नवीन लेखन...

मैत्रीण

(कारण दिल तो पागल है!, दिल दिवाना है! श्रीकेक्षींनी शेलेया कविचे उद्गार नोंदवून त्याला आपल्या मित्राच्या पत्नीबाबत वाटणार्‍या पवित्र आर्कषणाचा अन्वर्थक उल्लेख केला आहे. असो शेवटी मित्र हा नवर्‍यापेक्षा जगण्याचे महत्वाचे कारण आणि अधिष्टान असतो. स्त्रीसाठी निदान असायला हवा. नवरा मेला तर रडून मोकळं व्हायचं मित्र मेला तर जगण्याला काही अर्थ उरत नाही.)
हमने देखी है उन आखोंकी महकती खुशबू
हाथसे छू के उसे रिश्तोंका इल्जाम न दो
सिर्फ एहसार है ये, रुह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो
यथा काष्ठंच काष्ठंच न्यायानं माणसं प्रसंगाच्या रेट्याने परिस्थितीच्या रेट्याने एकत्र येतात. त्यातील काही स्त्री-पुरुषांमध्ये मुग्ध प्रेमाचे धागे कधी विणले जातात. हे त्यांच्याही लक्षात येत नाही. आपल्याकडे लग्नाखेरीज या संबधांना मान्यता नसते. लग्न तर जातीवरुन ठरतात. शेवटी जिस रास्ते मेरा मन गया उस रास्ते मेरी डोली नही गयी अशी म्हणायची वेळ आपल्या समाजातल्या शंभरातल्या नव्यांण्णव मुलींवर येते.
२१ व्या शतकातील स्त्री-पुरुष संबधावर भाष्य करायला मी कोणी समाज शास्त्रज्ञ नाही. पण दोन गोष्टी सरळसरळ जाणवतात. विभक्त कुटूंबपध्दती आणि कूटूंब नियोजन यामुळे निरनिराळ्या नात्यांच्या सुखाला आजची पिढी पारखी झाली आहे. पुर्वीचे एकत्र कुटूंबातील खेळीमेळीचे थट्टा मस्करीचे वातावरण नष्ट झाल्यापासून महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष संबध आधिक संकुचित अधिक एकांगित आणि अधिक अनुदार झाले आहेत.
दूसरीकडे रक्तांच्या आणि पवित्र नात्यातील लफडी मात्र प्रचंड वाढली आहेत. भोगवादी, चंगळवादी संस्कृती आणि स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार घेऊन व्यभिचारी मनोवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. स्त्री मुक्तीचाही विपर्यास होत आहे. अशा काळात माझ्यासारख्या मनस्वी माणसाने जर प्लॅटॉनिक लव्ह किंवा अशारितीने, आत्मिक प्रेमाचा विषय काढल्यामुळे माझी चेष्टाच होणार हे माहीत असूनही निकोप स्त्री-पुरुष संबधांची गरज मला जास्त महत्वाची वाटते म्हणून हा विषय मी मांडणार आहे.
स्त्री-पुरुषामधील पती पत्नीचे नाते हे एक सामाजिक व्यवस्था आहे. प्रियकर आणि प्रेयसी हे एक नाते आहेच. पण प्रत्येक वेळी प्रियकर हाच पती होऊ शकेल असे काही नाही. प्रियकराशी जरी लग्न झाले नाही आणि प्रेम विफल झाले तरी सामान्यतः कोणी जगणे सोडत नाही. प्रियकर आणि प्रेयसी पती आणि पत्नी यांची नाती आपापल्या परीने रमणीय आणि पवित्र तर आहेतच.
