नवीन लेखन...

सुपरबगचे आव्हान



प्रतिजैविकांना दाद न देणारा सुपरबग प्रकटल्याने अवघे वैद्यकीय विश्व चिताक्रांत बनले आहे. पाश्चात्यांनी सुपरबगच्या निर्मितीसाठी सोयीस्करपणे भारताला जबाबदार धरले असले तरी त्यात तथ्य नाही. सुपरबगची निर्मिती पाश्चात्य राष्ट्रांमध्येच झाली असावी. असे असले तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून सुपरबगवर परिणामकरक प्रतिजैविक शोधण्याची जबाबदारी भारतावरही आहे.

लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात सुपरबगचा उल्लेख झाल्यापासून पाश्चात्यांनी जणू भारताची धास्तीच घेतली आहे. अनेक प्रतिजैविकांना दाद न देणार्‍या या जीवाणूतील एन्झाईम या रसायनाला न्यू दिल्ली मेटॅलोबिटा लॅक्टामेझ-१ (एनडीएम-१) असे नाव देऊन लॅन्सेटने त्यासाठी चक्क भारताला जबाबदार धरले आहे. जीवाणूंमध्ये प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे म्हणजे विज्ञान आणि निसर्ग यांच्यातील लढाई आहे. प्रतिजैविकांमुळे जिवाणू मारले जातात किवा त्यांची वाढ होण्याची प्रक्रिया मंदावते तर निसर्गातून त्यांना यावर मात करण्याची शक्ती मिळते. याला नॅचरल सिलेक्शन असे म्हणतात. नॅचरल सिलेक्शन पद्धतीमुळे जीवाणूंमध्ये नव्याने निर्माण झालेले गुणधर्म त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होतात. जीवाणूंच्या एका गटावर प्रतिजैविकांचा मारा केला तर त्यातील काही जीवाणू त्या परिस्थितीतही जिवंत राहून पुनरुत्पादन करू शकतात. ही प्रतिजैविकांबद्दलची माहिती त्या जीवाणूंच्या जनुकांमध्ये साठवून पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होते. अशा प्रकारे त्या जीवाणूंमध्ये प्रतिजैविकांबद्दल प्रतिकारशक्ती निर्माण होते. एखाद्या जीवाणूमध्ये अशी अनेक जनुके असल्यास तो अनेक प्रकारच्या प्रतिजैविकांचा सामना करू शकतो. अशा जीवाणूंना सुपरबग म्हटले जाते.

जीवाणूंवर अधिक काळ प्रतिजैविकांचा वापर केल्यास त्यांच्यामध्ये प्रतिकारक्षमता विकसित होण्याची शक्यता अधिक असते. प्रतिजैविकांचा वापर औषध म्हणून केला जात असतानाच पालनकेंद्रांमधील प्राण्यांची वेगाने वाढ व्हावी म्हणून आणि त्यांच्या व्याधींवरही केला जातो. त्यामुळे जिवाणू अनेकदा प्रतिजैविकांच्या संपर्कात येतात. अयोग्य उपचारपद्धती, अती वापर, स्वतःच्या मनाने प्रतिजैविके घेणे,

डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण न करणे तसेच साध्या सर्दीसाठीही प्रतिजैविकांचा गैरवापर करणे अशा कारणांमुळे जिवाणू

प्रतिजैविकांच्या संपर्कात येतात आणि त्यांच्यात प्रतिकारक्षमता निर्माण होते. औषध निर्माण क्षेत्रातील टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळेही जीवाणू प्रतिजैविकांच्या संपर्कात येऊ शकतात.

