नवीन लेखन...

तुका आकाशा एवढा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. माधुरी विजय भट  यांनी लिहिलेला हा लेख


श्री ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या भागवतधर्माच्या मंदिरावर कळस चढविण्याची कामगिरी देहूच्या तुकोबारायांनी पार पाडली. जगामध्ये पूर्वीपासून तसेच आजही भारतीय अध्यात्मविद्या हीच अग्रणी राहून मार्गदर्शन करीत आहे.

भारतीय संतांनी विशेषतः महाराष्ट्रातील पाचही संप्रदायातील संतांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून समाजाला सुखी जीवनाचा मूलमंत्र दिला.

संत आणि समाज ही परस्परांपासून भिन्न असलेली प्रवृत्ती नसून समाजात ज्या चांगल्या-वाईट, दुष्ट-सुष्ट प्रवृत्ती आहेत त्यातील प्रतिकूलता नाहीशी करून सत्प्रवृत्त समाज निर्माण करण्याचे कार्य करणारी अनामिक शक्ती आहे.

सं – सातत्याने, सत्-कार्य करण्यास प्रवृत्त करणारा तो संत. संतत्व ही एक साधनाही आहे आणि वृत्तीही.

कृती – आवृत्ती – प्रवृत्ती या त्रयींचा हा सुरेख संगम झाला की सत् मधून सत्गुण प्रेरित होतात आणि सहजभावातून सज्जन ज्यांना म्हणावे असे संत! – विचारातून, सहज केली कृती (आचरण) – ती कृती – पुन्हा पुन्हा त्याची प्रचिती जनात येते ती आवृत्ती आणि सदाचार हा ज्यांचा सहज, नित्य सर्वकाळ असतो ती प्रवृत्ती अशा अलंकारांनी अलंकृत तो संत.

पुणे शहरापासून साधारण वीस मैलांवर ‘देहू’ या नावाचे खेडे (ज्याला आता शहराचे रूप आले आहे) त्या ठिकाणी अध्यात्मरूपी मंदिराचा कळस अशा तुकारामांचा जन्म झाला आणि ती भूमी पावनपुण्यभूमी ठरली. जवळ ‘इंद्रायणी’ नदी झुळूझुळू वाहात होती.

इ. स. १६०८ (शके १५३०) तुकाराम बोल्होबा आंबिले कुळ – मोरे. हे घराणे देहू गावचे महाजन असून, पिढीजात व्वसाय वाण्याचा. तुकारामांच्या पूर्वीच्या आठ पिढ्यांचे वास्तव्य या गावी होते. घराण्याचे मुळपुरूष विश्वंभर’. अत्यंत सुखवस्तू कुटुंबात विश्वंभरांचा जन्म झाला होता. काही कारणाने घरातील पंढरीची वारी खंडित झाली होती. विश्वंभरांच्या आईने या वारीचे स्मरण विश्वंभरांना करून दिले.

तुकारामांचे आद्य चरित्रकार आपल्या ‘भक्तलिलामृत’ या ग्रंथात वर्णन करतात
आता पंढरीस जावया कारणे ।
सिद्ध होणे सत्वर ।
तुझ्या वाडवडिली निर्धारी ।
चालविली पंढरीची वारी ।
त्यासी सर्वथा अंतर न करी ।
तरीच संसार सुफळ ।। (अध्याय २५, ओवी २३-२४)
आईच्या सांगण्यावरून विश्वंभरांनी कार्तिकीपासून ज्येष्ठापर्यंत १६ वाऱ्या केल्या. त्या सेवेने देव प्रसन्न झाले. विश्वंभरांना देवांनी दृष्टांत दिला. दृष्टांतानुसार आंब्याच्या वनात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती सापडल्या. इंद्रायणीच्या काठी ‘देहू’ गावी मूर्तीची स्थापना झाली. पूर्वीचे देहूर म्हणजे देवकुळ, देवस्थान अथवा मंदिर तेच. देहू.

घरात महाजनकी असल्याने लिहिणे, वाचणे ज्ञात होते. वडील-बोल्होबा व आई कनकाई यांचीही विठ्ठलभक्ती आणि नामोपासना उच्चकोटीची होती. यांची आषाढी-कार्तिकीची वारी कधी चुकत नसे. त्यामुळे अशा पुण्यवान दांपत्याच्या उदरी हा महात्मा जन्मास आला. बीजास अंकुर येण्यासाठी आणि तेही शुद्ध-मातीही चांगली लागते.

विठ्ठलावरील दृढ निष्ठा, भजन-पूजन, अन्नदान, गरिबांविषयी दया, संतांचा सन्मान अशा सुसंस्कारांनी तुकोबा सुशोभित झाले. सदाचार हा त्यांचा अलंकार होता. व्यवसायही सचोटीने केला जाई.

लिहिणे-वाचणे अवगत आणि भवंतभक्तीची ओढ तुकोबात उपजतच होती. त्यांनी लहान पणापासून संस्कृत भाषेचा अभ्यास केला. विशेषतः गीता आणि भागवत या प्रमुख ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता.

कथा-कीर्तने आणि भजने ऐकून तुकाराम बहुश्रूत झाले होते. बाल्य बरोबरीच्या मुलांच्यात खेळणे, इंद्रायणीवर स्नान करणे, विठ्ठलभक्तीत व्यतीत करणे यात घालवला. कुळधर्म, कुळाचार घरी चालत. त्यामुळे आईचे संस्कार खोलवर रुजले होते, तर वडिलांच्या सदाचाराने त्यांच्याविषयी सार्थ आदरभाव रुजला होता. वडिलांच्या तालमीत सदाचार न सोडता व्यवहार कसा करावा याचे शिक्षण आपोआप मिळत होते.

वयाच्या १३ व्या वर्षापासून वडिलांनी सावकारी, व्यापार आणि महाजनकी याचे व्यवहार हळूहळू त्यांच्यावर सोपविले.

तुकारामांना दोन भाऊ. मोठा सावजी व धाकटा कान्होबा. वयाच्या १७ वर्षापर्यंत पितृछत्राखाली सर्व व्यवहार सुरळीत चालले होते. वडिलांनी दोन्ही मुलांची (सावजी-तुकाराम) लग्ने लावली. तुकोबांचे लग्न १४ व्या वर्षी झाले. बायकोचे नाव रखमाबाई. संसार सुखाचा होता. परंतु सन १६३० मध्ये मोठा दुष्काळ पडला त्या आधीच मातृ-पितृछत्र हरवले होते.

