विकासनीतीचा महाविजय !

राजकारण विकासाच्या मुद्दयांवर चालतं कि भावनिकतेवर? या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलं तर शंभर पैकी किमान ऐंशी लोक जात, धर्म, तथाकथित राष्ट्रवाद आदी भाविनक मुद्यांचेच उत्तर देतील ! कारण, सध्याच्या राजकारणाची अवस्थाच तशी झाली आहे.. गेल्या काही वर्षातील निवडणुका बघितल्या तर त्यात विकासाच्या अजेंड्यापेक्षा धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांचीच अधिक चलती राहिली असल्याचे दिसून येते. निवडणुका आल्या कि एकदा जातीचा, धर्माचा, राष्ट्रवादाचा मुद्दा बाहेर काढायचा आणि लोकांच्या भावनिकतेशी खेळ करून निवडणुका जिंकायच्या, हा आजच्या राजकारणाचा खरा फंडा.. बाकी, विकास, प्रगती, जनमानसाच्या सुविधा हे मुद्दे फक्त जाहीरनाम्यात छापण्यासाठी आहेत, अशी धारणा आजघडीला बहुतेकांची झाली होती. मात्र दिल्लीच्या निवडणूक निकालाने ह्या सगळ्या धारणांना फाटा देत राजकारणाचे सगळे संदर्भ बदलवून टाकले आहेत. एकाद्याकडे जर खरोखर विकासाचे व्हिजन असेल, आणि काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर नुसत्या विकासकामांच्या भरवश्यावर देखील निवडणूक जिंकता येते.. नुसती निवडणूक जिंकता येत नाही तर, विकासाचं राजकारण करून द्वेषाच्या, धर्मकारणाच्या, ध्रुवीकरणाच्या राजकारणाला धोबीपछाड देता येते, हा धडा दिल्लीकरांनी संपूर्ण देशाला दिला आहे. भावनिक राजकारण करण्यापेक्षा आता खऱ्या अर्थाने विकासाचे राजकारण केलं पाहिजे, हा संदेश दिल्ली निवडणुकीतून राजकीय पक्षांनी घ्यायला हवा !

नुकतेच दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे तख्त काबीज केले आहे. 70 पैकी 62 जागा मिळवित ‘आप’ ने मिळवलेला हा विजय अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण म्हटला पाहिजे. कारण दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेचे बनवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अक्ख केंद्रीय मंत्रिमंडळ, सुमारे 200 च्या वर खासदार, डझनभर आजी-माजी मुख्यमंत्र्यांपासून ते देशभरातील भाजपाच्या नेत्या, कार्यकर्त्यांच्या प्रचंड फौजा दिल्लीच्या मैदानात उतरल्या होत्या..दिल्ली पोलिसांसह बहुतांश सरकारी यंत्रणा दिमतीला असतांनाही आम आदमी पक्षाने त्यांना सहजपणे धूळ चारली, ही राजधानी दिल्लीसाठी अभिमानाची बाब म्हटली पाहिजे. यासाठी सुजाण दिल्लीकरांचे कौतुक करावे लागेल. भाजपने दिल्ली निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक भावनिक, धार्मिक मुद्दयांना हात घातला. एनआरसी वरून शाहीणबागेत सुरु असलेल्या आंदोलनाचे भांडवल करून विषारी प्रचार केला गेला. देशभक्ती आणि देशद्रोहाच्या नवनव्या व्याख्या करून ही निवडणूक भारत पाकिस्तानच्या पातळीवर नेवून ठेवण्यात आली. परंतु विवेकशील दिल्लीवासीयांनी आपला संयम ढळू न देता विकासनीतीला साथ दिली, हे उल्लेखनीय आहे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