कारण काहीही असले तरी त्याचा परिणाम भयंकर आहे. सुपरबगमुळे सध्या प्रभावी ठरणारे अनेक प्रतिजैविके पुढील काळात कुचकामी ठरू शकतील. सुपरबगमध्ये आढळणारी जनुके इतर जीवाणूंमध्येही सहज संक्रमित होऊ शकत असल्याने पुढे याहूनही अधिक प्रतिजैविकांना दाद न देणारे सुपरबग्ज निर्माण होऊ शकतील असेही तज्ज्ञांना वाटते. अशा परिस्थितीत संसर्ग झाल्यास तो जीवाणू वेगाने पसरेल आणि त्याचा प्रसार रोखणे अशक्य होऊन बसेल. यामुळे सुपरबग हा सर्व जगातील संशोधकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्द आहे तो सुपरबगच्या जन्मस्थानाचा. सुपरबगचा जन्म भारतात झाल्याचे लॅन्सेटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी प्रगत देशातील नागरिकांनी भारतात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी, हा भारताच्या वैद्यकीय पर्यटन व्यवसायावर आघात करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. सुपरबगला दिल्लीचे नाव देऊन विकसित राष्ट्रांनी दुटप्पी धोरणाचा अवलंब केला आहे. सुपरबगचा जन्म प्रतिजैविकांच्या अनिर्बंध आणि अशास्त्रीय वापरामुळे होतो हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी देशात आधुनिक प्रतिजैविकांचा वापर करणार्‍या रुग्णांची मोठी संख्या असणे गरजेचे आहे. भारताचा विचार केला तर हे शक्य नाही. कारण देशातील ८० टक्के जनतेला आधुनिक औषधे उपलब्ध होत नाहीत आणि आधुनिक प्रतिजैविकांचा खर्च त्यांना परवडणाराही नाही. त्यामुळे सुपरबगची निर्मिती भारतात झाली हे मानणे चुकीचे आहे.

खरे तर पाश्चात्य जगतात अनेक प्रतिजैविकांना दाद न देणार्‍या जीवाणूंची निर्मिती झाली असली तरी जगभरातील अनेक रुग्ण तेथे विविध व्याधींवरील उपचारांसाठी जातात आणि विज्ञानाला वाहिलेल्या कोणत्याही नियतकालिकाने यावर आक्षेप घेतलेला नाही. त्यापुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की, एमआरएसए (मेथीसिलिन रेझिस्टंट स्टॅफिलोकोकस ऑरिअस) ची निर्मिती अमेरिकेत झाल्याचे सर्वांना माहित असले तरी त्याला यूएसएमआरएसए असे नाव देण्यात आले नव्हते. त्यामुळे लॅन्सेटमध्ये वर्णन केलेल्या सुपरबगला दिल्लीचे नाव देऊन रुग्णांना उपचारांसाठी भारतात न जाण्याचे आवाहन करणे स्त्रीयदृष्ट्या अतार्किक, सामाजिकथृष्ट्या हास्यास्पद आणि राजकीयथृष्ट्या भेदभाव करणारे आहे. यासंदर्भात आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे दिल्लीचे नाव देण्यात आलेल्या सुपरबगसारखे विविध प्रतिजैविकांना दाद न देणारे जीवाणू प्लाझ्मिड्समुळे निर्माण होतात. प्लाझ्मिड्स हे स्वतंत्र अस्तित्व असलेले डीएनए असतात. हे डीएनए एका जातीच्या जीवाणूतून दुसऱ्या जातीच्या जीवाणूत सहज संक’मित होऊ शकतात. प्लाझ्मिड्स कोणत्याही देशाच्या सीमा मानत नाहीत. त्यामुळे लॅन्सेटमधील सुपरबगची निर्मिती इंग्लंडमध्येच झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला इंग्लंडवरून एखादे नाव देण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.

सुपरबगच्या निर्मितीला आपण जबाबदार नसलो तरी एक वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत देश म्हणून सुपरबगवर योग्य उपचार शोधण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. नवी प्रतीजैविके विकसित करणे ही खरी आजची गरज आहे; परंतु जगातील पहिल्या १५ औषधनिर्माण कंपन्यांमध्ये नव्या प्रतिजैविकांच्या संशोधन आणि विकासासाठी (आर अॅण्ड डी) १.६ टक्क्यांहूनही कमी बजेट ठेवले जाते. यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आपल्याकडे अनेक प्रभावी पारंपरिक औषधे उपलब्ध आहेत. हळदीचा वापर शतकानुशतके सुरू आहे. त्याचबरोबर आपल्याकडे १० हजारांहून अधिक वनस्पतींचा वापर करून ४० हजारांहून अधिक औषधे तयार केली जातात. त्याच्या शास्त्रोक्त पद्धतीही आपल्याला ज्ञात आहेत. यावर पुन्हा संशोधन करून त्यापासून अधिक परिणामकारक प्रतिजैविके तयार करता येतील.