दुष्काळाने कहर केला. लोक देशोधडीला लागले. तुकारामांचा व्यापार संपला. त्यातच मोठे बंधू सावजी यांची पत्नी गेली आणि भाऊ वैराग्याच्याभरात घर सोडून गेला. तुकारामाच्या पहिल्या बायकोला दमा असल्याने आई-वडिलांनी आधीच त्यांचा दुसरा विवाह करून दिला होता. पुण्यातील श्रीमंत सावकार कुटुंब. गुळवे घराण्यातील जिजाबाई तथा आवली ही त्यांची दुसरी भार्या. दुष्काळाने अन्नान्न दशा झाली होती. देणेकरी हात झाडून (हात झटकून) मोकळे झाले आणि

घेणेकरी मात्र सारख्या चकरा मारू लागले. या कठिण परिस्थितीतच पहिली पत्नी रखमा आणि मुलगा संताजी मरण पावले. संसाराचा सर्व भार तुकोबांवर पडला. आधीच निष्काम कर्म करणारे तुकोबा उद्विग्न झाले. भाव विवश तुकोबा अंतर्मुख झाले.

बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता।
बाईल मेली मुक्त झाली । देवे माया सोडविली ।
पोर मेले, बरे झाले । देवे माया रहित केले ।
माताही मेली मज देखता । तुका म्हणे ठरली चिंता ।

वयाच्या अवघ्या एकविशीच्या आतच या साऱ्या आपत्तींना तोंड द्यावे लागले. मन अधिकच उदास झाले, आप्तांनी पाठ फिरवली, गावकरी फिरले, त्यांची वैराग्यवृत्ती, दया-क्षमा, भक्ती ही नाणी व्यवहारात खोटी ठरली आणि तुकाबा चेष्टेचा विषय झाले.

सहनशक्तीला असहाय्यतेचा मुलामा दिला गेला, घराची ओढ आटली, कारण दुसरी पत्नी-जिजाऊ कर्कशा असल्याने संसाराचा अधिकच वीट आला. गुरे-ढोरे उरलीच नव्हती. दुसऱ्या पत्नीस प्रपंचाचे चटके सोसावे लागले. ‘बुवा’ पूर्ण विरक्त झाले होते.

संसार तापे तापलो मी देवा ।
करिता त्या सेवा कुटुंबाची |
म्हणुनि तुझे आठविले पाय ।
ये वो माझे माय पांडुरंगा ।

अंतर्मुख झालेले तुकोबा विठ्ठल नामात रंगून गेले आणि कधी विठ्ठलमय झाले ते त्यांनाही उमगले नाही. घरातील भग्न मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. कथा-किर्तनाने देवाचा गाभारा दुमदुमून गेला.

विठो तुझे माझे राज्य |
नाही दुसऱ्याचे काज ।।

या एकत्वाच्या भावनेने, एकांताची आवड जडली. भामनाथ किंवा भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन भजन, नाथ भागवत, ज्ञानेश्वरी, गीता यांचे वाचन व चिंतन हाच त्यांचा ‘योग’ व्हायला लागला. भामनाथाच्या गुहेत समाधी स्थितीत रममाण होऊ लागले.
जे जे घडे, ती भगवत् इच्छा ।

हा भाव दृढ होऊ लागला. प्रपंचात राहून साधकदशा पूर्णत्वाला पोचली आणि सद्गुरूंच्या भेटीची ओढ लागली.

कडकडीत वैराग्यवृत्ती, सुख-दुःख समेकृत्वा भाव वाढला होता. आपल्या अपूर्णतेची जाणीव होती आणि षड्विकारांवर विजय मिळविला होता. पण व्यावहारिक जीवन सर्वसामान्यां सारखेच होते. जगाला तुकोबांच्या सिद्धावस्थेची कल्पनाही नव्हती. तर प्रपंच तापाने आणि तुकोबांच्या अव्यवहारी वृत्तीने जिजाऊ अधिकच आक्रमक झाली होती.

उलट तुकोबा व्यावहारिक जिवनाच्या पलीकडे पोहोचले. निसर्गामध्ये, वृक्षवेलींतील परमात्मस्वरूप तृप्ती, आनंदाची अनुभूती देऊ लागले.

आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग, आनंदाचे ही अनुभूती आली. भक्तीरसात तुकोबा चिंब न्हाले. भक्तीमाय जिव्हेवर वास करू लागली. सहजउद्गार काव्य झाले. त्यात आर्तता मिसळली आणि तुकारामांचे जीवनच बदलले.

संत नामदेवांनी स्वप्नदृष्टान्त दिला. अभंगरचना करण्यास सांगितली. आपुले कार्य पुढे नेण्याचा आदेश दिला, तर स्वप्नात चैतन्य परंपरेतील बाबाजी चैतन्य नावाच्या सत्पुरुषाने माघ शुद्ध दशमी, गुरुवार शके १५६१ (२३/०१/१६४०) या दिवशी ‘रामकृष्ण हरी’ हा मंत्र दिला. तुकोबांचे जीवन कृतार्थ झाले. ज्ञानोत्तर भक्तीला प्रारंभ झाला

‘तुकोबांचे आध्यात्मिक जीवन आणि समाजाशी जोडलेली नाळ’ याचा प्रत्यय त्यांच्या अभंगातून येऊ लागला. अभंग, आत्मानुभूती असल्याने त्यात भक्तीस, करुणरस, उद्विग्नता, उद्रेक, अगतिकता, कारुण्य असे रसस्त्रोत दिसू लागले. सदगुरु स्वप्नी दिसले पण एक अपूर्णता त्यांच्या सहवासाची काव्यात प्रगट झाली-
सदगुरुराये कृपा मज केली ।
परि नाही घडली सेवा काही ।
सापडविले वाटे जाता गंगास्नान ।
मस्तकी जो जाणा ठेविला कर ।
भोजना मागती तूप, पावशेर ।
पडिला विसर स्वप्नामाजी ।
काय कळे उपजला अंतराय ।
म्हणोनिया काय त्वरा केली ।
राघव चैतन्य, केशव चैतन्य |
सांगितली खूण मालिकेची ।
‘बाबाजी’ आपुले सांगितले नाम ।
मंत्र दिला रामकृष्णहरि ।।
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार ।
केला अंगिकार तुका म्हणे ।।

समाजापासून त्रास
सद्गुरु कृपेने तुकारामांच्या चित्तवृत्ती बदलल्या. त्यांचा संसार विश्वात्मक झाला, आप-परभाव नव्हताच. त्यात ज्ञानाचा आविष्कार, सरस्वतीचा ओघवता प्रवाह, ममत्व भाव यामुळे अभंगांना प्रासादिकत्व आले. अज्ञजनांना किर्तन-कथेद्वारे गीतेचा अर्थ सोप्याभाषेत, व्यावहारिक उदाहरणांनी सांगू लागले. अखंड हरिकथा, देवाचे स्वरूप लोकांना सांगू लागल्याने सनातनी मंडळींना त्यांचा हेवा वाटू लागला.

