नवीन लेखन...

उम्मीद पर दुनिया कायम है

“काका-काकू.. बरेच वर्ष दोघंच राहायचे .. आधी मुलगा होता सोबत , पण मोठेपणी तो भारतीय सुरक्षा यंत्रणेशी निगडीत कुठल्याश्या गुप्त मिशनवर गेला असता, तिथेच बेपत्ता झाला .. काहीच ठावठिकाणा नाही .. तो त्या मिशनमध्ये शहीद झाला अशा अफवा सुद्धा आल्या .. ते ऐकून इकडे काकूंना मानसिक धक्का.. पार अंथरूणाला खिळल्या .. मरणासन्न अवस्थेत …. अवघ्या तिशीतल्या मुलाबद्दल असं ऐकून आईची अशी अवस्था होणं स्वाभाविकंच होतं .. काही दिवसांनी मिशनच्या संबंधितांचं बोलावणं आलं म्हणून काका दिल्लीला रवाना झाले .. आले ते अगदी आनंदात .. मुलाच्या मृत्यूच्या बातम्या अखेर अफवाच होत्या .. गुप्तता असल्यामुळे बाकी सविस्तर काही समजलं नसलं तरी त्याचं पार्थिव अजूनही मिळालं नाही .. बहुतेक मुलगा अजूनही मिशनवरच आहे .. पण कधी परत येईल , संपर्क कधी होईल ते सांगता येत नाही .. सगळ्यांना अगदी हायसं वाटलं .. काकूंनी तर काही दिवसात कातच टाकली .. “आज ना उद्या तो नक्की येईल”.. या आशेवर काका-काकू दिवस ढकलू लागले ..

मुलगा कधीही आला तरी त्याचं जंगी स्वागत करता येईल इतक्या सज्ज असायच्या काकू कायम .. दोघांच्या गप्पात त्याचा विषय निघाला नाही असा एकही दिवस गेला नाही .. मिशनचं पुढे काही समजलं नाही म्हणून काकांनी अधून मधून दिल्लीला पत्रव्यवहार सुद्धा केला पण उत्तर काही आलं नाही .. गुप्तता पाळणे हेच उत्तर !!.. त्याच्या फोटोला त्यांनी कधीही “हार घातला नाही” आणि कधी “हार मानलीही नाही” .. तो येणार ही एकमेव “आशा” .. हेच त्यांच्या जगण्याचं बळ .. काकू तर फोटो समोर बसून कधीकधी बराच वेळ बोलायच्या .. त्याच्या वाढदिवशी फोटोचं औक्षण करायच्या .. त्याच्या आवडीचे पदार्थ करायच्या.. वाट बघायच्या आणि शेवटी रात्री एखाद्या गरीब गरजू मुलाला देऊन टाकायच्या .. सणासुदीला , दिवाळीला सुद्धा तसंच .. काकांचा सुद्धा खूप पाठिंबा होता काकूंच्या या सगळ्याला .. दोघंही खूप सकारात्मकतेने करायचे सगळं .. कधी धीर सोडला नाही .. असाच एक-एक दिवस पुढे सरकत १२ वर्ष झाली .. काका-काकू आता आजी-आजोबा दिसू लागले .. अशाच एका रात्री काकू शांत झोपल्या .. पण सकाळी उठल्याच नाहीत .. १२ वर्षांपूर्वी हुलकावणी दिलेल्या मृत्यूचं पारडं आज मात्र जड होतं ..

दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीतली काही जुनी मंडळी काकांना भेटायला आणि चहा-नाश्ता वगैरे द्यायला आली .. काका शांतपणे खिडकीत बसून बाहेर बघत होते …सगळे म्हणू लागले .. “काका ss .. काळजी घ्या .. सांभाळा स्वतःला आणि काही लागलं तर नक्की सांगा !!”..

काकांचा अगदी समाधानी चेहरा .. दुःखाचा लवलेशही नाही.. “अरे .. मी व्यवस्थित आहे .. काही काळजी करू नका !!”.. “काकू झोपेत गेल्या .. काही त्रास न होता .. .. ते एका अर्थी बरंच झालं .. पण जाण्याआधी एकदा मुलगा भेटला असता तर !! .. त्याचंच वाईट वाटतं बघा राहून राहून !!”.. एक आज्जी पदर पुसत म्हणाल्या.

“अहो कसा भेटेल तो .. भेटणार नव्हताच तो कधी ss !!”

“म्हणजे ??”

“अहो वहिनी .. या sss , माझ्या या sss हातांनी अग्नी दिलाय हो मी त्याला ..दिल्लीला जाऊन !!” ..

“बाप रे !! काय सांगताय काय ?? काकू का म्हणायच्या मग अशा ??”..

“आठवतेय ना तुम्हाला तीची तेव्हाची अवस्था .. जवळजवळ वरती पोचलीच होती की ती .. म्हणून मीच सांगितलं तसं .. तिला जगण्यासाठी “आशा” निर्माण केली फक्त मनात तेव्हा .. असं खोटं सांगून ती पुढे किती वर्ष काढेल ; २ वर्ष-५ वर्ष-२० वर्ष.. मला माहिती नव्हतं .. पण मी माझ्या मुलाला गमावलं होतं आणि आता बायकोला गमवायचं नव्हतं ..

