नवीन लेखन...

जर्मन बेकरी पुणे, हैदराबाद ते बंगळुरू : दहशतवादी हिंसाचार वाढवण्याची शक्यता

पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला आरोपी हिमायत बेग याला या स्फोटाच्या प्रकरणात पुण्याच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवले व गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. हा स्फोट २०१० च्या फेब्रुवारीत झाला होता. या कटातले अन्य पाच आरोपी फरार आहेत. जर्मन बेकरी स्फोटाचा कट वरच्या पातळीवर शिजला होता. हिमायत बेगला शिक्षा झाल्याने जर्मन बेकरी स्फोटाचा पूर्ण निकाल लागला, असे होणार नाही. ही शिक्षा झाली तरीही पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेत राहावेच लागणार आहे.

बेंगळुरमध्ये बॉम्बस्फोट
राज्य विधानसभा निवडणुकीला जोर आलेला असतानाच बुधवारी मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप कार्यालयासमोर बॉम्बस्फोट झाला. या घटनेत ८ पोलिसांसह १६ जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा या घातपातामध्ये हात असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. ऐन निवडणूक काळात दहशतवादी हल्ला झाला. २०१० मध्ये बेंगळुरातीलच चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेला बॉम्बस्फोटदेखील १७ एप्रिल रोजीच झाला. दोन्ही हल्ल्यात बरेच साधर्म्य आहे. भाजप कार्यालयासमोर पार्किंग करण्यात आलेल्या सुझुकी कंपनीच्या दुचाकीत बॉम्ब ठेवण्यात आला. टायमरच्या साहाय्याने दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. मल्लेश्वरम येथे बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली दुचाकी हैदराबाद येथून चोरून आणण्यात आली आहे.

अमेरिका आणि भारत या दोन देशांना केवळ तीन दिवसांच्या अंतराने बॉम्बस्फोटांनी पुन्हा एकदा हादरा दिला आहे. सोमवारी अमेरिकेतील बोस्टन येथे जगप्रसिद्ध मॅरेथॉन स्पर्धेत झालेल्या स्फोटात तिघा जणांचा मृत्यू झाला तर १७६ लोक जखमी झाले. अमेरिकेमध्ये झालेल्या ९/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या राज्यकर्त्यांनी हा हल्ला करणार्‍यांना वेचून आणि ठेचून काढण्यात येईल अशी अमेरिकन जनतेला ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे अल कायदाचा ओसामा बिन लादेन याला काही वर्षांनंतर पाकिस्तानात ठार केले. गेली १२ वर्षे अमेरिकेवर कुठलाही दहशतवादी हल्ला होऊ दिला नव्हता. पण असे दहशतवादी हल्ले कायमचे रोखणे, अमेरिकेसारख्या महासत्तेलाही शक्य नाही हे सोमवारी अमेरिकेत बोस्टन येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनी सिद्ध झाले आहे. या देशाने सुरक्षाव्यवस्थेवरील खर्च कितीतरी पटीने वाढवला. आपल्या गुप्तहेर यंत्रणेवरील खर्च करताना अमेरिकेला केवळ देशांतर्गत खर्चाचाच विचार करून चालत नाही तर जगात जेथे-जेथे आपल्या गुप्तहेर यंत्रणांचे जाळे आहे तेथील यंत्रणांवर हा खर्च करावा लागतो.

अस्थैर्य माजवण्याची एक दीर्घकालीन योजना
१९६५ व १९७१ च्या अपमानकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल झिया आणि कुख्यात आयएसआय यांनी संयुक्तपणे भारतात अस्थैर्य माजवण्याची एक दीर्घकालीन योजना आखली आहे. या योजनेला पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतावरून के प्लॅन असे संबोधले गेले. भारतात द्वेषाची बीजे रोवून जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य भाग होता. यातूनच स्वतंत्र खलिस्तानची मागणी, काश्मीरचे विभाजन करण्याचाही डाव रचला गेला. १९९३ मध्ये पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना पैसे, शस्त्रास्त्रे, प्रशिक्षण वगरे सर्व प्रकारची मदत करून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणले व त्यानंतरच्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे, भारताची प्रगती, त्याचा औद्योगिक विकास, विविध धर्मांच्या व विविध भाषिक लोकांमधील ऐक्य, नांदणारी शांतता व लोकशाही या गोष्टी पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत सलत आल्या आहेत. मुंबईच काय, भारतात कुठेही दहशतवादी हल्ले झाले तरी काही तासांतच लोक पूर्ववत आपले व्यवहार सुरू करतात. भारतात येणार्‍या पर्यटकांवरही या दहशतवादी हल्ल्यांचा फारसा परिणाम झालेला नाही.ज्या पाकिस्तानने भारताविरुद्ध दहशतवाद पोसला त्याच पाकिस्तानमध्ये दहशतवादाने आज थैमान घातले आहे. बॉम्बस्फोटांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे अधिकाधिक प्राणहानी आणि अर्थव्यवस्था खिळखिळी करणे. मात्र, आता दहशतवादाने पोळलेल्या देशांनी एकत्र येऊन वेगळी रणनीती आखणे आणि जागतिक दशतवादाचे कुरण होऊ पाहणार्‍या पाकिस्तानावर दबाव आणणे, आवश्यक झाले आहे.

