कोची येथील एका मीडिया कंपनीकडून इंडिया व्हाईब हा वेब टीव्ही सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतात त्या निमित्ताने वेबटीव्ही पहिल्यांदाच येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वेब टीव्ही ही कल्पना नवीन नाही, ती टीव्ही पाहण्याची एक वेगळी पद्धत आहे इतकेच म्हणता येईल. त्यालाच इंटरनेट टीव्ही किंवा इंटरनेट प्रोटोकॉल टीव्ही असेही म्हणतात. इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून जेव्हा एखादी व्हिडिओ किंवा ध्वनीफित आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा तो वेब टीव्ही असतो.
विसाव्या शतकापर्यंत टीव्ही पाहण्यासाठी आपण हवेतील किंवा केबल सिग्नल्सचा वापर करीत होतो. वेब टीव्हीमध्ये एक छोटा बॉक्स असतो तो तुमचा टीव्ही व इंटरनेट कनेक्शन यातील दुवा असतो. यात डाऊनलोड केलेली वेब पेजच्या स्वरूपातील माहिती टीव्हीवर वेगळ्या आकृतीबंधात पाहता येते. या वेब टीव्हीचे कार्यक्रम आपण संगणक, टीव्ही, मोबाईल किंवा आयपॉडवरही बघू शकतो. यात डेटा पॅकेट्सच्या रूपात सिग्नल्स येत असतात व त्यांचा वेब एक सतत प्रवाह सुरू असतो. वेब टीव्हीमध्ये केबल टीव्हीपेक्षा जास्त पर्याय प्रेक्षकांना दिलेले असतात. विशिष्ट प्रेक्षकवर्ग डोळ्यापुढे ठेवून केलेले कार्यक्रम त्यावर बघता येतात.
वेब टीव्हीमध्ये एखादा कार्यक्रम बघायचा राहिला तरी परत बघता येण्याची सुविधा असते. ऑन डिमांड कार्यक्रमांचीही सुविधा असते. १९९५ मध्ये स्टीव्ह पेरलमन व फील गोल्डमन यांनी पहिल्यांदा वेबटीव्हीची संकल्पना प्रत्यक्षात आणली. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ९८ मध्ये वेबटीव्ही बघण्यासाठी विंडोजची व्यवस्था केलेली होती. वेबटीव्ही बघण्यासाठी संगणकाची क्षमता दर सेकंदाला एक मेगाबाईटपेक्षा जास्त असावी लागते. किमान २५ टक्के एचडीटीव्हीमध्ये (हायडेफिनेशन) वेबटीव्ही प्रक्षेपण पाहण्यास आवश्यक तांत्रिक सुविधा असतात.
Leave a Reply