“अरे मग ती पत्र ??.. एका समवयस्क मित्राची शंका. “आमच्याच गावाच्या बंद घराच्या पत्त्यावर पाठवायचो रे .. मध्ये एकदा गेलो तेव्हा सगळा खच पडला होता पत्रांचा .. जाळून टाकला .. अशा बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या इतक्या वर्षात .. तिला हे कळू नये म्हणून .. .. बिचारी भोळी होती हो आमची सौ.. त्यामुळे सोपं गेलं सगळं .. गुप्त मिशनच्या नावाखाली फसवू शकलो तिला .. पण ज्या कारणासाठी हे लपवण्याचं पाप मी अंगावर घेतलं तो हेतु सफल झाला .. अपराधी वाटतंच रे खूप .. पण आज त्या आशेवर १२ वर्ष बोनस आयुष्य मिळालं याचंच समाधान .. तसं ५-७ वर्षांपूर्वी अप्रत्यक्ष सांगून बघितलं तिला .. “तो देशसेवेत कामी आला असेल तर ते अभिमानास्पद आहे” वगैरे .. तर त्या रात्री तापाने फणफणली बिचारी .. मग लक्षात आलं की ही “आशा” हाच तिचा श्वास आहे .. ये “उम्मीद” ही उसकी जिंदगी है .. मग तेव्हापासून मात्र मी कधी विषाची परीक्षा नाही घेतली ..

समोर बसलेल्यांना नक्की कसं व्यक्त व्हावं हेच समजत नव्हतं .. त्यानाही धक्काच होता हा सगळा .. काका मात्र बोलतंच होते .. “तुम्ही म्हणाल आता मुलाला भेटायची इच्छा राहिली तर कावळा कसा शिवेल पिंडाला .. पण त्याच्या गेल्याची बातमी समजल्यावर हिनी प्राण सोडला असता तर तेव्हा तरी शिवला असता का हो कावळा ss ? ऐन तिशीतला पोर गेला हे किती अवघड आहे पचायला .. पण निदान त्या आशेवर राहिल्यामुळे आमच्या हिला १२ वर्ष देऊ शकलो हेच काय ते .!!. यात माझी अवस्था जास्तच बिकट होती .. माझं तर एक तप २४ x ७ गुप्त मिशनच चालू आहे .. ती निदान खऱ्याखुऱ्या आशेवर तरी होती ..मला मात्र सत्य माहिती असूनही , “देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या आपल्या मुलाचा वाटणारा अभिमान” कधी मुक्तपणे व्यक्त करू शकलो नाही .. उलट तो आज ना उद्या येणार असं म्हणणं जास्त अवघड होतं .. तिचे आणि माझे मिळून अगदी मोजके ८-१० नातेवाईक सोडले तर कोणालाच माहिती नाही हे .. बाकी कोणाकडे जाणं येणंच नाही फार आणि वेळ तरी कोणाला आहे इतका चौकशा करायला…. “हम दो और हमारी उम्मीद” .. फक्त “ती लेकाच्या आशेवर आणि मी त्या माऊलीच्या”.. हाच काय तो फरक .. हिरोशिमा हल्ल्यानंतर या आशेच्या जोरावर तर जपान पुन्हा दिमाखात उभं राहिलं.. .. लहान बाळ सुद्धा रांगताना-चालताना अडखळतं-पडतं .. पण पुन्हा प्रयत्न करतं ते पुढच्या वेळेस नक्की जमेल ही आशा मनात असते म्हणूनच ना ! .. आता हे गेल्यावर्षीचं कोरोना प्रकरण बघा ना !!.. बिचारी इतकी निर्दोष माणसं मारली गेली .. इतके संसार उद्ध्वस्त झाले .. अगदी जगभर .. पण तुम्ही-आम्ही अजून जगतो आहोतच ना ? धक्क्याने गेलो नाही .. कारण हीच “उम्मीद” .. आज ना उद्या हे सगळं संपेल आणि पुन्हा सगळं पूर्ववत होईल या आशेवरच टिकलोय.” . असंच आख्खं वर्ष काढलं ..आता पुन्हा आकडे वाढले .. “पुन्हा नवी आशा .. नई उम्मीद”..

इतक्या वर्षाचं साठलेलं सगळं बाहेर येत होतं .. काकांच्याही एकदम ते लक्षात आलं .. “अरे चला ss .. तुम्ही सगळे कामाचे लोकं .. मी रिकामा आहे .. नाहीतर म्हणाल यांचं सांत्वन करायला आलो ss तर म्हातारा लेक्चरच द्यायला लागला .. उलट तुम्ही मला जे सांगताय तेच आता मी तुम्हाला सांगतो …. तुम्हालाच कधी काही मदत लागली तर मला नक्की सांगा .. कारण आता मला कसलेच पाश नाहीत .. ना शारीरिक ना मानसिक .. मै हू जब तक ये उम्मीद है .. “उम्मीद रे बाबांनो .. शेवटी इस “उम्मीद पर दुनिया कायम है !!” .. “उम्मीद पर दुनिया कायम है !!”

©️ क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..