नवीन लेखन...

स्वरभास्कराचा अस्त

 
मुळातच ख्याल गायकी हा अवघड गायन प्रकार. या गायकीने अडीच-तीन तास श्रोत्यांना खिळवून ठेवणे आणखी अवघड. पंडित भीमसेन जोशी यांनी 50 वर्षांहून अधिक काळ श्रोत्यांना ख्यालगायकीने खिळवून ठेवलं. हिमालयाच्या उंचीचं गान कर्तृत्व असलेल्या पंडितजींना इतर अनेक नामचीन पुरस्कारांबरोबरच ‘भारतरत्न’ ही लाभले. संगीताच्या नभांगणातून अस्तंगत झालेल्या या महान कलाकाराला वाहिलेली श्रद्धांजली.हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात हिमालयाची उंची गाठणारे पंडित भीमसेन जोशी उर्फ अण्णा यांचे निधन झाल्यामुळे अवघे संगीतविश्व एका अखंड स्वर यज्ञाला मुकले आहे. आजघडीला त्यांच्या गायकीची अनेक वैशिष्ट्ये समोर येतात. त्यांच्या अनेक आठवणी डोळ्याच्या कडा ओल्या करतात. पंडीतजींना ‘भारतरत्न’ सारख्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानले गेले होते. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचं कळल्यावर मला कमालीचा आनंद झाला होता. एका ख्याल गायकाला हा पुरस्कार मिळाल्याने ख्याल गायकीचा यथोचित गौरव झाला आहे. मुळात ख्याल गायन हा ऐकायला सोपा वाटत असला तरी तो गाण्यासाठी अत्यंत अवघड असा गायन प्रकार. त्यामुळेच ख्याल गायकी तशी दुर्मिळ. त्यातही अडीच-तीन तास ख्याल गायकीने श्रोत्यांना एका जागी खिळवून ठेवणे ही प्रक्रिया खूप अवघड असते. त्यादृष्टीने पंडित भीमसेन जोशी यांनी ख्याल गायकीमध्ये मिळवलेलं सर्वोच्च स्थान लक्षात घ्यायला हवं.स्वतंत्र आणि अभिजात गानशैलीमुळे पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाचा सूर्य वेगळ्याच तेजाने लखलखत होता. पंडित भीमसेन जोशी यांच्या गाण्याची झळाळी जेवढी लखलखीत तेवढीच या तेजोमय सूर्याची झळाळी उत्कट म्हणावी लागेल. कोणत्याही खेळामध्ये एखादा अष्टपैलू कप्तान जशी कामगिरी करतो तशी कामगिरी पंडितजींनी संगीतक्षेत्रात केली. त्यांच्या आवाजाने सार्‍या जगाला भारलं असं म्ह
णं वरवरचं ठरेल. निर्मिती क्षमता प्रचंड असेल तरच या स्थानापर्यंत पोहोचता येऊ शकतं हे लक्षात घ्यायला हवं. पंडितजींनी अथक परिश्रमाने संगीतक्षेत्रातील हे तेजोमय शिखर गाठलं. आज तरी या शिखराला स्पर्श करू शकेल