‘बाबाजी’ चैतन्याचा उल्लेख ‘श्रीपाद श्रीवल्लभचरित्रा’त त्यांच्या ३३ पिढ्यांपूर्वीच (श्रीपादांच्या) आला आहे. बाबाजी म्हणजेच महादेव, म्हणजेच श्रीदत्त.

तर थिऑसॉफिकल सोसायटी (स्थापना अमेरिकेत न्यूयॉर्क शहरी तारीख १७ नोव्हेंबर १८७५ रोजी तर, भारतात मद्रास येथे ३ एप्रिल १९०५ रोजी कायदेशीरित्या) श्री. जे. कृष्णमूर्ती यांचेही गुरु हिमालयवासी ‘बाबाजी’ अनेक शतके सदेह आहेत.

वर्णाश्रम पद्धतीच्या समाजरचनेत वेदांचा अर्थ सांगण्याचा अधिकार ब्राह्मणांना असल्याचा दृढ समज आणि अज्ञानरुपी अहंकाराने समाजात जाती-पातीची दरी वाढली होती आणि त्यात रामेश्वर भट्ट आणि मंबाजीबुवा प्रमुख होते. त्यांच्या अहंकारे आक्रमकता घेतली, सरकार दरबारी असलेल्या वजनाचा पारमार्थिकदृष्ट्या गैरवापर केला आणि तुकोबांस अनन्वीत छळ सोसावा लागला. तुकारामांची गाथा हा त्यांचा हेव्याचा विषय ठरला. ‘तुम्हा शूद्रांना हा वेदोपदेशाचा अधिकार नाही,’ असे त्यांनी सांगितले.

मधल्या काळात कौटुंबिक हलाखी, पोरवडा, अन्नान्न दशा आणि समाजातील स्त्री शूद्रांवरील अत्याचाराने मऊ मेणासारख्या तुकोबांच्या अंतःकरणास यातना झाल्या. उच्चवर्णीयांच्या (ब्राह्मण, क्षत्रीय, पाटील, सावकार इ.) कोत्या वृत्तीच्या दर्शनाने व्यथित झालेले तुकोबा म्हणतात

याती शूद्र वैश्य केला व्यवसाय ।
आदि तो हा देव कुळपूज्य |
नये बोलोपरि पाळिले वचन ।
केलियाचा प्रश्न तुम्ही संती ।।
पण देवाने ‘बरे कुणबी केले ।’ इ. उद्गार काढले.

त्यामुळे मला ज्ञानाचा, जातीचा दंभ झाला नाही.
लोकांचा तुकोबांना अत्यंत कळवळा होता.

तुकारामांनी अवघ्या जनलोकांचा आचार-विचारांबाबत शुद्ध लोकधर्म सांगितला, मनुष्यमात्रांच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखविला. सर्वांभूती आत्मभाव अनुभवणारे आणि समभाव जोपासणारे तुकोबा, परमार्थाच्या अत्युच्च पदाला पोचले.

तत्कालीन यवनी राज्य, त्यांचे अत्याचार, स्त्रीयांस हीनत्वाची वागणूक, विशिष्ट जातींत अडकलेला ‘देव’धर्म या सर्वांवर तुकोबांनी सडकून टीका केली. प्रसंगी, मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठिण वज्रास भेदू ऐसे ।।

म्हणून कठोरही झाले. हे सर्व त्यांचे वैचारिक प्रतिबिंब अभंगातून दिसते.
अभंग आरसा शब्द झाले बिंब
शब्दची प्रतिबिंब लोकी झाले ।

तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली पण लौकीक अर्थाने त्यांचे अभंग चारी वर्णातील लोकांत मुखोद्गत झाल्याने अभंग राहिले.

सोने अग्नीत टाकल्यावर झळाळते, आणि अग्नि- केला जरीपोत बळेची खाले. ज्वाला तरी तो वरती उफाळे या न्यायाने गंगेने, त्यांचे अभंग १३ दिवस रक्षण केले आणि तरंगत गाथा तिरावर आली. या दिवसात तुकोबा अखंड नामात देहभान विसरून तल्लीन होते. अखेर भक्तीचा विजय झाला. ‘गाथा’ अभंग राहिली.

तुकारामांच्या काव्याचा विशेष बघितला तर भक्त आणि देवामधील संवाद आहे. माजस्थितीचे तुकोबांना भान आहे.

सुख देवाला मागावे
दुःख देवाला सांगावे ।। या न्यायाने आपुलाची वाद आपणासी असा हा संवाद.

विठ्ठलनामाचा हो टाहो! सर्वसामान्यांना देवप्राप्तीचा मार्ग आणि दालन उघडे केले आहे आणि यासाठी याता याती नका.

नामसंकीर्तन साधन पै सोपे । या पंढरीरायाचे प्रेम लुटा पुंडलिकाप्रति आदरभाव आहे कारण पुंडलिकासाठी परब्रह्म आलेगा याची जाण आहे.

पुंडलिको निकटसवे । कैसा धावे बराडी आपुले ते थोरपण नारायण विसरला ।

उभा करी ठेवून कर | न म्हणे पर बैससे ।
तुका म्हणे जगदीशा ।
करणे आशा भक्तांची ।।

हा देव भावाचा व सेवेचा चाहता आहे. पुंडलिकाचा सेवाभाव (मातृ-पितृ सेवा) पाहून तो त्याच्या दाराशी भिकाऱ्यासारखा आला. अनेक युगानयुगे हा नारायण कमरेवर हात ठेवून जनसेवेस्तव उभाच आहे. भक्ती तो अंकीला म्हणून कलियुगीही हा परब्रह्म परमात्मा आम्हास प्राप्त झाला. सगुणात मूर्ती रूपाने तर निर्गुणात भाव रुपाने भक्ताचा मेळावा भरवीत आहे. ज्या दिंडीखनात पंढरीत तो राहातो ती भूवरील वैकुंठनगरी झाली.

वैकुंठा जावया तपाचे सायास ।
लागे जीवा नाश करणे बहु ।।१।।
तया पुंडलिके केला उपकार ।
फेडावया भार पृथ्वीचा ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
पंढरी वैकुंठ भूमीवरी ।।

अशा प्रकारे तुकोबा या सगुणसाकार विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झाले. रात्रंदिवस विठ्ठल नामाचा छंद जडला

वि – विश्व व्यापून उरला असा तो
ठ्ठ -ठकडा – नाथांचा अभंग आहे (देव एका पायाने लंगडा ग!)
ल – कसा देवांचा देव बाई ठकडा ।

असा तो लक्ष्मीपती नारायण. त्या नारायणाची भक्ती केली की लक्ष्मी प्रसन्न होते. अर्थात ही कनककांता नसून शब्दब्रह्मा-शारदा, सरस्वती. अभंगाची गंगा दुथडी भरून भक्तीगंगा वाहू लागली.

सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची।। या उक्तीप्रमाणे ब्राह्मणाला संध्या आणि जानवे प्रमुख तसेच कविला अभंग. ज्यात भक्तिमाय आकं भक्तीप्रेम रसात चिंब भिजलेली असते. कृष्णा, भीमा, चंद्रभागा, गोदावरी भगिनी.

ज्ञानदेवांनी पहिल्या प्रथम ओवी व अभंग यांचा सुईदोरा घेऊन हरिभक्तीने विशाल वस्त्र विणले. शालू, पैठण्या, पितांबर व उत्तरीये विणली आणि पंढरीच्या पांडुरंगाला सजवले.

नामदेवांनी ज्ञानदेवांच्या संगतीत राहून घरोघरी ओवीरूप नंदादीपाचा प्रकाश पसरविला आणि अभंगांचे त्रिपुर झगमगते केले.

संत ग्रंथात ओवी-अभंगांची मक्तेदारीच आहे. भक्तीचे तबक, अभंगाचे आणि ओवीचे निरांजन. पंचप्राणांनी प्रज्वलित करून आरती ओवाळली जाते.

‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ या जाणकारांच्या उक्तीवरून संत तुकारामांची रचना सर्वोत्तम आणि भागवत धर्माचा विकास करणारी निश्चितच ठरली. गुरुकृपा आणि नामदेवांचा दृष्टान्त याने तुकोबांचे जीवनच पालटले.

नामदेवे केले स्वप्नामाजी जागे ।
सवे पांडुरंगे येऊनिया ।
सांगितले काम करावे कवित्व ।
वाऊगे निमित्त बोलो नको ।।
माप टाकी सवे धरिली विठ्ठले ।
थोपटोनि केले सावधान |
प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी ।
ठरले ते शेवटी लावी तुका ।।
नामदेवापायी तुकया स्वप्नी भेटी ।
प्रसाद हा पोटी राहिलासे ।।

साधारणपणे साडेचार हजारापर्यंत अभंग महाराजांचे उपलब्ध आहेत. त्यांच्या अभंगाचे स्थूलमानाने दोन प्रकार आत्मानुभूती (आप) – लौकीक अनुभूती (लोक).

१) तुकोबांना आलेले वैराग्य, त्यांची साधना, मनाची तळमळ, जीवाची तडफड, ईश्वराची करुण शब्दांनी केलेली प्रार्थना, आळवणी, देवावर रुसणे, प्रेमकलह, देवापाशी लडिवाळ हट्ट, एकेरीवर येणे, साधनेच्या किंवा साक्षात्काराच्या पूर्वावस्थेतील विविध अनुभवांचे चित्तवेधक व करुणेने आकंठ भरलेले अभंग. यानंतर –

२) ईश्वरभेट, त्याचा अंगसंग, जीवशिवाचे आलिंगन, मिठी. सगुण विठ्ठलाचे हर्षदायक दर्शन, त्याच्या प्रेमाने व जवळीकतेने धन्यता. आयुष्य धन्य. तन्मयता आणि तल्लीनतेचा उच्चांक सतत मनात भक्तीची उर्मी!

या प्रमुख दोन भागांमध्येच अंतर्भूत अभंग विषयाचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या अभंगवाणी मनाचा संवाद दिसतो.

तुकोबांच्या मनात पांडुरंगाविषयी अद्वैत भक्ती रूजल्यामुळे त्यांच्या मनात पंढरपूराविषयी विशेष भाव होता.

जया दोषां परिहार । नाही नाही धुंडिता शास्त्र | ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ।।
सकळ तीर्थांचे माहेर । भूवैकुंठ निर्विकार ।
नामाचा गजर । असुरकाळ कापती ।।
(गणूदास – शिर्डी माझे पंढरपुर साईबाबा रमावर
शुद्धभक्ती चंद्रभागा । भाव पुंडलीक जागा ।।
ऐका महिमा आवडीची। बोरे खाय भिल्लटीची ।
थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला ।
पोहे सुदामदेवाची। फके मारी कोरडेचि ।।
न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे ।
तुका म्हणे भक्तीपुढे ।।४।।
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे साधन ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छाते ।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।
नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ।।४।।
मने मनास पुजिजे – कारण मनापासून एखादे
काम केले तरच पूर्णत्व, एखाद्यास गुरु मानले, तर देवत्व!- देव दगडात नसून, त्या मूर्तीत मनानेच आपण साकारतो. मनानेच देवत्व निर्माण करतो, पूजतो. सर्व इच्छेत मनच गुंतले आहे. मनंच गुरु, शिष्य, माता आहे. मानला तर देव नाहीतर दगड. म्हणून परमार्थात मन अनुकूल झाले, तर सद्गती देते, प्रतिकूल झाले तर अधोगती देते. म्हणून तुकाबाराय सांगतात – मनाशिवाय दुसरे दैवत नाही. त्यासाठी ‘नामाची कास’ धरावी.

नामे स्नानसंध्या केले क्रियाकर्म ।
त्याचा भवश्रम निवारला ।।१।।
आणिके दुरावली करिता खटपट ।
वाउगे बोभाट वर्माविण || २ ||
रामनामी जिंही धरिला विश्वास ।
तिहीं भवपाश तोडियेले ||३||
तुका म्हणे केले कळकाळ ठेंगणे ।
नामसंकीर्तने भाविकांनी ।।४।।
नामसंकिर्तनाला साज, बाज, साधने किंवा अन्य वेळ लागत नाही. ‘नाम’ हा जिवाचा भाव झाला की तो सहजक्रिया होते.

करो काम-धाम लेत रहियो नाम ।।
किंबहुना कर्म हीच पूजा होते आणि नाम-रूप धारण करते.

तुकोबा पुढील अभंगात म्हणतात –
बैसूं खेळू जेवूं । तेथे नाम तुझे गाऊ ।।१।।
नाम माळा । घालुं ओवुनिया गळा ||२||
विश्वास हा धरू । नाम बळकट करू || ३ ||
तुका म्हणे आता । आम्हां जीवन शरणागता ।।

मग पांडुरंगाप्रति- भक्तांविषयी स्नेह निर्माण होतो आणि –
जाणे भक्तीचा जिव्हाळा ।
तोची दैवाचा पुतळा ।।१।।
आणिक नये माझ्या मना ।
होका पंडित शहाणा ||२||
नामरुपी जडले चित्त ।
त्याचा दास मी अंकित ।।३।।
तुका म्हणे नवविध |
भक्ति जाणे तोचि शुद्ध ।।४।।

भक्तीत ढोंग नको, मागणे नको, देवाण-घेवाण नको पण दृढता आणि निष्ठा हवी. जे सुख अथवा दुःख मनाची भावना आहे. आत्माराम निर्विकार आहे तो देही-विदेही आहे. देव चराचरी व्यापला आहे, सर्वसामान्यांना दिलासा देताना सर्व वर्णास देव प्राप्ती सहज आहे, देव सर्वांचा आहे.