राष्ट्रीय भावनेने त्याचा मुकाबला करण्याची गरज
दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे राजकारण न करता राष्ट्रीय भावनेने त्याचा मुकाबला करण्याची गरज आहे. राजकारणापलीकडे राष्ट्रकारण असते आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते आवश्यक असते, याची आमच्या येथील राजकारण्यांना जाणीवच नाही. कॉंग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी स्फोटाच्या या घटनेचे राजकारण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. दहशतवाद्यांच्या कारवायामुळे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान राजकारण्यांच्या या वृत्तीमुळे होत असते. भाजपा कार्यालयाजवळ हा स्फोट झाल्यामुळे राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला मिळेल, असे तारे शकील अहमद यांनी तोडले आहेत. भाजपानेच आपल्या राजकीय फायद्यासाठी हा स्फोट घडवून आणला, असा शकील अहमद यांच्या विधानाचा मथितार्थ आहे. पक्षाचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी शकील अहमद यांच्या भूमिकेशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. बंगळूरूच्या स्फोटाच्या या घटनेचे राजकारण न करता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. दहशतवाद ही गंभीर अशी राष्ट्रीय समस्या आहे. या दहशतवादानेच कॉंग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांचा बळी घेतला आहे, तरीसुद्धा त्यांचे डोळे कसे उघडत नाही. त्यामुळे दहशतवाद चिरडून टाकण्याचे कठोर धोरण स्वीकारणे ही काळाची गरज झाली आहे. असे धोरण आपण सर्व पक्षीय आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवत स्वीकारले नाही, तर एक दिवस दहशतवादच आपल्या देशाला चिरडून टाकेल याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे.

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेतील स्फोट
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अशा दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त केली. अमेरिकेतील स्फोट ही दुःखद घटना असून, स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांच्या दुःखामध्ये आम्ही भारतीय नागरिक सहभागी आहेत. “या घटनेची चौकशी करण्यासाठी भारत अमेरिकेला पूर्णपणे सहकार्य करेल असे सांगितले”. काय आश्वासक शब्द आहेत मनमोहनसिंग यांचे. त्यांचे हे आश्वासन ऐकून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा धन्य झाले असतील, आश्वस्त झाले असतील. मनमोहनसिंग यांच्यासारख्या (खंबीर, कर्तव्यकठोर, पोलादी, खंबीर) पुरुष माणसाची साथ मिळाल्याने बराक ओबामा याना हायसे वाटले असेल.

आतंकवादाचा मुकाबला कसा करावा याचे धडे आपल्या कडून घेण्याची दुर्दैवी वेळ अद्याप अमेरिकेवर आलेली नाही. आतंकवादाचा मुकाबला कसा करू नये, अतिरेक्यांचे लाड कसे करावेत, त्याना करदात्यांच्या पैशाने कसे पोसावे, त्यांच्या शिक्षेवरून सत्तेचे आणि मतांचे राजकारण कसे करावे, देशहिताला आणि देशाच्या सुरक्षेला तिलांजली कशी द्यावी, बहुसंख्यांक जनतेला कसे वार्‍यावर सोडावे याचे सोपे आणि सुलभ उपाय शिकण्याची वेळ जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांवर येईल तेव्हा त्यांना आपण तुमची “शिकवणी” लावू, पंतप्रधान साहेब, आपण आधी आपल्या देशातील बॉम्बस्फोटांचा निकाल लावा. दुष्काळ पडला आहे तिकडे आधी मदत करा. आधी तुम्ही आपल्या देशातील लोकांचे रक्षण करा मग तुम्ही दुसर्‍या देशाची काळजी करा ? पुढील वर्षी अफगाणिस्तानातून अमेरिका आपले सैन्य मागे घेणार आहे. त्यानंतर जी ‘पोकळी’ तयार होईल त्यात हिंसाचार वाढत जाणार आहे. कारण तालिबानी अतिरेकी भारतीय उपखंडात हिंस्र धिंगाणा घालायला मोकळे होतील. बोस्टन ते बंगळुरू साखळी ही त्यानजीकच्या भविष्याची नांदी आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..