नवीन लेखन...

झडी आठवणींची

बऱ्याच कालावधीनंतर म्हणा किंवा अगदी जिवाची लाही लाही केल्यानंतर मनाला आणि तप्त झालेल्या धरेला सुखावणारं वातावरण सध्या आपण सारे अनुभवतो आहोत. सर्वत्र पावसाचे आगमन झालेल आहे. कुठे दमदार तर कुठे नुसतीच हजेरी आहे. कुठे पावसाचा धुमधडाका सुरू आहे तर कुठे नुसताच शिडकावा. तरी देखील त्याच येणं सुखावणार. मनाच्या आशा पल्लवीत करणार. नवी स्वप्न जागवणारं. बाहेर चिंब वातावरण.. पण बरसणं नाहीच. आकाशात ढगांची नुसतीच गर्दी दाटलेली. हवेच्या झुळकीनं इकडुन तिकडे त्यांची पळापळ चाललेली. मनाच्या आकाशातही आठवांची अशीच काहीशी गर्दी होत असते. कुणाची तरी याद मनाला छेडते अनं मग मन त्या आठवात डुंबत जातं. पार खोल खोल जात असताना काय काय आठवत जातं…

मनाचा डोह लय भारी. काय नसतं हो त्याच्यात.. समुद्राची अथांगता सामावेल अशी त्याची क्षमता. गगनाची.. अवकाशाची मर्यादा स्पष्ट करतील अशी त्याची विस्तारणारी क्षितीजे.. समोरच्याच्या मनाचा ठाव घेण्याची विलक्षण क्षमता.. स्वत:ला सामर्थ्यवान समझणाऱ्या मनाचा कोपरा मात्र काही वेळा रिताच राहतो. रितेपणात आठवणींची झडी लागून असते काही वेळा मनाला. मग ही झडी काही केल्या लवकर जात नाही. ती सतत ओलं करत असते.. चिंब करत असते.. मनाची सुपीक माती. मग त्यातून उगवत राहतं.. आठवणींची झाडं.. ही झाडं वाढत जातात.. फोफावत जातात.. त्यांना वाटेल तशी ती वाढतात.. वेडी वाकडी. कधी अगदीच सरळ.. पण वाढतात.. ती खुंटत नाही.. कारण झडीच तशी लागलेली असते.. मनाच्या मशागतीला पोषक ठरणारी.

आठवणींच्या झडीत चिंब झालेलं मन.. हरखुन गेलेलं असतं.. स्वत:ला, भोवतालाला विसरलेलं असतं. त्याला आठवत राहतं.. लहानपणापासुन आईनं केलेलं संस्कार.. बाबांनी दिलेली लढण्याची जिद्द… शाळेत गेल्यावर पाटीवर काढलेलं पहिलं वेडवाकडं अक्षर.. चुकल्यानंतर गुरूजींनी पाठीत हाणलेला धपाटा.. पाठीवर वळ उमटला तरी त्यातही गंमत असल्याची जाणीव नंतर होऊ लागते. गुरूजींनी दिलेल्या धपाट्यातही त्यांच्या प्रेमाची झलक पहायला मिळायची. मग प्रार्थनेच्या वेळी समोरच्या मित्राचा शर्ट ओढण्याची ती आठवण कशी बर पुसता येईल. शाळेच्या आवारात दंगा करताना झालेली पडझड.. पडताना मित्रांनी सावरलेलं… काही वेळा मित्रांशी झालेली हमरी-तुमरी अन पुढच्या क्षणाला होणारी घट्ट मैत्री. मैत्रीचा हा धागा घट्ट घट्ट होत जातो.. काळाच्या प्रवाहात त्याचे घट्टपण अधिक गहिरे होत जाते. कालांतराने शाळेतील मित्र दुरावतात.. मात्र त्यांची आठवण मनात कायम राहते… झडी सारखी. आठवणींची ही झड काही केल्या दूर जात नाही.. सोडून..

व्यवहारी जगात वावरताना आपण वरवर व्यवहार जपत असतो.. व्यवहाऱ्या सारखे वागत असतो.. पण मन मात्र तसचं असतं आठवणींच्या झडींत भिजलेलं.. चिंब झालेल.. जगाच्या पसाऱ्यात स्वत:ला सिद्ध करताना काही वेळेला तडजोडी केल्या जातात.. कराव्या लागतातही… पण आठवणींच्या या झडीशी आपणच आपले प्रामाणिक राहतो.. हा ठेवा आपलाच असतो… त्याला इतर कुणी हात लावू शकत नाही.. तो कुणी पुसू शकत नाही… हे मात्र खरं..

– दिनेश दीक्षित (११ जुलै २०१८)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

1 Comment on झडी आठवणींची

  1. खुपच छान! जे तुम्ही मांडलेलं आहे. ते खरच वास्तवदर्शी आहे. लहानपणाची दर्शन घडवणारं आहे. कारण वाचक जेव्हा मनापासून एखादा लेख वाचतो तेव्हा प्रस्तुत लेखासारखाच स्वतःला पाहतो. छान!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..