो. एकप्रकारे निसर्गाने जगण्यासाठी नालायक ठरविलेल्या संततीला आम्ही कृत्रीम उपचारांनी जगवून मोठे करीत आहोत. हे असेच सुरू राहिले तर काही पिढ्यांनंतर या देशासमोरचा लोकसंख्या वाढीचा प्रश्न कायमचा निकालात निघेल. बरं, जन्मल्यापासून जगण्यासाठी झगडणारी ही संतती पुढे कोणत्या मार्गाने जाते? आधीच शारीरिकदृष्ट्या कमजोर असलेली ही मुले अगदी किशोर वयातच गुटखा, दारू, सिगारेट, तंबाखूच्या व्यसनात गुरफटतात. म्हणजे आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला आणि ते कमी म्हणून की काय त्याला विंचूही डसला, अशी एकंदर परिस्थिती. ज्या खांद्यावर राष्ट्राचा भार पेलण्याची जबाबदारी उद्या येणार आहे ते खांदे आजच कोणत्याही भाराशिवाय मोडून पडत आहेत. वरवर पाहता परिस्थितीचे हे गांभीर्य कोणाच्या लक्षात येणार नाही, परंतु थोडे सखोल निरीक्षण केले तर आपल्या सहज लक्षात येईल की, आजच्या युवापिढीतील किमान 75 टक्के मुलं विचाराने, आचाराने व बुध्दीने भरकटलेले आणि शरीराने पार
खंगलेले आहेत. या पिढीतून जेव्हा पुढची पिढी निर्माण होते, तेंव्हा तर ती जिवंत माणसांची मृत पिढीच असेल. काळाचे एक चक्र त्यावेळी पूर्ण होईल. काळाच्या या चक्रात आपण सध्या स्वातंत्र्याच्या टप्प्यावर आहोत, परंतु हा केवळ एक मधला पडाव ठरणार आहे, गुलामीकडून गुलामीकडच्या प्रवासातला. कारण राष्ट्र उभे राहत असते ते त्या राष्ट्रातील जनतेच्या कणखर, दणकट मनगटाच्या जोरावर. आपली मनगटं तर आजच पिचल्या गेली

आहेत. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढीत कदाचित मनगटच राहणार

नाहीत, पाठीला कणा राहणार नाही आणि अशा रांगणाऱ्या लोकांच्या नशिबात गुलामीखेरीज दुसरे काय असेल?
या देशाला पुन्हा गुलाम करू इच्छिणाऱ्या शक्ती आपला प्रवास त्या दिशेने व्यवस्थित होतोय की नाही, याची पुरेपूर काळजी घेतच आहेत. आज किमान आपल्याला त्याची जाणीव आहे. आपल्या मागच्या पिढीने तर गुलामीविरुध्द तीप संघर्ष करून स्वातंत्र्य प्राप्त केले. परंतु पुढच्या किंवा त्या पुढच्या पिढीत ही गुलामी मांजरीच्या पावलाने प्रवेश करून अख्ख्या देशाच्या नरडीचा घास घेईल तरी कोणाला काही कळणार नाही. ही जी काही आहे ती गुलामी आहे, ही जाणीवच हरवलेली असेल आणि हरविलेले असतील गुलामीची जाणीव करून देणारे विचार आणि विचारवंत! उद्याच्या या संभाव्य कायमस्वरूपी गुलामीपासून देशाला वाचवायचे असेल तर आज, आत्ता, या क्षणी सावध होणे गरजेचे आहे. एक सशक्त, सुदृढ आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली युवापिढी निर्माण करणे हाच त्यावर एकमात्र उपाय आहे. थोडा कष्टाचा आहे, त्यागाचा आहे, परंतु त्याला पर्याय नाही. धोक्याची घंटा वाजत आहे. तिच्याकडे अधिक काळ दुलर्क्ष केलं तर आपल्याला माफ करायलासुध्दा पुढच्या पिढ्या राहणार नाहीत.

— प्रकाश पोहरे

Make your own waffles on a sunday or essay writing services reviews blog another day when you have a lot of time

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..