नवीन लेखन...

स्वरपंढरीचा यात्री

 
वर्षानुवर्षांची संगीतसाधना आणि अपार परिश्रम घेण्याची तयारी यातून निर्माण झालेला या क्षेत्रातील तेजस्वी तारा म्हणजे भीमसेन जोशी. या स्वरभास्कराने आजवर अनेक मैफिलींमधून लाखो रसिकांना तृप्त केले. गुरुप्रती असणार्‍या निष्ठेतून सवाई गंधर्वसारखा महोत्सव सुरू करून नवोदितांना व्यासपीठ मिळवून दिले. अशा या स्वरपंढरीच्या यात्तिकाचे जाणे चटका लावणारे आहे. त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली.पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रातील सूर्य मावळला आहे, असे म्हणावे लागेल. त्यांचा संगीतक्षेत्रातील सुरुवातीचा प्रवास बराच खडतर राहिला. पण, केवळ संगीताची ओढ तसेच त्याप्रती असलेली निष्ठा यातून त्यांनी हा कालखंड सहजपणे झेलला. हाडाचा कलावंत ही त्यांची ख्याती कायम राहिली. अतिशय लहान वयात संगीत शिकण्याच्या ओढीने घराबाहेर पडलेल्या पंडितजींनी जीवनभर त्या व्रताचे काटेकोर पालन केले. संगीतसाधना किती व्यापक आहे शिवाय त्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात याचा आदर्शच पंडितजींनी अवघ्या रसिकवर्गासमोर तसेच नवोदित कलाकारांपुढे उभा केला. अलीकडच्या वेगवान युगात तर अशीच वर्षानुवर्षांची साधना प्रकर्षाने लक्षात येत आहे. शास्त्रीय संगीतासाठी तानस्तास रियाझ गरजेचा ठरतो. त्या दृष्टीनेही पंडितजींनी अपार परिश्रम घेतले.पंडितजींचे गाणे हृदयातून येत होते. त्यामुळेच त्यांचे स्वर रसिकजनांवर मोहिनी घालत. भक्तीसंगीतातील त्यांचा गोडवा काही औरच होता. शास्त्रीय संगीत असो वा भक्तीगीत, ते गाताना पंडितजी तल्लीन होतच शिवाय रसिकही आपले भान हरपत. सर्वच स्तरातील रसिकांना मोहिनी घालण्याची किमया पंडितजींच्या गायकीत होती. विविध मंदिरांमध्ये अजूनही सकाळच्या पुजेची सुरुवात पंडितजींच्या ध्वनी मुद्रीकेने होते. सुर्योदय होत असताना या स्वरभास्क
ाचे सूर कानावर पडल्याने धन्य होणार्‍यांची संख्या कमी नाही. असा महान गायक शतकातून एकदाच निर्माण होतो, असे म्हणता येईल.गुरुंप्रती समर्पण भाव तसेच अंत:करणपूर्व श्रद्धा याबाबतही पंडितजींचा उल्लेख विशेषत्वाने करता येईल. सवाई गंधर्वांकडून संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर गुरुंचे स्मरण सतत करता यावे तसेच त्यांना वेगळी गुरुदक्षिणा