एका बाजूने विषारी, विखारी प्रचार होत असताना केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने दाखविलेला प्रगल्भपणाही कौतिकास्पदच म्हणावा लागेल. भाजपच्या काही नेत्यांनी बोलताना सगळे नीतिनियम सोडून अगदी खालच्या पातळीवर टीका केली. केजरीवाल यांना देशद्रोही संबोधण्यात आले. पण अरविंद केजरीवाल यांनी ह्या सगळ्या आघाताना अनुल्लेखाने प्रभावहीन केले. आरोपाला प्रत्यारोपाने उत्तर न देता त्याकडे दुर्लक्ष करून समोरच्याचा उद्देश निष्प्रभ करता येतो, हा धडा अरविंद केजरीवाल यांनी देशातील समस्त राजकारण्यांना दिला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी आपल्या तिखट प्रचारावर भाष्य करावं, त्याला तितक्याच तिखट शब्दात प्रतिउत्तर द्यावं, ही भाजपची अपेक्षा होती. तसं झालं असतं तर दिल्लीच्या निवडणुकीत मतांचे धुर्वीकरन होऊन त्याचा फायदा भाजपाला झाला असता. पण केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला विवेक ढळू न देता जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरच चर्चेचा रोख कायम ठेवला आणि त्यात ते यशस्वी झाले, हे निवडणूक निकालावरून स्पष्टपणे दिसून येते.

व्यवस्था बदलाच्या विरोधात नुसती चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून व्यवस्थापरिवर्तन करण्याचे ध्येय ठेवून अरविंद केजरीवाल राजकारणात उतरले होते. त्यांच्या मागील सत्ताकाळावर नजर टाकली तर केजरीवाल सरकारने खऱ्या अर्थाने जनमानसाच्या हितासाठी प्रशासकीय सिस्टीम राबविल्याचे दिसून येते. शाळा, आरोग्य, वीज, पाणी आदी मूलभूत गरजांसाठी आप च्या सरकारने नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा नुसत्या अभिनंदनीय नाही तर अनुकरणीय आहेत. त्यामुळे दिल्लीकर आपच्या पाठीशी उभे राहिले तर यात नवल काहीच नाही. याउलट भाजप सरकारने दिल्लीच्या राजकारणात अनेकदा ढवळाढवळ केल्याचे सर्वश्रुत आहे. विरोधासाठी विरोधाचे राजकारणच भाजपाला भोवले, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. राहिला विषय काँग्रेसचा तर सुरवातीच्या काळात काँग्रेस पूर्ण ताकतीने निवडणुकीत उतरली होती. पण मध्यात काँग्रेसने ही निवडणूक सोडून दिल्यासारखी परिस्थिती दिसून आली. आता हे ठरवून झालं कि काँग्रेसचं अवसान गळालं होत? हे काँग्रेसलाच माहित. पण मत विभाजन टळलं आणि त्याचा पूर्ण फायदा आम आदमी पक्षाला झाला. आता या निकालाचा देशाच्या पुढील राजकारणावर निश्चितच वेगळा परिणाम दिसून येणार आहे. विकासाच्या राजकारणासमोर धर्मकारणाचे आणि धुर्वीकरणाच्या राजकारणाचे सगळे अस्त्र नाकाम होतात, हे सगळ्या देशाच्या समोर आले आहे. त्यामुळे पुढील राजकारणात भाजपासारख्या पक्षाला आता आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे. जुमलेबाजी आणि नुसत्या भावनिक मुद्याच्या आधारे जनतेला फार काळ गृहीत धरता येत नाही, हा संदेश दिल्लीच्या निवडणुकीने दिला आहे. जुमलेबाजीपेक्षा विकासाचा अजेंडाच आजही मूलगामी, टिकावू आणि प्रभावी असल्याचे दिल्लीच्या निवडणुकीत दिसून आले. हाच अजेंडा देशाच्या संपूर्ण राजकारणात दिसून आला तर जुमलेबाजांची धूळधाण उडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आता तरी जुमलेबाजी करणारे शहाणे होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही..!!

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 58 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..