नवीन लेखन...

विहीण की मैत्रीण (कथा)

“अग नीता, आईला फोन केलास का? आज तिचा वाढदिवस आहे ना?”

“नाही .. अहो आई, मेसेज केला आहे सकाळीच. फोन जरा निवांतपणे करेन.”

“अग सध्या सर्व घरी असताना तुला कुठे मिळणार निवांतपणा. मी पोळ्या करते. तोपर्यंत तू फोन करून ये. मला माहित होते. तुझ्यासाठी थांबले तर, माझेपण बोलणे होणार नाही. आमच्या सकाळीच गप्पा झाल्या. अगदी आपल्या दोन वर्षांपूर्वीच्या युरोप ट्रिप पासून ते पुढचा चौथ्या लाॅकडाऊनची घोषणा संपून नवीन निर्बंध काय येतील इथपर्यंत.”

इतका छान सुसंवाद ऐकून दचकायला नाही ना झाले? दोन विहिणी. दोन मैत्रीणी. प्रथम पासूनच होत्या का त्या मैत्रीणी? ऐकायचे आहे का , ‘नीता, तीची ए आई आणि अहो आईची गेल्या तेवीस वर्षांची कहाणी…?”

सुदिप आणि नीता एका काॅलेजमधील. नीता औरंगाबादवरून मुंबईला शिकायला आलेली. दिसायला सुंदर आणि गाण हा तिचा श्वास होता. सुदिपने आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगितले, तेव्हा फक्त “मराठवाड्यातील गावाकडची सून नको” असं म्हणून त्याच्या आईने नाकारले होते. “तिचं कुटुंब तिकडचे असले तरी ती इथे मुंबईत शिकते आहे. त्यामुळे तिला मुंबईतल्या घरात ॲडजेस्ट व्हायला जड जाणार नाही.” असे सांगून सुदिपने आईचे बोलणे खोडून काढले होते. पण मुलगी-जावई परदेशात राहाणार. आणि सूनेचे माहेर ? सुरूवातीला सासूबाईंनी आपला तोरा दाखवायला सुरवात केली. 

नीता तीन बहिणींमधील सर्वात धाकटी बहिण. दोन बहीणीनंतर हा तिसरा चान्स घ्यायला जरा उशीर झाला होता. सगळ्यांची लाडकी. थोडीशी आळशी. त्यात शिक्षणासाठी बाहेर राहिल्याने सुट्टीला घरी आली की आईच्या हातचे हातात खायला मिळायचे.

तर नीताला सासरी स्वयंपाकघरात जवळपास मज्जावच होता. फारतर एक असिस्टंट म्हणून नीताचे काम असायचे. कधी चुकून नीताने भाजी केली तर ठरलेले वाक्य, “तुमच्यासारखी तिखट जेवणाची आम्हाला सवय नाही. मीच करत जाईन भाजी.” असे बोलून तिच्या उत्साहावर पाणी. अगदीच कणीक किंवा थालीपीठात साखर घालत नव्हत्या, हेच काय ते नीताला समाधान. आईच्या हातची चव आणायची कशी, असे विचारयाला त्याकाळी मोबाईलच काय फोनचा सुध्दा सुळसुळाट नव्हता. त्यामुळे आईचे तायांना सांगून गुळगुळीत झालेले वाक्य नीताला आठवायचे, “प्रत्येक घरची पध्दत असते. शिकून घ्यायची. त्या शिकत शिकत आपल्या स्वतःच्याच पद्धती बनवायच्या.”

कधी टाॅवेलच बेडवर राहिला किंवा पर्स बाहेरच्या दिवाणखान्यात ठेवली, अशी फुटकळ कारणे अहो आईंची बोलणी खायला नीताला पुरेशी असायची.

कधी संध्याकाळी दोघेजण फिरायला गेले आणि यायला रात्रीचे नऊ वाजले; तर यांच्या शिस्तीचा भंग. जेवणाच्या वेळा, दुपारच्या चहाची वेळ सुध्दा ठरलेली.

“तुम्ही दोघे जण जा. कधी तिथे उन्हाळा जास्त तर कधी थंडी नाही तर तिथले पाणी जड आहे.” अशी कारणे त्यांना पुरे असायची सूनेच्या माहेरी न जायला. 

