नवीन लेखन...

भारत-पाक संबंध एक शुन्याचा पाढा

इतर देशांशी आधी संबंध सुधारा
काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी चर्चेद्वारे सोडवावा, यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही’, असे सांगत संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) पाकिस्तानला झटका दिला. भारताचे दोन्ही प्रमुख शेजारी पाकिस्तान आणि चीन हे नेहमीच भारताच्या सीमा भागात गोळीबार व घुसखोरी करत असतात. दोन देशांची ही आगळीक एवढी नियमितपणे होत असते की, चीन आणि पाकिस्तान हे दोघेही संगनमताने हे प्रकार करत असतात की काय, अशी शंका यावी.

६७ वर्षांत स्वतंत्र भारतासाठी पाकिस्तान कायमची डोकेदुखी बनला आहे. १९४७, १९६५, १९७१, १९९९ अशा चार युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची माती खायला लावली. हे युद्ध हारल्यानंतर पाकिस्तानने आपल्याबरोबर छुपे युद्ध सुरु केले ज्याला ओपरेशन टोपेझ असे म्हटले जाते.

दोन्ही देशांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तसेच आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी कराराचा भंग करीत भारतीय लष्करी चौक्या तसेच सीमेलगतच्या नागरी वस्त्यांवर जोरदार गोळीबार व तोफगोळ्यांचा भडिमार सुरू ठेवला आहे.

पाकिस्तानमधील राजकीय अस्थैर्यावरून तेथील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने भारतीय सरहद्दीवर हल्ले चढविण्याचा नेहमीचा सिलसिला सुरू केला आहे. पाकिस्तान भारताच्या सीमेवर हल्ले चढवत असून पंतप्रधान महाराष्ट्रात निवडणूक प्रचारात गुंतलेले आहेत, अशी टीका केली गेली. देशासमोर उभ्या आव्हानांकडे त्यांनी पाठ फिरविली होती का? मोदी यांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यांचे गांभीर्य ओळखून पावले टाकायला सुरुवात केली होती, याचे प्रत्यंतर लगेच आले.

मैत्रीचा प्रस्ताव धुडकावून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे पाकिस्तानला महाग पडेल. हा केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिलेला इशारा पाकिस्तानला दिला. पाकिस्तानी सैनिकांकडून जम्मू-काश्मीरमधील सीमेवर सातत्याने सुरू असलेल्या गोळीबार आणि उखळी तोफांच्या मार्‍याला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले. साधारणपणे सीमेवर गोळीबारासाठी मशिनगन्सचा वापर केला जातो. तोफगोळ्यांच्या हल्ल्यात होणारी हानी तुलनेने अधिक असते.

भारतीय सैनिकांनी प्रत्त्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ३७ चौक्या उद्ध्वस्त झाल्या तसेच १५ पाकिस्तानी ठार झाले, ३0 हून अधिक जण जखमी झाले. ही हानी आपल्या देशाच्या हानी पेक्षा तिप्पट आहे. भारतीय सैन्याच्या या जबरदस्त कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तातडीने आपात्कालीन बैठक बोलावली.

पाकिस्तानचे उपद्‌व्याप संपणार नाही
मोदी यांच्या शपथविधीला नवाझ शरीफ पाहुणे म्हणून हजर राहिल्याने आता पाकिस्तान-भारत संबंध सुधारण्यास मदत होईल, असे अनेक भाबडे आपल्या देशात आहेत. येत्या काही महिन्यांत जम्मू-काश्‍मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे तेथे अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू राहतील. भारतीय लष्कराची बदनामी करणे, जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीविषयी विपर्यस्त बातम्या पेरणे, घुसखोर पाठवून दहशतवादी कृत्ये घडविणे आणि सरहद्दीवर गोळीबार करणे, असे पाकिस्तानचे अनेक उपद्‌व्याप संपणार नाही.

काहीही झाले तरी पाकिस्तानची विचारसरणी बदलणे अशक्य आहे. पाकिस्तानमध्ये खरे शासक सैन्य आहे. भारत-पाक संबंधांबाबत पाकिस्तानी सरकारला काय वाटते यापेक्षा सैन्याला काय वाटते हे महत्त्वाचे ठरते. पाकिस्तानी सैन्याला सध्या शांतता नको आहे.

१५ अतिरेक्यांना कंठस्नान घातले
पाकिस्तान भारतात मोठ्या प्रमाणावर हिंसा करण्यासाठी नव्याने प्रयत्न करत आहे. नियंत्रण रेषेच्या वेगवेगळ्या भागातून २००० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सज्ज आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या पुरात लष्कराच्या अनेक छावण्यांचे प्रचंड नुकसान झाले. लष्कराचा मोठा शस्त्रसाठा पुरात वाहून गेला. पुराचे पाणी आणि चिखल यात अडकून पडल्यामुळे अनेक शस्त्रे बिघडली. असंख्य सैनिक मदतकार्यात गुंतले आहेत. या सगळ्याचा सीमावर्ती भागातील बंदोबस्तावर परिणाम म्हणुनच दहशतवाद्यांनी घुसखोरी सुरू केली.

लष्कराने तातडीने आपली स्थिती सुधारण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. एकाचवेळी संरक्षण यंत्रणा सीमावर्ती भागातील आपल्या चौक्या, बंकर, छावण्यांची डागडुजी करणे आणि नागरी वस्तीत मदतकार्य सुरू ठेवणे अशी कसरत करत आहे. केंद्र सरकार आणि संरक्षण यंत्रणा शस्त्रसाठ्याची हानी भरुन काढण्याचे काम करत आहेत. गेल्या दोन आठवड्यात सीमेपलीकडून काश्मीर खोर्‍यात अतिरेक्यांच्या घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावताना लष्कराने नियंत्रण रेषेवर लष्कर-ए-तोयबाच्या १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे.