देव देव्हाऱ्यात नाही । देव नाही देवालयी । देव कोंडुन ठेविल, ऐसा कोण भाग्यवंत? ।
तुकोबा आश्वासन देतात, कर्मकांडात गुंतू नका त्याने देवप्राप्ती नाही तर हो कां दुराचारी ।

वाचे नाम जो उच्चारी ।।१।।
त्याचा दास मी अंकित ।
कायावाचा मने सहित ।।
पापपुण्याच्या भ्रामक कल्पनेतून उच्चवर्णियांनी इतरेतर जन आणि स्त्रीयांना वेठीस धरले होते. देव सोवळा-ओवळा यातून त्यापासून दूर ठेवले. त्यावर हा प्रहार.

आरे, तो आत्माराम एकच आहे. जया मनी जैसा भाव, तैसे रुप साकार. राम, कृष्ण, हनुमंत, हरि, दत्त किंवा माया (आदिशक्ती) हे सर्व एकाच सचित् परमात्म्याचे रूप आहे. म्हणून मुखे विठ्ठल विठ्ठल म्हणा, नरदेहाची हीच महती.

आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरीये वास ।
तो हा देवांचाही देव । काय कळिकाळाचा भेव
वेद जया गाती । शृती म्हणती नेति नेति ।।
तुका म्हणे विज । रुपडे हे तत्त्वबीज ।।
भक्तवत्सल दिनानाथ । तिही लोकी ज्याची मात ।।
तो हा पुंडलिकासाठी । आला उभा वाळवंटी ।।
गर्भवास धरी । अंबऋषींचा कैवारी ।।
सकळा देवा अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ।।
तुका म्हणे ध्यानी । ज्यासि ध्यातो शूळपाणी ।।
हरि-हर अद्वैतभक्तीचेही दर्शन येथे होते.
हर विशेष, हरि गौठ ऐसे म्हणति ।

जे त्या लागुन आणुन नरकी घालावे ।। इति
शिवलीलामृत ।।

म्हणून हा त्रिगुणात्मक देव आपला करावयाचा असेल तर अंगी भक्ती, विश्वास हवा आणि मनाची निर्मलता हवी.

नाही निर्मळ जीवन, काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही, बोध तेथे करील काही ।।

नरदेहाची शुद्धता निर्मल विचार, निर्मळवाणी आणि सदाचार यांनी आहे. कामक्रोधादी षड् विकार जाळून टाकणे, निंदा विष्टेसमान आहे. हाताने काम आणि मुखाने नाम हेच साधन आहे. तुकारामांनी प्रपंच करताना तो सचोटीने करावा, लबाडी-कपट यांपासून दूर रहावे. किंबहूना, जेथे असत्य, द्वेष, खोटेपणा आहे त्या ठिकाणचे द्रव्य अथवा अन्न वर्ज्य करावे. ऐसे ज्याचे आचरण तेथेच देव.

जेथे जाती-पातीच्या भिंती नाहीत, आपपरभाव नाही. तोच वैरागी, त्याचे आचरण हीच विरक्ती!
द्वेषभावना विरहीत भक्तीत संगतीला अनन्यसाधारण महत्त्वही विषद केले आहे. लोकापवादाकडे भक्तांनी लक्ष देऊ नये.

या अभंगात लोकप्रतिबिंब तुकोबा दाखवतात
ऐसा हा लौकिक कदा राखवेना ।
पतितपावना देवराया ।।
संसार करितां म्हणती हा दोषी ।
टाकितां आळशी पटपोसा ।
आचार करितां म्हणती हा पसारा ।
न करिता नरा निंदिताती ।।
संतसंग करिता म्हणती हा उपदेश ।
येरा अभाग्यासि ज्ञान नाही ।।
धन नाही त्यासी ठायींच कर हा ।
समर्थासि ताठा लाविताती ।।
बहु बोले जाता म्हणतिल वाचाळ ।
न बोलो सकळ म्हणती गर्वा ।।
भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर ।
येता जाता घर बुडविले ।
लग्न करू जाता म्हणती हा मातला ।
न करितां जाला नपुंसक ।।
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ ।
पातकाचे मूळ पोरवडा ।।
लोक जैसा ओक धरितां धरवेना ।
अभक्ता जिरे ना संतसंग ।।
तुका म्हणे आता ऐकावे वचन ।
त्यजुनिया जन भक्ति करा ।।

तुकारामांनी सर्वसामान्यांना भक्तीचे दालन मुक्त केल्याने उच्चवर्णीय आणि तथाकथित थोर (श्रीमंत, सरदार, सावकार इ.) त्यांच्या विरोधात गेले. धर्ममार्तंडांची बैठक भरवली. आधीच वैराग्य, वैराग्यात दारिद्र्य, कौटुंबिक अस्वास्थ्य, बाईल कर्कशा, चारी बाजूंनी संकटांनी घेरून टाकले. आप्त-स्वकीय निंदकेयांचे साथीदार झाले –

जो वरी पैसा, तोवरी बैसा
जो वरी खाऊ । तो वरी बहिण म्हणे भाऊ ।।

हा कलियुग धर्म तुकारामांनाही जाचक झाला. धर्मपिठाने – रामेश्वर भट्ट इ. यांनी अभंगवाणी म्हणजे अधिकार नसता वेदांवर केलेलीटिका हे महत्पाप आणि शिक्षा इंद्रायणीत गाथेचे समर्पण. तेव्हा तुकोबा
म्हणतात,
आपुलिया बळे नाही मी बोलत ।
सखा भगवंत वाचा त्याची ।।
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी ।
शिकविता धनी वेगळाची ।।
काय म्यां पामरे वोलावी उत्तरे ।
परि त्या विश्वंभरी बोलविले ।।
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा ।
चालवी पांगळा पायांविण ।।
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ।।

असा निर्वाळा देणाऱ्या तुकोबांचे कर्मापुढे आणि काळापुढे काही चालले नाही. जे तुका नामाचा महिमा – नामाचे सामर्थ्य जाणत होते.

राम, कृष्ण म्हणा, हरिहरि म्हणे
वाचा तोची होय भगवंताचा
राम मंत्र जगी श्रेष्ठ ।
नको काही अन्य गोष्ट ।।
हनुमंत ज्याच्या हृदयी ।
राम-सिता वास करी जिव्हे ।
नारायण मंत्र मोठा ।
होय लाभाचा साठा ||
हरि ॐ दत्त ” मन न होय देही आसक्त
गोविंद गोविंद – मना हाची मोठा छंद
म्हणा राम, गोविंद, हरि-
नारायण त्याच्या घरी
विठ्ठलरुपी अवघे देव – नको जीवा देवघेव
चुके चौऱ्यांशीचा फेरा –
रामकृष्ण मुखे म्हणा ।।
तरीही अवघ्या लोका नामे उद्धरीले
कर्म – वर्म ठरले तुकोबांसी
कर्माच्या गती गहना

भोगल्या वीण सुटेना ।

१३ दिवस गाथा चंद्रभागेमधे लुप्त होती, भक्ताची कसोटी आणि भक्तीची परिसीमा गाठली होती. तुकारामांचा सर्व भार विठ्ठलावर होता. तो जे करेल ते मान्य अशी निष्ठा आणि उचितच करेल हा विश्वास.