पण दोन स्त्री-फुषांमध्ये याखेरीजही नाते असू शकते. द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्यातल्या अशा नात्यावर एक मोठा मनोज्ञ लेख श्री. के क्षीरसागरांनी लिहीला आहे. त्यांच्या मते या जगाला दिर्घ परिचयाची तेवढीच नाती समजतात. परिचीत नात्यापेक्षा वेगळे नाते निर्माण झाले तर आपण ते आधी ओळखतच नाही, नाहीतर धुडकावून तरी लावतो नाहीतर त्याला एखादे (मानलेला भाऊ) परिचित पण खोटे नाव देऊन मोकळे तरी होतो.
शरद देऊळगावकर नावाच्या एका लेखकाने त्यांच्या मैत्रिण या कादंबरीत अशा सौंदर्य आकर्षणातून निर्माण झालेल्या पण शरीर आभिलाषेत पर्यवसित न झालेल्या नात्याचा फार सुंदर वेध घेतला आहे. एखाद्या स्त्रीच्या सानिध्यामुळे उच्च स्फूर्तीचा, उच्च अनुभूतीचा, उदात्त, आत्मिक संवादाचा अनुभव येत असेल तर पुरुषाला त्या स्त्रीच्या शरीरापासून मिळणारे खालच्या पातळीवरचे सुख घेण्याची कल्पनाही मनाला शिवणार नाही.
जिथे स्त्री-पुरुषात शरीर आभिलाषेच्या पलिकडचा संबध निर्माण होतो. तिथेच स्त्रीच्या खर्‍या शक्तित्वाचा अनुभव येतो. श्रीकेक्षीनी झाशीच्या लक्ष्मीबाईचे सुंदर उदाहरण दिले आहे. इतिहासात अशा काही स्त्रियांची भुमिका अशी केवळ शक्ती दानाची, स्फूर्ती दानाची होती त्या सुदंर, तरुण तेजस्वी, परमधार्मिक आणि परमनिग्रही स्त्रोत आपल्या भोवतालच्या पुरुषात आत्मिक तेज निर्माण करण्याची शक्ती असावी. असे तत्कालिन हकिकती वाचल्यावर वाटू लागते.
स्त्रियांपासून अशी शक्ती मिळवणार्‍या गांधीजींबद्दलही श्रीकेक्षीनी फार सुंदर लिहीले आहे. स्त्रीचे आत्मिक सौंदर्य स्त्रियांचे आत्मनिरपेक्ष जीवन त्यांचे सहृदय मन त्यांचा सोशिकपणा त्यांची जीवनातील हौस ज्यांचे गांधीनी इतक्या तन्मयतेने आणि श्रध्देने पाहिली असा पुरुष राजकारणी लोकात तरी गांधीजी खेरीज दुसरा दाखवणे अशक्य आहे.
या दृष्टीने गांधीजी कवी आणि रोमॅंटीक होते. म्हणजेच स्त्री पुजक होते. अशी श्रीकेक्षींची धारणा आहे. गांधींजी सर्वच स्त्रियांना मधुर आत्मिक स्नेहाचे साधन बनवत असत. दिसायला अतिशय सामान्य असणार्‍या स्त्रीतही प्रसंगी असामान्य गोष्ट करुन दाखवण्याचे सामर्थ असते. आपल्या प्रिय पुरुषाला असामान्य प्रेमाचा अनुभव देण्याचे सामर्थ्य असते. स्त्रीचे शक्ती म्हणून जे रुप आपल्या तंत्र ग्रंथात वर्णीले आहे ते वस्तूतः हेच आहे.