असा गायक दिसत नाही. मुळात ख्याल गायकी ही फार अवघड गोष्ट. त्यातही इतकी वर्षे रसिकांना ख्याल गायकीने बांधून ठेवणं ही आणखी दुर्मिळ, अप्राप्य गोष्ट. त्यामुळेच पंडितजींचं थोरपण वेगळ्या दृष्टीकोनातून लक्षात येतं. ख्याल गायकीमध्ये निर्मिती प्रक्रियेला फार महत्त्व असतं. एखाद्या गायकाला सुरुवातीची पाच-दहा वर्षं अशी निर्मिती करणं शक्य होतंदेखील. पण, सातत्याने अनेक वर्षे अशी निर्मिती करत राहणं हे सोपं काम नव्हे. त्यामुळेच पंडितजींची कामगिरी दुर्मिळ ठरते. 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी ख्याल गायकीने श्रोत्यांना खिळवून ठेवलं. त्यामुळेच ते आमच्या पिढीचा थोर आदर्श ठरले. त्यांच्या ठायी अतिशय सिद्ध अशी निर्मितीक्षमता होती. त्यांना मिळालेल्या अनेकविध सन्मानांमुळे संगीतक्षेत्राचा खर्‍या अर्थाने सन्मान झाला.पंडितजींच्या सहवासाची संधी लाभली हे मी भाग्यच समजतो. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी माझ्या हृदयात बंदिस्त आहेत. त्यांचा आशीर्वाद लाभला ही मोठी भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. 1981 मध्ये वयाच्या 11 व्या वर्षी मी पहिल्यांदा कुंदगोळ येथे भरलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात प्रथम गायलो. पंडितजींच्या गुरूभगिनी गंगुबाई हनगल यांनी मला त्या महोत्सवासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी अर्थातच माझा आवाज सुटलेला नव्हता. मी त्या ठिकाणी काळी पाचमध्ये गायलो. गाणं संपल्यानंतर ग्रीन रूममध्ये पंडितजींनी पाठिवर कौतुकाची थाप मारली आणि मला आशीर्वाद दिले. त्यावेळी पंडितजींसोबत काढलेलं छायाचित्र आजही माझ्या संग्रही आहे. त्याच वर्षी एका खासगी कार्यक्रमात
ी पंडितजींबरोबर गायलो. पंडितजींनी माझं गाणं ऐकलं आणि ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा ज्ञानदेवांच्या कुळातील मुलगा आहे.’ त्यांच्या या शब्दांमुळेच आई-वडिलांनी माझी संगीतक्षेत्रातील कारकीर्द निश्चित केली.या क्षेत्रात मी स्थान पक्कं करू शकलो यामागे पंडितजींनी त्यावेळी दिलेला आशीर्वाद आहे. 1990 च्या सवाई गंधर्व महोत्सवात ‘मोस्ट ब्राईट यंग आर्टिस्ट’ म्हणून माझा पंडितजींच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पंडितजींनीमाझी आत्मियतेने चौकशी केली. त्यानंतर अनेकदा पंडितजींच्या भेटी होत राहिल्या. प्रत्येक भेटीत त्यांचा साधेपणा मनालाभावत राहिला. इतका मोठा, जागतिक किर्तीचा कलावंत असूनही पंडितजींच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनीमी लहान असताना आई-वडिलांना माझ्या बाबतीत दलेले सल्ले फार मोलाचे ठरले. एकदा ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा मुलगा छान गातोच. पण, त्याच्या तब्येतीकडेही लक्ष द्या.’ पंडितजींनी दिलेला हा सल्ला मला फार मोलाचा वाटला. केव्हाही भेटले तरी त्यांच्याशी गप्पांची मैफल सहज जमून यायची. अशा वेळी त्यांना वयाचं, ज्येष्ठतेचं बंधन आड यायचं नाही. माझे गुरू पंडितजसराज आणि पंडित भीमसेन जोशी यांचा स्नेहदेखील शब्दातीत होता. प्रतिभावंत कलाकार एकमेकांना भेटले की त्या ठिकाणी प्रतिभेचा मेळाच जमतो. माझे गुरू आणि पंडितजी भेटले की असाच स्नेहमेळा जमून यायचा. ‘तानसेन नंतर संगीत क्षेत्रात एकछत्री अंमल गाजवणारे पंडित भीमसेन जोशी हे एकमेव कलावंत आहेत,’ असं एकदा पंडित जसराज म्हणाले होते. माझ्या गुरूंनी केलेला पंडितजींचा हा शब्दगौरव मला फार महत्त्वाचा वाटला.पंडितजींनी 50 वर्षांपेक्षा अधिक काळ स्वरांचा एकछत्री अंमल गाजवला. पंडितजी संगीत क्षेत्रातील बहुतेक मान्यवर पारितोषिकांनी सन्मानित झाले. पद्मविभुषण, द्म
्री, पद्मभूषण असे तिन्ही पद्म पुरस्कार त्यांना लाभले. त्याचबरोबर महाराष्ट्र गौरव, संगीत अकादमी, तानसेन, देशीकोत्तम, पुण्यभूषण, हाफीज अली खान अशा अनेक पुरस्कारांनी पंडितजींना गौरवण्यात आलं. संगीतरत्न, स्वरभास्कर अशा पदव्या पंडितजींना प्राप्त झाल्या. कोणतंही औपचारीक शिक्षण न घेतलेल्या पंडितजींना संगीत क्षेत्रातील उत्तुंग कर्तृत्वाबद्दल म्हैसूर, पुणे, कर्नाटक आणि टिळक महाराष्ट्र अशा चार विद्यापीठांच्या ‘डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लीट) या पदव्या प्राप्त झाल्या. गंधर्व महाविद्यालयाने महामहोपाध्याय ही सर्वोच्च पदवी त्यांना बहाल केली. काही वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारने पंडितजींना पुण्यातील निवासस्थानी येऊन कर्नाटकरत्न पुरस्कार देऊन गौरवलं होतं. पुणे विद्यापीठातील ललितकला केंद्रामध्ये पंडित भीमसेन जोशी अध्यासन मागेच कार्यरत झालं. एखाद्या कलावंताच्या नावाने त्याच्या हयातीत असं

अध्यासन सुरू होण्याची घटना दुर्मिळ म्हणावी लागेल.आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंडितजनी सुरू केलेला सवाई गंधर्व महोत्सव हा अवघ्या संगीत विश्वामध्ये ‘न भूतो न भविष्यती’ ठरला. संगीतक्षेत्राला पंडितजींनी दिलेली ही अनमोल देणगी म्हणावी लागेल. शास्त्रीय संगीताचा बाज असणारी ‘संतवाणी’ ही पंडितजींनी गानरसिकांना दिलेली अशीच एक अनोखी देणगी. टाळ-मृदुंगाच्या गजरात अण्णा तल्लिन होतात आणि हजारो रसिकांना भक्तीरसामध्ये चिंब भिजवून टाकतात. नामाचा गजर, पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा, अणुरेणिया थोकडा तुका आकाशाएवढा, माझे माहेर पंढरी, इंद्रायणी काठी यासारख्या पंडितजींनी गायलेल्या अभंग रचना विसरणं अशक्यच. अशा या उत्तुंग कर्तृत्व असलेल्या स्वरभास्कराला श्रद्धांजली वाहताना आज डोळे भरून येत आहेत.थोडक्यात जीवनप्रवास* कर्नाटकमधील ध रवाड
जिल्ह्यातील गदग येथे 4 फेब्रुवारी 1922 रोजी जन्म.* 16 भावंडांमध्ये सर्वात थोरले.* वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक.* घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने 11 व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले.* विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती.* ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण.* जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर 1936 पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण.* वयाच्या 19 व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम.* 22 व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफित एचएमव्ही तर्फे प्रकाशन.* 1943 मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी.* समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद.* उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीचीखास वैशिष्ट्ये. * शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग.* गुरूंना श्रद्धांजली म्हणून 1953 मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.

(अद्वैत फीचर्स)

— पं. संजीव अभ्यंकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..