नवीन लेखन...

किल्ले भरतगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कालावलची खाडी आहे. या खाडीच्या किनार्‍यावर नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेले मसुरे गाव आहे. मसुरे गाव भरतगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे.

मालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्ग वरील कणकवली येथूनही रामगडमार्गे मसुरे पर्यंत गाडी मार्गाने येता येते. समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डोंगरच दृष्टीपथात येतो. मसुरे गावापर्यंत मालवणकडून एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे.

भरतगडाच्या पायथ्याला असलेल्या दर्ग्यापासून गडावर जाणारा मार्ग आहे. या मार्गावर सध्या पायर्‍या केलेल्या आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला रेलिंग उभारलेले असून मधून मधून विश्रांतीसाठी बसण्याची सोय केलेली आहे.

पायथ्यापासून पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचतो. समोरची तटबंदी डावीकडे ठेवीत जाणार्‍या पायवाटेने गडाच्या प्रवेशद्वाराकडे जावे लागते. तटबंदी तोडून केलेल्या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. लहान माथा असलेला भरतगड आयताकृती आकाराचा आहे. चारही बाजुंनी तटबंदी आणि बुरुजांनी तो परिवेष्टीत आहे.

संरक्षणाच्या दृष्टीने विचार करुन मारा करण्यासाठी तटबंदी आणि बुरुजांची रचना केलेली आहे. सध्या गडाच्या माथ्यावर आंबा, काजूची लागवड केलेली दिसते. गडाच्या माथ्यावर अतिक्रमणकरुन ही लागवड केली गेली आहे. पण यामुळे डोंगरमाथा हा हिरव्यागर्द झाडीने फुललेला आहे. या गर्द झाडीमधे धनेश पक्ष्यांचा वावर मोठय़ाप्रमाणावर दिसतो. येथे एकावेळी १२ धनेश पक्षी पहायला मिळाले.

गडमाथ्यावर मधे बालेकिल्ला अथवा परकोट आहे. या परकोटात जाण्यासाठी दोन बाजुंना दोन दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा बुरुजाला लागूनच आहे. दरवाजाच्या आत पहारेकर्‍यांची देवडी आहे. डावीकडील तटबंदीजवळच एक लहानसे मंदिर आहे. चौथर्‍यावर हे मंदिर देवसिद्ध महापुरुषाचे असल्याचे तेथिल फलकावरुन कळते. काही काळापुर्वीच याचा जिर्णाद्धार केल्यामुळे हे मंदिर सुस्थितीमधे आहे. मंदिरासमोरच तुळशी वृंदावन केलेले आहे.

मंदिराच्या डावीकडे खोल विहीर आहे. मात्र याच्या पायर्‍या ढासळलेल्या असल्याने खाली उतरता येत नाही. पाणी काढण्याची काही सोय नाही. मंदिराच्या मागच्या बाजूला वाडय़ाचे भले मोठे जोते पहायला मिळते. सर्वत्र झाडीझुडपांचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे या परिसरात सावधगिरीनेच वावर करणे गरजेचे आहे.

डावीकडील तटबंदीमधे एक लहान दरवाजा आहे. याला चोर दरवाजा असेही म्हणतात. या दरवाजाच्या बाहेरील तटबंदीचा मोठा भाग सुटा होऊन ढासळला आहे. वेळीच याची दुरुस्ती झाली नाही तर तटबंदीचा मोठा भाग नामशेष होईल. या बालेकिल्ल्यातून बाहेर पडून दक्षिण टोकावरील बुरुजावर जाता येते. उत्तम बांधणीचा बुरुज पाहून पश्चिम टोकावर आल्यावर बालावलखाडीचे दृष्य दिसते. नारळी पोफळीच्या हिरव्यागर्द झाडीमधून संथ गतीने हेलकावणारी कालावलची खाडी खिळवून ठेवते. खाडीच्या पलिकडील तीरावर गर्द झाडीने झाकलेला भंगवतगड दिसतो.

तटाच्या कडेने परत फिरत आपण पुन्हा दरवाजा जवळ येतो. गडफेरी साधारणत: तासाभरात पूर्ण होते.

शिवरायांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला होता. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी आपल्या रक्षणासाठी येथे किल्ला उभारला. पुढे १८१८ मधे इतर किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला इंग्रजाना मिळाला तेव्हा गडावर अठरा तोफा असल्याची नोंद केलेली आढळते.

–प्रमोद मांडे

‘महान्यूज’ च्या सौजन्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..