शैक्षणिक मानसशास्त्रात “प्रबलन” ही एक सुंदर संकल्पना मांडली आहे. स्त्रीमध्ये दुसर्‍याचे स्वार्थ निरपेक्ष कौतूक करण्याची एक उपजतच शक्ती असते. तिच्यामुळे तिच्या भोवतीचे सहज प्रबलन होते. म्हणून स्त्रियांनी शिक्षक झाले पाहिजे. “बाई शाळा सोडून जातात.” या गंगाधर गाडगीळांच्या कथेचे हेच मर्म आहे. गुरुजी शाळा सोडून गेले असते तर नायकाला एवढे वाईट वाटले नसते. माणूस हा कौतुकाचा भुकेला प्राणी आहे. प्रतिभावंत, कलावंत वा साहित्यिक सामान्य माणसापेक्षा कौतुकाचे आधिक भुकेले असतात. नवनिर्मिती करणार्‍यांना कौतुक हाच खरा-खुरा चेहरा होय. स्त्रियांच्या अंगी कौतुक करण्याची शक्ती स्वभावतःच विशेष प्रमाणात असते. त्यानुसती आपली जाण दाखवत नाहीत तर कौतुक करतात. त्यामुळे गुणी लोकांना कळत-नकळत उत्तेजन देऊ शकतात.
रंविद्रनाथ टागोरांनी अनेक स्त्रीयांकडून हे उत्तेजन मिळविले. हे रंगनाथ तिवारींना कळले नाही. त्यांनी कादंबरी वहिनीसकट सर्वच स्त्रीयांचे आपल्या गुरुदेव कादंबरीत विकृत चित्रण केले आहे. स्त्रीयांच्या मधील कौतुकांच्या शक्तीचे केंद्र सेक्स हे नसुन तो त्यांच्या मातृशक्तीचा एक भाग आहे असा विचार का करता येऊ नये.
याचा अर्थ सर्वच स्त्रीया प्रतिभेला किंवा प्रज्ञेला उत्तेजन देतात असे नाही. बौध्दिक उत्तेजन देणार्‍या स्त्रीयांची जात वेगळी आणि वरची समजावी लागेल. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते म्हणतात ती पत्नीच असली पाहिजे असे नाही. पत्नी, मैत्रीण होऊच शकत नाही असेही नाही. या मैत्रीची मात्र प्रत्येकाला आवश्यकता असते. कुणाच्या परमभाग्याने त्याला अशी एखादी (किंवा अनेक) मैत्रीण लाभली तर त्याच्यातल्या काम निरपेक्ष आकर्षणाला समजून घेणारा समाज आपल्याला निर्माण करावयाचा आहे. माधव ज्युलियनांच्या स्त्री विषयक भुमिकेत ही दृष्टी दिसते.
नाते पुरुष-स्त्रीमध्ये “ते” एकची वाटे ऐसे उफराटे
ज्यांचे मत, त्यांचे वच येवो नच कानी तेथे चल राणी
शेवटचा मुद्दा आकर्षण ही घटना जर योजून होणारी व टळणारी नसेल, ते नेहमीच अविवाहित पुरुषांच्या बाबतीत आणि विवाह पात्र मुलींच्या संदर्भातच घडेल असे गृहीत धरता येणार नाही. आकर्षण आणि विवाहेच्छा याची हुकमी गाठ बांधता येणार नाही, कारण आकर्षण हे स्वयंभू आहे. तर विवाह हा समाज निर्मित आहे. तसेच एकदा विवाह झाला की पुढे कधीच असे आकर्षण इतरत्र वाटणार नाही असेही खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.
कारण दिल तो पागल है!, दिल दिवाना है! श्रीकेक्षींनी शेलेया कविचे उद्गार नोंदवून त्याला आपल्या मित्राच्या पत्नीबाबत वाटणार्‍या पवित्र आकर्षणाचा अन्वर्थक उल्लेख केला आहे. असो शेवटी मित्र हा नवर्‍यापेक्षा जगण्याचे महत्वाचे कारण आणि अधिष्टान असतो. स्त्रीसाठी निदान असायला हवा. नवरा मेला तर रडून मोकळं व्हायचं मित्र मेला तर जगण्याला काही अर्थ उरत नाही.
पल्लू फटे सी लेना
आकाश फटे किया सीणा
खसम मरे, रो लना
यार मरे, किया जीना ?
– प्रा. विश्र्वास वसेकर, शनिवार पेठ, थेरगांव, पुणे
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

— प्रा. विश्वास वसेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..