नवीन लेखन...

ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड

आपल्या वाद्यांच्या परीसस्पर्शाने गाण्याचं सोनं करणारे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड यांच्या कलाकर्तृत्वाला अरुण पुराणीक यांनी दिलेला उजळा.

काही वेळा एखादं गाणं ऐकत असताना एखाद्या वाद्याची सुरस साथ, सोलो पीस चटकन आपले लक्ष वेधून घेतो, त्या परीसस्पर्शाविषयी कुतूहल जागृत होतं आणि त्या अनामिक कलाकाराला प्रत्यक्ष भेटण्याची उर्मी दाटून येते. देव आनंद-साधनाचा ‘हम दोनो’ पाहिला आणि त्यातील सिगारेट लाइटर म्युझिकच्या प्रेमात पडलो. तसा म्युझिकल लाइटर विकत घेण्यासाठी अख्खी मुंबई पालथी घातली. कालांतराने कळले तो पीस, संगीताचा तुकडा केरसी लॉर्ड या असामान्य प्रतिभाशक्तीच्या वादक कलाकाराने वाजवला होता. केरसी त्या काळात ग्रॅण्ट रोड पुलाजवळ ए-१ इराणी हॉटेलच्या वर राहत होते. केरसीचे वडील कावस लॉर्ड १९४०च्या सुमारास ताजमहल हॉटेलमध्ये एका बॅण्ड पथकात वादन करायचे. १९४५ मध्ये गोव्याहून प्रसिद्ध जाझ ट्रम्पेट वादक चिकचॉकलेट (चिको वाझ) मुंबईला आले. लाहोरहून कुक्कू डान्सर मुंबईत आली. अकॉर्डीयन वादक गुडी सिरवाईना कावसनी बोलावून घेतले. व्हायोलिन वादक जेरी फर्नांडिसही त्यात सामील झाले. या सर्वांनी मिळून ‘जिरोम एण्ड हिज जाइव्ह बॉईज’ हा बॅण्ड तयार केला. कुक्कूच्या पहिल्या फिल्मी नृत्याचं ध्वनिमुद्रण याच बॅण्डने केलं.

सी. रामचंद्र म्हणजे कल्पक व तल्लख बुद्धीचे संगीतकार. सतत काहीतरी नवं आणि वेगळं संगीत देण्याच्या प्रयत्नात ते असत. जाझ संगीतावर त्यांचं विशेष प्रेम होतं. दिवसभर गाण्यांचं ध्वनिमुद्रण करून मध्यरात्री ते बॅण्ड ऐकायला ग्रीन्स हॉटेलमध्ये चिकचॉकलेटकडे येत असत. त्यांना कावस लॉर्ड यांचं विविध पाश्चिमात्य तालवाद्यांवर असलेलं प्रभुत्व भावलं. त्या बॅण्डमधील सर्व कलाकारांना घेऊन पाश्चिमात्य शैलीचं फिल्मी संगीत करण्याचं त्यांनी ठरविलं. नेमकी त्याच काळात मुंबई इलाख्यात दारूबंदी जाहीर केली गेली. नाइट क्लबज, बार बंद झाले. उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणं आवखश्यक होतं म्हणून हे सर्व सी. रामचंद्र यांच्या वाद्यवृंदात सामील झाले. कावसनी आपल्या बरोबर जाझ ड्रम्स, बोंगो, कोंगो, कबास, रेसोरेसो, कॅस्टनेट, चायनीज ब्लॉक्स, वूड ब्लॉक, व्हायब्रोफोन आदी लॅटिन अमेरिकन वाद्यं सोबत आणली. या सर्वांनी नवीन प्रकारचं फिल्मी संगीत तयार केलं. त्यांच्या ‘मेरी जान संडे के संडे’, ‘जवानी की रेल चली जाए रे’ (शहनाई), ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (समाधी), ‘मोम्बासा मोम्बासा’ (सरगम), ‘मेरे पिया गये रंगून’ (पतंगा) या गाण्यांनी सर्वत्र धमाल उडवून दिली.

कावसच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या तिन्ही मुलांनी, बालपणापासूनच पियानो, अॅकॉर्डियन, ड्रम व इतर लॅटिन अमेरिकन वाद्यं शिकण्यास सुरुवात केली. कावस हे कठोर शिक्षक होते. मुलांकडून ते रोज बारा तास सराव करून घेत. हॉलिवूडच्या ‘लव्हज ऑफ कारमेन’ या स्पॅनिश चित्रपटाकडून कारदारनी ‘जादू’ (१९५१) या वेशभूषाप्रधान चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील गाण्यांसाठी कावसनी प्रथमच कॅस्टनेट (हाताच्या मुठीत धरून बोटांनी वाजवायचं स्पॅनिश वाद्य) वाद्याचा उपयोग केला. शमशादच्या ‘लारा लू लारा लू’ गाण्यात पंधरा वर्षांच्या केरसी लॉर्डने वडिलांबरोबर कॅस्टनेट वाजवलं आहे. इतर वादक दोन्ही हातांनी त्याची एक जोडी वाजवतात तर केरसी आणि त्यांचे वडील कावस एकाच वेळी दोन्ही हातांनी दोन जोड्या वाजवत. आर. डी. बर्मनच्या ‘छोटे नवाब’मधील ‘मतवाली आंखोवाले’ गाण्यात केरसी लॉर्डनी दोन्ही हातांनी दोन जोड्या वाजवल्या आहेत. ‘जादू’मधील ‘लो प्यार की हो गई जीत’ गाण्यात केरसीनी बोंगोवादन केलं आहे. खंजिरीचा उपयोग पूर्वीपासून भारतीय संगीतात केला जायचा. वादक तालासाठी धातूच्या चकत्यांचा वापर करीत. केरसी लॉर्डनी खंजिरी वादनात अमेरिकन शैली आणून ते पूर्ण वाजविण्यास सुरुवात केली.

