नवीन लेखन...

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता, अध्याय २ :: श्लोक २३ आणि २४.

:: विज्ञान आणि अध्यात्म ::
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: |न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: || गीता २:२३ ||अच्छेद्योयम् अदाह्योयम् अक्लेद्योयम् अशोष्य एव च |नित्य: सर्वगत: स्थाणु: अचलोयम् सनातन: || गीता २:२४ ||

श्री. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे विवेचन :या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही तसेच त्याला वार्‍याने सुकविताही येत नाही. (२:२३)हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. (२:२४)
तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षाअस्त्रे, चक्रीवादळे इत्यादी जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत, आधुनिक अग्नीवर्षाव करणार्‍या शस्त्रास्त्रांव्यतीरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू आकाश इत्यादी पासून बनविलेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारीसुध्दा अग्निशस्त्रांमध्ये केली जाते. परंतू प्राचीनकाळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वांपासून बनविलेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्निशस्त्रांचा प्रतिकार जलास्त्रांनी (वरूणास्त्र) केला जात असे. पण अशी वरूणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवनास्त्राचे ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्रांद्वारे त्याचा संहारही होऊ शकत नाही.
श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात…
हा अनादि नित्यसिध्दु, निरुपाधि विशुध्दु, म्हणऊनि शस्त्रादिकी छेदु, न घडे यया,,हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे, एथमहासोषु न प्रभवे, मारुताचा,,
प्रा. ह. भ. प. सोनोपंत दांडेकर यांचे, सार्थ ज्ञानेश्वरी या ग्रंथातील भाष्य :
याला (आत्म्याला) शस्त्रे तोडीत नाहीत, अग्नि जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही व वारा सुकवीत नाही. या आत्म्याचा छेद होणे, दाह होणे, तो आर्द्र होणे किंवा शुष्क होऊन जाणेही अशक्यच आहे. हा नित्य, सर्वव्यापी. स्थिर, अचल आणि सनातन आहे. हा आत्मा अनादि, नित्यसिध्द, (शास्वत असणारा), उपाधिरहित व अत्यंत शुध्द असा आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगाने घात होत नाही. हा आत्मा प्रलयकाळाच्या पाण्याने बुडत नाही, हा अग्निने जळणे संभवत नाही; येथे वायूच्या महाशोषणशक्तीचा प्रभाव चालत नाही.
श्रीस्वामी रामसुखदासजी महाराज म्हणतात…शस्त्रे, अग्नी, जल, आणि वारा शरीरीला (शरीरात राहणारा आत्मा) काहीही करू शकत नाही. शस्त्रे पृथ्वी तत्वापासून तयार केलेली असतात. म्हणजे पंचमहाभूतापैकी आकाशतत्वात कोणतीही क्रिया करण्याची शक्ती नाही. आकाशतत्व पहिल्या चार महाभूतांना फक्त अवकाश (जागा) देते, कोणतीही क्रिया करीत नाही. या शरीरीला शस्त्रे कापू शकत नाहीत कारण ते प्राकृत शस्त्र तेथपर्यंत पोचूच शकत नाहीत. जेव्हढी म्हणून शस्त्रे अअहेत ती सर्व पृथ्वीतत्वापासून उत्पन्न झालेली असतात. हे पृथ्वीतत्व या शरीरीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही.येव्हढेच नव्हे तर हे पृथ्वीतत्व शरीरीपर्यंत पोचूच शकत नाही. नाही तर मग विकृती करण्याची गोष्ट तर दूरच राहिली, शस्त्रे, अग्नी, जल, आणि वारा शरीरीला (शरीरात राहणारा आत्मा) काहीही करू शकत नाही. शस्त्रे पृथ्वी तत्वापासून तयार केलेली असतात. म्हणजे पंचमहाभूतापैकी आकाशतत्वात कोणतीही क्रिया करण्याची शक्ती नाही. आकाशतत्व पहिल्या चार महाभूतांना फक्त अवकाश (जागा) देते, कोणतीही क्रिया करीत नाही.
लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथात केलेले विवेचन :याला म्हणजे आत्म्याला शस्त्रे तोडीत नाहीत, याला अग्नि जाळीत नाही, तसेच याला पाणी भिजवीत नाही, व वायू सुकवितही नाही. (कधीही) न तुटणारा, न जळणारा, न भिजणारा व न सुकणारा हा आत्मा, नित्य, सर्वत्र भरलेला, स्थिर, अचल व सनातन म्हणजे चिरंतन आहे.
थोडे विचार मंथन ः
सजीवांच्या शरीरात आत्मा नावाची चेतना असते हे निर्विवाद सत्य आहे. त्याचे मूर्त स्वरूप कुणाला दिसले का? आत्मा या संकल्पनेवर अध्यात्माचा डोलारा उभा आहे. सजीवाचे शरीर जीर्ण झाले म्हणजे त्यातील आत्मा निघून तो दुसर्‍या नव्या शरीरात प्रवेश करतो. जुने शरीर मरते तर नवे शरीर जिवंत होते.
आधुनिक विज्ञानानुसार, आनुवंशिक तत्व असल्याशिवाय सजीवाचे शरीर अस्तित्वात येत नाही. तरूण नरमादी जेव्हा अपत्याला जन्म देतात तेव्हा त्यांच्यात, त्यांच्या जनकांकडून आलेले आनुवंशिक तत्व ते जन्य पिढीत संक्रमित करतात.
आत्म्याचे अध्यात्मिक गुणधर्म आणि आनुवंशिक तत्वाचे विज्ञानीय गुणधर्म बरेचसे मिळतेजुळते आहेत.
गीतेच्या वरील श्लोकांत आत्म्याचे दैवी गुणधर्म सांगितले आहेत. ते विचारवंतांच्या अनुभूतीतून साकार झाले आहेत. प्रत्येकाला ते अनुभवता येत नाहीत किंवा पडताळूनही पाहता येत नाहीत. आत्म्याचे कोणत्याही शस्त्राने तुकडे करता येत नाहीत. कुणी त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी झाला? कुणी त्याला जाळण्याचा प्रयत्न केला आणि तो आत्मा जळला नाही? कुणी त्याला पाण्याने भिजविण्याचा आणि वार्‍याने सुकविण्याचा प्रयत्न केला? आणि तो (आत्मा) भिजबिता किंवा सुकविता आला नाही?
सजीवांच्या शरीरात आत्मा नावाची चेतना असते हे निर्विवाद सत्य आहे. त्याचे मूर्त स्वरूप कुणाला दिसले का? मग त्याचे तुकडे कसे करणार? त्याला जाळणार कसे? त्याला ओला कसा करणार? किवा कसा सुकविणार?हे विश्व, ही आकाशगंगा, ही सूर्यमाला, हे ग्रह, ही पृथ्वी, हे सूर्यचंद्र, हे डोंगर, या नद्या, हा पाऊस, ही झाडे, या वनस्पती, हे प्राणी, हे मासे, हे पक्षी…. हे सगळे जाणवते वास्तव आहे त्याअर्थी ते कुणीतरी महाशक्तीमान, महाबुध्दीवान व्यक्तीने केव्हातरी निर्माण केलेच असणार. ती व्यक्ती म्हणजे ईश्वर हा तर्कशुध्द विचार आदिमानवाच्या मेंदूतही आला
तसेच पृथ्वीवरील सर्व सजीव जन्म पावतात, त्यांची शरीरे वाढतात, वयात आली की नरमादी प्रेम करतात, आपल्या प्रजातीच्या पिल्लांना जन्म देतात, आपल्या इच्छेनुसार वागतात, हिंडतात फिरतात, आहार घेतात वगैरे वगैरे. हे जिवंतपण असेतो सर्व व्यवहार चालतात पण ही चेतना निघून गेली की ते मरतात. सजीवांच्या या चेतनेला विचारवंतांनी आत्मा हे नाव दिले.
ईश्वर आणि आत्मा या दोन संकल्पना, सर्व मानवसमूहात, आणि सर्व धर्मात फार पूर्वीपासून रूढ झाल्या आहेत. विचारवंतांनी आणि धर्ममार्तडांनी, या संकल्पनांच्या आधारावर अध्यात्माचे डोलारे उभारले. त्यामुळेच मानवसमूहांची कुटुंबव्यवस्था स्थिर राहिली, संस्कृती विकास पावल्या आणि समाजव्यवस्था टिकून राहिल्या.
सजीवांचे शरीर आणि त्याचा आत्मा यांचे संबंध, धर्मशास्त्रात विस्तृतपणे विचारात घेतले आहेत. शरीर अशास्वत, विनाशी, असत् आहे तर आत्मा शास्वत, अविनाशी, सत् आहे. आत्मा म्हणजे पुरूष आणि शरीर म्हणजे प्रकृती, आत्मा म्हणजे शिव आणि शरीर म्हणजे शक्ती, आत्मा ईश्वराचा अंश आहे. तो जेव्हा शरीर धारण करतो त्यावेळी त्याला जीव, जीवात्मा, शरीरी, देही असे म्हणतात. मुक्ती मिळेपर्यंत, जीव, जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकलेला असतो वगैरे संकल्पना पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. कारण, धार्मिक ग्रंथात, पोथ्यापुराणात, अनेक विचारवंतांनी, प्रवचनकारांनी आणि धार्मिक नेत्यांनी, गेल्या शेकडो वर्षापासून या संकल्पनांचा प्रचार केला आहे. हे विचार सामान्य माणसांच्या मेंदूत इतके ठासून भरले आहेत की, त्यापेक्षा निराळे विचार त्यांना पटणेच अशक्य आहे असे म्हणावेसे वाटते.
