नवीन लेखन...

वाढता लखलखाट

पृथ्वीचं तापमान वाढत आहे. त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. याची काही उदाहरणं म्हणजे, पृथ्वीवरच्या ध्रुवप्रदेशांतील बर्फाच्छादित क्षेत्र कमी होणं, हिमनद्यांचं आकसणं, मोठ्या हिमखंडांचे आणखी तुकडे होत जाणं. गेल्या मे महिन्यात तर अंटार्क्टिकाच्या उत्तरेकडील समुद्रातल्या बर्फाच्या थराचा (रोन आइस शेल्फ), सुमारे २४० किलोमीटर लांब आणि सुमारे २५ किलोमीटर रुंद असा एक प्रचंड तुकडा, वेगळा होऊन हिमनगासारखा स्वतंत्रपणे समुद्रात तरंगू लागला. ठिकठिकाणचे हवामानातील तीव्र बदल हेसुद्धा या पृथ्वीच्या वाढत्या तापमानाशी निगडित असल्याचं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. जंगलांतील वणव्यांच्या संख्येतील वाढीमागे उन्हाळ्यांची वाढती तीव्रता, हे एक कारण असण्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी पूर्वीच वर्तवली आहे. आता तर हवामानाशी निगडित आणखी एक परिणाम संशोधकांच्या लक्षात आला आहे. आणि तो आहे आर्क्टिक परिसरातील विजांशी संबंधित…

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातर्फे विजांची संख्या मोजण्यासाठी ‘वर्ल्ड वाइड लाइटनिंग लोकेशन नेटवर्क’ ही यंत्रणा उभारली आहे. ही यंत्रणा म्हणजे जगभर पसरलेलं संवेदकांचं जाळं आहे. एखाद्या ठिकाणी जेव्हा वीज चमकते, तेव्हा त्यावेळी तिथे रेडिओ लहरींची निर्मिती होते. वीजनिर्मितीदरम्यान निर्माण झालेल्या रेडिओ लहरी, या संवेदकांद्वारे टिपल्या जातात आणि विजेची नोंद होते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या रॉबर्ट होल्झवर्थ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अलीकडेच आर्क्टिक प्रदेशात, सन २०१० ते २०२० या काळातील जून, जुलै आणि ऑगस्ट या उन्हाळी महिन्यांतील विजांच्या संख्येचं विश्लेषण केलं. आर्क्टिक प्रदेशातले हे महिने वादळी असल्यानं, या काळात विजा चमकण्याची शक्यता अधिक असते. होल्झवर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या विश्लेषणातून एक महत्त्वाची बाब नक्की झाली, ती म्हणजे आर्क्टिक प्रदेशांतील विजांची वाढलेली संख्या! २०२० सालच्या जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत, या प्रदेशात एकूण सुमारे ३,८०,००० विजांची नोंद झाली. सन २०१०पासून २०२०पर्यंतच्या अकरा वर्षांत, विजांच्या अपेक्षित संख्येत तिप्पट वाढ झाली असल्याचं ही संख्या दर्शवते. या विश्लेषणातली पुढची गोष्ट म्हणजे, या काळातल्या वर्षानुरूप वाढत्या सरासरी तापमानाला अनुसरून ही संख्या वाढते आहे. या अकरा वर्षांच्या काळात पृथ्वीच्या, जून ते ऑगस्ट महिन्यांतील सरासरी तापमानात ०.३ अंश सेल्सियसची वाढ झालेली आहे.