कोणा ठायी राग-लोभ, दोषारोप नाही भगवंत ईच्छा हाच न्याय. असंख्य बहुजन समाज श्रद्धेने तर उच्चवर्णीय, ज्ञानी, पंडित, अधिकारी असुयेने एकत्रित झाले होते. काठावर तुकोबा निर्विकार अवस्थेत भगवंत स्मरणात निश्चल स्थित होते. रसनास्त्रवु लागले, भक्तीने ठाव मांडला ध्वनि आकाशी भिडला.

तेरा दिवस जाले निश्चक्र करिता ।
न पावसी अनंता मायबापा ।।
पाषाणाची खेळ घेऊनि बैसलासी ।
काय हृषीकेशी जाले तुज ।।
तुजवरी आता प्राण मी त्यजीन ।
हत्या मी घालीन पांडुरंगा ।।
फार विठाबाई धरिली तुझी आस ।
करीन जीवा नास पांडुरंगा ।।
तुका म्हणे आता मांडिले निर्वाण ।
प्राण हा सोडिन चंद्रभागे ।।
भक्तीचा विजय झाला. गंगामातेने ‘गाथा’ जशीच्या तशी तुकोबांच्या हाती आणून दिली. त्यावेळी तुकोबा देहावस्थेत नव्हते. भक्तगणांचा जयजयकार विठुचा आणि गंगेच्या दिव्य स्पर्शाने तुकोबा देहस्थितीवर, भानावर आले. विठाईचे वात्सल्य उराउरी भेटले. या देहीचे – त्या देही एकरूप झाले आणि तुकाराम रामच झाले. आधीच मुळचे विरागी तुकोबा कमलपत्रासारखे अलिप्त झाले. आता एकची छंद मन झाले गोविंद !

आपुले मरण पाहिलें म्या डोळा ।
तो जाला सोहळा अनुपम ।।
प्रापंचिक साधकाचे शब्दचित्र रेखाटताना
१) परिसेगे सुनबाई । नको वेचू दूध-दही…
आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा।

२) नास्तिक, दुष्टांशी लढताना मऊमेणासारखे तुकोबा, कठिण वजास भेदू असे म्हणू लागले.
भले तरी देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळासी काठी देऊ माथा ।।

३) प्रापंचिक स्त्रीस -पति हाच परमेश्वर ।
त्याची सेवा तीच पूजा ।

४) सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ।।
घरोघरी आठवण । मानी संताचे वचन ।।

५) हरिहराभेद । नाही करु कधी ।।

६) महारासि सिवे । कोवे ब्राह्मण तो नव्हे ||

७) जे का रंजले गांजले । त्याची म्हणे जो आपुले।।

८) तुका म्हणे विंचू सर्प नारायण ।
वंदावे दुरून शिवो नये ।।

९) दया, क्षमा, शांती । तेथे देवाची वसती ।।

१०) देव वसे चित्ती । त्याची धरावी संगती ।।

११) धन्य आजी दिन । झाले संतांचे दर्शन ||

१२) धर्म रक्षावयासाठी । करणे आहे आम्हांसी।।
धीर तो कारण; सहाय्य होतो नारायण ।।

१३) फोडिले भांडार धन्याचा हा माल ।
तेथे मी हमाल भार वाही ।।

१४) मज पामरा । हे काय थोरपण |
पायीची वहाण । पायी बरी ।।

१५) माप आणि गोणी । तुका म्हणे रिती दोन्ही ।।
तुकारामांचे मन आता निर्विकार झाले. रिते झाले.
मागे बहुत जन्मी । हेचि करीत आलो आम्ही।।
तुकारामांचा कौटुंबिक बंध सुटत चालला होता.
चमत्काराशिवाय नमस्कार नाही. शत्रुमित्र झाले.
रामेश्वर भक्तीभावे शरण आले. आम्हा घरी साधन शब्दांचीच रत्ने इ. अभंग अ-भंग झाले.
मंबाजी, सालोमालो सारखी खोटी नाणी बासनात गेली. तुकारामांना पैलतीर दिसू लागला. जाता जाता कलीचा पराभव नामाने होईल हे सांगायला विसरले नाहीत. परनारी मातेसमान, परद्रव्य विषासमान, ते नरकाच्या द्वारी नेईल करिता भगवंत नाम मुखी ठेवून कर्माचे आचरण करा. काम (विहित कर्म) हाच राम. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म सदाचार नितीहुनी आगळानु धर्म ।। हे सांगायला विसरले नाहीत.

कान्होबा बंधू, रामेश्वर भट्ट, बहिणाबाईंसारखे ज्ञानदीप (शिष्य) लावून गेले.
जाता जाता गाथेत नाहीत पण उपलब्ध आहेत असे, पत्नीस उपदेशात्मक, संभाषण आढळते.

१) कोण येते घरा आमुच्या कशाला ।
कायज्याचात्याला धंदा नाही ।।

२) गुरुकृपे मज बोलविले देवे ।
होईल हे घ्यावे हित काही ।।
होई बळकट घालुनियां कास ।
हाचि उपदेश तुज आता ।।

३) देव पहावया करी वो सायास ।
न धरी हे आस नाशिवंत ।
दिन शुद्ध सोम सकाळी पातला ।
द्वादशी घडला पर्वकाळ ।।
नको चिंता करू वरच्या या पोटाची ।
माऊली आमुची पांडुरंग ।।
सडा-संमार्जन तुळसी वृंदावन ।
अतीत पूजन ब्राह्मणांचे ।।
वैष्णवांची दासी होई सर्वभावे
मुखी नाम घ्यावे विठोबाचे ।।
तुका म्हणे आहे पांडुरंग कथा ।
तरेल जो चित्ता धरील कोणी ।।
तुकारामांच्या मनात देवाविषयी कृतज्ञभाव आहे.

ते म्हणतात –
थोर अन्याय केला । तुझा म्या अंत पाहिला
जनाचिया बोलासाठी चित्त क्षोभविले ।
भोगविलासी केला शीण । अधम मी यातीहीन ।
झाकुनी लोचन । दिवस तेरा राहिलो ।
अवघे घालूनिया कोडे । तहानभुकेचे सांकडे ।
योगक्षेम पुढे । तुजकारणे लागेल ।
उदकी राखिले कागद । चुकविला जनवाद ।
तुम्हा म्हणे ब्रीद । साच केले आपुले ।।
शिवरायांसारखा पाठीराखा असताना संकटाचे
साकडे त्यास घातले नाही, की त्यांनी देऊ केलेले धन स्विकारले नाही.