सुरूवातीला नीताच्या आईच्या घरी फोन नव्हता. आठवड्यातून दोनदा तिची आई दुकानात जाऊन नीताला फोन करत असे. नीता जरा जास्त वेळ बोलू लागली तर अहो आईंचा चेहरा असा काही व्हायचा की यांनाच बील भरायचे आहे. स्वतःच्या मुलीचा फोन आला की मग मात्र बाकी सर्व कामे नंतर. नंतरचे दोन दिवस मुलीचे घर, तिथला चकचकीतपणा सर्वांच कौतुक. 

अशा छोट्या मोठ्या कुरबुरी ऐकून, आई मात्र नीताला सांगायची. “अग, या काय तक्रारी आहेत? भांड्याला भांड लागल की आवाज होणारच. थोडे दिवस जाऊन देत. फरक पडेल त्यांच्यामध्ये.” “अग आई, थोडे दिवस म्हणजे किती दिवस?” नीताचा चिडून प्रतिप्रश्न. “तू तुझं गाण चालू ठेव. शांत राहायला त्याने मदत होईल.”

पहिल्या दिवाळीत नीताच्या आईने दिलेली साडी सासूबाईंनी त्यांच्या घरच्या कामवाल्या मावशींना देऊन टाकली. मावशीबाई ती साडी नेसून आल्या तेव्हा नीताच्या लक्षात आले. तीची चिडचिड झाली. तिने आईला तक्रार केली. त्यावर आईने तिला समजावले, “अग मी त्यांना साडी दिली, म्हणजे माझा त्याच्यावरचा अधिकार संपला. त्याचे पुढे काय करायचे हे त्यांनी ठरवावे. तू कशाला चिडचिड करतेस?” आईच्या या स्वभावाचा नीताला नेहमी राग यायचा. पण आईने इतकी वर्षे स्वतःच्या संसारात संयम राखून दोन्हीकडची माणसे कशी सांभाळली हे सुध्दा तिने बघितले होते. त्यामुळे ती गप्प बसायची. 

लग्नाला एखादे वर्ष पूर्ण झाले असेल. नीताला दिवस गेले. पहिले बाळंतपण माहेरीच होणार. नीता माहेरी जायची तयारी करत होती, तर सासूबाई परदेशवारीची. युरोपमध्ये फिरायला जायचे आणि तिथून पुढे लेकीकडे. असा त्यांचा बेत होता. ट्रिपच्या दोन दिवस आधी सकाळी अकराच्या सुमारास नीताचे सासरे बॅंकेच्या कामाला घराबाहेर पडले. नेहमीचाच रस्ता. तरीही क्राॅस करताना एका कारने त्यांना उडवले. घराजवळच ॲक्सिडेंट झाला असल्यामुळे शेजारच्या लोकांमुळे मदत लवकर मिळाली. नीताने सुदिपला बोलवून घेतले. दुखापत बरीच झाली होती. त्यांना शुध्दिवर यायला एक दिवस गेला. मणक्याचे आणि पायाचे ॲापरेशन करायला लागणार होते. इतके करून सुध्दा परत स्वतःच्या पायावर चालता येईल याची खात्री नव्हती. बाबांची परिस्थिती बघून  अहो आई हबकून गेल्या. हिंमत हारून रडायला लागल्या. 

“काय करायचे? पुढे काय?” असा प्रश्न सुदिप आणि नीताला पडला. सुदिपने नीताला विचारले,”तुझी आई इथे येऊन नाही का राहणार?” “माझी आई आणि इथे?” “अग त्यात काय झाले? माझी आई तिच्या मुलीकडे नाही का जात तसेच तुझी आई तिच्या मुलीकडे.” “आई इथे असताना?” “हो. तू काळजी करू नकोस.” नीताने आईला फोन लावला. आईने तयार झाली. चार दिवसांनंतर बाबांचे ॲापरेशन करायचे ठरले. 

या धावपळीमुळे किंवा मानसिक ताणामुळे नीताला बाबांच्या ॲापरेशनच्या आदल्या दिवशीच हाॅस्पीटलमध्ये ॲडमिट करायला लागले. एकाचवेळी दोन पेशंट दवाखान्यात. नीताला मुलगा झाला. तर ठरल्याप्रमाणे बाबांचे ॲापरेशन झाले. सुदिपची ओढाताण होत होती. पण आईमुळे सगळं सांभाळून घेतलं जात होतं. 