द्यावी या हेतूने पंडितजींनी पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाला सुरुवात केली. आज या उपक्रमाचे रुपांतर विशाल वटवृक्षात झाले आहे. सवाई गंधर्व महोत्सवातील व्यासपीठावरून एकदा तरी गावे अशी प्रत्येक गायकाची इच्छा असते. त्यादृष्टीने नवोदितांना प्रोत्साहन देण्यात पंडितजी कायम अग्रेसर असत. नवोदितांना वेळोवेळी प्रोत्साहन देतानाच प्रसंगी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासही ते विसरत नसत. सवाई गंधर्वचा प्लॅटफॉर्म नवोदित गायकांसाठी उज्ज्वल भवितव्याचा पथदर्शक ठरला आहे. त्यांनी ज्येष्ठ तसेच नवोदित गायकांवरही मनापासून प्रेम केले. मूळची कर्नाटकातील असल्यामुळे माझ्यावर त्यांचे थोडे अधिक प्रेम होते.आज त्यांच्या विषयीच्या अनेक आठवणींनी मनात गर्दी केली आहे. त्यातील एक आठवण या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते. सवाई गंधर्व महोत्सवात पहिल्यांदा गायची संधी मिळाली तेव्हा मी तेवीस वर्षांची होते. या लहान वयात इतकी मोठी संधी मिळाल्याचा आनंद तर होताच पण काहीसे दडपणही होते. या महोत्सवात साधारणपणे रात्री नऊ वाजता गायला मिळेल असे सांगण्यात आले होते. पण, अगोदरच्या गायकांची अप्रतिम मैफल रंगल्यामुळे त्यांचा गायनाचा कालावधी बराच वाढला. त्यामुळे माझी गाण्यासाठी वेळ आली तेव्हा तीन वाजले होते. एक तर माझ्या अगोदरच्या सार्‍याच गायकांनी अप्रतिम गायन करून रसिकांची मने जिंकली होती. त्यानंतर एवढ्या उशिरा गायचे म्हटल्यावर माझ्
ावरील दडपण वाढले होते. अशा परिस्थितीत पंडितजींनी जवळ बोलावून धीर दिला, प्रोत्साहन दिले आणि ‘मोकळेपणाने गा, काळजी करू नकोस’ असे सांगितले. त्यांच्या या आश्वासक शब्दांमुळे माझ्यावरील दडपण कमी झाले आणि ती मैफल रंगली. सवाई गंधर्व महोत्सवाचे व्यासपीठ हा माझ्यासाठी माईलस्टोन होता. पंडितजींचे मार्गदर्शन, त्यांचा सहवास यामुळे संगीतक्षेत्रातील आजवरची वाटचाल सुकर झाली.गायनाच्या वेगवेगळ्या छटा हे पंडितजींच्या गायकीचे एक ठळक वैशिष्ट्य मानता येईल. त्यामुळेच अनेक गायकांच्या स्वरांवर पंडितजींचा प्रभाव राहिला. ही नवोदित मंडळी गायन करू लागली की त्यातून पंडितजींचे दर्शन होते. पंडितजींचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास होता. शास्त्रीय संगीतातील वेगवेगळ्या ताना ते इतक्या तन्मयतेने गात की ऐकणार्‍याचे कान तृप्त होत. अलीकडच्या पॉप आणि आधुनिक संगीताच्या जमान्यात शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला लाखो रसिकांनी तासन तास गर्दी करावी यातच पंडितजींच्या कार्याची थोरवी दिसून येते. भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन अशा या अलौकिक कार्यकर्तृत्वाचा यथोचित गौरव केला. म्हणूनच या स्वरभास्कराची संगीतसाधना अजरामर राहील.पंडितजींची संगीतसाधना अपार होतीच पण त्यांचे या क्षेत्रातील चिंतनही तितकेच मोलाचे होते. या चिंतनातूनच शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात काही नवीन संकल्पना पुढे येण्यास मदत झाली. एखादी चीज किंवा आलाप किती वेगळ्या पद्धतीने गायला जाऊ शकतो हे पंडितजींच्या गायनातून स्पष्ट होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे संगीतक्षेत्रात एवढे मोठेपण प्राप्त होऊनही त्यांचा विनयशील स्वभाव कायम राहीला. साधेपणा आणि कमालीची विनम’ता ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये सार्‍यांनाच भावत. आजकाल थोड्या-फार यशाने हुरळून जाणारी मंडळी पाहिली की पंडितजींचे वेगळेपण
प्रकर्षाने जाणवते. अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गायन थांबले असले तरी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीतील त्यांची उपस्थितीही कलाकार आणि रसिकांना धन्य करत असे. विशेषत: सवाई गंधर्व महोत्सवात त्यांच्या दर्शनासाठी कलावंत तसेच रसिक आसुसलेले असत. शास्त्रीय संगीत आणि या महोत्सवाप्रती असणार्‍या आत्मिक ओढीनेच पंडितजी या महोत्सवाला हजेरी लावत असत. महोत्सावतील कलाकारांचे गाणे ते तन्मयेतेने ऐकत. त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान ही कलाकारांसाठी खरी पोचपावती असे. पंडितजी कलाकारांचे आवर्जून कौतुक करत. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कलाकार घडवताना त्याचा प्रवास अनेक टप्प्यातून होत असतो. अशा प्रत्येक टप्प्यावर नवोदितांना पंडितजींनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अनेक बारीक-सारीक सूचनाही दिल्या. त्यामुळेच कलाकारांना परिपूर्ण गायकी म्हणजे काय याची ओळख होऊ शकली. असा हा स्वरपंढरीचा वारकरी हे जग सोडून गेल्याचे दु:ख सार्‍यांना आहे. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली

आहे.थोडक्यात जीवनप्रवास* कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील गदग येथे 4 फेब्रुवारी 1922 रोजी जन्म.* 16 भावंडांमध्ये सर्वात थोरले.* वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक.* घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने 11 व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले.* विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती.* ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण.* जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर 1936 पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण.* वयाच्या 19 व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम.* 22 व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफ
एचएमव्हीतर्फे प्रकाशन.* 1943 मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी.* समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद.* उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीची

खास वैशिष्ट्ये.* शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग.* गुरूंना श्रद्धांजली म्हणून 1953 मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.(अद्वैत फीचर्स)

— आरती अंकलीकर-टिकेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..