नवीन लेखन...

प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन

Water Management in Ancient India

पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजांचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात. अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद ला बांधलेले ‘थत्ते नहर’ असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणी पुरवठ्याची रचना असो. बऱ्हाणपूर ला आजही अस्तित्वात असलेली, पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो की पंढरपूर – अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. ‘समरांगण सूत्रधार’ ह्या ग्रंथाच्या आधाराने राजा भोज ने बांधलेला भोपाळ चा मोठा तलाव असो… अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.

वराहमिहिराने आजच्या वैज्ञानिकांसारख्या नोंदी करून ठेवल्या, ज्या महत्वपूर्ण आहेत. त्याने पंचावन्न वृक्ष व वनस्पतींचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्याच प्रमाणे त्याने मातीचे वर्गीकरण देखील विस्ताराने केले आहे. ह्या सर्व निरीक्षणांचे निकष ही त्याने मांडून ठेवले आहेत. त्यातील काही आहेत –

1. भरपूर फांद्या व तेलकट साल असलेले ठेंगणे झाडं असेल तर पाणी आढळते.
2. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर पृष्ठ्भागाजवळ पाणी असते.
3. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकलेली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.
4. जेंव्हा जमीन गरम झालेली असते तेंव्हा एखाद्याच ठिकाणी ती थंड लागली तर तिथे पाणी असते.
5. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर हमखास पाणी मिळते… वगैरे.

अशी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवलेली आहेत.

खरी गंमत तर पुढेच आहे.

वराहमिहिराचे हे प्रतिपादन खरं की खोटं, हे ठरविण्यासाठी आंध्र प्रदेशातल्या तिरुपती मधल्या श्री वेंकटेश्वर (एस. व्ही.) विद्यापीठाने सुमारे पंधरा – सोळा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विहिरी खोदुन पाहायचे ठरविले. वराहमिहिराच्या निरीक्षणानुसार पाणी मिळण्यास योग्य ठरतील अश्या जागा निवडल्या आणि सुमारे ३०० बोअर घेतले. (बोअरवेल खणल्या). आश्चर्य म्हणजे ९५% ठिकाणी पाणी लागले. अर्थात वराहमिहिराचे निरीक्षण योग्य होते हे सिध्द झाले. मात्र पुढे दुर्दैवाने हा प्रकल्प सरकारी लालफिताशाहीत अडकला आणि तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही..!

गढा-मंडला (जबलपुर संभाग) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचं राज्य होतं. अगदी मुगलांना, आदिलशाहीला किंवा कुतुबशाहीला सुध्दा त्यांना जिंकता आलं नव्हतं. मात्र तरीही आपल्या देशात हा प्रदेश म्हणजे मागासलेला मानला गेला. अर्थात खरं चित्र तसं नव्हतं. एक खूप सुरेख हिंदी पुस्तक आहे – ‘गोंड कालीन जल व्यवस्थापन’. यात सुमारे पाचशे ते आठशे वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात किती उत्कृष्टपणे पाण्याचं नियोजन केलं होतं याचं वर्णन आहे. या नियोजनाचा फायदा म्हणजे कुठल्याही दुष्काळाची किंवा अवर्षणाची झळ ह्या गोंड प्रदेशाला कधीही लागली नाही.

जबलपुर शहरात गोंड राणी दुर्गावती च्या काळात (अर्थात पाचशे वर्षांपूर्वी) ‘बावन ताल आणि बहात्तर तलैय्या’ बांधले गेले (तलैय्या – लहान तलाव). हे तलाव नुसतेच खोदून बांधले गेले नव्हते तर जमिनीच्या ‘कंटूर’ प्रमाणे त्यांची रचना आहे. काही तलाव तर आतून एक-दुसऱ्याशी जोडले गेलेले आहेत. आज त्यातले अनेक बुजले असूनही उरलेल्या तलावांमुळे जबलपुर मधे, अगदी आज ही पाण्याची पातळी बऱ्यापैकी चागली आहे आणि येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. मग त्या काळात पाण्याची, शेतीची आणि निसर्गाची काय समृध्दी असेल..!!

याचाच अर्थ, पाण्याचे महत्त्व, पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्या जवळ होते. काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पध्दतीने वापरत होतो. आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम – सुफलाम होता..!

मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आज ही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी. आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..!

दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जल व्यवस्थापन विसरलो अन आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय, १४४ कलमं लावतोय, युध्द खेळतोय..!!

आपल्यालाच आपल्या समृध्द ज्ञानाचा, वारश्याचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं होणं अटळ आहे..!!

2 Comments on प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन

  1. नमस्कार.
    ही माझी पुढील मेल.
    – वराहमिहिराच्या ग्रंथाचा आपण उल्लेख केलेला आहे, त्याचें नांव आहे ‘बृहत्-संहिता’.
    – दाते पांचांगात लेले हे पावसाचें भविष्य लिहीत असत. ते, बृहत्.संहिता, तसेंच पराशरांचें कृषि-पराशर, या ग्रंथांचा आधार घेत असत. त्यांनी या विषयावर हवामान खात्याच्या एका सेमिनार मध्ये १९८५साली निबंधही वाचला होता. इस्रोमधील कांहीं वैज्ञानिक त्या काली त्यांचा सल्ला घेत असत.
    – समरांगण सूत्रधार’ हा ग्रंथ १६व्या – १७व्या शतकातील आहे, असें माझ्या वचानात -ऐकण्यात होतें. तसें असल्यास, ११व्या शतकातील रााज भोज यानें त्याचा आधार घेतला असेल असें संभवत नाहीं. तरी, आपणांस माहीत असल्यास, या ग्रंथाच्या काळाचा खुलासा केल्यास आभारी होईन.
    सधन्यवाद.
    सुभाष नाईक.

  2. नमस्कार.
    उत्तम व माहितीपूर्ण लेख. मध्ययुगीन खूपच चांगली महिती. धन्यवाद.
    – सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या काळातील, ‘लोथल’ तर सर्वांच्या माहितीचें आहेच, जेथें गोदीमध्ये पाणी आात घेण्यासाठी व बाहेर सोडण्यासाठी नदीतून कालवे बांधले होते. असें कालवे व चार्‍या शेतीसाठी सुद्धा होत्या. (नवीन संशोधनाप्रमाणें, या संस्कृतीचा काल इ.स.पू. ८००० असा आहे, व या संशोधनात सरकारचा आर्कियॉलॉजिकल सर्व्हे विभागही सामील आहे ) .
    – त्याच काळी, ( जशी आधुनिक काळात लेव्हल प्रमाणें ‘बंडिंग’ ची पद्धत आहे, त्याचप्रमाणें ) , शेतीसाठी पाणी अडवायला/ वळवायला. ‘बंध’ बांधले जात, ज्यांना ( नंतरच्या काळात) ‘गबरबंद’ हें नांव पडलें आहे. असे अनेकानेक तत्कालीन गबरबंद आपल्याला ( खास करून पुरातत्व-शास्त्रज्ञांना ) बलुचिस्तान वगैरे मध्ये ( आतां पाकिस्तानात) आजही पहायला मिळतात.
    सुभाष नाईक.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..