आम्हा घरी कारण शब्दांचीच रत्ने । खऱ्या अर्थाने जगले.

तुकाराम, रामदास समकालीन. एक राजधर्म जागवत होता, शरीरबल वाढवून तरुण खंदे देशास बहाल करीत होता तर दुसरा त्याच कार्यात शरीरासंगे मनास बळ देत होता. अवघा रंग, अवघा जन, पांडुरंगी रंगे भाव या प्रकारे शिव (पवित्र) शिवकार्यात हाती हात गुंफले. दोघेही एकमेकांचा आध्यात्मिक अधिकार जाणून होते.

तुकाराम रामदासांचे वर्णन करतात.

हुर्मजी रंगाचा उंची मोतीदाणा
रामदास बाणा या रंगाचा ।
पीत वर्ण कांती तेज अघटित ।
आवाळू शोभत भृकुटी माजी ।
रामनाम मुद्रा द्वादश हे टीळे ।
पुच्छ ते वळवले कटीमाजी ।।
कौपिन परिधान मेखला खांद्यावरी ।
तुंबा कुबडी करी समर्थांच्या ।।
काष्ठाच्या खडावा स्वामींच्या पायात ।
स्मरणी हातात तुळशीची ।।
कृष्णेच्या तटाकी जाहले दर्शन ।
वंदिले चरण तुका म्हणे ।।
धन्य तुकाराम, धन्य तुणी वाणी ।
ऐकता उन्मनी दीप लागे ।।
धन्य निःस्पृहता, एकविध निष्ठा ।
शृतिभाव स्पष्ट दाखविसी ।।
संतोषले चित्त होताची दर्शन ।
कळो आली खूण अवताराची ।।
घातलासे धडा, नामाचा पै गाढा ।
प्रेमे केला वेडा पांडुरंग ।।
नवविद्याभक्ती, रुढविली जगी ।
तारु कलियुगी दास म्हणे ।।

दोघांत जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध होते. चिंचवड येथील गणेशभक्त देव यांचे मंदिरात तुकोबा व समर्थ यांनी एकत्र उपस्थितीत कथाकिर्तनांचे घमंड माजवून दिल्याचा उल्लेख – आत्माराम महाराजांच्या दासविश्रामधामात आढळतो. तुकोबांचा आणखी एक मोठेपणाचा दाखला म्हणजे,

छत्रपती शिवाजी जेव्हा अनुग्रहासाठी संत तुकारामांकडे गेले तेव्हा तुकोबांनी त्यांना समर्थांकडे रामदासांकडे पाठविले. तो या अभंगात उल्लेख ही सापडतो –

राया छत्रपती ऐकावे वचन ।
रामदासी मन लावी वेगी ।।१।।
रामदास स्वामी सोयरा सज्जन ।
त्यासी तन-मन अर्पी बापा || २ ||
मारुती अवतार स्वामी प्रगटला ।
उपदेश करील तुजलागी || ३ ||
तुका म्हणे राया तुज असो कल्याण ।
सद्गुरु शरण राहे बापा ।।४।।

तुकाराम बंधू-कान्होबा यांसही कवित्व प्रसाद मिळाला असून रामेश्वर भट्टांचेही अभंग आढळतात.

कान्होबा (तुकोबांच्या वियोगानंतर)
न लगे चिंता आता अनुमोदन हाता ।
आले मूळ भ्राता गेला त्याचे ।।
घरभेद्य येथे आहे ते सुकान ।
धरितो कवळून पाय दोन्ही ।।
धींदधींद तुझ्या करीन चिंधड्या |
ऐसे काय वेड्या जाणितले ।।
केली तरी बरे मज भेटी भावास ।
नाही तरी नास आरंभिला ।।
मरावे-मारावे या आले प्रसंग ।
बरे पांडुरंगा कळले सावे ।।
तुकया बंधु म्हणे तुझी माझी उरी ।
उडाली न धरी भीड काही ।।
सापडले जुने । आमुच्या वडिलांचे ठेवणे ।
केली नारायण । कृपा पुण्ये पूर्वीचिया ।।
सुखे आनंदरुप आता ।
आम्ही आहो याकरिता ।।
निवारिली चिंता ।
देणे घेणे चुकले ।।
जाले भांडवल घरीचे अमूल नाम विठ्ठलाचे।
सुकृत भावाचे ।
हे तयाने दाखविले ||
तुकया बंधु म्हणे फिटला ।
पांग नाही बोलायाला ।
चाड दुसरी विठ्ठल ।
बांधूनिया आणीक ।।
राम कृष्ण हरी । राम कृष्ण हरी ।।
आपणासारखे करिती तात्काळ याची प्रचिती
तुकोबांच्या चरित्रातून येते.

आता तुकोबा देही-विदेही झाले होते. देह संसारात, चित्त पांडुरंगापाशी. लौकिकातील काम संपल्याची जाणीव त्यांना झाली होती.

आम्ही देव काजासाठी या लोकी आलो सांगणारे तुका – भेटी लागी जीवा, लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।

मन अखंड तळमळत होते. अवस्था अशी की,
कन्या सासुरासी जाये ।
मागे परतुनी पाहे ।।
तैसे जाले माझ्या जीवा ।
केव्हा भेटसी केशवा? ||
जिथीचे तेथे ठेवण्याची ओढ वाढत होती
आप्तस्वकीयांचा निरोप घेत होते –
आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी।
बोलले जे ऋषी । साच भावे वर्तावया ।।
ही ओढ इतकी वाढली की भावविश्वात त्यांना दृष्टान्त झाला
आपुल्या माहेरा जाईन मी आता ।
निरोप या संता हाती आला ।
सुख-दुःख माझे ऐकिले कानी ।
कळवळा मनी करुणेचा ।।
करुनी सिद्ध मूळ साऊले-भातुके ।
येती दिसे ऐक न्यावयासी ।
त्याची पंथे माझे लागलेसे चित्त ।
वाट पाहे नित्य माहेराची ।
तुका म्हणे आता येतील न्यावया ।
अंगे आपुलिया मायबाप ।।

तुकारामांना देव-भक्त बंध अधिक प्रिय होते म्हणून ते म्हणतात
न लगे देवा तुझे आम्हांसी वैकुंठ ।
सायुज्यतापद नलगे मज ।।
देई तुझे नाम मज सर्वकाळी ।
मागणे वनमाळी हेचि तुज ||
नारद, तुंबर, उद्धव, प्रल्हाद ।
बळी रुक्मांगद नाम ध्याती ।।
सिद्ध मुनीगण गंधर्व किन्नर |
करिताती गजर रामनामे ।।
तुका म्हणे हरि देई तुझे नाम ।
अखंडित प्रेम हेचि द्यावे ।।
मोक्षपदे तुच्छ केली याकारणे ।
आम्हा जन्म घेणे युगायुगी ।।

