नवीन लेखन...

योग्य विमा योजना ठरवताना…

विमा हे केवळ करसवलत मिळवण्याचे साधन नसून भविष्यात कर्त्या पुरुषाचे उत्पन्न थांबल्यानंतरही कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये हे विम्याचे मूळ उद्दिष्ट आहे. विम्याची गरज पटूनही नेमकी कोणती योजना निवडावी हे ग्राहकाला समजत नाही. आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यात उत्पन्नाची सांगड घातली की, काही समीकरणे मांडून योग्य योजना ठरवणे

सोपे जाते.

आजवर विमा हे केवळ आयकर वाचवण्याचे साधन मानले जात असे. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्यांना विम्याचे महत्त्व पटू लागले असले तरी या क्षेत्रात अनेक कंपन्यांनी पदार्पण केल्याने आणि त्यांच्या विविध आकर्षक योजना बाजारात आल्याने नेमकी कोणती पॉलिसी घ्यायची याबद्दल अनेकांना संभ्रम पडतो. खरे तर विम्याचे मुख्य उद्दिष्ट विमाधारकाला विविध आपत्तींपासून संरक्षण देणे हे असल्याने आयकरातील सवलत म्हणचे बोनसच समजायला हवा. जगातील अनेक देशांमध्ये उत्पन्नाचा मोठा हिस्सा विम्यात गुंतवला जातो. काही ठिकाणी तर विम्यात केलेल्या गुंतवणुकीला आयकरात सवलत दिली जात नाही.

लोकांच्या आर्थिक गरजा ध्यानात घेऊन विम्याच्या योजना तयार केल्या जातात. कुटुंबाच्या आर्थिक गरजांचे प्रामुख्याने पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते.

1. घरातील कर्त्या पुरुषाला काही कारणामुळे काम करता न आल्यास महिन्याचे उत्पन्न सुरक्षित राहणे बरेचदा एखाद्या आजारपणामुळे कर्ता पुरुष काही महिने किवा कायमचा अंथरुणाला खिळून राहतो आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीचे बनते. अशा वेळी विम्याचे संरक्षण असल्यास कुटुंबाला आधार मिळतो.

2. घरातील कर्ता पुरुष निवृत्त झाल्यानंतर त्याचे उत्पन्न थांबते. अशा वेळी कुटुंबाची काळजी घेण्यासाठी विम्याचा उपयोग होतो.

3. घरातील व्यक्तींना गंभीर व्याधी जडल्यास किंवा अपघात झाल्यास उचपारांसाठी मोठा खर्च लागतो. विमा उतरवला असल्यास या खर्चाची तरतूद करता येते.4. भविष्यातील ज्ञात आर्थिक गरजांसाठी बचत करणे. मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी ठरावीक वेळी मोठा खर्च लागणार आहे याची

आपल्याला कल्पना असते या गरजा ध्यानात घेऊन विम्यात गुंतवणूक केल्यास ऐन वेळी पैसा उभा करणे शक्य होते.

5. आपण बचत केलेल्या रकमेची किमत चलनवाढीमुळे कालांतराने कमी होत जाते. त्यामुळे ही रक्कम बचत खात्यात ठेवून उपयोग होत नाही. चलनवाढीचा सामना करण्यासाठी विम्याचा उपयोग होतो.

एखादा चांगला विमा एजंट आपल्या गरजा ध्यानात घेऊन आणि त्यांचे प्राधान्य ठरवून योग्य पॉलिसी सुचवू शकतो. पण, बरेचदा काही विमा एजंट्स आपल्या गरजांपेक्षा त्यांच्या कमिशनकडे अधिक लक्ष देतात आणि त्यांना फायदेशीर असलेल्या योजना आपल्या गळी उतरवू शकतो. त्यामुळे आपण विमा योजनांची माहिती करून घ्यायला हवी. स्वत:च्या गरजा ओळखून त्यांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचे काम आपणही करू शकतो. यासाठी एका जोडप्याचे उदाहरण घेऊ या.

अशोक आणि सविता यांची वये तिशीच्या आत-बाहेरची आहेत. त्यांचे पहिलेच अपत्य रुचिका काही महिन्यांची आहे. सविता माध्यमिक शाळेत शिक्षिका असूनही रुचिकाची काळजी घेण्यासाठी ती नोकरी सोडून देते. अशोकला बँकेत चांगली नोकरी आहे. त्याचे वर्षाचे उत्पन्न साधारणत: सहा लाखांच्या घरात जाते. बँक कर्मचार्‍यांचा विमा उतरवते. त्यात त्याला आठ लाख रुपयांचे संरक्षण मिळाले आहे. शिवाय आरोग्य विम्याचेही (मेडिक्लेम) संरक्षण आहे. त्यांना स्वत:चे घर घ्यायचे आहे. सध्या ते भाड्याच्या घरात राहत असून 15 हजार भाडे भरत आहेत. इतर सर्व खर्चांमुळे त्यांच्या बचत खात्यात फारशी शिल्लक नाही. त्यांच्याकडे एक दुचाकी वाहन असून 50 हजार रुपयांचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत अशोक आणि सविता यांच्या नेमक्या गरजा ओळखून त्यांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा ?