अध्यात्म्याचे बाबतीत आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवते, ती ही की, धर्ममार्तंड जे जे सांगतील त्या सर्वावर सामान्य माणसांनी पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांचे विचार पूर्णतया स्वीकारले. त्या संबंधी ना कोणते प्रश्न विचारले ना कोणते आक्षेप घेतले. धर्माविरुध्द वागणे म्हणजे महाभयंकर पाप आहे. आणि मेल्यानंतर नरकवास निश्चित. पुढला जन्म हीन योनीत होणार हेही निश्चित अशी ठाम समजूत होती.
विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ ::सजीवांच्या शरीरात आत्मा नावाची चेतना असते हे निर्विवाद सत्य आहे. त्याचे मूर्त स्वरूप कुणाला दिसले का? मग त्याचे तुकडे कसे करणार? त्याला जाळणार कसे? त्याला ओला कसा करणार? किवा कसा सुकविणार?
मानवी पेशीत ४६ गुणसूत्रे आणि सुमारे ३० हजार जनुके असतात. ती सोबतच्या चित्रात Nucleus असे लिहिले आहे तेथे हे आनुवंशिक तत्व असते. पुरुषाच्या शुक्राणूत हे आनुवंशिक तत्व असते पण त्यात अर्धी म्हणजे २३ गुणसूत्रे असतात. ही गुणसुत्रे पुरूषाच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातून आलेली असतात. तसेच स्त्रीच्या बीजांडातही अर्धी म्हणजे २३ गुणसूत्रे असतात आणि ती तिच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातून आलेली असतात. शुक्राणू आणि बीजांड यांचा संयोग झाला म्हणजे फलित गर्भ पिंडात ४६ गुणसूत्रे होतात आणि हा संच मरेपर्यंत कायम राहतो.
सजीवांच्या जिवंत पेशींच्या केंद्रकात, आनुवंशिक तत्व म्हणजेच सृजनशील तत्व (जेनेटिक मटेरियल), गुणसूत्रे, जनुके, डी. एन. ए. वगैरेंच्या स्वरूपात असते. ते इतके सूक्ष्म असते की, शस्त्रांनी, सजीव शरीराचे कितीही लहानलहान तुकडे केले तरी पेशींचे तुकडे होत नाहीत. आगीत मात्र पेशी जळतात आणि आनुवंशिक तत्वही जळून खाक होते. सजीव शरीरातील पेशींच्या द्रवातच, आनुवंशिक तत्व कार्यक्षम राहू शकते.
हे आनुवंशिक तत्व, साडेतीन अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी पृथ्वीवर आले, त्यात उत्क्रांती होतहोत लाखो प्रजाती निर्माण झाल्या आणि शेवटी सुमारे ७० लाख वर्षांपूर्वी कपिपासून मानव निर्माण झाला. पृथ्वीवर जोपर्यंत सजीव जगू शकतील तोपर्यंत हे आनुवंशिक तत्व, सजीवशरीर धारण करीत राहणार आहे.
आत्मा म्हणजे आनुवंशिक तत्व असे असले तरी गीतेतला हा श्लोक आनुवंशिक तत्वाला पूर्णतया लागू होत नाही.एक सजीव मारला किंवा जाळला म्हणजे पृथ्वीवरील ती प्रजाती नष्ट होत नाही तसेच एक झाड तोडले म्हणजे पृथ्वीवरील सर्व झाडे नाहीशी होत नाहीत. म्हणूनच कोट्यवधी वर्षांपासून आनुवंशिक तत्व टिकले आहे आणि जोपर्यंत पृथ्वीवर सजीवांना जिवंत राहण्यासारखी परिस्थिती अस्तित्वात आहे तोपर्यंत आनुवंशिक तत्वाचेही अस्तित्व अबाधित राहणार आहे.
आनुवंशिक तत्व आणि सजीवांच्या शरीराच्या संबंधाविषयी हे शास्त्र विकसित झाले आहे आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावाही शास्त्रज्ञांनी मिळविला आहे. डॉली मेंढीचा जन्म आणि कृत्रिम गर्भधारणा करून, मूल न होऊ शकणार्‍या जोडप्याला अपत्यप्राप्ती करून दिलेली आहे. हे प्रयोग म्हणजे, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा या संकल्पनेचा प्रत्यक्ष पुरावा म्हणता येईल.
हे आनुवंशिक तत्व या पृथ्वीवर कसे आणि कुठून आले याचे, पुराव्यानिशी स्पष्टीकरण विज्ञानाला अजून देता आले नाही. आपल्याला कोणत्याही घटनेचे किंवा घटकाचे स्पष्टीकरण देता आले नाही म्हणजे आपण त्याचे श्रेय, पुराव्याअभावी, ईश्वराला देतो. पण तो ईश्वर आणि तो पुरावा कुणालाही सापडत नाही.

