नवीन लेखन...

खरा भक्त आणि भोंदूबाबा

त्या दिवशी मी निवांत चहाच्या टपरीवर बसलो होतो. कामचं नव्हतं काही. टाईम पास चाल्ला होता.
टाईम पास करणं ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही.काय करावं हेचं कळतं नाही मुळी .डोकचं बंद पडतं.
तेवढयात माने गुरूजी आला.माने म्हणजे सज्जन माणूस…खोट बोलायचं ते ठरवून ही तो बोलू शकत नाही. का तर ?
त्याला पाप लागेल. देवाधर्माचा लयं नाद. नाद म्हणजे निव्वळ याडचं त्याला. सकाळ संध्याकाळ पूजा करायची. नुसता देवदेव करायचं याड. आता कुणाला कशाचं कुणाला कशाचं याडं.
पूजा अर्चा करणं .वा-या करणं. फक्त दिंडीत जाण्यासाठी त्यांनी अख्या अर्जीत रजा खर्च करणारे ते सर. महान आहेतं.
कसा वेळ घालवायचा हा सुध्दा मोठा प्रश्न असतो?
एवढयात गुरूजी शब्दात प्रचंड सज्जनतेची ताकद असते.चहाचं ते फुळूक पाणी प्याल्यावर…ते जरा भितभितचं मला म्हणाले,” सर काय करता ? चल्ला गडावर .”
“गडावर….? माझा आश्चर्यचकित प्रश्न.( गड म्हणजे ऐतिहासिक वास्तू नाही तर ते देवस्थान आहे.असे अनेक गड आमच्या पंचक्रोशीत आहेत. अजून ही होताहेत.)
” हा… आज एकादशी आहे.योग चांगला.”
“पण…?”
“पण नाय बिण नाय.मी एकटाचं आहे.तेवढचं सोबत होईल.काम तर नाही दिसतं.तेवढाचं टाईम पास.”
” टाईम पास ही होईल आणि सज्जनांची संगत ही घडेलं.”मी अशी स्तुती केल्यावर ते लाजले थोडं .
” तस्स काही नाही हो.आहे देवाचा नाद थोडा.”
आम्ही निघालो.गडावर… त्याच्यांच गाडीत.जबरी ऊनं पडलं होतं.गडावर गर्दी होती. रांगेत उभा राहून दर्शन घेतलं. ते डायरेक्ट ही घेता आलं आसतं.कारणं माने गुरूजीचा तेवढा वशिला होता. तसा त्यांचा वट ही होता.तशा पध्दतीने दर्शन घेणं त्याना आवडत नाही. रांगेत घुसून….रांग मोडून दर्शन घेणारे बहाद्दर भक्त असतातचं की. पेशे देऊन मागच्या दाराने दर्शन घेणारे लक्ष्मी पुत्र ही असतातच ना ?
पांडुरंगचं दर्शन घेतलंआणि बाहेर आलो. इकडं पण मोठी रांग होती.
महाराजांच्या दर्शनासाठी ती रांग होती. स्पशेल दर्शन मंडपचं केला आहे. आम्ही पुन्हा त्या रांगेत उभा राहिलो.दहा पंधरा मिनटात आम्ही त्या दर्शन कक्षात पोहचलो. ते प्रसिद्ध महाराज ….मंचकावर बसले होते.तिथंचं दोनचार खुशमस्करे होते.त्याचे हास्य विनोद चालले होते.
महाराजाच्या हातात हिरे जडीत सुवर्ण अंगठया होत्या. त्या दोन्ही बोटात मिळून सहा होत्या.गळयात जाड जूड सोन्याचा कंढा होता. चैन नाही म्हणता येत त्याला. चैन लहान नाजूक असते.हा कंढाचं होता. चांगला करंगुळी एवढा जाड असेल.पाया समोर नोंटाचा खच पडला होता. चिल्लर पैशाचा ढीग होता. महाराजाच्या पायावर डोकं ठेऊन लोक पवित्र दर्शन घेत. आपआपल्या ऐपती प्रमाणे पैसे टाकत होते व धन्य होत होते.महाराज मात्र गप्पात दंग होते. त्याचं या लोकांकडे अजिबात लक्ष नव्हते. आम्ही दर्शन घेतलं. मी खिशात हात नाही घातला. हे माझं कृत्य कुणालाचं आवडलं नाही.त्यांच्या चेह-यावर तुच्छतेच्या रेषा उमटल्या.मला माझाच अभिमान वाटला.आमचे आदरणीय माने सरनी मात्र चक्क शंभर रूपायची कोरी करकरीत नोट त्यांच्या पायावर ठेवली व भक्ती भावाने डोक ही चरणी ठेवलं.मानेसरांच्या चेह-यावर एक अनोख समाधान ओंथबून आलं होतं.तिथं त्यांच स्वागत ही झालं.