नैन मिले नैन हुए बांवरे (तराना)
आ जा अब तो आजा (अनारकली)
हंस हंस के हसीनो से (यास्मिन)

धातूच्या त्रिकोणी ट्रँगलचा वापर आपल्याकडे तमाशात तालासाठी केला जातो. केरसीने तेच वाद्य आपल्या स्टाईलने ‘नया दौर’ चित्रपटातील, ‘साथी हाथ बढाना…’ गाण्यात वाजवलं आहे.

घोड्यांच्या टापांचा आवाज निर्माण करण्याचं प्रथम श्रेय आर. सी. बोराल व पंकज मलिकला जातं (चले पवन की चाल) परंतु घोड्यांच्या टापांचा अस्सल ध्वनी निर्माण करण्याची किमया लॉर्ड यांचीच! दोन रिकाम्या करवंट्या फरशीवर वाजवून त्यांनी तो आभास निर्माण केला आहे. ‘मांग के साथ तुम्हारा’ (नया दौर)

मिश्कीलपणा हा पारशांचा गुणधर्म आहे. रेकॉर्डिंगमध्ये ते खूप गमतीजमती करत. ‘दिल का हाल सुने दिलवाला’ (श्री ४२०) मधील ‘चुकचुक’ आवाज ही त्यांचीच कल्पना होती. ताल वादनातही केरसी अनेक प्रयोग करत. ‘जाने क्या तूने कहीं’ (प्यासा) गाण्यात त्यांनीच प्रथम चायनीज टेंपल ब्लॉक्सचा उपयोग केला. गाण्याचा ऱ्हीदम नीट ऐकल्यास लक्षात येईल!

‘काला पानी’मधील ‘अच्छा जी मैं हारी चली’ गाण्यात केरसीनी अॅकॉर्डियन व कावसनी त्यांच्या वडिलांनी बोंगो वाजवला आहे. केरसीचं हे अॅकॉर्डियनवरचं पहिलंच गाणं होतं, तरीही त्यांनी गाण्यातील मधुबालाचा मिश्कील भाव आपल्या वादनातून हुबेहूब प्रदर्शित केला.

देव आनंदच्या ‘हम दोनो’मधील केरसी लॉर्डनी वाजविलेल्या सिगारेट लायटरच्या म्युझिकमुळे ग्लॉकनस्पिअल हे जर्मन वाद्य सिनेसंगीतात प्रचलित झालं. ‘आराधना’ चित्रपटाच्या संगीत नियोजनाची बैठक चालू होती. सचिनदानी गाण्याची पार्श्वभूमी केरसीना सांगितली. पावसात चिंब भिजलेले नायक व नायिका शेकोटीसमोर बसून ऊब घेत आहेत. या सिच्युएशनवर रोमॅण्टिक गाणं करायचं आहे. मनोहरी सिंग सुरुवात करेल, पुढे काय करायचं ते तू ठरव. बोंगो कावस लॉर्ड, अॅकॉर्डियन केरसी, सॅक्साफोन मनोहरी सिंग व व्हायब्रोफोन बजी लॉर्ड. दहा मिनिटं या सर्वांनी आपसात चर्चा केली व एका शृंगारिक गाण्याला जन्म दिला- ‘रूप तेरा मस्ताना…’

हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ ६० टक्के गाण्यात कावस, केरसी व बजी या लॉर्ड फॅमिलीचं योगदान आहे. एकट्या केरसीचीच पंधरा हजार गाणी आहेत. त्यामुळे सर्वांचा उल्लेख करणंही कठीण आहे. आपल्या परम मित्राचं – पंचमचं – निधन झाल्यावर केरसीनी २००० साली सिनेव्यवसायातून निवृत्ती पत्करली.

केरसी लॉर्ड यांनी वाजवलेली काही गाणी

तुम जो मिल गये हो – हसते जख्म – ऑर्गन
ये मेरा दिल – डॉन – ऑर्गन
अन्धे जहाँ के अन्धे रास्ते – पतिता – बोंगो
ये रात भीगी भीगी – चोरीचोरी – बोंगो
जोर लगा के हैय्या – जाल – बोंगो
मैं ना जानू – काली घटा – बोंगो
तस्वीर तेरी दिल में – माया – अॅकॉर्डियन
मेघा छाए आधी रात – शर्मिली – अॅकॉर्डियन
देख कसम से – तुमसा नही देखा – कॅस्टनेट
हर नजर में सौ अफसाने – शबनम – कॅस्टनेट
सारे के सारे – परिचय – अॅरेंजमेंट
पाकिजा – पार्श्वसंगीत
मेरे जीवनसाथी – साथी – अॅरेंजमेंट
दिल तो पागल है – डान्स म्युझिक

— श्री. अरुण पुराणिक
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..