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

2 Comments on विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता, अध्याय २ :: श्लोक २३ आणि २४.

  1. श्री. समीर देसाअी :: अुत्तर : मंगळवार २० सप्टेंबर २०१६.

    जीव किंवा आत्मा हे देहाचेच भाग आहेत. पारंपारिक अध्यात्मात ते वेगळे आहेत ही संकल्पना, गेली हजारो वर्षे प्रचलीत आहे. आत्मा अविनाशी आहे तर देह नाशवंत आहे हेही गृहीतक प्रचलीत आहे. सजीवांच्या शरीरात जी चेतना असते तिला आत्मा हे नाव दिलं आहे. पण तो आत्मा अविनाशी आहे आणि तो मेलेल्या शरीरातून निघून जातो, भटकत राहतो, पुन्हा जन्म घेतो वगैरे संकल्पनांना वास्तव पुरावा नाही.

    आत्म्याच्या आनुवंशिक तत्वानुसार, शरीरातील आनुवंशिक त्तव हाच आत्मा आहे या संकल्पनेनुसार, आत्मा आणि देह हे वेगळे नाहीत. शरीर अचेतन झालं म्हणजे नाश पावतं आणि त्यच बरोबर आनुवंशिक तत्व म्हणजे आत्माही नाश पावतो. सजीव जेव्हा अपत्यांना जन्म देतात तेव्हा त्यांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व अपत्यांच्या शरीरात संक्रमीत होतं. हाच आनुवंशिक तत्वाचा महणजे आत्म्याचा पुनर्जन्म.

    अप्रत्यक्षपणे तुम्ही शोषितांचं शोषण हे स्वाभाविक आहे असं म्हणत शोषक-वर्गाबरोबर हातमिळवणीच करता…
    या विधानाचा अर्थबोध होत नाही. अधिक स्पष्ट करावा.

  2. . . . . . अस्तित्वाचा अर्थ किंवा अस्तित्वाचे प्रश्न नीट समजून घ्यायचे असतील तर देह आणि जीव (आत्मा?) असं दुहेरी विश्लेषण करावंच लागतं. आत्म्याच्या जागी DNA structure दाखवून काहीच निष्पन्न होत नाही आणि अप्रत्यक्षपणे तुम्ही शोषितांचं शोषण हे स्वाभाविक आहे असं म्हणत शोषक-वर्गाबरोबर हातमिळवणीच करता…

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..