नीता घरी आली होती. बाबांना घरी यायला अजून दहा-पंधरा दिवस लागणार होते. अहो आई हाॅस्पीटल मध्येच राहात होत्या. उद्या बाबांना घरी घेऊन येणार होते आणि अचानक दैवाचे फासे उलटे पडले. बाबांना हाॅर्ट अटॅक आला. काही तासातच त्यांची प्राणज्येात मालवली. 

एका डोळ्यात हासू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू. या घटनेतून बाहेर पडायला काळ हेच एक औषध होते. तरीही आईच्या शब्दांनी जादू केली. नीताच्या आईने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्यांचा हात हातात घेतला. “ताई, मी लहान तोंडी मोठा घास घेते. राग नका मानू नका. खर तर निवृत्तीनंतरच सहजीवन चालू होते. या वयातच एकमेकाना आधाराची गरज असते. तुमचा नातूच बाबांच्या रुपाने परत आला आहे. आपण त्याला बाबांचेच नाव देऊ या. मुलीचे पहिले बाळंतपण माहेरी करायचे असते. मी इथे येऊन केले इतकेच. नीता आणि नातू सध्या इथेच राहतील. दोन-चार महिन्यानंतर मी नीताला थोडे दिवस घरी घेऊन जाईन. तेव्हा तुम्ही लेकी कडे जा काही दिवस. तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे आपण ठरवुयात.” 

आईने नीताला देखील समजावले, “कदाचित तुला अत्ता थोडा त्रास होईल. त्यांची मनस्थिती समजून घे. तू सध्या इथे राहिलीस तर त्यांना बरे वाटेल. आपल्या नातवाकडे बघून त्या आपल्या दुःखातून लवकर बाहेर येतील.” “हो, पण तू असं कशाला सुचवलेस की बाबांचे नाव द्यायचे?” “अग, त्यात काय झाले? दोन वेगळी नावे नाही का ठेवतां येत? इतक्या छोट्या गोष्टीचा कशाला विचार करतेस? बारस कधी करायचे ते ठरवू नंतर.”

नीताला थोडे वाईट वाटत होते. आईवर तिचा विश्वास होता. मुलींच्या संसारात किती लक्ष घालायचे याचे नीताच्या आईचे गणित पक्के होते. यामुळे मुली आत्मनिर्भर होतात यावर त्या ठाम होत्या. आलेला प्रसंग सर्वांनाच खूप काही शिकवून गेला होता. अहो आईं हळूहळू आपल्या दुःखातून बाहेर येऊन नातवाशी खेळू लागल्या. आपले परदेशात जाणे त्यांनी काही काळ पुढे ढकलले होते.

यथावकाश काळाची चक्रे फिरत होती. सर्वांची आयुष्य पुढे सरकत होती. नीताला दुसरा मुलगा झाला होता. मुलं मोठी होत होती. अहो आई कधीतरी मुलीकडे जाऊन येत होत्या. सुदिप आणि नीता सुध्दा त्यांना आपल्या बरोबर ट्रिपला घेऊन जात होते. आजी नातवंडांबरोबर माॅडर्न होऊन डिजीटल जगात यायचा प्रयत्न करत होती.

घरांमध्ये वाद झाले तरी संवाद संपला नाही की, आपोआप नाती सांभाळली जातात.” हे नीता हळूहळू शिकत गेली. म्हणूनच अहो आईंची सुरूवातीला वाटणारी भीती कमी होऊन, त्याची जागा आता सासू आणि मुलगी अशी होत होती.