“बसा..बसा गुरूजी. ” त्या टोळक्यातलं एक जण म्हणालं.
महाराजांनी बाजूला पडलेला एक नारळ उचलला. माने सराच्या हातात दिला.पुन्हा पायावर अक्षरश लोळाटी घेत माने सरनी तो कृपाप्रसाद स्वीकारला. महाराज ज्याच्यावर कृपादृष्टी टाकतात.त्यांना प्रसाद म्हणून नारळ देतात.ज्यांना नारळ मिळतो.ते भाग्यवान समजले जातात.माने गुरूजी बरोबर मी तिथं अपराध्या सारख बसलो. माने गुरूजीचं क्षेमकुशलं विचारलं. इकडंचं तिकडंचं …. माझी ओळख करून नाही घ्यावीशी वाटली त्यांना .महाराज पुन्हा राजकरण…समाजकारण या गप्पात बुडाले.एंकदरीत गप्पा ट्प्पा वरून महाराज सर्वपक्षीय असल्याचा माझा समज झाला.
महाराजांनी निपक्ष असावं अशी आपली भोळी अपेक्षा असू शकते.भाविक येत.चरणावर मस्तक आदळतं.पाच…दहा…पन्नास..शंभर..पाचशे रूपयाच्या नोटांचा ढीग वाढत चालला होता.मी बारकाईनं सारं पहात होतो.महाराजांचं लक्ष भाविक भक्ताकडे मुळीचं नव्हतं.ते गप्पात गुंग होते.
एवढ्यात एक वयस्कर म्हतारं तिथं आलं.ते रांगेतच आलं. रंग उडालेला फेटा…फाटकीचं बंडी.हातात काठी.
कपाळी मोठा गोपीचंदाचा गंध…त्यात अष्टगंध…त्या बंडीवरून मोठयाला मण्याची माळ…हातात तुळसीची चार पाच पानं..विशेष त्याच्या पायात चप्पलं नव्हती. तो म्हतारा आला.महारांजाच्या पायावर मस्तक ठेवलं. तृप्त हासला. काठी बाजूला ठेवली. बंडीतून एक पिशवी काढली.
त्यात तंबाखू असावी.हात घालून त्यांन चापून…चापून..एक पाच रूपायाचं नाणं काढलं.त्या पवित्र चरणावर ठेवलं.पुन्हा पूर्ण डोक पायावर ठेवून तो काठी टेकत टेकत निघून गेला. मी त्याच्याकडं पहात राहिलो. हो फक्त मीच त्याच्याकडं पहात होतो. सहा बोटात सोन्याच्या अंगठया असलेला महाराज….गळयात सोन्याचा कंढा आसलेला महाराज…आणि तो भाविक भक्त. संसारात असून ही भक्ती भावाने तुडुंब भरलेला त्या वारक-याचं मन.. तो एकादशी असून ही साधा चहा ही पेला नसेल.आणि…परमार्थात असून ही लोभात बरबटलेलं महाराज….
महाराजाची प्रंचड चीड मनात निर्माण झाली.
लहानपणी वडील मला म्हणायचं पांडूरंग कुणाच्या रूपात भेट देतो.आपण सा-याचा सन्मान करावा. दारावर आलेलं उपाशी पाठवू नये. देव आपली परिक्षा घेतो.
माझ्या अक्षरशत्रू आण्णाला हे कळतं होतं ते या पंडीत महाराजाला कळत का नसावं ?

परशुराम सोंडगे, पाटोदा
9673400928

कथा आणि व्यथा

Avatar
About परशुराम सोंडगे 11 Articles
परशुराम सोंडगे हे स्तंभलेखक असून बीड येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक सुराज्य, दैनिक चंपावतीप्रत्र वगैरे वृत्तपत्रांतून लेखन करतात. ते “आई गातो तुझी गाणी” हा कविता व कथांचा बहारदार कार्यक्रम सादर करतात.

1 Comment on खरा भक्त आणि भोंदूबाबा

Leave a Reply to PARESH DATTATRAY JOSHI Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..