गरजांचा प्राधान्यक्रम ठरवताना सर्वात आधी कोणत्या गरजेकडे लक्ष द्यायला हवे याचा विचार केला जातो. परंतु, अपघात कधीही होऊ शकतो. त्यामुळे त्याला सर्वोच्च प्राध्यान द्यायला हवे. दुर्दैवाने अशोक अपघातामुळे अधू झाला आणि त्याला काम करणे शक्य झाले नाही किवा त्याहूनही वाईट घडले तर कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी संरक्षण हवे. त्याचबरोबर आरोग्य सुविधांच्या किमतीही वेगाने वाढत आहेत. त्यांचाही विचार व्हायला हवा. पण, या आघाडीवर बँकेचा आरोग्य विमा दिलासा देऊ शकतो. घर घेण्यासाठी मोठी रक्कम उभी करण्याला ठरावीक कालावधीसाठी प्राधान्य द्यायला हवे. रुचिकाच्या शिक्षणासाठी निधी लागू शकेल. पण, त्यासाठी अजून 20 वर्षांचा कालावधी हातात असल्याने या गोष्टीला वरचे प्राधान्य देण्याची गरज नाही. निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांसाठी निधी उभा करण्यालाही अजून बराच वेळ असल्याने त्यालाही अत्युच्च प्राधान्य देण्याची गरज नाही.पुढील आयुष्यातील घटनांचा कुटुंबावर किती परिणाम होणार आहे याकडे लक्ष द्यायला हवे. काही कारणामुळे अशोकची जीवनभराची कमाई संपुष्टात आल्यावर कुटुंबाला वर्षाला किमान अतिरिक्त तीन लाख रुपयांची गरज भासेल. सविताने पुन्हा नोकरी सुरू केल्यानंतर काहीसा दिलासा मिळू शकेल. या उत्पन्नात चलन फुगवट्यानुसार वाढ व्हायला हवी. अशा परिस्थितीत विम्याचे संरक्षण किती असावे यासाठी सोपे समीकरण मांडता येईल. त्यासाठी नोकरीतील उरलेल्या आयुष्याला उत्पन्नातील फरकाने गुणून त्यातून सध्याचे विमा संरक्षण वजा करावे. म्हणजे 30 वर्षे गुणिले तीन लाख – आठ लाख (बँकेने उतरवलेला विमा) + 82 लाख. या मानाने बाकीच्या गरजा लहान ठरतात. गरज आणि इच्छा यांचा विचार करून प्राधान्यक्रम ठरवावा. अशोक आणि सविताला स्वत:चे घर घेण्याची इच्छा आहे. परंतु, ते भाड्याच्या घरातही राहू शकतात. अशा प

रिस्थितीत अशोकच्या उत्पन्नाला संरक्षण देणे अधिक गरजेचे आहे.

यानंतर त्यांच्या सध्याच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी ते वर्षाकाठी किती रुपये खर्च करू शकतात हे शोधून काढायला हवे. अशोक आणि सविता दैनंदिन गरजा भागवल्यानंतर साधारणत: साठ हजार रुपये भविष्याची तरतूद म्हणून वेगळे काढू शकतात. यात घरासाठी निधी उभा करणेही समाविष्ट आहे. पण, अशा वेळी पूर्ण

साठ हजार रुपये विम्यात गुंतवणे

योग्य नाही. अशा प्रकारचे पृथक्करण केल्यानंतर आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम लक्षात येतो. त्यामुळे तुमच्याकडे विमा एजंट आल्यास त्याला त्याच्या मनातील योजना विकू न देता आपल्या गरजा भागवणारी योजना घ्या. सर्वप्रथम त्याच्याकडील सर्व योजना जाणून घ्या. त्याच्याकडील एखाद्या योजनेत विविध प्रकारचे फीचर्स असतील, गुंतवणुकीचाही विचार केलेला असेल परंतु, कदाचित त्याने तुमच्या गरजा भागणार नाहीत. दुसरीकडे तुमच्या गरजा भागवणारी योजना घेतल्यानंतर दुसर्‍या कंपनीचीच तशीच योजना अधिक स्वस्त असल्याचे लक्षात येईल. परंतु, तुमच्या हातात चांगली योजना असल्याचे समाधान असेल. प्रत्येक विमा कंपनीकडे आकर्षक योजना असतात. परंतु, त्यांचे विश्लेषण करून योग्य योजना ठरवणे अवघड बनते. त्यासाठी काही मुद्यांकडे लक्ष द्यावे. कोणत्याही विमा योजनेत संरक्षण आणि गुंतवणूक या दोन बाबी महत्त्वाच्या असतात. मृत्यू आणि अधू झाल्यास मोठे संरक्षण असेल (वार्षिक प्रिमिअमच्या शंभरपटींहून अधिक) तर पॉलिसी संपल्यानंतर हातात फार मोठी रक्कम येणार नाही. ही रक्कम वार्षिक प्रिमिअमच्या 20 पटींहूनही कमी असेल. अशोक आणि स्वाती यांचा विचार केल्यास अॅक्सिडेंटल डिसॅबिलिटीचे संरक्षण असलेली टर्म इन्शुरन्स योजना त्यांच्या प्राथमिक गरजांसाठी मृत्यू झाल्यास 82 लाख रुपयांचे संरक्षण आणि 25 वर्षांसाठी सहा लाखांचे अॅक्सिडेंटल डिसॅबिलिटीचे संरक्षण यासाठी त्यांना 15 हजारांहूनही कमी वार
षिक प्रिमियम भरावा लागेल. उरलेले 45 हजार घरासाठी लागणार्‍या निधीत जमा करता येतील किवा रुचिकाच्या शिक्षणासाठी एखाद्या पॉलिसीत गुंतवता येतील. अशा परिस्थितीत आपले कुटुंब सुरक्षित असल्याच्या भावनेने अशोकला शांत झोप लागेल.

(अद्वैत फीचर्स)

— महेश धर्माधिकारी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..