दोन वर्षापूर्वी त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा करायचा होता. तेव्हा नीताने सुदिपला सुचविले, “अरे, जवळपास वीस वर्षे झाली बाबांना जाऊन. आईंची युरोप ट्रिप राहिली, ती राहिलीच. यावेळेस त्यांच्या वाढदिवसाला त्यांना आपण युरोपला घेऊन जाऊ यात का?” “अरे वा!  छानच कल्पना आहे. आपण इतके दिवस अनेक ठिकाणी फिरलो. माझ्या कसे लक्षात आले नाही. मी तयारीला लागतो. तू आईला आधी सांगू नकोस.” ट्रिपची तयारी सुरू झाली. ट्रिपच्या काही दिवस आधी जेव्हा अहो आईंना सांगितले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी मुलाला पटकन सांगितले, “सुदिप आपण नीताच्या आईला देखील घेऊन जाऊ यात. त्या बरोबर असतील तर माझाही वेळ छान जाईल. तुम्हाला दोघांना सुध्दा फिरताना सतत माझी काळजी नको.” सुदिप आणि नीताला हा अनपेक्षित धक्का होता. “आई, बघतो कस जमेल ते. ट्रॅव्हल कंपनीशी बोलवून ठरवतो काय ते.” नंतर दोघांनीही विचार करून तिच्या आईची सुध्दा व्यवस्था केली. अशा रितीने त्या चौघांची युरोप ट्रिप पार पडली. 

अहो आई वयोमानाने थकत होत्या. पण या नव्या कोरोना आणि लाॅकडाऊनच्या मध्ये नीताला होईल तशी मदत करून आपला खारीचा वाटा उचलत होत्या. कधी छोटी छोटी भांडी घासून तर कधी पोळ्या करून तर कधी बसल्या जागी भाजी निवडून.

अहो आईंच्या बोलण्याने भानावर आलेली नीता आईला फोन करायला गेली. तिच्या मनांत आले, “येत्या काही वर्षात आपली सुध्दा बढती होईल. आपल्याला जमेल का असे मैत्रिणीचे नाते जपायला आपल्या विहिणीबरोबर?”

अशी ही नीताची साठाउत्तराची कहाणी सफळ संपूर्ण झाली. ए आई आणि अहो आई यांतील बॅलन्स सांभाळणाऱ्या  एकत्र कुटुंबातील स्त्रीयांची ही प्रातिनिधिक कहाणी आहे. 

सध्याच्या लाॅकडाऊनच्या अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक कुटुंबातील प्रश्न, समस्या नक्कीच वेगवेगळे आहेत. कुठे परावलंबी जेष्ठ नागरीक तर कुठे लहान मुले. सतत सर्व जणांची एकमेकावर डोकी आपटणार. त्यातून घरातील वातावरण आनंददायक ठेवायला, आवश्यक आहे आपापल्या मोबाईलमधून बाहेर पडून घरातील मंडळीशी संवाद साधायची. 

अहो आई आणि ए आई हा फरक तसा नेहमीच राहतो. तरीही या काळातील अहो आई आणि ए आई असा फरक मुलींसाठी तसा कमीच झाला आहे. या लाॅकडाऊनच्या मिळालेल्या वेळेमुळे तो अजून कमी झाला असेल. अशी अपेक्षा आहे. 

— सौ. वीणा आशुतोष रारावीकर

Avatar
About सौ. वीणा आशुतोष रारावीकर 2 Articles
सौ. वीणा आशुतोष रारावीकर यांनी संगणक तंत्रज्ञान, व्यवस्थापन व पदार्थविज्ञान या विषयात उच्चशिक्षण घेऊन दीड दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय कंपन्यात विविध देशांमध्ये काम केले आहे. एक लोकप्रिय ललित लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक कथा, लेख, कविता, पुस्तक परिक्षण, अर्थगर्भ सुविचार असे त्यांचे विविधांगी लिखाण नामवंत वृत्तपत्रे व माॅम्सप्रेसो या ब्लाॅगसाइटवर प्रकाशित झाले आहेत. माॅम्सप्रेसो ब्लाॅगसाइटवर त्यांच्या शंभर शब्दांच्या अनेक कथा प्रसिध्द झाल्या आहेत. त्यातील अनेक कथा पहिल्या पाच क्रमांकामध्ये निवडून आलेल्या आहेत. तसेच या ब्लाॅगसाइटवर त्यांचे शेकडो फॉलोअर्स आहेत. जीवनाच्या विविध क्षेत्रांचा मनस्वी आस्वाद घेणाऱ्या या लेखिकेला योगाभ्यास, पर्यटन, वाचन, क्रीडा प्रकार आणि टपाल व चलन संग्रह यातही रुची आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..