प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी पेप्टाईड्सकडेही आशेने पाहता येईल. पेप्टाईड्स हे लहान प्रोटिन्स असून त्यात

५० हून कमी अमायनो अॅसिड्स असतात. अमायनो अॅसिड हे कोणत्याही प्रोटिनचे निर्मितीघटक असतात. पेनिसिलिनचा शोध लावणार्‍या अॅलेक्झांडर फ्लेमिग याने लिसोझाईम या पहिल्या अॅन्टिमायक्रोबियल

पेप्टाईडचाही शोध लावला होता. सेमिनलप्लाझ्मिन या आणखी एका परिणामकारक अॅन्टिमायक्रोबियल पेप्टाईडचा शोध भारतातील हैदराबादमध्ये लावण्यात आला होता. १९७० मध्ये नेचर या नियतकालिकाने त्याची दखलही घेतली होती. त्या वेळी आर. नागराज आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या हैदराबाद येथील संस्थेत हे संशोधन केले होते आणि त्यात हे पेप्टाईड त्याच्या मूळ प्रोटिनपेक्षाही अधिक परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले होते. आता हे पेप्टाईड बाकेम या पेप्टाईड्स तयार करणार्‍या जगातील सर्वात मोठ्या कंपनीतर्फे तयार केले जाते. आजघडीला एकूण एक हजार प्रकारचे अॅन्टिमायक्रोबियल पेप्टाईड्स ज्ञात आहेत; परंतु व्यावसायिक तत्त्वावर त्यातील एकाचाही वापर केला जात नाही. आपल्यासाठी ही सोन्याची खाण ठरू शकते. देशात सुपरबगचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याकडील रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी कंपनीतर्फे राष्ट्रीय प्रतिजैविक धोरणाचा अवलंब करायला हवा. दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतर प्रतिजैविकांचा वापर सुरू झाला आणि त्यांच्या अतिवापरामुळे जीवाणूंमध्ये जनुकीय बदल घडून येऊन त्यांच्यावर या प्रतिजैविकांचा परिणाम होणार नाही हे वैद्यकीय व्यावसायिकांच्या लक्षात आले नाही. प्रतिजैविकांचा परिणाम होणार्‍या जीवाणूंच्या ‘कल्चर’मध्ये प्रतिजैविकाला दाद न देणारे एखादे जनुक असेल आणि हे कल्चर तसेच वाढू दिले तर प्रतिजैविकाला दाद देणार्‍या
आणि न देणार्‍या जवाणूंचे गुणोत्तर १० लाखास एक असे असेल, परंतु हे कल्चर प्रतिजैविकाच्या संपर्कात आणले तर लक्षावधी जीवाणूंचा नाश होईल; परंतु प्रतिजैविकाला दाद न देणारा तो एक जीवाणू वाचून तशा जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. कालांतराने त्यात प्रतिजैविकाला दाद न देणार्‍या लक्षावधी जीवाणूंची निर्मिती होईल. जगात अनिर्बंध आणि अशास्त्रीयपणे प्रतिजैविकांचा वापर केल्यामुळे नेमके हेच घडले आहे. सध्या एका किवा अनेक प्रतिजैविकांना दाद न देणार्‍या जीवाणूंची निर्मिती झाली आहे. जगात उपलब्ध असलेल्या १६० पैकी १५९ प्रतिजैविकांना दाद न देणार्‍या एखाद्या जीवाणूची निर्मिती झाली आणि उरलेल्या प्रतिजैविकाला तो दाद देत असेल तर त्या प्रतिजैविकाचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. अमेरिकेत १९९० मध्ये एमआरएसए हा जीवाणू विकसित झाला त्यावेळी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. आता सुपरबग आला आहे. सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.

(अद्वैत फीचर्स)

— महेश धर्माधिकारी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..