भारताला सीमेपलीकडून वारंवार होणार्‍या गोळीबाराला अजुन अनेक वर्षे तोंड द्यावे लागेल. अशा परिस्थितीत आपण सीमेलगतच्या आपल्या भूभागात बंकर्स बांधले पाहिजे. सीमेवर तणाव निर्माण झाला तर काय करावे, या दृष्टीने सीमावर्ती भागातील नागरिकांना प्रशिक्षित केले पाहिजे. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाल्यास वारंवार स्थलांतर करण्याची वेळ जनतेवर येणार नाही. ते बंकर्समध्ये सुरक्षित राहू शकतात. शिवाय त्यांची नुकसान भर पाई लगेच केली पाहिजे.

पाकिस्तानला अवाजवी महत्त्व
या पार्श्‍वभूमीवर भारताची भूमिका काय असावी, पाकिस्तानची निरर्थक बडबड सुरू आहे. मात्र, राष्ट्राच्या सहनशक्तीची एक सीमा असते, हे पाकिस्तानला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे.

भारतात सत्तांतरानंतर धोरणात्मक बदल दिसून येत आहे. यापूर्वीच्या यूपीए सरकारला जो व्यापक जनाधार लाभला होता त्यात पाकिस्तानबद्दल आत्मियता बाळगणार्‍यांचा वाटा महत्त्वाचा होता. म्हणुन यूपीए सरकारने पाकबाबत जास्तीत जास्त नरमाईचे धोरण ठेवले होते. यूपीए सरकारने कधी पाकबाबत कठोर पावले उचलली नाहीत. हेच बंधन आता केंद्रात सत्तेत आलेल्या सरकारवर नाही. शिवाय या सरकारला लाभलेल्या सहकार्यांमधे पाकिस्तानविषयी आत्मियता असणार्‍यांचा गट सहभागी नाही. त्यामुळे पाकविषयी नरमाईचे धोरण अवलंबण्याचा प्रश्न येत नाही. यूपीए सरकारच्या काळात पाकिस्तानला जे अवाजवी महत्त्व देण्यात आले तशी परिस्थिती आता नाही.

पुढची भूमिका कशी हवी?
आपण पाकिस्तानशी कसे वागायला पाहिजे? पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण गेली ६६ वर्षे प्रयत्न करत आहोत. तरीही शांतता प्रस्थापित झालेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानला भारताकडून काश्मिर हवे आहे आणि ते आपण त्यांना कधीही देऊ शकत नाही. आपल्याला पाकपुरस्कृत दहशतवाद थांबवला गेला पाहिजे. मात्र पाकिस्तान त्याबाबत काहीही पावले उचलताना दिसत नाही.

दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प तात्काळ आणि पूर्णपणे बंद केले पाहिजेत. अफगाणीस्तान, नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंका या राष्ट्रांमधून पाकिस्तानतर्फे दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न केला जातो तो थांबला पाहिजे. पाकिस्तानकडून बांगलादेशी घुसखोरांना जे प्रोत्साहन दिले जाते ते पूर्णपणे थांबले पाहिजे. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे बॉम्बस्फोट घडवले जातात ते थांबले पाहिजेत. तसेच सीमेवरून मोठ्या प्रमाणात भारतात बनावट नोटा, शस्रास्त्रे, दारूगोळा, स्फोट पदार्थ भारतात पोहोचवले जातात ते थांबवले पाहिजे. तरच आपली शांतता चर्चा पुढे चालू राहू शकते.

जगात दुबळ्यांचे कोणी ऐकत नाही. ऐकले जाते ते समर्थ राष्ट्राचेच! सामान्य भारतीयांना भविष्यकाळ आशावादी वाटतो आहे.. आता देशात स्थिर सरकार आणि खंबीर नेतृत्व आहे. पाकिस्तानला अवाजवी महत्त्व न देण्याचे धोरण मोदींनी अवलंबले आहे. त्यामुळे त्या देशाने सीमेवरील आगळिकीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पाकिस्तान हा देश केवळ भारताची नव्हे तर सार्‍या जगाची डोकेदुखी आहे. पाकिस्तानला मुँहतोड जवाब मिळणे आवश्यक होते. ते भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तराने दिले आहे. काश्मीर प्रश्नाचे कायम भांडवल करून पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवाद पसरविण्याचे प्रयत्न केले. भारताचे तुकडे करण्याचे मनसुबे बाळगणार्‍या पाकिस्तानचे नाक ठेचणे व आंतरराष्ट्रीय संकेतांनुसारच आम्ही पाकिस्तानशी बोलणी करणार(अशा घोषणा करत राहणे) ही चाणक्यनीती भारताने यापुढे अवलंबावी.

भारतीय माध्यमांमधील पाकप्रेमी अस्वस्थ आहे. खोडकर पाकिस्तानला घरातील लहान भावाप्रमाणे सांभाळून घेतले पाहिजे, असे त्यांना वाटते. हे माध्यमवीर भारताला उपदेश करतात. मात्र, दहशतवादी गटांना चार शब्द सुनावताना यांची वाचा बसते. पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध असणं आवश्यक असलं तरी ते निर्माण करण्याची जबाबदारी भारताइतकीच पाकिस्तानचीही आहे. पाकिस्तानशी संबंध सुधारण्याआधी अमेरिका, रशीया, युरोप, म्यानमार, आसियान देश, इस्रायल, भारताचे अन्य शेजारी अशा किमान ५० देशांशी भारताला संबंध सुधारावयाला हवेत.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..