नवीन लेखन...

ढगांची पळवापळवी

एक दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या पूर्वीची दोन वर्षं कोरडी गेली होती. अवर्षणाचा तडाखा त्या भागाला बसला होता. खरं तर हा प्रदेशच मुळी पर्जन्यछायेतला आहे. सह्याद्रीच्या कड्यांच्या सावलीत वसलेल्या या प्रदेशावर ढग येतात ते त्या डोंगरराजीच्या पलीकडच्या कोंकणपट्टीत आपला रतीब घालूनच. उरलीसुरली धार तेवढी मग या प्रदेशाच्या वाट्याला येते. तेव्हा पाऊस फारसा न होणं हे काही त्या प्रदेशाला नवीन नाही. तरीही ती दोन वर्षं अगदीच भाकड गेली होती. लोक घायकुतीला आले होते. या कोरडेपणाला कोण जबाबदार आहे, पाण्यानं भरलेले घननीळ तिथं यायला का राजी होत नाहीत याचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि त्या प्रयासातच कोणीतरी तिथल्या त्या पर्वतांच्या माथ्यावर बसवलेल्या पवनचक्क्या दिसल्या. झालं. गरगर फिरणार्‍या त्या पवनचक्क्यांनी कोणाचं तरी डोकं गरगरवलं. आणि त्या चक्क्याचं ढगांना पळवून लावायला कारणीभूत असल्याचा जावईशोध लावला गेला. या निष्कर्षाची पाठराखण करणारा पुरावा कोणता असा सवाल कोणीही केला नाही. सगळे त्या पवनचक्क्यांच्या विरोधात बोलू लागले. सामान्य जन तसं बोलताहेत हे पाहून तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेणार्‍या राजकीय पुढार्‍यांना स्फुरण चढलं. त्यांनीही आंदोलनाची भाषा सुरू केली. काही तथाकथित तज्ञांनीही तसा निर्वाळा दिला. आणि हे आपण सर्वांनी निमूटपणे ऐकून घेतलं. जर पवनचक्क्या खरोखरच या अवर्षणाला कारणीभूत असतील तर मग जगभर जिथं जिथं पवनऊर्जानिर्मितीसाठी अशा चक्क्या उभ्या केल्या गेल्या आहेत तिथं सर्वत्र पावसानं तोंड फिरवलेलं असायला हवं. तसं झालं आहे का? आणि जिथं त्या नाहीत तिथं असे अवर्षणाचे मोसम उगवलेलेच नसले पाहिजेत. तसं तरी आहे का? एवढंच कशाला, या प्रदेशातही पवनचक्क्या उभ्या राहण्यापूर्वी कधीही

असे सलग दोन मोसम अवर्षण झालेलं नसलं पाहिजे, तशी परिस्थिती तरी आहे का? साधे सवालही आपण केले नाहीत. कोणत्याही दोन बाबी एकसाथ अस्तित्वात असल्या म्हणजे त्यांच्यामध्ये कार्यकारणभावाचाच संबंध असतो असं नाही. त्यांचं सहअस्तित्वच असतं. त्यातली एक बाब दुसरीला जन्माला घालायला कारणीभूत असते असा निष्कर्ष काढायचा तर असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा. तसा झाला नाही. पुढच्याच वर्षी आणि त्यानंतरच्या मोसमातही याच प्रदेशात धोधो, अगदी पूर येण्याइतपत पाऊस पडला आणि तो निष्कर्षही वाहून गेला. काय बोध घ्यायचा यातून?

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..