तुकारामांना सर्वत्र नारायणरूप दिसू लागले –
शंखचक्रगदा पद्म । कासे झळके पितांबर ।।
भाव विठ्ठलमय झाला आणि –
घालू देवासीच भार ।।
जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ।।
देवा सांगो सुख-दुःख । देव निवारील भूक।।
देव सुखाचा सागर ।
राही जवळी देवापाशी।
आता जडोनि पायाशी ।।
तुका म्हणे आम्ही बाळे ।
या देवाची लडिवाळे।।
सर्व शब्द मूक होऊ लागले. भक्त-भाविक-हुणगे-फुणगे वाळवंटात जमले. तुका देहभान हरपले होते. वैकुंठवार्ता सर्वत्र पसरली. कुणी कुतूहलाने, कुणी भक्तीने, कुणी सर्वभावाने अनुपम्य सोहळ्यात सामील झाले. टाळ, मृदुंग, ढोल, निनादू लागले. वारकऱ्यांनी ‘जय-जय रामकृष्ण हरी’चा ठेका धरला, पाय थिरकू लागले आणि क्षण आला –

वैकुंठाहून आले विमान |
अद्भुत प्रसंग भूलोकी ।।

आवडी-मुले येईपर्यंत पांडुरंगास धीर नव्हता. भगवंतभेटी निकट येऊ लागली –
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।
गुण गाईन आवडी । हेची माझी सर्वजोडी ।।
न लगे मुक्तिधनसंपदा । संतसंग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी।।

अवघ्या जनांस नामाचा मार्ग दाखवून देव आपल्यातच आहे, तो सोवळा न ओवळा. सत्य हाच देव. सदाचार हा धर्म, कर्माचे पान ही नीती, मातृ-पितृसेवा ही भगवंत पूजा सांगणारा तुका अखेरचा निरोप घेत होता –
आम्ही जातो आमुच्या गावा ।
आमुचा राम राम घ्यावा ।।
तुमची आमची हेचि भेटी ।
येथुनिया जन्म तुटी ।।
आता असो द्यावी दया ।
तुमच्या लागतसे पाया ।।
येता निजधामी कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ।।
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ।।
अघटित करणी देवे केली ।
सदेह गेला तुकावाणी ।।
देवे धरिले हाताशी ।
उचलुनी घेई अंकावरती ।
क्षण पापणी न लवते ।
वैकुंठी तुकयासी नेते ।।
तुका झाला देवरुप |
मुक्ती पावे सायुज्य ।।
लोकांत तुकारामांच्या सदेह गमनाविषयी मतांतरे आहेत. परंतु रामेश्वर भट्ट, जे प्रथम तुकोबांच्या गाथेविषयी, खंडण करीत होते, तेच पुढे अनुयायी झाले. ते प्रत्यक्ष साक्षी आहेत, ते म्हणतात पंडित वैदिक अथवा दशग्रंथी ।
परि सीर न परती तुकयाची ।।
शास्त्र ही पुराणे गीता ।
नित्य नेमे वाचिताती ।
वर्म न कळे त्यांसी ।
कर्म अभिमाने वर्ण अभिमाने ।
नाडले ब्राह्मण कलियुगी ।
तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाई ।
भाव त्याचा पायी विठोबाचे ।।
अमृताची वाणी वरुषला शुद्ध ।
करि त्या अशुद्ध ऐसा कोण ।।
चहु वेदांचे हे केले विवरण ।
अर्थहि गहन करुनिया ||
उत्तम, मध्यम, कनिष्ठ वेगळे ।
करुनी निराळे ठेविले ते ।।
भक्ति ज्ञान आणि वैराग्य आगळा ।
ऐसा नाही डोळा देखिलिया ।।
जप-तप यज्ञ लाजविले दाने ।
हरिनाम किर्तने करुनिया ।।
मागे कवीश्वर झाले थोर थोर ।
नेले कलेवर कोण सांगा ।।
म्हणे रामेश्वर सकळा पुसोनि ।
गेला तो विमानी । बैसोनिया ।।
दुसरा साक्षी अर्थ – श्रुतिने तुकारामांचा तिसरा पुत्र नारायण महाराज
सायुज्य मुक्ती विवरणा प्रमाणे ।
रुपी मिसळले देवभक्त एक झाले ।।
नुरले काही भूवरी । युक्तीच्या अवस्था ।
सायुज्यता म्हणजेच वैकुंठगमन.

आकाश, वायू, अग्नि, जल, पृथ्वी हा पंचभूतात्मक देह. याचे विघटन असे.

गाथेत वाराणसीपर्यंत आपण सुखरूप गेल्याचे तुकोबांचे निवेदन –

सांगावा-निरोप संतांसी ।
येथुन आम्हा जाणे निजधामी ।

(हिमालयातून) भक्ताचा भाव पराकोटीचा झाला की कुडी, चित्त पावन होते.

सगळ्या पृथ्वीची प्रसवप्रक्रिया जसे उदा. माती-मडके-त्यावर नक्षीकाम. भाजले जाणे, फुटले की पुन्हा चिखल-माती.

त्याप्रमाणे –
देह पंचमहाभूतात्मक –
परब्रह्म परमात्मा – माया – त्रिगुणात्मक प्रकृती. महतत्त्व – अहंकार, तीन इंद्रियांची निर्मिती.
तन्मात्रा – देवतांची निर्मिती, पंचमहाभूतात्मक देह.
१) पृथ्वीतत्त्व – जलात, जलातून अग्नित, अग्नितून वायु, आकाशात. अहंकार तामस, राजस, सात्विक महाबुद्धि महातत्त्वात – प्रकृतित जातात. साम्यवस्थेत जाते. मायेत – माया ईश्वरात-प्ररब्रह्म परमात्म्यात हा प्रतिप्रसव. म्हणून या प्रमाणे योगिक तपश्चर्या ज्याची पूर्ण झाली त्याला देह टाकावा लागत नाही. ही प्रक्रिया क्षणार्धात, डोळ्याचे पाते लवते न लवते तद्वत घडते.

म्हणून तुकाराम गेले सदेह वैकुंठी पृथ्वीची कथा सांगण्यास. पंढरीचे भाग्य, देव तेथे राहे । देव-भक्त झाले एकरूप नामी – भगवंत-निर्गुणी राहतो-सगुण होई भक्तांसाठी. तुका देव झाला रामी । तुकाराम रंगला । अवकाशी झाला आकाश!

— सौ. माधुरी विजय भट

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..