नवीन लेखन...

तुमको न भूल पाएँगे- भाग १

सुप्रभात आणि सप्रे म नमस्कार मंडळी !
कसं काय मंडळी मजेत ना?आणि आपला नेहेमीचा आपुलकीचा प्रश्न ” वाचताय ना? वाचायलच पाहिजे , कारण घेऊन आलोय तुमच्या आवडीचा कार्यक्रम उदय सप्रे म प्रस्तुत चला , { आनंदाने } जगण्याची दवा येऊ द्या ! { झी आणि डाॅ.नीलेश साबळेंची क्षमा मागून !
मंडळी , आपण अनेकदा वाचलंय की अमुक तमुक व्यक्तीला अमुक तमुक संन्यासी बाबांनी वा बुवांनी आशिर्वाद दिला की “जा बाळ , तू मोठ्ठा कलाकार होशील!” आणि मग तो अमुक तमुक इसम खरंच तसा घडतो ! पचवायला जड असतात अशा गोष्टी पण आज मी तुम्हाला एक अशी हकिगत सांगणार आहे की जी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की या हकीगतीमधला हा बालक , जो मोठेपणी एक अद्वितीय कलाकार व एक उत्कृष्ट माणूस म्हणून नावारूपाला आला आणि ज्याचं संपूर्ण श्रेय हे त्याला आशिर्वाद देणार्‍या त्या अनामिक गुमनाम फकिराचं नसून त्या बालकाच्या स्वत:च्या वेडात आणि त्या वेडापायी एकेकाळी सर्व त्याग करून घेतलेल्या अविश्रांत मेहनतीचं आहे! चला तर मग , सुरुवात करतो…..

पंजाबमधल्या अमृतसरमधे कोटला सुलतानसिंग नावाचं एक खेडेगांव.तिथे मोहम्मद हाजी अली नावाचे एक गृहस्थ रहात — त्यांना असलेल्या ८ अपत्यांपैकी सातव्या क्रमांकाचा मुलगा होता फिको . कालांतराने मोहम्मद हाजी अली यांनी लाहोरला स्थलांतर केलं आणि तिथे ते भाटीगेट येथील नूर मोहल्ल्यात एका माणसाचं सलून चालवत.

फिको एंव्हाना ६ वर्षांचा झाला होता.गल्लीमधे येणारे एक फकीर गाणं गाऊन खैरात मागायचे. { आपल्या महाराष्ट्रात याला वासुदेव म्हणतात ! } फिकोला त्यांचा आवाज प्रचंड आवडायचा.त्यामुळे फिको त्यांच्या मागेमागे फिरायचा.फकीर दमून कुठेतरी आरामासाठी टेकायचा अाणि त्या वेळात हा चिमुरडा फिको त्या फकिराच्या गाण्यांचा सराव करायचा.हळुहळु फिकोच्या जीवनातला हा एक नित्यक्रमंच होऊन गेला होता.एक दिवस त्या फकिराने फिकोला आपली गाणी म्हणताना ऐकलं , तो प्रसन्न झाला व फिकोला कडेवर घेतलं ! { हल्लीच्या ६ वर्षाच्या मुलाला कडे ला घ्यावं लागतं ! } फकीर फिकोला म्हणाला , “बाळ , तू एक दिवस खूप मोठा गायक होशील!”तेंव्हा फिको अवघ्या ६ वर्षांचा होता!
फिकोचा मोठा भाऊ मोहम्मद दीन याचा एक मित्र होता — अब्दुल हमीद.

या फकीरबाबा घटनेनंतरंच काहि दिवसांनी फिको हमीदबरोबर एका दुकानात गेला होता.फिको पंजाबी गाणं गुणगुणंत होता.संगीतातील कुणी उस्ताद काहि खरेदीसाठी तिथे आले होते.फिकोचं गाणं ऐकून प्रभावित होत त्यांनी हमीदला सांगितलं ‘ या लहान वयात इतका गोडवा असलेला हा मुलगा मोठेपणी महान गायक झाल्याशिवाय रहाणार नाही!
हमीदनं हे फिकोचं कौतुक फिकोच्या अब्बूंपर्यंत पोचवलं आणि फिकोचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झालं — उस्ताद अब्दुल वाहिद खान , उस्ताद छोटे गुलाम अली खाँ , पंडित जीवनलाल मुट्टो यांच्याकडे!
फकीरबाबाचा आशिर्वाद फळला…..बोलाफुलाला गाठ पडते कधी कधी…..फिकोच्या बाबत ते लवकरंच घडायचं होतं.त्याचं असं झालं…..