विजेच्या निर्मितीसाठी हवा ही सतत खालून वर जात राहायला हवी. हवेच्या पुरेशा प्रवाहांच्या अभावी थंड प्रदेश हे वीजनिर्मितीच्या दृष्टीने अनुकूल नसतात. त्यामुळे आर्क्टिक प्रदेशातील विजांची संख्या इतर ठिकाणच्या विजांच्या संख्येपेक्षा कमी असते. किंबहुना, उत्तर ध्रुवावर अजुनपर्यंत विजेची नोंद झालेली नाही. त्यातल्या त्यात उत्तर ध्रुवाजवळची विजेची नोंद म्हणजे सन २०१९मध्ये उत्तर ध्रुवापासून ५२ किलोमीटर अंतरावर झालेली नोंद. आर्क्टिक प्रदेशात विजांची संख्या वाढत असल्याचं शास्त्रज्ञांनी काही काळापूर्वी ओळखलं होतंच. सन २०१९मधली ही नोंद एका दृष्टीनं वीजनिर्मितीतील वाढीची द्योतक आहे. आर्क्टिक प्रदेशातलं तापमान हे पृथ्वीवरील इतर प्रदेशांपेक्षा अधिक गतीनं वाढत असल्याचंही दिसून आलं आहे. साहजिकच या विजांच्या संख्येचा तापमानवाढीशी असणारा संबंध तपासण्यासाठी रॉबर्ट होल्झवर्थसारख्या हवामान शास्त्रज्ञांनी आपलं लक्ष आर्क्टिक प्रदेशाकडे वळवलं आहे. रॉबर्ट होल्झवर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विश्लेषणानुसार, २०१० सालच्या जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत पृथ्वीवर लखलखणाऱ्या दर हजार विजांमागे दोन विजा आर्क्टिक प्रदेशात नोंदल्या जात होत्या. मात्र, २०२० साली हाच आकडा दर हजारी सहापर्यंत वर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे आर्क्टिक प्रदेशातही हवेचे प्रवाह आता काहीसे सहजपणे वर जाऊ लागले आहेत. याचा परिणाम विजांची संख्या वाढण्यात होत आहे. होल्झवर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गणितानुसार, जर आर्क्टिक प्रदेशातील जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांतल्या तापमानाची सरासरी वाढ अर्ध्या अंशापर्यंत पोचली तर, याच काळातल्या पृथ्वीवरच्या दर शंभर विजांपैकी एक वीज ही आर्क्टिक प्रदेशातली असेल.

आर्क्टिक प्रदेशातील विजांच्या वाढत्या लखलखाटामुळे एका महत्त्वाच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधलं गेलं आहे. नेदरलँड्समधील फ्री युनिव्हर्सिटी ऑफ ॲ‍मस्टरडॅम या विद्यापीठातील प्राध्यापक सँडर व्हेरावर्बेक यांच्या संशोधनानुसार आता उत्तरेकडील प्रदेशांतील जंगलांना लागणाऱ्या वणव्यांची संख्याही वाढत असल्याचं दिसून आलं आहे. सन २०१७मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या शोधनिबंधानुसार, त्याअगोदरच्या दोन वर्षांत अलास्का आणि कॅनडातील वणव्यांची संख्या कधी नव्हे इतकी वाढली होती. मुख्य म्हणजे या वणव्यांपैकी निम्म्याहून अधिक वणव्यांना विजा कारणीभूत ठरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, विजांची वाढती संख्या आणि वाढतं तापमान यांच्या संबंधांवर आधारलेलं, होल्झवर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन अतिशय महत्त्वाचं ठरलं आहे. मात्र त्यांनी अभ्यासलेला अकरा वर्षांचा काळ हा काहीसा छोटा आहे. त्यामुळे या संशोधनाला दीर्घ काळाच्या निरीक्षणांची जोड देणं गरजेचं आहे. पुढील वर्षी नॉर्वे, स्वीडन, फिनलंड आणि एस्टोनिया या उत्तरेकडील देशांतील विजांच्या मापनाची वीस वर्षांची माहिती उपलब्ध होईल. या माहितीवरून रॉबर्ट होल्झवर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या निष्कर्षांतील अनिश्चितता कमी करणं शक्य होईल.

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: Jan Baumbach – Wikimedia

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..