नवीन लेखन...

श्री. मोरेश्वर – मोरगाव

बारामती तालुक्यात कर्‍हा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे हे मंदिर आहे. भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराला पायर्‍या असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पायर्‍या चढून गेल्यावर एका दगडी चौथर्यावर मोठा आता काळ्या पाषाणातला, गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदीपुढे मोठे, चपटी व दगडी असे कासव आहे. या कासावापुढे मुख्य मंदीर लागते. ते दगडी पाषाणातले असून तेथेही एक मोठा उंदीर आहे. मंदिराच्या गाभार्‍यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात आणि बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात शमी, मंदार, बेल यांची वृक्ष आहेत.

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. येथील मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहमनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मुघल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फुट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

मोरेश्वराची मनोहारी मुर्ती सभामंडपातूनच लक्ष वेधून घेते. मुर्ती पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची असून मुर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे आहेत. श्रीं च्या मस्तकावर नागराजाचा फणा पसरलेला आहे. तसेच त्याच्या डाव्या उजव्या बाजूस रिध्दी-सिध्दीच्या पितळी मुर्ती आहेत.

अष्टविनायक यात्रा प्रथेप्रमाणे येथील श्री मयुरेश्वराचे (मयुरेश्वर) दर्शन घेऊनच यात्रा सुरू केली जाते व सर्व अष्टविनायकांचे दर्शन घेऊन पुन्हा मोरेश्वराचे दर्शन घेतल्यावर ती संपूर्ण झाली असे समजले जाते.

श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय. हे क्षेत्र भूस्वानंद भुवन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील साडे तीन गणेश पीठांपैकी हे आद्यपी. या स्थानाचे महात्म्य मुद्गुल पुराणातील सहाव्या खंडात समाविष्ट आहे. भृशुंडी ऋषींच्या सांगण्यावरून ब्रम्हा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य या पाच देवतांनी येथे अनुष्ठान करून गणेश पिठाची स्थापना केली. या स्थानी गणेशाने मोरावर बसून सिंधू व कमलासुर दैत्याचा संहार केला. या युद्धात गणेशाचे मोर हे वाहन होते. त्यावरून येथील गणेशास मयुरेश्वर वा मोरेश्वर असे म्हणतात. येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली. चिंचवड येथील महान गणेश उपासक श्री मोरया गोसावी यांचे हे जन्म स्थान. येथे कर्‍हा नदीच्या पात्रात त्यांना गणेश मूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची चिंचवड येथे स्थापना केली. मोरगाव क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे. वर्षातून दोन वेळा गणेशाची पालखी चिंचवडहून येथे येते. चारशे वर्षां पूर्वी योगींद्र महाराजांचा येथे अवतार झाला. त्यांनी येथे योगींद्र मठाची स्थापना केली व संपूर्ण भारतात गणेश संप्रदायाचा प्रसार केला. गाणपत्य संप्रदायाचे हे प्रमुख केंद्र आहे. त्यांना २२८ वर्षांचे आयुष्य लाभले. येथील त्यांची समाधी व ध्यान मंदिर दर्शनीय आहे. मयुरेश्वर मंदिरात त्यांचा सुंदर पुतळा आहे. मयुरेश्वराचे दर्शन घेताना समर्थ रामदासांनी ’सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती उत्स्फुर्तपणे रचली. येथील विजया दशमीचा उत्सव रात्रभर चालतो. उत्सवात गणेशास तोफांची सलामी दिली जाते. नंतर गणेशाची पालखी गावात मिरवली जाते व गावातील सर्वांच्या वंशावळीचे वाचन होते.

अख्यायिका – गंडकी नगराचा राजा चक्रपाणी याला सुर्याउपासनेतून पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव त्याने सिंधू असे ठेवले. सिंधूने सुध्दा सुर्यदेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचे वरदान मिळवले. परंतु वरदान मिळताच सिंधूराज उन्मत झाला. त्रिलोक्याच्या लालसेने त्याने पृथ्वी जिंकली व देवांस गंडरी नगरीत बंदीवासी केले. त्याच्या जाचाला कंटाळून देवांनी संकट विमोचनार्थ गणेशाची आराधना सुरु केली त्यावर गणेशाने प्रसन्न होऊन, ‘लवकरच पार्वती मातेच्या पोटी जन्म घेऊन मी तुमची सुटका करेन.’ असा आशिर्वाद दिला. भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेशाने बालकरूपात अवतार घेतला. काही दिवसांनी मोरावर आरूढ होऊन गणेशाने सिंधू राजाबरोबर युध्द आरंभले. गणेशाने कमलासुराचा वध करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराचे मस्तक ज्या ठीकाणी पडले तेच मोरगाव. थोडय़ाच कालावधीत गणेशाने सिंधूराजाचा वध करून देवांना मुक्त केले. मोरावर बसुन दैत्यांचा पराभव केला म्हणून गणेश मोरेश्वर-मयुरेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. तर येथील स्थानास मोरगाव म्हणून ओळखू जाऊ लागले.

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..