हमीदला फिकोचा गाण्याबद्धलचा लळा ठाऊक होता.एकदा लाहोरमधे एका मोठ्या प्रथितयश गायकाचा कार्यक्रम होता.फिकोच्या मोठ्या भावाचा मित्र —अब्दुल हमीद फिकोला घेऊन त्या कार्यक्रमाला गेला.खच्चून गर्दी जमलेली.गायक महाशय माईकसमोर येऊन गायला लागले आणि काहि सेकंदांतंच माईकची तांंत्रिक व्यवस्था फेल झाली.त्यामुळे गायक महाशयांचं गाणं काहि श्रोत्यांपर्यंत पोचेना.श्रोत्यांचा आरडाओरडा सुरु झाला. आयोजक हवालदिल ! तेंव्हा हमीदनं मौकेपे चौका मारायचं ठरवलं.तो फिकोला घेऊन आयोजकांकडे गेला व माईकशिवाय फिकोला रंगमंचावर गायला संधी द्यायची विनंती केली ! बारकुड्या १४ वर्षांच्या फिकोला बघून आयोजकांना खात्री वाटणं शक्यंच नव्हतं { तसं तर काय १९८९ ला कराचीमधे क्रिकेट कसोटिमधे भारताच्या ४१ ला ४ बाद अशा दयनीय अवस्थेत असताना ६ व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या बारकुड्या १६ वर्षांच्या सचिन तेंडुलकरविषयी पण कुणाला खात्री होती म्हणा ! पण पहिला बाऊन्सर व दुसरा बीट झालेला गुड लेंग्थ चेंडू विसरत सचिननं लाँग आॅनला सणसणीत चौकार ठोकून — बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या धर्तीवर आपली बॅट मैदानात दाखवून दिलीच की महाराजा ! }
पण आता हा बारकुडा फिको पण आयोजकांना देवदूतासारखा भासला व त्यांनी फिकोला गायला परवानगी दिली ! त्यादिवशी माईकशिवाय आपल्या खणखणीत आवाजात फिको असा काहि गायला की जनता खुश व गायक महाशय पण एकदम प्रभावित ! त्यांनी फिकोला आशिर्वाद दिला : एक दिवस तू मोठ्ठा गायक होशील ! माईकशिवाय शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोचवणार्‍या फिकोवर खूश होत पुढे त्या महान गायकाने लाहोर रेडिओकडे त्याची शिफारस केली आणि त्यामुळे फिकोला रेडिओ लाहोरवर गायची संधी मिळाली!

त्याची लाहोर रेडिओवरची गाणी ऐकून संगीतकार शामसुंदर प्रभावित झाले व त्यांनी फिकोच्या कामगिरीवर खुश होऊन लवकरंच गुलबलोच नामंक आपल्या संगीत दिग्दर्शनाखाली फिकोकडून सोणिये नी हीरिये नी हे झीनत बेगम बरोबरचं युगुल गीत गाऊन घेतलं व अशा प्रकारे १९४१ साली रिलीज झालेल्या पंजाबी गाण्याद्वारे आपल्या सिनेजगतातील पार्श्वगायक म्हणून फिको नं वयाच्या १७ व्या वर्षी पदार्पण केलं !

मंडळी , ज्या प्रथितयश गायकानं फिकोचं कौतुक करंत आशिर्वाद दिला तो महान गायक म्हणजे कुंदनलाल ऊर्फ के.एल्.सेहगल आणि हिंदी—उर्दू मातृभाषा असून ज्यानं पंजाबी गाण्यानं आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात करत पुढे ३९ वर्षं हिंदी सिनेजगतात आपलं ध्रुवपद निर्माण केलं , तो हा फिको म्हणजेच २४ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेला आणि वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी ३१ जुलै १९८० रोजी रात्री १०.२५ ला अल्लाला प्यारा झाला , तो फिको म्हणजे मंडळी रफ़ी हा एक शब्दातीत विषय आहे ! अहो , त्याच्या करिअरच्या सुरुवातीपर्यंतचा हा लेख !

मोहम्मद रफी!
आपला विनम्र,
उदय गंगाधर सप्रे म—ठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..